November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्ध आणि त्यांचा धम्म – भाग दुसरा – १. कपिलवस्तू ते राजगृह

The Buddha and His Dhamma,

📚 बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 डॉ. भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ

प्रथम खंड :  भाग दुसरा  – कायमचा गृहत्याग.

🌼 १. कपिलवस्तू ते राजगृह 🌼

१. कपिलवस्तू सोडल्यानंतर सिद्धार्थाने मगध राज्याची राजधानी राजगृह येथे जाण्याचा विचार केला

२. बिंबिसार मगधचा राजा होता. त्यावेळी थोर दार्शनिक, तत्त्वचिंतक आणि विचारवंत राजगृही वास्तव्याला होते.

३. राजगृही जाण्याच्या विचाराने प्रेरित होऊन तीव्रगामी प्रवाहाची तमा न बाळगता त्याने गंगा पार केली.

४. राजगृहाच्या वाटेवर तो सकी नामक ब्राह्मण तपस्विनीच्या आश्रमात थांबला. तेथून तो पद्मा नावाच्या दुसऱ्या ब्राह्मण तपस्विनीच्या आश्रमात थांबला. सर्वांनी त्याचा यथोचित आतिथ्य सत्कार केला

५. ज्याला तुलना नाही अशा तेजस्वी रूप, अनुपम सौंदर्य आणि अलौकिक व्यक्तित्वाच्या स्वामीने संन्याशाची वस्त्रे धारण केलेली पाहून त्या क्षेत्रातील लोक आश्चर्यचकित झाले.

६. त्याला पाहून जे बसले होते ते तत्काळ उभे राहिले. जे उभे होते ते त्याच्यापाठोपाठ जाऊ लागले. हळूहळू गंभीरतेने पाऊले उचलणारे द्रुतगतीने चालू लागले आणि जे आपल्या वाटेने जात होते ते वाटेतच थांबले.

७. काहींनी त्याला आदराने दोहो करांनी नमस्कार केला. काहींनी श्रद्धापूर्वक वाकून त्याला प्रणिपात केला, काहींनी त्याला आदराने संबोधिले. तेथे एकही असा नव्हता की त्याने त्याच्याप्रति आदर व्यक्त केला नाही.

८. त्याला पाहून ज्यांनी विविधरंगी वस्त्रे परिधान केली होती त्यांना आपल्या वस्त्रप्रावरणांची लज्जा वाटली, जे व्यर्थ वार्तालापात मग्न होते ते स्तब्ध राहिले. त्याला पाहून कोणाच्याही मनात कोणताही अनुचित विचार आला नाही.

९. त्याची भुकुटी, त्याचे मस्तक, त्याचे मुख, त्याचे बाहू, त्याची पाऊले, त्याचा देह, त्याच्या देहाच्या कोणत्याही अंगाचे दर्शन होवो ती व्यक्ती मंत्रमुग्ध होऊन पाहतच राहिली.

१०. कठीण आणि दीर्घतम प्रवास करून गौतम पांच पर्वतांनी वेष्टित अशा राजगृही पोहोचला. राजगृह पर्वदराजींनी संरक्षित होते. राजगृह पर्वतराजींनी अलंकृत होते. राजगृहाच्या चोहोबाजूला मंगलमय पवित्र स्थाने होती.

११. राजगृही पोहोचल्यावर त्याने पांडव पर्वताच्या पायथ्याशी आपल्याकरीता एक स्थान निवडले आणि काही काळ वास्तव्य करण्याच्या हेतूने तेथे एक लहानशी पर्णकुटी बांधली.

१२. कपिलवस्तू ते राजगृह हे अंतर जवळपास ४०० मैल होते.

१३. एवढा लांबचा प्रवास गौतमाने पायीच केला