September 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

मातंग समाजातील भावना यादव असिस्टंट कमांडर मुलीने घेतली बौद्ध धम्माची दीक्षा !

मुंबई ( चेंबूर ) : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कमांडरपदाच्या परीक्षेत मुलींमध्ये देशातून प्रथम आलेल्या मातंग समाजातील भावना यादव हिने बौद्ध धम्म स्वीकारला आहे. तथागत भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर प्रेरित होऊन तिने हा निर्णय घेतला आहे.
यूपीएसी व एमपीएससीचा अभ्यास करताना तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे तत्त्वज्ञान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांकडे आकर्षित होऊन भावनाने भांडुप येथील नाहूर परिसरातील राजगृह बुद्ध विहारात जाऊन भदन्त बोधिशील स्थविर यांच्या हस्ते बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आहे.
सुभाष यादव हे भावनाचे वडील मुंबई पोलिस दलात सहायक फौजदार म्हणून बोरिवली येथील वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. भावनाचे प्राथमिक शिक्षण अंधेरीच्या सेंट झेव्हियर्स शाळेत झाले. मागील काही वर्षांपूर्वी यादव कुटुंबीय मिरा रोडमध्ये स्थायिक झाले आहेत. त्यानंतर भावनाने १० वीपर्यंतचे शिक्षण येथील शांतिपार्क येथील सेंट झेव्हियर्स शाळेतून पूर्ण केले आहे. पुढे विरारच्या विवा कॉलेजमध्ये तिने एमएससीपर्यंत शिक्षण घेतले आहे.
२०२० मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कमांडरपदाच्या परीक्षेत मातंग समाजातील भावनाने बाजी मारली. देशभरातील एकूण १८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यात भावना १४ व्या क्रमांक पटकावून देशात मुलींमध्ये पहिली आली. महाराष्ट्रातील ती एकमेव विद्यार्थिनी उतीर्ण झाली होती. सध्या हैदराबादला ती प्रशिक्षण घेत आहे.