August 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनचे मुखपत्र म्हणून नवीनच सुरू झालेल्या ‘ पीपल्स हेराल्ड ‘ या इंग्लिश साप्ताहिकाच्या प्रकाशन प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….

दिनांक ४ जानेवारी १९४५ रोजी कलकत्ता येथे शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनचे मुखपत्र म्हणून नवीनच सुरू झालेल्या पीपल्स हेराल्ड या इंग्लिश साप्ताहिकाचे प्रकाशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

पीपल्स हेराल्ड ‘ या इंग्लिश साप्ताहिकाच्या प्रकाशन प्रसंगी केलेल्या महत्वपूर्ण भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
काँग्रेसच्या राजकारणाचा इतका अधःपात झाला आहे की, गांधींच्या नंतर काँग्रेसच्या ठिकऱ्या उडालेल्या आपणास दिसतील. राजकीय व नैतिकदृष्ट्या आपल्या अस्पृश्य समाजाचा पक्ष हाच या देशातील चिरकाल टिकणारा पक्ष राहील.

आपल्या पक्षाबद्दल विरोधकांकडून जाणूनबुजून गैरसमज पसरविण्यात येतात. केवळ काही नोकऱ्यांसाठी आणि अन्नाच्या तुकड्यांसाठी आपल्या पक्षाचा लढा आहे, हा आरोप मूर्खपणाचा आहे. त्यात काही अर्थ नाही. वास्तविक, या देशात स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्त्वांची प्रस्थापना करण्याकरिता अस्पृश्य समाजाचा पक्षच खरा लढा देत आहे आणि या बाबतीत आपल्या पक्षाची तत्त्वप्रणाली केवळ अस्पृश्य समाजाचाच प्रश्न सोडविण्याचा, ही मर्यादित ध्येयमर्यादा ओलांडून केव्हाच वरील तीन उदात्त आणि सर्वश्रेष्ठ तत्त्वावर जाऊन भिडली आहे.

काँग्रेसच्या राजकारणात या गोष्टींचा पूर्ण अभाव आपणास दिसून येतो. काँग्रेस देशाच्या स्वातंत्र्याचा दावा करते पण त्यात ढोंगीपणा आहे. काँग्रेस ही निर्भेळ स्वातंत्र्य किंवा समता यासाठी मुळीच लढत नाही. काँग्रेसच्या स्वातंत्र्यात आपणाला स्वातंत्र्य मिळण्याची आशा नाही. सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समता मिळणार नाही, आपणाला बंधुभावाने वागविले जाणार नाही. म्हणून काँग्रेसच्या या स्वातंत्र्य लढ्याच्या व्यापक चळवळीमध्ये भाग घेण्याऐवजी, हजारो वर्षे गुलामगिरीमध्ये अडकून पडलेल्या माझ्या अस्पृश्य समाजाच्या उद्धारकार्यासाठी मी माझे जीवित वाहून घेतले आहे. देशाच्या स्वातंत्र्यापेक्षा अस्पृश्योद्धार हाच माझा आयुष्यातील जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. हिंदुस्थानमध्ये, अस्पृश्योद्धारापेक्षा उदात्त आणि श्रेष्ठ प्रतीचे असे दुसरे एखादे कार्य आहे, असे मला मुळीच वाटत नाही. मी ज्या समाजामध्ये जन्मलो आहे, त्या समाजाच्या उद्धारासाठी झटणे हे माझे कर्तव्य आहे. आधी मला माझ्या समाजाचे ऋण फेडावयाचे आहे, त्यानंतर देशाचे. माझे हे जीवितकार्य उदात्त असेच आहे, याबद्दल मला मुळीच संदेह नाही.

स्पृश्य हिंदुंच्या विषयी असे म्हणता येईल की देशातील लक्षावधीच नव्हे तर कोट्यावधी रंजलेल्या, गांजलेल्या आणि दडपल्या गेलेल्या लोकांचे रक्त शोषण करून त्यांच्या श्रमावर मजा मारण्याचा ऐतखाऊ हिंदू लोकांचा कावा आहे. अशा भांडवलशाही खुशालचेंडूंच्या हाती देशाचे स्वातंत्र्य जाणार असेल तर त्याचा आपल्याला व देशातील जनतेला काहीच उपयोग होणार नाही. हिंदुंच्या हाती देशाची सत्ता गेली तर ते अस्पृश्य समाजाला आणि रंजल्या गांजलेल्या जनतेला अधिकच दडपण्याचा प्रयत्न करतील, याबद्दल मला मुळीच शंका नाही. म्हणून आपण एव्हापासूनच दक्षता बाळगणे अगत्याचे आहे. या वेळी आपण आपली संघटना मजबूत केली नाही तर अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये निग्रो लोकांची जी अवस्था आहे तीच गत आपली झाल्याशिवाय राहणार नाही, याबद्दल आपणापैकी प्रत्येकाने खातरजमा बाळगली पाहिजे. अमेरिकेसारख्या सुधारलेल्या देशात या विसाव्या शतकात देखील निग्रो लोकांच्या हक्कांना स्थान नाही. कारण त्यांच्यात एकी नाही, संघटना नाही म्हणून त्यांची अशी दुर्दशा आहे. निग्रो लोकांप्रमाणे आपली स्थिती होऊ देता कामा नये. यावर उपाय एकच की आपल्यातील झाडून साऱ्या जमातींनी, लहान थोरांनी, स्त्री-पुरुषांनी आपल्या शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या एकाच झेंड्याखाली संघटित होणे. आपण अशी अभेद्य संघटना निर्माण केली तर आपल्या हक्कांचे रक्षण करून हिंदू लोकांचे डाव आपण सहज हाणून पाडू शकू.

सध्याच्या युगात वर्तमानपत्राचे अत्यंत महत्त्व आहे. आपापल्या पक्षाचा प्रचार करण्याकरिता इतर पक्ष हजारों रुपये खर्च करून वर्तमानपत्रे चालवितात. जनतेपुढे आपली राजकीय आणि नैतिक बाजू मांडण्यासाठी व त्याचप्रमाणे आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या कार्याची माहिती देण्यासाठी वर्तमानपत्रांची आवश्यकता आहे. आपल्या चळवळीचा दृष्टिकोन मांडण्याकरिता आज आपणास प्रांतोप्रांती अनेक वर्तमानपत्रे पाहिजे आहेत. त्या दृष्टीने अस्पृश्य समाजाच्या वतीने येथे सुरू होणारे हे ‘पीपल्स हेराल्ड’ साप्ताहिक आपली बाजू निर्भीडपणे मांडण्याचे कार्य उत्तम प्रकारे बजावील असा मला पूर्ण भरवसा आहे. ‘पीपल्स हेराल्ड’ ची उत्तरोत्तर प्रगती होवो, असे मी इच्छितो.

🔷🔷🔷

✍️ संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे