February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

तथागत बुद्धांनी आपल्या शिष्यांना, विश्वाला प्रेम, दया आणि शांतीचा संदेश द्यायला सांगितला.

तथागत बुद्धांचे असंख्य शिष्य होते. त्यापैकी एक होता, ‘पूर्णा.’ त्याची साधना पूर्ण झाली होती. म्हणून तो बुद्धांना म्हणाला, ‘ तथागत, आता आपण मला अनुज्ञा द्या.

मला आता बाहेर पडून जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत आपला उपदेश पोचवायचा आहे.

तथागत म्हणाले, ‘ठीक आहे. माझी अनुज्ञा आहे. परंतु मला अगोदर सांग, तू कुठे जाणार आहेस ?

पूर्णा म्हणाला, ‘तथागत, बिहारमध्ये सुखा नावाचा एक छोटासा प्रदेश आहे.

जिथे अजून आपल्यापैकी कोणीही भिक्खू गेलला नाही आणि तिथल्या लोकांना आपल्या उपदेशाचा लाभ झालेला नाही. म्हणून मी प्रसारासाठी मुद्दाम या प्रदेशाची निवड केली.’

तथागत म्हणाले, ‘अरे, तिकडे कोणीही भिक्खू गेला नाही, याला कारण आहे. तिथले लोक फार वाईट आहेत म्हणे !

तू तिथे गेलास, तर कदाचित ते तुझा अपमान करतील, मग तू काय करणार ?’

पूर्णा म्हणाला, ‘तथागत, मी त्यांना धन्यवाद देईन. कारण त्यांनी नुसता अपमानच केला. शिव्या वगैरे दिल्या, पण मारले तर नाही ना.’

तथागत म्हणाले, ‘समजा, एखाद्याने तुला खरोखरच मारले, तर तू काय करशील ?’

पूर्णा म्हणाला, ‘तथागत, तरीही मी त्यांना धन्यवाद देईन. कारण त्यांनी मला नुसते मारले, जीव तर नाही घेतला.’

तथागत म्हणाले, ‘तुला आता आणखी एक, शेवटचा प्रश्न विचारतो. समजा, त्यांपैकी एकाने तुला जिवे मारले, तर तू काय करशील ?’

पूर्णा म्हणाला, ‘तथागत, याही अवस्थेत मी त्यांचा ऋणीच राहीन. कारण, त्यांनी मला जीवनमुक्ती दिली. नाहीतर कदाचित मी पुढे जीवनात बहवून गेलो असतो.’

यावर संतुष्ट होऊन तथागत बुद्ध म्हणाले, ‘पूर्णा, तू माझ्या परीक्षेला पूर्ण उतरलास. आता तू हवे त्या ठिकाणी जाऊन प्रचारकार्य करू शकतोस.

कारण, तू कुठेही गेलास तरी सर्वजण तुला तुझे कुटुंबीय वाटतील. ज्याचे हृदय असे प्रेमाने सदैव भरलेले असते, त्याला जगातील कोणतीही व्यक्ती इजा करू शकत नाही.’

☘️भवतु सब्ब मंगलं !