वंदनीय भन्तेजींच्या पायांना जखमा ,पण……
जगाला सत्य – शांती – अहिंसेचा महान मार्ग दाखवणारे विश्वगुरू तथागत बुद्धांच्या महामंगल अस्थी धातूंचा पवित्र कलश घेऊन परभणी येथून निघालेली “धम्म पदयात्रा” आता अंतिम टप्प्यात आली असून , येत्या १५ फेब्रुवारी २०२३ रोजी ही महामंगल अस्थीधातु धम्म पदयात्रा मुंबईच्या उर्जाभूमीत चैत्यभूमीवर येणार आहे , ही प्रत्येक मुंबईकरांसाठी अभिमानाची व गौरवाची बाब आहे.
ह्या महामंगल पदयात्रेचे नेतृत्व थायलंड मधील महावंदनीय ११० बौद्ध भिक्खू करीत असून ही पदयात्रा जणूकाही ह्या थायलंडच्या ११० भिक्खू संघाच्या धम्मनिष्ठेची परीक्षा पहाणारीच आहे.पायात चप्पल न घालता काट्याकुट्यावरून , उन्हाने भाजलेल्या गरम रस्त्यांवरून , दगड धोंडे पार करीत अनवाणी पायाने थायलंडचे हे ११० भिक्खू अविरतपणे , न थकता , काहीही कुरकुर न करता , अगदी आनंदाने , “बुद्धम शरणम गच्छामि , धम्मम शरणम गच्छामि , संघम।शरणम गच्छामि ” च्या सुरेल जयघोषात चालत आहे आणि चालतच आहे.शेवटी भदंत हे सुद्धा आपल्यासारखेच मनुष्यप्राणी असून ते आपल्यासारखेच हाडामांसाचे आहेत.( ते स्वयंघोषित बाबा , बुवा नाहीत आणि कोणत्याही प्रकारचे थर्डक्लास फडतूस चमत्कार दाखवून भोळ्याभाबड्या लोकांना लुटायचे गोरखधंदे गल्लीबोळात असणारे स्वयंघोषित बाबा , आप्पा ,बुवा सारखे लोकं करत असतात.) निसर्ग नियमानुसार अनेक भदंतांच्या पायांना खोलवर जखमा झाल्या आहेत परंतु वंदनीय भदंतांच्या चेहऱ्यांवर तथागत बुद्धांची महाकरुणा दिसून येत असून त्यांच्या मुखावर स्मितहास्य पसरलेलं आहे. कुठेही वेदनेचा लवलेश नाही.हे सगळं अचंबित करणारा प्रकार पाहून काही पत्रकारांनी जेव्हा भदंतांना ह्या बद्धल विचारले असता भदंतांनी दिलेले उत्तर फारच भावनिक आहे , खूपच प्रेरणादायी आणि आदरयुक्त आहे. वंदनीय भदंत म्हणतात “भारत ही तर बुद्धांची महान भूमी आहे. ह्या महामंगल भूमीवरून चप्पल घालून कसे चालणार ? *तथागत बुद्धांच्या महान भूमीत आल्याने आमचे जीवन सार्थक झाल्याचेच आम्हाला समाधान आहे. जीवनातील ह्या सर्वोच्च आनंदापुढे , आमच्या पायाचे दुखणे आम्हाला काहीच जाणवले नाही.” ह्या भव्यदिव्य आणि ऐतिहासिक धम्म पदयात्रेचे मुख्य आयोजक असणारे डॉ.सिध्दार्थजी हत्तीअंबिरे यांनी पत्रकारांना अधिक माहिती देताना सांगितले की , “ह्या महामंगल धम्मपदयात्रेत चालणाऱ्या वंदनीय भन्तेजींना कोणत्याही प्रकारच्या सुखसोयींची अपेक्षा नाही. त्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्या नम्रपणे नाकारत , भारतात बुद्धभूमीत आल्याचे समाधान असल्याने भारावून गेल्याचे ते सांगतात. त्यांच्या पायाला जखमा आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय पथक सज्ज आहे.”
🌹 बौद्ध धम्मपद यात्रेचे महामंगल स्वागत 🌹
Buddhism In India
More Stories
दीक्षाभूमीवर क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
कवी साहित्यिक किरण लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त काव्यसंमेलन, बक्षीस वितरण
बुद्ध धम्म समजणे म्हणजे काय ? What is understanding Buddha Dhamma ?