July 30, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

मनोजभाईला द्यायची अस्सल श्रध्दांजली!

Real tribute to Manoj Bhaila!

Real tribute to Manoj Bhaila!

काय मनोजभाई असं कोणी जातं का? आयुष्यभर खांद्याला खांदा देऊन लढलो. हरेक घडीला सोबत होतो. आणि अचानक कोणालाही न सांगता एकदम ॲक्झिट घेणं हे शोभतं का तुम्हाला? काल परवा पर्यंत आपल्याला रिपब्लिकन ऐक्य घडवायचय हे तुम्ही आम्हाला सांगत आलात. अगदी तुम्ही आजारी पडल्यानंतर बबन सरवदे आणि मी तुम्हाला भेटावयास आलो होतो तेंव्हाही तुम्ही आम्हा दोघांना तुमच्या बोबड्या शब्दात हेच सांगीतलं होतं.

मनोजभाई तुम्ही रोखठोक स्वभावाचे होतात. खोटं बोलणं तुम्हाला कधीच जमलं नाही. जे काही असेल ते तोंडावर बोलून तुम्ही मोकळे व्हायचात. तद्वतच मानभावीपणे खोटं बोलणं, गोड, गोड बोलणं आम्हालाही जमत नाही. याबाबतीत मनोजभाईं तुमची आणि आमची जातकुळी एकच आहे. मनोजभाईं तुमच्या याच स्वभावामुळे तुमच्या प्रेतयात्रेत एकही आंबेडकरी नेता सहभागी झाला नसावा. ना प्रकाश आंबेडकर सहभागी झाले, ना आठवले सहभागी झाले, ना कवाडे सहभागी झाले, ना राजेंद्र गवई सहभागी झाले, ना आनंदराज सहभागी झाले. मी वडाळ्यापासून तुमच्या प्रेतयात्रेत होतो. निदान माझ्या तरी पाहण्यात मला हे नेते दिसले नाहीत. अन्य कोणाला दिसले असतील तर त्यांनी तसे सांगावे.

मनोजभाईं तुमच्या निधनानंतर कोणीतरी अशी पोस्ट टाकली होती की, प्रकाश आंबेडकरांचे मनोजभाईंशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. या पोस्टमधे काही अंशी तथ्यांश असूही शकतो. पण जर तुमचे प्रकाश आंबेडकरांशी खरेच इतके जिव्हाळ्याचे संबंध असते तर तुम्ही आपला स्वारिप व युथ रिपब्लिकन गुंडाळून कधीच वंचितमध्ये सामिल झाला असता.. पण तुम्ही वंचितमध्ये सामिल न होता आपली स्वारिप व युथ रिपब्लिकन चालवत राहिलात. मनोजभाई तुम्ही आजारी असताना रामदास आठवले तुम्हाला भेटावयास आले होते. पण तुमचे आठवलेंविषयीचे मत आम्हा सर्वांना ज्ञात आहे. तुम्हाला रिपब्लिकन पक्षाची एकजूट करायची होती पण त्यात तुम्हाला आठवले नको होते. आता आठवले का नको, याचं कारण सर्वांना चांगलच माहीत आहे. केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर आठवलेंची जी वक्तव्य आपण ऐकत आहोत त्यावरुन आठवले हे मोदीवादी आहेत की, आंबेडकरवादी आहेत हा संभ्रम आम्हा सर्वांनाच पडत आहे, आणि त्यामुळेच रिपब्लिकन ऐक्यामध्ये आठवले नकोत, हा तुमचा आग्रह आम्हालाही यथोचित वाटत होता. या ऐक्यात तुम्हाला प्रकाश आंबेडकर व कवाडेही अपेक्षित होते. पण यासाठी प्रकाश आंबेडकरांनी वंचित सोडावी आणि कवाडेंनी काँग्रेसची पाठराखण सोडावी, हा तुमचाहट्टाग्रहच होता. आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या सोबत असल्याने हे आम्हास पुरते ठाऊक आहे.

आमच्याकडून म्हणजे विषेशतः बबन सरवदे आणि माझ्याकडून मनोजभाईं तुमच्या खुप अपेक्षा होत्या. म्हणूनच तुम्ही आपल्या मनीचे हितगुज आमच्याशी बोलून मोकळे व्हायचात. पण सदोदित तुमच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमध्ये आमच्या प्रापंचिक अडचणीमुळे आम्हाला ते शक्य होत नव्हते. आज जरी तुमच्या पश्चात तुम्हाला भावनेच्या भरात कोणी पँथर म्हटले असेल. तरीही तुम्ही कट्टर आणि कडवट रिपब्लिकन होता, हे आमच्या शिवाय छातीठोकपणे आम्हीच सांगू शकतो. आपल्या पक्ष व संघटनेची जी नावे आहेत ती युथ रिपब्लिकन व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष अशी आहेत. यात ठळकपणे ‘रिपब्लिकन’ हे नाव आपणास स्पष्टपणे दिसून येते. याचाच अर्थ हा की, मनोजभाई तुम्हाला बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाविषयी प्रचंड निष्ठा व आत्मियता होती. जगेल तर रिपब्लिकन म्हणून आणि मरेल तर रिपब्लिकन म्हणूनच हा तुमचा प्रण होता. स्वारिप वा युथ रिपब्लिकन हे तुमचे साध्य नसून फक्त साधन होते. बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष मजबूत व्हावा, हे मनोजभाईं तुमचे एकमेव असे अंतिम साध्य होते. भैय्यालाल भोतमांगे प्रकरणात तुम्ही रिपब्लिकन नेत्यांनी एक व्हावं म्हणून अत्यंत शर्थीचे प्रयत्न केले. पण त्याला म्हणावे तितके यश आले नाही. पण मनोजभाई, तुम्ही आयुष्यभर रिपब्लिकन म्हणूनच राहिलात आणि. मेल्यानंतरही तुम्ही रिपब्लिकनच राहिलात. तुमच्या अंत्ययात्रेत तुमच्या डोक्यावर असलेली निळी टोपी, हेच दर्शवित होती.

एक जुना प्रसंग आठवतो. माझे उठाव नावाचे काव्यसंग्रहाचे पुस्तक प्रकाशित झाले होते. सुमारे दोन हजाराची आवृत्ती होती. एक हजार पुस्तके प्रकाशनाच्यावेळेसच संपली होती. पण अजून एक हजार पुस्तके शिल्लक होती. ही पुस्तके आपल्या माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी सहा डिसेंबरची तारीख निश्चित केली. पण पुस्तके कुठे ठेवायची हा प्रश्नच होता. मी अनेक स्टाॅलधारकांना याबाबत विनंती केली. पण कोणीच स्टाॅलधारक माझी पुस्तके ठेवायला तयार नव्हता. शेवटी मी शिवाजी पार्कच्या फुटपाथवर चादर अंथरुन माझी पुस्तके ठेवली. मनोजभाई, हे कोणाकडून तरी तुमच्या कानावर आले. लागलीच तुम्ही अनिल मोरेंना माझ्याकडे पाठविले आणि माझ्या पुस्तकांसाठी आपल्या विशाल स्टाॅलचा एक कोपरा मोकळा करुन दिलात. माझ्यासाठी माईकची व्यवस्था करुन दिलीत. मी पाच व सहा डिसेंबरला माईकवरुन माझ्या कविता म्हणत होतो आणि जवळ, जवळ माझ्या पुस्तकाच्या पाचशे प्रती विकल्या गेल्या. हे सगळं मनोजभाई तुमच्यामुळेच शक्य झालं. हा प्रसंग मी आयुष्यभर विसरू शकत नाही. नाहीतर सहा डिसेंबरला स्टाॅलची बुकींग करणं, त्यात लाईटची व्यवस्था करणं, हे माझ्यासारख्या फाटक्या माणसाला आपल्या बापजन्मीही शक्य नव्हतं. आणि मग मनोजभाई पुढच्या सहा डिसेंबरला अगदी हक्काने मी तुमच्या स्टाॅलवर माझी उरलेली पुस्तके लावली आणि हातोहात ही पुस्तके संपली सुध्दा.

मनोजभाई अगदी सुरवातीला तुम्ही आजारी आहात हे कळल्यावर मी व बबन सरवदे तुम्हाला भेटावयास आलो होतो. कडकडून गळाभेट झाल्यानंतर तुम्ही आम्हाला अगदी जबरदस्तीने बाजूला बसवून घेतले. त्यावेळेस बोबडे का होईना पण मनोजभाई तुम्ही बोलत होता. मनोजभाई तुम्ही आम्हा दोघांना म्हणालात “आता माझी परिस्थिती ही अशी आहे. पण तुम्ही दोघे आता तरी प्रत्यक्ष मैदानात उतरा. मी शेवटपर्यंत तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही हे नक्कीच करू शकता”. आम्ही दोघांनी तुमच्या हातात हात मिळवले. तुम्ही आमच्या दोघांचे हात घट्टपणे दाबून धरले.

मनोजभाईं, तुमच्या शब्दात आम्ही नेमके काय करायचे आहे, हे आम्हाला अचूक कळले होते. तुमचं रिपब्लिकन एकजूटीचे स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं आहे, हा स्पष्ट संदेश तुम्ही आम्हा दोघांना दिला होता. कदाचित हे तुम्ही अनेकांशीही बोलले असावेत. ही घटना सांगून आम्ही आमचे व्यक्तीस्तोम माजवतो आहोत, असा कोणाचा गैरसमज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण इथे मला हे स्पष्ट करावेसे वाटते की, राजकीय क्षेत्रात आम्ही कधीही नेतेपद स्विकारणार नाही, ही आमची भिमप्रतिज्ञा आहे. आणि हे आम्ही मनोजभाईं तुम्हाला या आधीही अनेक वेळा सांगीतलं होतं. आमचं आणि मनोजभाईं तुमचं एकच स्वप्न आहे की, बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष हा भारतीय राजकारणात दखलपात्र झाला पाहिजे. आणि त्यासाठी रिपब्लिकन पक्षाची एकजूट होणे क्रमप्राप्त आहे. यासाठी प्रयत्न करणं, हीच खऱ्या अर्थाने मनोजभाई तुम्हाला श्रध्दांजली असेल असे मला वाटते. मनोजभाई, आम्ही हे तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण करू हे आमचे तुम्हाला वचन आहे.
– विवेक मोरे