February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

मुलांना बुद्धधम्म कसा शिकवावा 2

बौद्ध शिक्षण एक कर्तव्य

कोणत्याही इतर धर्मात मुलांना त्या धर्माचे शिक्षण देणे ही अगदी अनिवार्य गोष्ट मानली जाते. म्हणून इतर धर्मात धर्मशिक्षणाला महत्त्वाचे स्थान दिले जाते. मग बुद्धधम्माबाबत वेगळे काही असण्याचे काय कारण आहे? पण त्याचे उत्तर आहे – बुद्धधम्म हा केवळ धर्म नाही तर त्याहून अधिक म्हणजे एक तत्त्वज्ञान आहे. पण त्याबरोबर बुद्धधम्म ही एक जीवनपद्धती पण नाही का? आणि ही ‘जीवनपद्धती’च खरे तर आपणाला मुलांच्या मनावर बिंबवायची आहे. आधुनिक जगात बुद्धधम्माची अवस्था व प्रतिष्ठा पूर्वीच्या काळी होती इतकी चांगली नाही, याचे प्रमुख कारण म्हणजे आपण आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले आहे. ‘बौद्ध शिक्षण’ पाश्चिमात्य देशांत सहज शक्य आहे, यावर मी विशेष करून या लेखात अधिक भर देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हे करणे जर शक्य आहे तर ते केलेच पाहिजे. बौद्ध शिक्षणपद्धती प्रस्थापित करण्याच्या अवस्थेपासून आपण खूप दूर आहोत याची मला जाणीव आहे. पण कुठेतरी सुरुवात केलीच पाहिजे. हा लेख त्या समस्येवर विचार करण्यासाठी लिहिला आहे. यावर बौद्ध समाजात आधीपासूनच चर्चा चालू आहे.

‘बौद्ध शिक्षण’ प्रत्यक्ष व्यवहारात का चालू करावे यासाठी आणखीही दुसरे महत्त्वाचे कारण आहे. केवळ स्वतः च्या निर्वाणासाठी नव्हे, पण धम्म टिकून राहावा म्हणूनही पौर्वात्य देशात अनेक बौद्ध मंडळी भिक्खु होतात, संघात प्रवेश करतात. परंतु (बहुतेक) पाश्चिमात्य देशांत पूर्वेकडील देशांतून बौद्ध भिक्खु नियमितपणे येत नसतात. त्यामुळे आपण पाश्चिमात्य बौद्धांनीच धम्माचे संवर्धन करण्यासाठी आपला भार आपणच उचलला पाहिजे. आपल्या मुलांना बौद्ध धम्माचे शिक्षण देणे हा या कर्तव्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला बौद्ध शिक्षण न दिल्याबद्दल पौर्वात्य देशांना जबाबदार धरणे हे काहीसे अन्यायकारक होईल, अयोग्यच होईल. पौर्वात्य बौद्ध सर्व पाश्चिमात्य देशांत अशी शिक्षण केंद्रे स्थापन करतील, ते पाश्चिमात्य भाषा संपूर्णपणे आत्मसात करतील आणि पाश्चिमात्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण समस्या समजावून घेतील, याची वाट पहात राहणे एवढाच याचा अर्थ होईल. ही स्थिती येईपर्यंत, आपणाला शक्य होईल तितक्या चांगल्या आणि कार्यक्षम मार्गाने आपणच आपला प्रश्न सोडविला पाहिजे, आपणच एकमेकांना मदत केली पाहिजे.

बौद्ध इतिहास

या आधीच जातककथांचा उल्लेख केला आहे. त्यांच्याबरोबर आपण आपल्या मुलांना पुढील माहिती सांगितली पाहिजे भगवान बुद्धाच्या वेळचे लोकजीवन, समाजव्यवस्था, बुद्धधम्म या सुरुवातीच्या काळाची ऐतिहासिक पार्श्वभूमी,
बुद्धधम्माचा सर्वसाधारण इतिहास, भारतात आणि त्या पलिकडच्या देशांत प्रवर्तनाचे ‘चक्र’ कसे फिरत गेले, म्हणजेच त्या ठिकाणी धम्माचा प्रसार कसा झाला, इत्यादी.

धम्माचे स्पष्टीकरण

बुद्धधम्माच्या मूलभूत तत्त्वाविषयीच मुलांची जाण जसजशी विकसित होत जाईल, तसतसे धम्माचे चैतन्य हळूहळू त्यांच्या मनात स्फुरत जाईल, त्याची वाढ होईल. आईवडिलांनी काही सोप्या सुक्तांतील सोप्या गोष्टी मुलांना वाचून दाखवाव्या, उदा. पंचशीलाशी संबंधित असणारी सुते आणि त्यातील कथा, अनभिज्ञ बौद्धांनी काय करावे आणि काय करू नये हे सांगणारी सुत्ने, विशेष करून अंगुत्तर निकायातील प्रवचने की जी सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने मार्गदर्शक आहेत, हे सर्व मुलांच्या आकलनात बसण्यासारखे आहे. हे सर्व मुलांना समजेल असे आहे. याशिवाय धम्मपदातील सोप्या गाथाही त्यांना वाचून दाखविता येतील, जसे की-

“सर्वजण शिक्षेला घाबरतात, मृत्यूची सर्वांनाच भीती वाटते.

स्वतःशी इतरांची तुलना करून कोणी हिंसा करू नये किंवा हिंसा घडवून आणू नये. (धम्मपद १२९).
पाप न करणे, पुण्यकृत्यांचा संचय करणे, आपल्या चित्तास शुद्ध करणे ही बुद्धांची शिकवण आहे. (धम्मपद १८३). ”

आपल्यांपैकी अनेकांना वाटते त्याप्रमाणे बुद्धधम्म हा काही क्लिष्ट धर्म नाही.
मुलांना लहानपणापासून बौद्धशिक्षण दिल्यावर त्यांना बुद्धधम्म सहज समजू शकतो.

काही पाठांतर

मुले पाठांतरातून अनेक गोष्टी लवकर शिकत असल्यामुळे त्यांना, पालीमध्ये का होईना, पण आपण ‘पंचशील’ आणि ‘त्रिशरण’ शिकवूया. धम्मपदाच्या काही गाथा त्यांनी त्यांच्या मातृभाषेत शिकणे, हीपण मुलांच्या दृष्टीने चांगली कल्पना आहे. “त्याने मला शिव्या दिल्या, मला मारले, माझ्यावर कुरघोडी केली, मला लुबाडले अशा तऱ्हेचे विचार ज्यांच्या मनात येतात, त्यांचे वैर कधीच शांत होत नाही.’ (धम्मपद ३ आणि पुढील २ गाथा)

‘हे एक जुने सत्य आहे. केवळ फक्त आजचेच सत्य नाही. शांत बसणाऱ्याची लोक निंदा करतात आणि फार बडबड करणाऱ्यांची सुद्धा लोक निंदा करतात. जे अगदी थोड़े बोलतात त्यांचीसुद्धा लोक निंदा करतात. जगात असा कोणीही नाही की ज्याची निंदा केली जात नाही. सर्वस्वी निंदित किंवा सर्वस्वी प्रशंसित असा माणूस आत्तापर्यंत झाला नाही, सध्याही नाही आणि होणारसुद्धा नाही. (धम्मपद २२७, धम्मपद २२८ आणि नंतरचे चार श्लोक).

पालीतून मूल जितके अधिक धम्मोपदेश पाठ करील. आणि त्यातला गर्भितार्थ त्याला जितका समजत जाईल, तितका ह्या ज्ञानापासून त्याला फायदा मिळत जाईल. याचा अर्थ असा नव्हे, की ज्याचा अर्थ त्याला अजिबात समजत नाही अशाही गाथा मुलाने शिकाव्यात. परंतु मूल जसे वाढत जाईल, त्यानुसार वरील सोप्या गाथांचा अर्थ त्याला अधिक चांगल्या तऱ्हेने समजत जाईल.

उपोसथ दिवस

मुलांनी ज्या गाथा शिकल्या आहेत वा पाठ केल्या आहेत, त्याची उजळणी करण्यासाठी उपोसथ दिवस हे मुलांच्या दृष्टीने अतिशय उत्तम दिवस आहेत. पालकांच्या दृष्टीने बुद्धाची शिकवण समजावून देण्यास उपोसथाचे दिवस अगदी योग्य दिवस आहेत. अशा विशेष दिवशी वा प्रसंगी मुलांना त्याचा जास्त त्रास होणार नाही त्याचीही आपण काळजी घेतली पाहिजे. एखाद्या चांगल्या गोष्टीकडे मुले किती वेळ लक्ष केंद्रित करू शकतील, याबद्दलची त्यांची क्षमता खूपच मर्यादित असते. उपोसथाचा दिवस हा खरे म्हणजे एक उत्सवाचा दिवस असतो आणि मुले त्याची आतुरतेने वाट पहात असतात. म्हणून त्या दिवशी आपण त्यांना फिरायला नेले पाहिजे, खरे तर लांब सहल काढली पाहिजे, आणि त्यांचेबरोबर खेळण्यातही काकू करू नये. शेतात वा जंगलात आनंदाने, मजेत फिरत असताना, निसर्ग आणि जीवन जसे आहे तसे पाहण्यास (जीवन कसे सुंदर आहे याचे निरीक्षण करण्यास, आनंद लुटण्यास ) त्यांना सांगायला हरकत नाही. आपल्या राजवाड्याच्या बागेच्या बाहेरच फिरायला राजपुत्र सिद्धार्थ बाहेर पडला, तेव्हाच त्याला म्हातारा माणूस, आजारी माणूस, प्रेतयात्रा दिसली आणि शेवटी त्याला एक भ्रमणपण भेटला. त्याचप्रमाणे आपण आपल्या मुलांना सुरक्षित, प्रसन्न, पण संकुचित घरातून बाहेर काढून दुःखी, कष्टी अशा विशाल जगात नेले पाहिजे.

राजपुत्र गौतम वाढला तशा तऱ्हेच्या बंदिस्त राजवाड्याच्या बागांत वा राजवाड्यात बौद्ध मुलांना आपण लहानाचे मोठे करायचे नाहीये. अशा तन्हेच्या निसर्गातील सहलसफरीत खरेखुरे जीवन काय आहे हे पाहाण्याची, अनुभवण्याची विपुल संधी मुलांना मिळणार आहे. त्यांना असे दिसेल की निसर्गात प्रत्येकाचे दात आणि पंजे रक्ताने लाल झालेले आहेत. प्रत्येक प्राणी हिंस्र झगडा करतो आहे आणि दुर्बलांना खाऊन टाकतो आहे. अनेक लोकांची जीवनपरिस्थिती किती हलाखीची आहे हे पण ती मुले पाहातील. म्हातारपण, आजारपण आणि मरणोन्मुखावस्था म्हणजे काय असते ह्याची मुलांना साधारणतः जाण नसते. थोडे थोडे करीत, या सर्वांची आपण मुलांना चांगली व योग्य कल्पना दिली पाहिजे आणि तेव्हाच मैत्रीभावनेचे कसे आचरण करावयाचे हे त्यांना आपण शिकविले पाहिजे. लहान मुले पुष्कळ वेळा प्राण्याशी क्रूरतेने, निर्दयतेने वागतात, कारण आपण काय करीत आहोत याची त्यांना जाणीव नसते. मुले काय करीत आहेत याचे पालकांनी सदैव व त्वरित निरीक्षण करावयाचे, आणि आपण काय करीत आहो याची मुलांना लवकर जाण करून द्यायची, यावरच हे पुष्कळसे अवलंबून असते. आपली मुले प्राण्यांबाबत निर्दय असणार नाहीत याची निक्षून काळजी बौद्ध आईवडिलांनी घेतली पाहिजे. जनावरे किंवा प्राणी म्हणजे आपल्या अन्नाचा भाग आहे असे समजू नये. प्रत्येक जनावर संजीवप्राणी असते म्हणून प्रत्येक बौद्ध मुलाने त्यांना आदराने वागवले पाहिजे. ग्रामीण भागात आपण जेव्हा सहलीला जातो तेव्हा माणूस आणि प्राणी या दोघांबरोबर प्रेमाने, सहानुभूतीने कसे वागायचे हे दाखविण्याचे अनेक प्रसंग आपल्याला आढळतात. पण अशा वेळी व्याख्यान न देता प्रत्यक्ष कृतीने आपण समजावून दिले पाहिजे, एखाद्या म्हाताऱ्या बाईला डोक्यावर टोपली उचलून द्यायला अगर हातगाडी ढकलायला आपल्या मुलाने चांगल्या स्काऊटप्रमाणे मदत केली पाहिजे. डबक्यात पडून बुडणाऱ्या लहानशा कीटकालाही त्याने वाचविले पाहिजे. भरतीच्या वेळी वर आलेल्या आणि छोट्या पाण्यात अडकून पडलेल्या आणि तडफडणाऱ्या माशांना त्याने खोल पाण्यात नेऊन सोडून दिले पाहिजे. आपल्या मातापित्यांचे अनुकरण करून, आपण बुद्धधम्म आचरत आहोत हे दाखविण्याच्या अनेक संधी मुलांना मिळत असतात, सर्व बौद्धजनांनी एक महत्त्वाची गोष्ट जाणायला हवी केवळ ज्ञान उपयोगी नाही, पुरेसे नाही,

करुणा म्हणजे बुद्धधम्म

खरोखर बुद्धधम्म हा अतीव करुणेचा धम्म आहे आणि अशाच स्वरूपात तो मुलांना समजावून देण्यास आपण कधीही विसरता कामा नये. सर्व जगाबद्दलच्या करुणेतूनच बुद्धाने धम्म शिकविला. ज्याप्रमाणे या ‘सर्व करुणाकारा’ने ‘करुणा’ हाच आपल्या शिकवणीचा केंद्रबिंदू बनवला होता, त्याप्रमाणे केवळ वायफळ चर्चेला महत्त्व देऊन ‘करुणे’ची वस्तुस्थिती नजरे आड करून चालणार नाही. जर आपण आपल्या मुलांना मैत्री, करुणा आणि मुदिता चांगल्या तन्हेने शिकवू शकलो, तर आपल्याला जे उत्तम करावयाचे आहे, त्यात आपण यशस्वी झालो असे म्हणता येईल, उपेक्खा ज्ञानाला आचरणाची जोड मिळायला हवी (उपेक्षा, मनाचा समतोल), पण उपेक्खा तितकीच महत्त्वाची असते. पण ती मुलांना समजून घेण्यास कठीणच असते.

बुद्ध – आमचा आदर्श

मुलांना हे सर्व कठीण, क्लिष्ट वाटता कामा नये. नाहीतर ती कंटाळतील, नाउमेद होतील. हे सर्व आईवडिलांच्या मानसिक संवेदनक्षमतेवर पुष्कळसे अवलंबून राहील. आपण किती दूरवर जाऊ शकतो याची त्यांनाच पुरेशी जाण असली पाहिजे. जनतेशी संवाद कसा साधायचा हे बुद्धाला अधिक चांगल्या तऱ्हेने माहीत होते. तत्त्वज्ञानी अगर शिक्षित लोकांपेक्षा वेगळ्या तऱ्हेने तो सर्वसामान्यांशी बोलत असे. त्याच्या उदाहरणावरून आपणाला खूपच शिकण्यासारखे आहे. तो महान तत्त्वज्ञानी होताच, त्याबरोबर महान मानसशास्त्र होता. त्या पूर्ण सत्यज्ञानीच्याबाबत यापेक्षा वेगळे काही असणे कसे शक्य आहे? म्हणून, बुद्धधम्म अगदी तपशीलवार आपणच प्रथम शिकला पाहिजे. कारण त्याशिवाय हा धम्म आपण दुसऱ्यांना शिकवू शकणार नाही. खरे तर ही एक अत्यंत अपरिहार्य गोष्ट मानली पाहिजे. हे इतके स्पष्ट आहे की त्याचा उल्लेख करायला मी जवळ जवळ विसरूनच गेलो होतो.