📚 बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ
प्रथम खंड : भाग तिसरा – नव प्रकाशाच्या शोधात
🌼 ४. तपश्चर्येच्या मार्गावर 🌼
१. गौतमाने सांख्य दर्शन आणि समाधी मार्गाचा अनुभव घेऊन पाहिला. परंतु तपश्चर्येच्या मार्गाचे
परिशीलन न करताच त्याने भृगू ऋषीचा आश्रम सोडला होता.
२. त्याला असे वाटले की या मार्गाचेही अध्ययन करावे, अनुभव घ्यावा, तरच त्याला या मार्गाविषयीही अधिकारवाणीने बोलता येईल.
३. त्यानुसार गौतम गया नगरीकडे प्रयाण करता झाला. त्याने आसपासच्या भूप्रदेशाचे अवलोकन केले. गयेचा राजर्षी नेगारी याचा आश्रम उरुवेला येथे होता. गौतमाने तपश्चर्येसाठी त्याच्याच आश्रमात वास्तव्य करण्याचे ठरविले. तपश्चर्येच्या दृष्टीने योग्य असा हा आश्रम निरंजना नदीच्या काठी एकांत स्थानी होता.
४. ज्यांनी त्याला शांतीवार्ता कथन केली होती ते राजगृही भेटलेले पाच परिव्राजक त्याला उरुवेला येथेही भेटले. ते सुद्धा तपश्चर्येत लीन होते.
५. त्या परिव्राजकांनी त्याला पाहिले. त्याला आपल्या सोबत घेण्याच्या हेतूने ते त्याच्या निकट गेले. गौतमाने सहमती व्यक्त केली.
६. त्यानंतर त्यांनी गौतमाची मनोभावे सेवा केली. जणूकाही ते त्याचे शिष्यच ते विनम्र होते. ते
आज्ञाधारक होते.
७. गौतमाची तपश्चर्येनिमित्त देहपीडेची, आत्मक्लेशाची प्रक्रिया उग्र स्वरूपाची होती.
८. तो प्रतिदिन दोनच गृही भिक्षाटनासाठी जात असे. तो कधीही प्रतिदिन सात गृहांपलीकडे भिक्षेसाठी जात नसे. तो एका गृहस्वामिनीकडून फक्त दोनच ग्रास अन्न ग्रहण करीत असे. तो एका गृहस्वामिनीकडून सात प्रासांपेक्षा जास्त अन्न कधीही ग्रहण करीत नसे.
९. तो एके दिवशी एकच वाटी अन्न ग्रहण करीत असे. तो एके दिवशी सात वाट्यांपेक्षा जास्त अन्न ग्रहण करीत नसे.
१०. कधी तो दिवसातून एकदाच तर कधी दोन दिवसातून एकदाच अन्न ग्रहण करीत असे. अशाप्रकारे कधी सात दिवसातून एकदा तर कधी पंधरवाड्यातून एकदाच तो अन्न ग्रहण करीत असे. त्याने अन्न ग्रहणाची मात्रा कठोरपणे नियंत्रित केली होती.
११. जसजशी त्याची तपश्चर्या उग्ररूप धारण करू लागली तस तसा त्याचा आहारही बदलत होता वनातील हिरवी कंद-मुळे, रानात उगवलेले धान, रानातच उगवलेले अन्नधान्य कण, वृक्षाची साल, जल वनस्पती, धानाच्या आतील भागातील लालसर कण, भाताची पेज किंवा तेलबियाचे सारतत्त्व हाच त्याचा आहार होता.
१२. रानातीन कंदमुळे किंवा वाऱ्याने उडून आलेले धान्य कण किंवा वरून पडलेली फळे हाच
त्याचा आहार होता.
१३. त्याची वस्त्रे तागाची किंवा ताग आणि लक्तरे किंवा वृक्षाची साल किंवा मृगचर्म किंवा गवत किंवा लाकडाचे तुकडे किंवा माणूस आणि पशुंच्या केसांच्या विणलेल्या घोंगड्या किंवा घुबडाचे पंख यापासून तयार केलेली असत.
१४. तो आपल्या डोक्याचे आणि दाढीचे केस उपटून काढीत असे. तो ताठ मान करून पद्मासनाच्या मुद्रेतच बसत असे. तो उठून उभा राहत नसे. तो बसल्याबसल्याच स्थानांतरण करीत असे.
१५. अशा रीतीने विविध प्रकारे तो आपल्या देहाला कष्ट, पीडा देत होता त्याच्या तपश्चर्येने अंतिम अवस्था गाठली होती.
१६. आपल्या देहाप्रति त्याचा उपेक्षाभाव या मर्यादपर्यंत गेला की वर्षानुवर्षाच्या तपश्चर्येने त्याच्या देहावर मळ आणि घाणीचे थर जमा होऊ लागले. हे थर एवढे जमा झाले की ते आपोआपच गळून पडूही लागले.
१७. त्याने आपल्या वास्तव्यासाठी घनदाट वन निवडले. वन एवढे घनदाट होते की त्याच्या आठवणीनेही अंगावर शहारे यावेत. एखादा वेडाच अशा वनात वास्तव्य करण्याचा विचार करू शकत होता.
१८. शीत ऋतूत रात्रीच्या गोठवणाऱ्या थंडीत कृष्णपक्षाच्या रात्री तो खुल्या मैदानात वास्तव्य करीत असे आणि दिवसा उजेडी तो घनदाट अंधाऱ्या वनात वास्तव्याला जात असे.
१९. वर्षाऋतूपूर्वी ग्रीष्मात जेव्हा सूर्य आग ओकीत असे तेव्हा दिवसा तो भजून काढणाऱ्या उन्हात राहत असे आणि रात्री मात्र घनदाट वनात वास्तव्याला जात असे.
२०. तो स्मशानभूमीत मृतांच्या अस्थी उशाशी घेऊन झोपत असे.
२१. त्यानंतर गौतमाने आपला आहार एक शेंग, एक तांदळाचा दाणा किंवा एक राईचा दाणा एवढाच सीमित केला.
२२. जेव्हा त्याने आपला आहार एवढा सीमित केला तेव्हा त्याचा देह खूपच क्षीण झाला होता.
२३. जेव्हा तो आपल्या उदराला स्पर्श करीत असे तेव्हा त्याच्या हाताला त्याच्या पाठीचा कणा लागत असे. जेव्हा तो पाठीच्या कण्याला स्पर्श करीत असे तेव्हा त्याच्या हाताला त्याच्या उदराचा स्पर्श होई. त्याच्या अत्यल्प आहारामुळे त्याचे उदर पाठीशी भिडले होते.
४. तपश्चर्येच्या मार्गावर ( समाप्त ) …
More Stories
Buddha and his Dhamma बुद्ध आणि त्याचा धम्म
🌼 मल्लांचा विलाप आणि एका भिक्खूची प्रसन्नता. 🌼 The lament of a warrior and the joy of a monk.
आत्मा आणि पुनर्जन्म या सिद्धांताचे आलोचक