“गुरुवीन कोण दाखवील वाट” असे भारतीय परंपरेमध्ये प्राचीन काळापासून म्हटले गेले आहे. या जगात बुद्ध हे पहिले जगद्गुरु होते की ज्यांनी आषाढ पौर्णिमेला केलेल्या प्रथम उपदेशामुळे ती पोर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाऊ लागली. गुरूंच्या निर्वाणानंतर त्यांची पोकळी जाणवू नये यासाठी गुरूंच्या वस्तू सांभाळणे व त्यांची आठवण म्हणून त्या पूजने ही भारतीय परंपरा होती. त्याचप्रमाणे बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे अस्थिधातूवर स्तूप उभारले गेले. सम्राट अशोकाच्या काळापासून धम्माचा प्रसार चोहीकडे झाल्यावर स्तुपाबरोबर बुद्ध शिल्प, त्रिरत्न, बोधिवृक्ष, रिक्त सिंहासन, कमलपुष्प, पदकमल अशी रूपके-चिन्हे शिल्पांकीत करून त्यांना मनोभावे वंदन करण्यात येऊ लागले. त्यापैकी बुद्ध प्रतिमा शिल्प आणि पदकमल ( Footprint ) प्रतिमा शिल्प भारतखंडात अत्यंत लोकप्रिय झाले.
जगात पहिल्यांदाच ज्या महामानवाचे पदकमल शिल्प तयार करण्यात आले ती व्यक्ती म्हणजे भगवान बुद्धच होते. त्यांचे अस्तित्वच या पदकमलातून लोकांना जाणवू लागले. राजपुत्र असून देखील सर्व सुखांचा त्याग करून संन्यस्त मार्ग स्वीकारणे सोपे नव्हते. समस्त मानवजातीप्रती करुणा निर्माण होऊन दुःखमुक्तीचा मार्ग शोधणे आणि तो सर्वाना उपदेशीणे हे अदभुत होते. यामुळेच बुद्ध तत्वज्ञान दिवसेंदिवस स्वीकारले जात आहे. व त्यांच्या रुपकांना वंदन केले जात आहे. ‘बुद्ध पदशिल्प‘ म्हणजेच भगवान बुद्ध यांच्या पावलांची पूजनीय प्रतिमा. ही वालुकामय पाषाणावर, खडकावरती मोठ्या शिळेवर अशा असंख्य ठिकाणी कोरली गेली. भगवान बुद्धांच्या पावलांचा तो ठसा नसला तरी मानवजातीस त्यांनी दाखविलेला दुःखमुक्तीचा मार्ग म्हणून यांच्याप्रती ती श्रद्धा होती. म्हणूनच आदरार्थ भावनेतून पदकमल शिल्पांचा उदय होत गेला व लेण्यांमधून, चैत्यगृहातून, विहारातून ती दृष्टीस पडू लागली. ही प्रथा पूर्वेकडील बौद्ध देश जपान, थाई, बर्मा, कंबोडिया, व्हिएतनाम, लाओस आणि दक्षिणेकडे सिरिलंकेत सुद्धा पसरली. विविध पदकमल शिल्पे हेच सांगतात की या पृथ्वीतलावर एकेकाळी बुद्ध यांचे वास्तव्य होते. काही ठिकाणी ही पदशिल्पे साकारताना ३२ लक्षणांची रूपके-चिन्हे सुद्धा पावलांच्या तळव्यावर कोरली जाऊ लागली. श्रीलंकेत ‘सिरी पदया’ नावाचा मोठा पर्वतच आहे. तेथे बुद्ध पदकमले कोरण्यात आली असून असंख्य भाविक आणि पर्यटक तेथे दर्शनार्थ जात असतात.
जगात वेगवेगळ्या कालावधीत अनेक देशात बुद्ध पदकमल शिल्पे तयार करण्यात आली. जपानी लेखक ‘मोटोजी निवा’ यांनी याबाबत अभ्यास केला आणि आशिया देशातील अनेक बुद्ध पदशिल्पांचा शोध घेतला. तेंव्हा त्यांना तीन हजाराच्यावर बुद्ध पदशिल्पे आढळली. जपानमध्ये तीनशेच्यावर तर सिरीलंकेत एक हजारच्या वर पदकमल शिल्पे आहेत. प्रत्येक पदकमलावर धम्मचक्र अंकित केल्याचे त्यांना आढळून आले. चीनमध्ये चँग राजवटीत मोठी बुद्ध पदशिल्पे उत्खननात मिळाली तेव्हा तेथील राजकुमारीने इसवी सन ७०१ पासून नवीन शक सुरू केले. आतापर्यंत पदशिल्पे अफगाणिस्तान, भूतान, कोरिया, मलेशिया, मालदीव, पाकिस्तान, सिंगापूर, थायलंड येथे प्राप्त झाली आहेत. भारतात बिहार, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि तामिळनाडूत बुद्ध पदकमल शिल्पे मिळाली आहेत. अलीकडेच फेब्रुवारी २०१७ मध्ये छत्तीसगढ राज्यातील बिलासपूर जिल्ह्यातील डमरू गावात वोटीव स्तूप आणि बुद्धपद शिल्प मिळाले. हे वाहून नेण्याजोगे असून त्यावर १२ कमलपुष्प कोरले आहेत.
बुद्ध पदकमल शिल्पांचा विषय मोठा व गहन आहे. त्यावर प्रबंध लिहिला जाऊ शकेल. जाणकारांनी त्याचा जरूर अभ्यास करावा. हल्लीच्या थातुरमातुर गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यापरीस सत्यमार्गावर एकतरी पाऊल पुढे टाकावे.
— संजय सावंत ( नवी मुंबई )
9768991724
More Stories
🧡 बुद्धांचे मैत्रीविषयक विचार 🧡 Buddha’s Thoughts On Friendship
🐍 Nag Panchami and Buddha Dhamma – A Buddhist Perspective 🐍 नाग पंचमी : परंपरेतून समजून घेणे
Buddhist Story अंगुलिमाल – खुनी भिक्षू बनतो!