August 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्ध आणि त्यांचा धम्म – भाग तिसरा – ३. समाधी मार्गाचा अनुभव.

The Buddha and His Dhamma,

📚 बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ

प्रथम खंड : भाग तिसरा –  नव प्रकाशाच्या शोधात

🌼 ३. समाधी मार्गाचा अनुभव. 🌼

१. जेव्हा गौतम आपल्या समस्येच्या समाधानासाठी विविध पर्यायांचा शोध घेत होता तेव्हा त्याने समाधीमार्गही ( मनाची एकाग्रता ) आत्मसात् करावा असा विचार केला.

२. ध्यानमार्गाच्या तीन परंपरा विद्यमान होत्या.

३. या तिन्ही परंपरात “श्वासाच्या आवागमनावर नियंत्रण” हे तत्त्व मात्र समान होते.

४. श्वासाच्या आवागमनावर नियंत्रण ठेवण्याची एक प्रणाली/ “अनापानसती” म्हणून संबोधिली जाई.

५. दुसरी परंपरा श्वासावर नियंत्रणाच्या ज्या प्रणालीचा अवलंब करीत असे तिला “प्राणायाम” म्हणत असत. या प्रणालीत श्वासोच्छ्वासप्रक्रिया तीन भागात विभागली असे. १ – श्वास आत घेणे ( पूरक ) २ – श्वास रोखून धरणे ( कुम्भक ) आणि ३ – श्वास सोडणे ( रेचक ) तिसरी परंपरा समाधी परंपरा म्हणून मान्यता पावली होती.

६. ध्यानमार्गाचा ज्ञाता म्हणून आलार कालामची ख्याती होती. गौतमाला असे वाटले की, आलार कालामच्या मार्गदर्शनाखाली ध्यानमार्गाचा उपदेश मिळाला तर योग्य होईल.

७. म्हणून तो आलार कालामशी या संबंधात बोलला. त्याने आलार कलामला विचारले की, त्याला ते ध्यान मार्गाची शिक्षा देण्याची कृपा करतील काय ?

८. आलार कालाम उत्तरला, “मोठ्या आनंदाने”

९. आलार कालामने त्याला ध्यानमार्गाचे तंत्र शिकविले. या तंत्रात सात अवस्था होत्या.

१०. गौतमाने त्या तंत्राचा प्रतिदिन अभ्यास करून ते तंत्र पूर्णत्वाने आत्मसात केले.

११. “त्यानंतर यापुढे शिकण्यासारखे आणखी काही उरले आहे काय?” असे गौतमाने आलार कालामला विचारले.

१२. आलार कालाम उत्तरला, “नाही. मित्रा, माझ्याजवळ तुला देण्यासारखे होते ते सर्व मी तुला दिले आहे.” त्यानंतर गौतमाने आलार कालामचा निरोप घेतला.

१३. गौतमाने योगी उद्दक रामपुत्ताविषयी ऐकले होते. त्याने आलार कालामच्या सात अवस्था युक्त ध्यानमार्गापेक्षा एक अवस्था श्रेष्ठ अशी ध्यानावस्था विकसित केली आहे अशी त्याची ख्याती होती.

१४. गौतमाने त्याचे तंत्रही आत्मसात् करण्याचा विचार केला त्याचा विचार समाधीची उच्चतम अवस्था अनुभवण्याचा होता. तो उद्दक रामपुत्ताच्या आश्रमात गेला. त्याने त्याचे शिष्यत्व पत्करले.

१५. थोड्याच कालावधीत गौतमाने ध्यानसाधनेची उद्दकाची आठवी अवस्थाही आत्मसात
केली. उद्दक रामपुत्ताच्या समाधी तंत्रात पूर्णत्व प्राप्त केल्यानंतर गौतमाने आलार कालामला
विचारलेला प्रश्नच उद्दकालाही विचारला “यापुढे आपल्याकडून शिकण्यासारखे काही उरले आहे
काय ?”

१६. उद्दक रामपुत्ताने तेच उत्तर दिले, “नाही. मित्रा, मी यापेक्षा अधिक काही तुला देऊ शकत नाही.”

१७. आलार कालाम आणि उद्दक रामपुत्त कोशलांच्या देशात ध्यानमार्गाचे ज्ञाते म्हणून ख्यात होते. परंतु गौतमाच्या असेही ऐकिवात होते की, मगधांच्या देशातही ध्यानमार्गाचे एवढेच ख्यात ज्ञाते आहेत. त्यांच्या प्रणालींचेही अध्ययन करावे असा त्याने विचार केला.

१८. त्यानुसार गौतमाने मगध देशाला प्रयाण केले.

१९. त्याला असे आढळले की, मगध देशातील ध्यानमार्गाचे तंत्र जरी श्वासोच्छ्वासाच्या नियंत्रणावरच आधारित आहे तरी कोशल देशात प्रचलित प्रणालीपेक्षा या प्रणाली भिन्न आहेत.

२०. ती प्रणाली श्वास घेणे सोडणे यावर नियंत्रणाऐवजी श्वासाचा निरोध करून चित्ताची एकाग्रता साध्य करण्यावर आधारित होती.

२१. गौतमाने ही प्रणालीही आत्मसात् केली. जेव्हा त्याने श्वासाचा निरोध करून चित्ताची
एकामता साध्य करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला त्याच्या कर्णरंध्रातून तीव्र ध्वनी बाहेर पडत आहेत, त्याचे मस्तक कोणीतरी तीक्ष्ण सुऱ्याने भेदत आहे असे वाटत होते.

२२. ही अत्यंत पीडादायक प्रक्रिया होती पण गौतमाने तीही आत्मसात करण्यात यश मिळविले.

२३. अशाप्रकारे समाधी मार्गाचे त्याचे अध्ययन पूर्ण झाले.

३. समाधी मार्गाचा अनुभव. ( समाप्त )….