November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्ध आणि त्यांचा धम्म – १६. प्रव्रज्या : स्वेच्छा निष्क्रमण

The Buddha and His Dhamma,

📚 बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 डॉ. भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ

प्रथम खंड :  भाग पहिला  – जन्म ते प्रव्रज्या.

🌼 १६. प्रव्रज्या : स्वेच्छा निष्क्रमण 🌼

१. सेनापती म्हणाले, “तुझा प्रस्ताव स्वीकारणे कठीण आहे. जरी तू स्वेच्छेने देहदंडाची किंवा गृहत्यागाची शिक्षा स्वीकारलीस तरीही ही बाब कोशल नरेशाला माहीत होणारच. आणि त्यानंतर कोशल नरेश ही शिक्षा संघानेच तुझ्यावर लादली या निर्णयाप्रत येईल आणि मग कोशल नरेश
संघाविरुद्ध कृती करण्यास प्रवृत्त होईल.”

२. “हीच अडचण असेल तर यातून मी सहज सोपा असा मार्ग सुचवितो.” सिद्धार्थ म्हणाला, “परिव्राजक होतो आणि देश सोडून जातो. हाही एक प्रकारचा देशत्यागच आहे.”

३. सेनापतींनी विचार केला की हा चांगला पर्याय आहे. परंतु तरीही त्यांच्या मनात सिद्धार्थ आपल्या निर्णयावर कायम राहील आणि त्यानुसार कृती करील याविषयी शंकाच होती.

४. म्हणून सेनापतींनी सिद्धार्थाला विचारले, ‘तुला तुझ्या मातापित्याची आज्ञा आणि भार्येच्या अनुमतीशिवाय परिव्राजक कसे होता येईल ?’

५. सिद्धानि त्यांना आपण आपल्या मातापित्याची आज्ञा आणि भार्येची अनुमती प्राप्त
करण्याचे शक्यतो सर्व प्रयास करू असे अभिवचन दिले.

६. या समस्येच्या समाधानाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सिद्धार्थाचा प्रस्ताव होय अझै संघाला वाटले.
संघाने सिद्धार्थाचा प्रस्ताव स्वीकारला

७. सभेचे कामकाज समाप्त झाल्याचे निदर्शनास आल्याने संघ सभा समाप्तीची घोषणा करणार तेवढ्यातच एक युवा शाक्य आपल्या स्थानी उभा राहिला आणि म्हणाला, ‘मला काही महत्त्वाचे सांगावयाचे आहे. कृपया माझे म्हणणे ऐकून घ्यावे.’

८. बोलण्याची अनुमती प्राप्त करून तो युवा शाक्य म्हणाला, “सिद्धार्थ गौतम आपल्या वचनाचे पालन करून त्वरित देश सोडून जाईल यात मला तिळमात्र शंका नाही. परंतु ज्याविषयी मी संतुष्ट
नाही असा एक प्रश्न उरतोच.”

९. “आता सिद्धार्थ लवकरच आपल्या नजरेआड होईल. तरीही संघ कोलीयाविरुद्ध युद्धाच्या घोषित प्रस्तावाला त्वरित कार्यान्वित करू इच्छितो काय ?”

१०. “माझ्या या प्रश्नाचा पुन्हा एकदा विचार करावा अशी मी संघाला विनंती करतो. कोणत्याही परिस्थितीत सिद्धार्थ गौतमाच्या देशत्यागाची वार्ता कोशल नरेशाला कळणारच आहे. जर शाक्यांनी कोलीयाविरुद्ध त्वरित युद्धाची घोषणा केली तर, कोलीया विरुद्ध युद्धाचा विरोध केला म्हणून सिद्धार्थाला देशत्याग करावा लागला हे कोशल नरेशाला सहज समजेल आणि हे आपल्याकरिता योग्य होणार नाही.”

११. “म्हणून मी प्रस्ताव प्रस्तुत करितो की सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग आणि कोलीयाविरुद्ध युद्धाचा आरंभ या दोन घटनात काही अंतर असावे. जेणेकरून कोशल नरेशाला या दोन घटनातील सहसंबंध प्रस्थापित करता येणार नाही.”

१२. हा फार महत्त्वाचा प्रस्ताव आहे याची संघाला जाणीव झाली आणि आणीबाणीचा प्रस्ताव म्हणून संघाने त्यास त्वरित स्वीकृती दिली.

१३. अशाप्रकारे या शाक्य संघाच्या सभेची समाप्ती झाली आणि ज्यांचा या युद्ध प्रस्तावाला विरोध होता परंतु तो विरोध व्यक्त करण्याचे धाडस ज्यांच्यात नव्हते अशा अल्पमतातील शाक्यांनी, संकटाची परंपरा घेऊन येणारी ही घटना टाळता आली म्हणून सुटकेचा निश्वास सोडला निरोपाचे शब्द.