November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

अज्ञात समाजकंटककांनी पुन्हा महापुरुषांचे फोटो असलेले होर्डिंग फाडून नासधूस

दाभाडीत अभिवादन फलकाची दोनदा नासधूसअ ज्ञात समाजकंटककांनी पुन्हा महापुरुषांचे फोटो असलेले होर्डिंग फाडून नासधूस तणावाचे वातावरण : कारवाईची मागणी

मालेगाव : सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे लावण्यात आलेले महापुरुषांचे फोटो असलेल्या अभिवादन फलकाची अज्ञात समाजकंटकाकडून नासधूस करण्याचा प्रकार गुरुवारी (दि.६) मध्यरात्री घडला. या घटनेने दाभाडी गावात तणावाचे वातावरण असून चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

दाभाडी मध्ये फलकाची तोडफोड करणाऱ्यांना अटक करीत कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त पदाधिकारी, कार्यकत्यांनी छावणी पोलिस ठाण्यात धाव घेत केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन सदर कृत्य करणाऱ्यांना अटक केली जाईल, अशी ग्वाही अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपाधीक्षक प्रदीप कुमार जाधव यांनी दिल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.

महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक उत्सव समितीतर्फे दाभाडी गावात अभिवादन करणारे होर्डिंग दोन दिवसांपूर्वी लावण्यात आले होते. मात्र अज्ञात समाजकंटकाने सदर महापुरुषांच्या प्रतिमा असलेल्या होर्डिंगची नासधूस केली होती. मात्र गावातील शांततेस गालबोट लागू नये, जातीय तेढ निर्माण करण्याचे समाजकंटकाचे प्रयत्न यशस्वी होऊ नयेत यासाठी समिती पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संयम ठेवत नवीन होर्डिंग लावण्याचा निर्णय घेतला होता. काल रात्री समितीतर्फे पुन्हा दाभाडी गाव प्रवेशद्वाराजवळ दोन होर्डिंग लावण्यात आले होते. मात्र मध्यरात्रीतून अज्ञात समाजकंटककांनी पुन्हा महापुरुषांचे फोटो असलेले होर्डिंग फाडून नासधूस केल्याचे सकाळी उघडकीस आल्याने गावात कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले. या निंदनीय कृत्यासंदर्भात ग्रामपंचायतीकडे तक्रार करण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी छावणी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या घटनेची माहिती मिळताच माजी उपमहापौर नरेंद्र सोनवणे, स्मारक समितीचे प्रमुख गुलाब पगारे, यशवंत मानकर, विवेक वारुळे, देवा वाघ आदी पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात दाखल होत घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला.

सध्या गावात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. घटनेनंतर कार्यकर्त्यांनी ठेवलेल्या संयमाचे पोलिस अधीक्षक भारती, जाधव यांनी कौतुक करीत सदरचे कृत्य करणाऱ्यांचा शोध घेण्यात येऊन त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिल्याने संतप्त कार्यकर्ते शांत झाले. याप्रकरणी फलकाची नासधूस करणाच्या समाजकंटकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम छावणी पोलिसांतर्फे सुरू होते. दरम्यान, या घटनेनंतर अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून गावात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.