अभिनेत्री प्रियंका उबाळे यांच्या मते त्यागमूर्ती माता रमाई ही रडणारी नव्हती तर लढणारी होती, आपण चित्रपट, गाणे असो का नाटक मी जिथं ही त्यागमूर्ती माता रमाई पाहिली ती दुःखात बुडालेली, सोशिक आणि रडणारीच दिसली. लहानपणापासूनच मी हे पाहात आले पण मला नेहमीच माता रमाईने प्रेरणा दिली, मी त्यांना एक धाडशी लढावू आणि करारी बाण्याची त्यागमूर्ती माता रमाई आता मला जगासमोर आणायची आहे.
अभिनेत्री प्रियंका उबाळेने मी ‘रमाई’ हा एकपात्री चित्रपट काढला आहे. तुम्ही एकपात्री नाटक ऐकलं असेल, पण आता अभिनेत्री प्रियंका उबाळेने एकपात्री चित्रपट काढला आहे यात चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि अभिनय सर्वकाही प्रियंकानेच केलं आहे. अत्यंत कमी बजेटमध्ये तिने हा चित्रपट तयार केला आणि ती राज्याभरातील दलित वस्त्या, बौद्ध विहार या ठिकाणी हा चित्रपट प्रोजेक्टरवर दाखवते.
रमाबाई आंबेडकरांवर अनेक चित्रपट आले आहेत मग तुला हाच विषय का निवडावा वाटला यावर तिने सांगितले, “की मी ज्या चित्रपटातली माता रमाई पाहिली आहे ती सहन करणारी, गरिबी आणि हालअपेष्टांमधलीच रमाई पाहिली आहे. मौखिक परंपरेतून आलेल्या साहित्यातही बरेच संदर्भ त्यांच्या अश्रूबद्दलच आहेत.
“पण त्या अत्यंत कणखर होत्या. त्या जर कणखर नसत्या तर बाबासाहेबांना त्यांनी कधीच विदेशात शिक्षणासाठी जाऊ नसतं दिलं. त्यांचं आयुष्य संघर्षमय होतं पण त्याचं चित्रण मात्र सोशिक स्त्रीचं होतं. त्यावरून मला वाटलं की नव्या पिढीसमोर जर योग्य आदर्श निर्माण करायचा असेल तर आपल्याला कणखर आणि लढाऊ रमाई समोर आणाव्या लागतील.”
“या आधी आलेल्या चित्रपटांतून रमाईंची ओळख झाली आहे. पण या चित्रपटात असं दाखवलं आहे की त्यांच्या मुलाचं जेव्हा निधन होतं तेव्हा त्या खूप रडल्या. मग तो सीन बदलतो. माझं म्हणणं आहे की त्या फक्त रडल्या हेच दाखवू नका. त्यानंतर त्या परिस्थितीला कसे सामोरं गेल्या, त्यांनी त्यावर कशी मात केली हे देखील दाखवा.
“आधी ज्यांनी हे दाखवलं त्यांचा तसाच उद्देश होता असं माझं म्हणणं नाही पण रमाईंचा करारीपणा आणि त्यांची धाडसी वृत्ती समोर येणं आवश्यक होतं ते झालं नसल्याचं मला आंबेडकरी समाजात वावरताना दिसलं आणि माझ्या चित्रपटातून मी हेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे,” प्रियंका सांगते.
चित्रपटाची कल्पना कशी आली ? चित्रपट का तयार करावा असे वाटले ?
प्रियंकाचे पदव्युत्तर शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागात झाले. नाट्यशास्त्राच्या अभ्यासाचा भाग म्हणून देखील तिने कित्येक वेळा रमाईंची भूमिका साकारली होती.
हीच भूमिका मोठ्या पडद्यावर आली तर रमाईंचा खरा इतिहास तर नवीन पिढीसमोरही येईल आणि त्याला ते रिलेट ही करतील असा विचार प्रियंकाने केला. पण ही गोष्ट काही लवकर साध्य होणार नव्हती. हा विचार आला खरा पण शिक्षण झाल्यावर आधी आपण काम करुन अनुभव घ्यायला हवा असं तिने ठरवलं.
प्रियंकाने मुंबई गाठली आणि मराठी चित्रपटसृष्टीत नशीब आजमावून पाहिलं. प्रियंकाने आतापर्यंत ‘प्रेमवारी’, ‘बाबो’ या चित्रपटांमध्ये तर साता जन्माच्या गाठी, माझ्या नवऱ्याची बायको या मालिकांमध्ये काम केले आहे.
चित्रपटसृष्टीत हळूहळू जम बसत आहे असं लक्षात आल्यावर प्रियंकाने रमाबाई आंबेडकरांच्या जीवनपटासाठी स्क्रिप्ट लिहिण्याचं काम हाती घेतलं.
अनेक संदर्भ ग्रंथ पाहणे, पुस्तकं वाचणं, चित्रपट पाहणे हे काम ती करू लागली. पण याच वेळी कोरोनाच्या केसेसही वाढू लागल्या तेव्हा प्रियंका परभणीत आपल्या घरी आली आणि मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन लागला. या काळात प्रियंकाला विचार करण्यासाठी भरपूर वेळ मिळाला. संदर्भ ग्रंथ तर तिच्यासोबतच असायचे मग तिने स्क्रिप्ट पूर्ण केली.
पुढे लॉकडाऊन उठले आणि आता आपण या चित्रपटावर काम सुरू करायला हवं असा विचार प्रियंकाने केला.
अनेक महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर मालिकांचे शुटिंग सुरू झाले आणि प्रियंकाला नवीन ऑफर्स देखील येऊ लागल्या पण आपल्याला चित्रपट पूर्ण करायचा असेल तर या ऑफर्स घेता येणार नाही असा विचार तिने केला.
मी स्क्रिप्ट तर लिहिली पण आता खरं आव्हान होतं प्रोड्युसर मिळण्याचं. मी अंदाजे 60 हून अधिक प्रोड्युसर्सची भेट घेतली. सर्वांनी कौतुक तर केलं पण कुणीही म्हटलं नाही की प्रियंका आपण हा चित्रपट काढू.
कुणाच्या खऱ्या अडचणी होत्या तर कुणाला या प्रोजेक्टमध्ये व्यावसायिक यशाची खात्री नव्हती. पण कुणीच मला फायनान्स करण्यासाठी तयार झालं नाही. शेवटी या चित्रपटाची निर्मिती स्वतःच करण्याचा तिने निर्णय घेतला.
चित्रपट तयार करताना काय अडचणी आल्या ? प्रकाश वाघ यांनी कशी मदत केली….
चित्रपट तर तयार करायचा पण शूटिंग कसं करायचं, पोस्ट प्रोडक्शन कसं करायचं, प्रमोशन आणि रिलीज इत्यादी गोष्टींचा प्रश्न तर होता पण प्रियंकाने स्टेप बाय स्टेप जाण्याचा निर्णय घेतला.
आधी आपण पिक्चर शूट तर करू मग पुढचं पाहू असं तिने ठरवलं. यासाठी औरंगाबाद येथे राहणारा प्रियंकाचा फोटोग्राफर मित्र प्रकाश वाघला तिने विचारलं मला एक चित्रपट तयार करायचा आहे. तू परभणीला येऊ शकतोस का?
प्रकाश एक व्यावसायिक फोटोग्राफर आहे आणि त्यावेळी तो एका प्रोडक्शन हाऊससाठी काम करत होता. त्याला तर कळलंच नाही ही काय विचारते आहे. प्रियंकाने त्याला सांगितलं की मी सगळं काही सविस्तर सांगते आधी तू परभणीला तर ये.
प्रकाशने त्याच्या नोकरीला रामराम ठोकला आणि तो परभणीत हजर झाला. प्रियंकाने त्याला सविस्तर सांगतले, तिची योजना ऐकली. त्याला ती योजना अतिशय धाडसी वाटली पण आता प्रियंकाच्या डोक्यात एखादी गोष्ट आली म्हटल्यावर ती पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही हे देखील त्याला माहीत होतं.
चित्रपट शूट करायचा म्हणजे त्यासाठी उत्तम कॅमेरा तर हवा ना. प्रियंकाने कॅमेरा भाड्याने घ्यायचा विचार केला. पण त्याचं भाडं तसेच त्याची जबाबदारी पाहता तिने असा विचार केला त्यापेक्षा आपण कॅमेरा का विकत घेऊ नये.
पण त्यासाठी पैसे कुठून येणार. प्रियंकाजवळ जी काही सेव्हिंग होती ती, प्रकाश आणि प्रियंकाची बहिण संघमित्रा यांनी पैसे जमा केले आणि एक कॅमेरा घेतला.
प्रियंकाने एक डायरेक्टरलाही हायर करण्याचा विचार केला. पण त्याने दिवसाची फी सांगितली 3 हजार रुपये आणि वीस दिवसांचे शूटिंग म्हणजे 60 हजार रुपये!
मग प्रियंकाने ठरवलं की इतके पैसे तर आपल्याकडे नाहीतच पण असते तरी हे देणं परवडलं नसतं मग तिनेच डायरेक्शन करण्याचा निर्णय घेतला.
प्रकाश तर फोटोग्राफर होता पण तो या चित्रपटाचा सिनेमॅटोग्राफर बनला.
‘अगं, हे मला करणं होणार नाही. मी कधीच व्हीडिओ शूट केले नाहीत, पिक्चर तर दूरच,’ असं म्हणत प्रकाशने हे आपली हरकत दाखवली पण पुन्हा प्रियंकाने त्याला म्हटलं अरे करुन तर पाहू.
आणि मी रमाईचा मुहूर्त ठरला. तो देखील रमाई आंबेडकरांच्या जन्मदिनी म्हणजेच 7 फेब्रुवारी.
मेकअप, हेअर स्टायलिस्ट, आर्ट डायरेक्टर सर्व जबाबदारी प्रियंकानेच उचलली. रमाईंचे घर सुद्धा प्रियंकानेच बनवले. त्या काळातील वस्तू, भांडी कशा असतील हे फोटोत पाहून त्या तिने जमा केल्या. त्या आणण्यासाठी ती गंगाखेडला आजोळी गेली आणि तिथे गावात फिरून पाटा वरवंटा, कंदील, पितळाची भांडी या वस्तू तिने आणल्या.
दोन महिन्यात शूटिंगदेखील पूर्ण झालं. मग आला पोस्ट प्रोडक्शनचा भाग, साउंड, एडिटिंग इत्यादी अनेक गोष्टी अजून बाकी होत्या.
मग परभणीतीलच एका व्हिडिओ एडिटरची मदत घेऊन तिने एडिटिंग पूर्ण केले. तिची धडपड आणि विषयावरची तळमळ पाहून एडिटरने तिच्याकडून फी न घेण्याचा निर्णय घेतला.
पण प्रियंकाने म्हटलं काही ना काही तर घ्यावेच लागेल तेव्हा शेकडो तासांचे फुटेज एडिट केल्यानंतर आणि प्रियंकाच्या आग्रहाखातर मानधन घेतले. चित्रपटासाठी संवाद राजेश कांबळेंनी लिहिले होती. त्यांनी देखील प्रियंकाकडून कुठलेही मानधन घेतले नाही. पण ‘फुल ना फुलाची पाकळी’ असं म्हणत प्रियकांने त्यांना देखील मानधन दिले.
अशा रीतीने पोस्ट प्रोडक्शनचे काम प्रियंकाने पूर्ण केले आणि रमाईंच्या स्मृतिदिनी म्हणजेत 27 मे 2021 ला हा प्रकल्प पूर्ण झाला.
चित्रपट पूर्ण तर झाला पण दाखवणार कुठे ? कसा ?
पिक्चर तर तयार झालेला पिक्चर दाखवणार कुठे ? थिएटरचा तर प्रश्नच नव्हता. कुणीतरी तिला सुचवले युट्युबवर टाक. पण युट्युबवर चित्रपट रिलीज करणे म्हणजे भविष्यात मग त्याला कुठे फिल्म फेस्टिवलला स्क्रिनिंग मिळत नाही या तांत्रिक मुद्द्यामुळे प्रियंकाने हा विचार सोडला.
मग प्रियंका आणि प्रकाश एक प्रोजेक्टर घेऊन आणि पेनड्राइव्हमध्ये आपला चित्रपट घेऊन गावागावात दाखवू लागले.
समाजमंदिर, बौद्धविहार, कधी कुणाचे घर तर कधी अंगणात असं चित्रपटाचं स्क्रिनिंग झालं.
टीव्ही, सीरिअल, चित्रपट न पाहणाऱ्या माता-माऊल्यांनी रमाईचा पिक्चर पाहिला.
प्रियंकाने आतापर्यंत मराठवाड्यामध्ये 60 हून अधिक ठिकाणी हा चित्रपट दाखवला आहे आणि तो देखील संपूर्णपणे मोफत. फक्त जाण्यायेण्याचा खर्च द्या बाकी मी सिनेमा दाखवण्याचं मी पाहते.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईंचं नातं बरोबरीचं होतं !’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई यांच्या नात्यावर प्रियंका सांगते, “पहिल्या काळात महिला या आपल्या पतीला मालक म्हणायच्या. पण रमाई या त्यांना साहेब म्हणायच्या. बाबासाहेबांचं आणि त्यांचं नातं बरोबरीचं होतं. प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे उभी राहणारी रमाई दाखवणे मला आवश्यक वाटत होतं त्यातूनच मी हे आव्हान घेतलं.”
प्रियंका पुढे सांगते, “जेव्हा रमाईंना कळलं की बाबासाहेबांना लंडनमध्ये पैशांची अडचण आहे. तेव्हा त्यांनी बाबासाहेबांना 14 रुपयांची मनी ऑर्डर पाठवली. मला वाटतं, आपल्या नवऱ्याला विदेशात मनी ऑर्डर पाठवणारी ती पहिली बायको असावी. त्यांचं मूल वारलं पण त्यांना या गोष्टीची जाणीव होती की जर आपण आता दुःखात बुडालो आणि स्वतःला सावरलं नाही तर साहेबांचं शिक्षण पूर्ण होणार नाही आणि त्यामुळे त्यांची ज्या समाजासाठी काम करण्याची इच्छा आहे ती पूर्ण होणार नाही.”
“माता रमाईंनी केवळ घरच नाही सांभाळलं तर त्या चळवळीतील महिलांचे गाऱ्हाणे ऐकायच्या. त्यांना मार्गदर्शन करायच्या. बाबासाहेबांच्या कार्याची त्यांना जाणीव होती आणि समजही होती. त्याकाळात अनेक महिला हे गाऱ्हाणे घेऊन येत असत की आमचा नवरा आम्हाला दारू पिऊन मारतो. तेव्हा त्या त्यांना सल्ला देत असत की तुम्ही त्यांचा मार खाऊ नका. त्यांचा प्रतिकार करा.
“इतक्यावरच त्या थांबल्या नाहीत त्यांनी ही गोष्ट बाबासाहेबांच्या कानावर घातली. ही गोष्ट आपल्याला ज्ञात आहे की बाबासाहेबांनी जेव्हा आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तेव्हा त्यांनी ज्या 22 प्रतिज्ञा सांगितल्या त्यात दारू न पिणे ही देखील एक प्रतिज्ञा होतीच. हा संदर्भ देखील लक्षात घेणं मला आवश्यक वाटतं.
“मला जी रमाई मांडावी वाटते किंवा मांडली आहे ती महिलांना आवडते असं मला वाटतं. चित्रपट पाहिल्यावर त्या महिला मला हमखास म्हणतात, लेकरा लई चांगलं काम करायली. तर कुणी म्हणते माय आम्ही तर कवा रमाई नाही पायली पण तुझ्यात आम्हाला रमाई दिसली.
“तर काही महिला म्हणतात मी बाबासाहेबांचं काम करते. हेच बाबासाहेबांचं काम मला पुढे करत राहायचं आहे. आता मी 40 मिनिटांचा चित्रपट काढलाय पुढे रमाईंच्याच आयुष्याप्रमाणे भव्य चित्रपट काढायचा माझा विचार आहे. केवळ आंबेडकरी समाजासाठीच नाही तर प्रत्येक स्त्री साठी रमाई ही आदर्शवत ठरू शकते त्यांच्यापर्यंत रमाई पोहचावी यासाठीच मी हे करत आहे,” असं प्रियंका सांगते.
More Stories
हार्वे केइटल बौद्ध धर्म-प्रेरित साय-फाय नाटक ‘मिलारेपा’ (अनन्यv) च्या फर्स्ट लूकमध्ये गुरु बनला
मनोज बाजपेयी ‘बुद्ध अवशेषांचे रहस्य’ मध्ये बौद्ध धर्माचे मूळ, महत्त्व उलगडणार
“द बेटल ऑफ भीमा कोरेगांव”