July 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

आदरणीय कोरियन भिक्षू पोमन्युन सुनीम यांनी सांगितलेली एक गोष्ट

माझू नावाचा भिक्षू शरीरास कष्ट देऊन खूप ध्यानधारणा करीत असे. आपल्या गुरूंच्या सर्व सूचनांचे पालन करीत असे. कोणी त्याला भेटावयास आले तरी तो दुर्लक्ष करीत असे. एके दिवशी त्याचे गुरु हुएरआँग त्याच्याजवळ आले आणि त्यांनी त्याला विचारले “तू काय करीत आहेस ?”
“मी ध्यानधारणा करीत आहे.” माझू म्हणाला.
तू ध्यानधारणा कशाला करीत आहेस ?
“ज्ञानप्राप्तीसाठी.”
“अच्छा यासाठी का ?” एवढे बोलून त्याचे गुरु निघून गेले.

शिष्य माझू याला थोडी गंमत वाटली. कारण गुरू यांनी जे सांगितले आहे त्याप्रमाणे तो करीत होता आणि परत तेच विचारत आहेत की तू काय करीत आहेस ?

थोड्या वेळाने ध्यान साधना करताना माझू यास घासण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. साधना करताना कुठल्याही आवाजाने विचलित व्हायचे नसते, अशी शिकवण माझू याला दिली होती. परंतु घासण्याचा आवाज तसाच येत राहिल्याने जिज्ञासा जागृत होऊन त्याने हळूवार डोळे उघडले. तेव्हा त्याने बघितले की गुरु हातात दोन विटा घेऊन एकमेकांवर घासीत आहेत. त्यांच्या या कृतीबद्दल बुचकाळ्यात पडून त्याने गुरूंना विचारले की “आपण हे काय करीत आहात ?”
“मी आरसा बनवीत आहे.” गुरु बोलले.
यावर माझू बोलला,
“दोन विटा एकमेकांवर घासून तुम्ही आरसा कसा बनविणार ?”

गुरू म्हणाले, “मग तू शरीरास कष्ट देऊन, साधना करून ज्ञानप्राप्ती कशी करणार ? विटा एकमेकांवर घासून आरसा तयार करणे हे जसे मूर्खपणाचे आहे तसेच नुसते ध्यानस्थ बसून ज्ञानप्राप्ती प्राप्त करणे वेडेपणाचे आहे.

“मग ज्ञानप्राप्ती मला कशी होईल ?” माझू यास प्रश्न पडला.
गुरु म्हणाले,
“जेव्हा तू रथ हाकीत असतोस तेव्हा रथ जर हलत नसेल तर तू चाबूक घोड्याला मारतोस का रथाला मारतोस ?”
“निश्चितच, मी घोड्याला मारतो.” माझू उत्तरला.
“तर मग तू रथाला चाबुक का मारीत बसला आहेस ?”

गुरूंचे बोलणे ऐकून माझू याचे डोळे खाडकन उघडले. शरीरास राख फासून, टिळा लावून, पेहराव बदलून, कष्ट देऊन ध्यान धारणा करणे उचित नाही. जे ध्येय मनाच्या साह्याने गाठायचे आहे, त्यास उल्हासित केले पाहिजे. त्यास शील पालनाच्या फटकाऱ्याने वठणीवर आणले पाहिजे. कुशल विचारांच्या झाडूने अंधश्रद्धेची जळमटे, मोह,राग,द्वेष विकार काढून मन स्वच्छ ठेवले पाहिजे. मन प्रफुल्लित झाले की त्याची तरंगे शरीरभर पसरून ते देखील प्रफुल्लित होते. बुद्धांचा आणि त्यांच्यानंतर अहर्त झालेल्या भिक्षूंचा, नाथांचा, संतांचा, स्वामींचा हाच उपदेश आहे की नुसतेच वाचन आणि पठण नको. त्यातून प्रेरणा घेऊन मनास वळण लावा. दृढ निश्चयाने बसून, एकाग्रता साधून ध्यान साधना केल्याने फळ प्राप्त होईल. टिळा लावून, केस दाढी वाढवून आणि पेहराव बदलून मनास वळण लावता येत नाही. संत माणसाचे सोंग आणता येत नाही. धम्म धारण केला की तो उपजतच शरीर धारेवर दिसू लागतो. मी धार्मिक आहे हे कुणाला सांगण्याची गरज पडत नाही.

—– संजय सावंत

🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️