मुंबई : भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीला ह्या वर्षी 73 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2025 साली राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण होतील. या निमित्ताने संवेदना फेलोशिप प्राप्त आमीर काझी या तरुणाने संवेदना फेलोशिप अंतर्गत मध्य रेल्वे, मुंबईच्या संबंधित अधिकाऱ्यांसमोर लोकलच्या एका डब्याचे रुपांतर “संविधान रेल्वे डबा” म्हणून करण्याचा प्रस्ताव मांडला होता. तसेच याकामी आशयपूर्ण पोस्टर्स आणि त्यासाठीच्या आर्थिक सहयोगासाठी तयारी दर्शविली. हा प्रस्ताव मुंबई विभागाचे ADRM अरमिंदर सिंग यांनी मनापासून स्विकारला आणि 26 जानेवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे अधिकारी आणि पुकार संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या अनिता देशमुख यांच्या हस्ते “संविधान रेल्वे डब्याचे यशस्वीरित्या उद्घाटन करण्यात आले. (Aamir Qazi’s efforts succeed, a local coach converted into a “Constitutional Railway Coach”)
भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीला ह्या वर्षी 73 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2025 साली राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण होतील. या निमित्ताने संवेदना फेलोशिप प्राप्त आमीर काझी या तरुणाने संवेदना फेलोशिप अंतर्गत मध्य रेल्वे, मुंबईच्या संबंधित अधिकाऱ्यांसमोर लोकलच्या एका डब्याचे रुपांतर “संविधान रेल्वे डबा” म्हणून करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
संविधान रेल डब्यामध्ये संविधान सभा, संविधानाची निर्मिती, संवैधानिक मूल्ये, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये याबाबतच्या माहितीचे पोस्टर्स लावण्यात आहेत. पोस्टर्सची रचना समता आंदोलनाने केली आहे. या पोस्टर्समध्ये चित्रांच्या माध्यमातून भारतीय संविधानातील मूल्ये सोप्या पद्धतीने नागरिकांना समजतील अशी रचना केली आहे. ज्यातून त्यांना आपली राज्यघटना जाणून घेणे सोपे होईल. यासाठी आमिर काझी यांना कुर्ला कारशेडचे वरिष्ठ DEE रामेंद्र राय आणि संवेदना फेलोशिप टीम यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
मुंबई सेंट्रल लाईनवरील लोकल ट्रेन क्रमांक 5262बी मध्ये लेडीज कोचच्या पुढील व इंजिनपासून दुसरा डबा हा संविधान रेल डबा आहे. हा डबा 26 जानेवारी 2023 पासून सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. संविधान साक्षरता वाढविण्याच्या महत्वपूर्ण कामासाठी आमिर काझी, अनिता देशमुख आणि संबंधित रेल्वे अधिकारी यांनी घेतलेला हा पुढाकार अभिनंदनीय आहे. तर संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणखी एका संविधान डब्याचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे करण्यात आलेले आहे.
याबाबत बोलताना आमीर काझी सांगतो की, “सन 2018 मध्ये ‘संविधान प्रचारक’ या चळवळीशी मी जोडला गेलो आणि माझा अभ्यास सुरू झाला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, संविधान कळत-नकळत आपल्या जीवनाशी प्रत्येक क्षणी जोडलं गेलेलं आहे. संविधानामुळेच आज आपण स्वाभिमानानं जगू शकतो, शिक्षण पूर्ण करू शकतो, जे हवं ते मिळवू शकतो. संविधानानं आपल्याला अनेक अधिकार दिले असून संविधानामुळेच आपल्या अधिकारांना सरंक्षण आहे.” तसेच संविधान प्रचारक’च्या माध्यमातून संविधानाचा प्रचार आणि प्रसार करणं किती गरजेचं आहे, हे लक्षात आल्याने त्याने यावर काम करायला सुरुवात केली. पुढे दारूखाना येथील वस्त्यांमधील मुलांना त्यानं शिकवायला सुरुवात केली; तर महाविद्यालयांमध्ये संविधानावर आधारित चर्चासत्रे आयोजित करणं, मदरशांमध्ये धार्मिक शिक्षणाच्या जोडीलाच ‘दीनी तालीम और भारत का आईन (संविधान)’ या नावानं सत्र आयोजित करणं आदी कामं तो करत असतो. संविधान फक्त पुस्तकात न राहता लोकांमध्ये लोकांमार्फत रुजायला हवं, अशी त्याची भावना आहे.
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन अशा विविध धर्मांचे लोक प्रवास करत असतात. त्यांत श्रीमंत असतात, गरीब असतात, स्त्रिया असतात, पुरुष असतात. असे सर्व प्रकारचे लोक असतात. अत्यंत सोईचा आणि परवडणारा प्रवास म्हणून लोकलमधून मोठ्या संख्येने हे लोक प्रवास करत असतात. त्यामुळे आमीरच्या मनात आलं की, भारतीय संविधान हे लोकलमध्येसुद्धा असणं गरजेचं आहे. त्यानुसार आज त्याच्या प्रयत्नांना यश आले आहे.
“जात-धर्म यांचे राजकारण देशाला नवीन नाही. अशा वातावरणात सुज्ञ नागरिकांची भिस्त असते ती संविधानवर! कारण, संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे. लोकांना लोकांशी जोडण्याचं काम संविधानानं केलं आहे. या देशातील लोक सुखी, समृद्ध आणि संपन्न व्हावेत असं वाटत असेल तर त्याला एकमेव पर्याय आहे संविधान. त्यामुळे संविधानाचा प्रचार करणं मला गरजेचं वाटतं. म्हणून माझ्या डोक्यात ‘संविधान रेल डिब्बा’ ही संकल्पना आली…” मुंबईत राहणारा अठ्ठावीसवर्षीय आमीर काझी त्याच्या अभिनव उपक्रमाविषयी सांगत होता.
More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सदोष पुतळा आंबेडकरी जनतेवर लादण्याचा प्रयत्न हाणून पाडू !
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे आश्वासन मागण्या मान्य परभणी ते मुंबई लाँग मार्च स्थगित
महाबोधी महाविहारावर बौद्धांच्या नियंत्रणात सोपवण्याची मागणी तीव्र, १२ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण