August 1, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

पैशाचा विनियोग गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर करणे हिताचे – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

मोटार ड्रायव्हर अस्पृश्य सेवक संघाच्या प्रथम वार्षिकोत्सवात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….

शनिवार दिनांक २९ सप्टेंबर १९३४ रोजी मुंबईतील परळ येथील दामोदर हॉलमध्ये डॉ. पी. जी. सोळंकी साहेबांच्या अध्यक्षतेखाली मोटार ड्रायव्हर अस्पृश्य सेवक संघाचा प्रथम वार्षिकोत्सव यशस्वीरीतीने पार पडला. या वार्षिकोत्सवास डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रा. ब. बोले वगैरे मंडळी प्रामुख्याने हजर होती. स्वागतपर पद व अध्यक्षांची निवड झाल्यानंतर अध्यक्ष श्री. मारुतीराव घमरे यांनी रिपोर्ट वाचन करून संस्थेविषयी माहीती देणारे छोटेसे भाषण केले. त्यानंतर रा. ब. बोले यांचे भाषण झाले. नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भाषण करण्यास अध्यक्षांनी विनंती केली. अध्यक्षांच्या विनंतीवरून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर बोलावयास उभे राहिले.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात संघाच्या कार्याविषयी संतोष व्यक्त केला. संघाच्या आवश्यकतेबद्दल विस्तृत असे भाषण करताना ड्रायव्हर लोकांना कळकळीचा उपदेश केला. आपणास कराव्या लागणाऱ्या पैशाचा विनियोग अनाठायी करण्यापेक्षा स्वतःच्या कुटुंबाच्या पोषणाकडे, समाजाकडे व विशेषतः गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे करणे खरे हिताचे ठरेल. तसेच अनीती किंवा दुर्व्यसनाचा फैलाव न होण्याकडे सर्वांनी विशेष लक्ष पुरवावे. आपल्याला संघटनेशिवाय समाजहितासारखे बिकट कार्य पार पाडणे शक्य नसते. वाडवडिलांच्या नावलौकिकावर विकून घेऊन त्यांच्या नावाच्या बळावर आपण स्वतःला विकून घेण्यात काय अर्थ आहे. तरी माझ्या बांधवांनी उद्योगधंद्यामध्ये मिळणाऱ्या पैशाचा सदुपयोग करण्याकडे विशेष लक्ष पुरवावे अशी आशा प्रदर्शित करतो.

🔹🔹🔹

डॉ. बाबासाहेबांचे भाषण झाल्यानंतर इतर वक्त्यांची भाषणे झाली. अध्यक्ष डॉ. सोळंकी साहेबांचे फार मननीय व परिणामकारक असे भाषण झाले.

यानंतर कलेमध्ये अपूर्व कौशल्य दाखविल्याबद्दल श्री. गंगाराम रघुनाथ व समाजकार्य करून वेळोवेळी ऋणी केल्याबद्दल श्री. साबाजी मिरके यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते अनुक्रमे रौप्य पदके व पुष्पहार अर्पण करण्यात आले. या समारंभात सर्वश्री बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, शिवतरकर, उपशाम, भातनकर वगैरे मंडळींची प्रसंगानुसार भाषणे झाली. शेवटी आभार प्रदर्शन व निवडक निमंत्रित मंडळींचा अल्पहार झाल्यावर हा समारंभ संपविण्यात आला.

*

✍🏻 संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे