November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

बहिष्कृत विद्यार्थ्यांच्या कर्तव्यावरच बहिष्कृतांचे भवितव्य – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

पुणे येथील बहिष्कृत विद्यार्थ्यांच्या चतुर्थ वार्षिक सामाजिक सम्मेलनात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण….

रविवार, दिनांक २ ऑक्टोबर १९२७ रोजी पुणे येथे बहिष्कृतांचे सुप्रसिद्ध पुढारी डॉ. भीमराव आंबेडकर, बार-ॲट-लाॅ यांच्या अध्यक्षतेखाली बहिष्कृत विद्यार्थ्यांचे चतुर्थ वार्षिक सामाजिक सम्मेलन उत्साहाने पार पडले. या समारंभासाठी डी. सी. मिशनचा अहिल्याश्रम हॉल सुशोभित केला होता. या सम्मेलनाचा कार्यक्रम शनिवार व रविवार असे दोन दिवस ठेवण्यात आला होता. शनिवारी विद्यार्थ्यांच्या संभाषणाचे व खेळांचे सामने झाले. विशेष म्हणजे या सामन्यांमध्ये महार, मांग व चांभार या वर्गातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. संभाषणात व खेळात बक्षीसे मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ रविवारी सायंकाळी ५ वाजता होणार होता. या बक्षीस समारंभासाठी नियोजित अध्यक्ष व बहिष्कृतांचे पुढारी डॉ. भीमराव आंबेडकर, बार-ॲट-लाॅ हे डॉ. सोळंकी, कदम वगैरे मंडळीसमवेत सायंकाळी ५ वाजता सभास्थानी येऊन पोचले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागतासाठी गव्हर्नमेन्ट डी. सी. हॉस्टेल व डी. सी. मिशन या संस्थांच्या बालवीरांची पथके दारापाशी सज्ज होऊन राहिली होती. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या सहकाऱ्यांसह दरवाजापाशी येताच सुभेदार घाटगे यांच्या आधिपत्याखालील बालवीरांच्या पथकांनी त्यांना मानाची सलामी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयजयकाराचा प्रचंड ध्वनी दुमदुमला आणि टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात व बाबासाहेबांच्या जयजयकारातच पाहुणे मंडळी आश्रमात येऊन दाखल झाली. त्यानंतर अल्पोपहार आटोपल्यावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यार्थी व काही निमंत्रित पाहुणे यांच्यासह ग्रुप फोटो घेण्यात आला. त्यानंतर ६ वाजता हा बक्षीस समारंभ सुरू झाला.

या समारंभास आवर्जून उपस्थित असलेल्या पाहुणे मंडळीत डॉ. सोळंकी, प्रि. तावडे, रा. श्रीधरपंत टिळक, रा. संगमनेरकर, कदम, ऐदाळे, बाराथ, भंडारे, राजभोज, लांडगे, वायदंडे, डी. सी. मिशनचे रा. पाताडे, सुभेदार घाटगे बंधु, गायकवाड, तसेच सेवासदनातील प्रौढ विद्यार्थिनी, ट्रेनिंग कॉलेजचे प्रौढ विद्यार्थी वगैरे मंडळी प्रामुख्याने दिसत होती.
नंतर जॉ. सेक्रेटरी रा. रणपिसे यांनी निरनिराळ्या सामन्यातील बाबींचे मार्मिक विवेचन केले आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी अध्यक्षपदावरून स्वहस्ताने यशस्वी उमेदवारास बक्षीसे वाटली. नंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले अध्यक्षीय भाषण केले.

बहिष्कृत विद्यार्थ्यांच्या या चतुर्थ वार्षिक सामाजिक सम्मेलनात केलेल्या अध्यक्षीय भाषणात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत वर्गाच्या सध्याच्या भयानक व चिंताजनक परिस्थितीचे वर्णन करून अशा विषम, हिरमोड करणाऱ्या परिस्थितीत बहिष्कृत विद्यार्थ्यांनी आपले कर्तव्य यथायोग्य पार पाडण्यावर बहिष्कृतांचे भवितव्य अवलंबून आहे असे सांगितले. त्याचप्रमाणे बहिष्कृतातील सुशिक्षित स्त्रियांनीही आपले शील व कर्तव्य सांभाळून समाजाच्या प्रगतीस हातभार लावण्याचा उपदेश केला. सुशिक्षित असूनही केवळ अस्पृश्य मानले गेल्यामुळे बहिष्कृतातील लायक माणसांची कशी कुचंबणा होते हे त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणे देऊन जेव्हा पटविले त्यावेळी सभागृहात भीषण गांभीर्य पसरले. डॉक्टरसाहेब मनापासून बोलत होते. त्यावेळी त्यांच्या जीवाची तळमळ व मनाची खळबळ त्यांच्या प्रत्येक शब्दात प्रतिबिंबित होत होती. एकंदरीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण अस्खलित, जोरदार व चित्ताकर्षक झाले. नंतर आभारप्रदर्शन झाल्यावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार घालण्यात आला व हा संस्मरणीय प्रसंग पार पडला.

⚫⚫⚫

✍️ संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे