माजी मुख्यप्रधान डॉ. खरे यांच्या स्वागतप्रसंगी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीच्या खऱ्या कल्पनांची व तत्त्वांची उत्तमप्रकारे फोड करून केलेले विचारपरिप्लुत अध्यक्षीय भाषण….
दिनांक ४ ऑगस्ट १९३८ रोजी मध्यप्रांताचे माजी मुख्यप्रधान डॉ. खरे यांचे स्वागत करण्यासाठी त्यांच्या काही चाहत्या मित्रांनी भारत सेवक समाजाच्या दिवाणखान्यात एक मेजवानीचा प्रसंग घडवून आणला. या स्वागतप्रसंगी समारंभाचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे विचारपरिप्लुत भाषण केले व लोकशाहीच्या खऱ्या कल्पनांची व तत्त्वांची जी उत्तमप्रकारे फोड करून सांगितली तिचे सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीने मनन करणे अत्यावश्यक आहे. याप्रसंगी श्री. तुळजापूरकर व डॉ. खरे यांचीही भाषणे झाली.
या समारंभाला श्री. ना. म. जोशी, डॉ. गोपाळराव देशमुख, डॉ. वाड, डॉ. बालिमा व मुंबईतील प्रतिष्ठित डॉक्टर्स, वकील व नागरिक हजर होते. मेजवानीनंतर सभेच्या कामाला सुरवात करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अध्यक्षपदाकरिता सुचविताना श्री. दाजीसाहेब तुळजापूरकर यांचे भाषण झाले.
श्री. दळवी यांनी अध्यक्षपदाच्या सुचनेला पाठिंबा दिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारून आपल्या भाषणास प्रारंभ केला.
याप्रसंगी बोलतांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले,
आपण जे आज येथे जमलो आहोत, ते खरे यांचे स्वागत करण्याच्या उद्देशाने हे सर्वांना ठाऊकच आहे. हे स्वागत करण्यास आपण कोणत्या कारणांनी व हेतुंनी उद्युक्त झालो याचे थोडेसे सविस्तर स्पष्टीकरण करणे जरूर आहे. आजच्या या सभेतील मंडळींकडे नजर फेका. आपण सर्व एकाच भावनेने अथवा एकाच कारणाने ह्या स्वागतासाठी येथे जमा झालो आहो असे वाटत नाही. राजकारणातील मतांच्या दृष्टीने फार तर आजचा हा जमाव अनेक जिनसीच असलेला दिसून येत आहे. काहींनी तर विशिष्ट पक्षाच्या, काँग्रेसच्या राजकीय विचारसरणीची खूण पटविण्याचा पोषाखही केला आहे. हिंदुस्थानातील पुष्कळ हिंदूना हाच फक्त एक जगन्मान्य पंथ वाटत आहे. इतर काही लोक जे येथे आले आहेत ते माझ्याप्रमाणे देशातल्या आजच्या त्या अग्रगण्य पक्षाचे सदस्य नाहीत. उलट त्यांचा त्या पक्षाला विरोधच आहे. याखेरीज हे इतर काही जण येथे उपस्थित झाले आहेत ते राजकारणाच्या बाबतीत उदासीनच आहेत. हे लोक जातीप्रेमामुळे अथवा तशाच स्वरुपाच्या काही कारणांमुळे आलेले असतील. हे कसेही असो. डॉ. खरे तरी आपल्यापुढे आज तीन भिन्न स्वरुपात उभे आहेत, यात शंका नाही. पहिली गोष्ट म्हणजे ते महाराष्ट्रीय आहेत, दुसरी गोष्ट म्हणजे ते काँग्रेसवाले आहेत आणि तिसरे त्यांचे स्वरुप म्हणजे मध्यप्रांतातील पदच्युत केलेले मुख्यप्रधान या नात्याने ते येथे उभे आहेत. आजच्या प्रसंगी येथे येऊन अध्यक्षस्थान स्वीकारण्यास मी का उद्युक्त झालो असेन असे आपल्याला वाटते ? डॉ. खरे यांची व माझी भेट होण्याचा योग पूर्वी कधीही आला नव्हता. काल अगदी एका समस्नेह्याच्या कचेरीत गाठ पडली व तेथेच डॉ. खऱ्यांची व माझी प्रथम ओळख झाली. अर्थात त्यांच्या राजकारणाने आकृष्ट होऊन मी काही येथे आलेलो नाही. ही गोष्ट स्पष्टच आहे. राजकारणाच्या बाबतीत आम्ही अनेकांना भिन्न व विरोधीच आहोत.
डॉ. खरे महाराष्ट्रीय आहेत ही गोष्टही महत्त्वाची आहे. त्यांच्या बाबतीतील अन्यायामुळे बऱ्याच महाराष्ट्रीयांची मने विशेष क्षुब्ध व्हावयाला ही गोष्ट कारणीभूत झाली आहे हे निःसंशय होय आणि तसे होणे स्वाभाविक आहे. हिंदी राजकारणातील महाराष्ट्रीयांचा वाट्याचा इतिहास पाहिला तर महाराष्ट्रीय त्यात मागे पडत चालले आहेत ह्या गोष्टीबद्दल मला तरी निदान शंका वाटत नाही. महाराष्ट्रीय लोक व्यापारात आतापर्यंत कधीच पडलेले नाहीत. त्यामुळे विपुल द्रव्य अथवा पैसाही त्यांनी कधी केला नाही. ज्यावेळी इतर भागातले हिंदी लोक परकीयांच्या जुलुमाखाली पीडले जात होते, त्यावेळी महाराष्ट्रीयांच्या पूर्वजांनी आपले सारे आयुष्य स्वराज्याचा कारभार हाकण्यात घालविले. त्यांचे रक्त त्यापायी खर्ची पडले. महाराष्ट्रीयांची पिछेहाट का होत चालली आहे याबद्दलही परवाच एका काँग्रेस पुढाऱ्याने मुंबईतील आपल्या एका भाषणात मीमांसा केली. महाराष्ट्रीयांना व्यवहारज्ञान कमी म्हणून ते मागे पडत आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. पण मला ही गोष्ट मुळीच पटत नाही. माझ्या मते महाराष्ट्रीयांइतकी व्यवहारबुद्धी हिंदुस्थानातील इतर कोणाही प्रांतीयात आढळू शकणार नाही. महाराष्ट्रीयांचा ऱ्हास इतर कोणत्याही कारणाने झालेला असो, पण व्यवहारबुद्धीच्या अभावामुळे मात्र तो खचित झालेला नाही. महाराष्ट्रीयांची पिछेहाट का झाली याचे कारण त्यांचे जीवित महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी कामी आले, राजकारण खेळविण्यात, राज्यकारभार
हाकण्यात त्यांचा काळ निघून गेला. माझ्या या म्हणण्याची इतिहासच साक्ष देत आहे. धनाढ्य श्रेष्ठीचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात तुम्हाला ऐकू येणार नाही पण सेनानी, मुत्सद्दी, राजकारणी पुरुष यांची नावे घडोघडी तुम्हाला सापडू शकतील. जगातील कोणत्याही देशाला अभिमान वाटावा अशी ही नावे आहेत.
महाराष्ट्राची पिछेहाट झाली याचे कारण हेच की, त्यांनी इतरांप्रमाणे व्यापाराचा मार्ग स्वीकारला नाही, लक्ष्मीची कृपा संपादण्याचा प्रयत्न केला नाही, तिच्या मागे ते लागले नाहीत. आज कशाला किंमत असेल, तर ती एका पैशाला ! पैशाने बुद्धी काबीज केली आहे, निदान बुद्धी व शील या दोहोंवर त्याने मात केली आहे हे तरी खासच होय !
एका काळी आपण राजकारणात अग्रभागी होतो. टिळक, गोखले व रानडे या तीन महाबुद्धिवान व राजकारण धुरंधर व्यक्ती आपल्यामध्ये होत्या. ह्या व्यक्तींचे राजकारण आजच्यासारखे खळबळींचे नसेल अथवा आजच्यासारखे औत्सुक्यपूर्णतेचे नसेल, पण ते आजच्यापेक्षा अधिक प्रामाणिक व अधिक विचारप्रवर्तक खास होते ! पण या बाबतीतील देखील पुढारीपण आमच्याकडे राहिलेले नाही. आजची स्थिती अवलोकन करता कारकून व मजूर ह्या पेशापलीकडे काहीच कर्तृत्व नसलेले लोक अशीच महाराष्ट्रीयांची अवस्था होत चाललेली अधिकाधिक दिसून येत आहे. ही घसरगुंडीची गोष्ट लक्षात घेता, ज्या काही थोड्या महाराष्ट्रीयांना या घसरगुंडीतूनही राजकारणात काही तरी स्थान मिळविता आले आहे त्यांचीही तेथून उचलबांगडी व्हावी ही गोष्ट महाराष्ट्रीयांना विशेष बोचू लागल्यास त्यात नवल नाही, परंतु ह्या कोत्या व दुसऱ्या बाजूने पाहिल्यास सद्बुद्धीच्या अशा दृष्टीकोनाने, डॉ. खऱ्यांच्या
लढ्याकडे पाहून तो लढविणे आपल्यापैकी कोणालाही मुळीच प्रशस्त वाटणार नाही याबद्दल मला खात्री आहे आणि याच कारणामुळे डॉ. खरे यांच्या स्वागताकरिता मी जो येथे आलो आहे तो महाराष्ट्रीय या नात्याने नव्हे, अर्थात महाराष्ट्रीय म्हणून म्हणवून घेण्यात मला अभिमानच वाटतो. माझ्या महाराष्ट्रीयत्वाचा मला फार फार अभिमान आहे ही गोष्ट मी येथे ठासून सांगतो. महाराष्ट्रीयात असे काही गुण आहेत की, जे इतर प्रांतीयात तुम्हाला दिसून यावयाचे नाहीत. लंडनसारख्या परक्या ठिकाणी सर्व प्रांतीयांचा मेळावा जमलेला असतो त्यावेळी हा फरक सहज लक्षात येऊ शकतो. कोणाचे कसे गुणदोष आहेत हे त्यावेळी ओळखणे सहज शक्य होते.
डाॅ. खरे महाराष्ट्रीय आहेत त्यामुळे जसा मी येथे आलो नाही, तसाच ते काँग्रेसवाले आहेत यामुळेही आलेलो नाही. डाॅ. खऱ्यांनी काँग्रेसचे अनुयायित्व पत्करले आहे. त्या संस्थेचे जे काय नियम असतील अथवा जी काय शिस्त घालून देण्यात आलेली असेल ती पाळण्याचेही त्यांनी पत्करले आहे हे सरळच आहे. या शिस्तपालनाबाबत त्यांच्या संस्थेशी त्यांचा काही वाद असला तर त्यात आमच्यासारखे जे काँग्रेसच्या बाहेर आहेत त्यांच्याकडून त्यांना साहाय्य होणे शक्य नाही. मी येथे आलो याचे कारण हेच की मुख्यप्रधानाच्या हक्काचा लढा डॉ. खरे हे आज लढवीत आहेत. मुख्यप्रधानाचे हे हक्क मला जनतेच्या, मतदारांच्या व जबाबदार राज्यपद्धतीच्या दृष्टीने अत्यंत बहुमोलाचे वाटत आहेत आणि यासाठीच डॉ. खऱ्यांचे स्वागत करण्याकरिता मी येथे उपस्थित झालो आहे.
मुख्यप्रधान हा जबाबदार राज्यपद्धतीच्या कमानीतला खिळीचा दगड होय असे मी म्हटले होते तेच मला पुन्हा एकदा येथे फिरून सांगावेसे वाटते. माझ्या मते जबाबदार राज्यपद्धतीला दोन गोष्टींची मुख्य आवश्यकता असते. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या प्रतिनिधींच्या कृत्यावर डोळ्यात तेल घालून नजर ठेवणारी जनता व दुसरी गोष्ट म्हणजे जनतेच्या मताचा कौल ज्यांनी घेतला नाही अशांना नव्हे, तर ज्यांनी हा कौल घेऊन स्वतःला निवडून दिले आहे अशांनाच फक्त जबाबदार राहणारा मुख्यप्रधान. मुख्यप्रधानाच्या कृत्याची रास्तारास्तता जोखण्यास जनता आपल्याकडे अखेरचा निर्णायक हक्क घेऊन बसलेली असते. तो हक्क तिचा आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीने आपला जो हक्क सांगितला आहे, त्यामुळे जबाबदार राज्यपद्धतीची माझ्या मते सारीपुरी विटंबनाच होत आहे !
काँग्रेस वर्किंग कमिटीने दोन तत्त्वे अंमलात आणली आहेत. ही तत्त्वे माझ्या मते अत्यंत विघातक व कोणत्याही लोकशाही राष्ट्रात असम्मत ठरणारी आहेत. वर्किंग कमिटीने पहिले तत्त्व असे सांगितलेले दिसत आहे की, मुख्य प्रधानाला आपल्या सहकाऱ्यांची निवड करण्याचा हक्क पोचत नसून हे त्याचे सहकारी मंत्री, मतदारांना अथवा कायदेमंडळाशी जबाबदार नसलेल्या अशा एखाद्या बाह्य संस्थेनेच निवडले पाहिजेत ! मंत्रिमंडळाच्या सामुदायिक जबाबदारीचे तत्त्व प्रस्थापित करून घेण्यासाठी गोलमेज परिषदेत आम्ही किती झगडलो आहोत याची, गृहस्थहो, तुम्हाला कल्पना नाही ! सायमन कमिशनने या बाबतीत आपल्या रिपोर्टात अशी शिफारस केली होती की, प्रांतातील राज्यपद्धती पूर्ण जबाबदारीची असावी असे जरी ठरविले असले आणि कायदा व सुव्यवस्था हे खाते जरी राखीव असू नये असे मान्य केले गेले, तरी ते खाते गव्हर्नरकडून नेमण्यात आलेल्या मंत्र्यांच्या बरोबरीने मंत्रिमंडळात समाविष्ट करावे. ही शिफारस हाणून पाडण्यासाठी साऱ्या हिंदी प्रतिनिधींनी एकजुटीने ताकीद दिल्याप्रमाणे मत नोंदवावे आणि मग लाथेच्या ठोकरीसरशी परत पिंजऱ्यात जाऊन पडावे एवढेच त्याचे काम. वर्किंग कमिटीने पुकारलेल्या तत्त्वांचा अर्थ हा असा आहे.
मुख्यप्रधानाच्या मूलभूत हक्कांसाठी डॉ. खरे भांडत आहेत म्हणूनच त्यांचे स्वागत मी करीत आहे आणि या त्यांच्या लढ्यात त्यांना सर्वांनी पाठिंबा देणे कर्तव्यच आहे. आता शेवटी एकदोन सर्वसाधारण मुद्याच्या गोष्टी सांगून मी आपले भाषण पुरे करणार आहे. ह्या गोष्टी सांगताना डॉ. खऱ्यांच्या काही विधानांचा मला उल्लेख करावा लागणार आहे. त्याबद्दल ते मला क्षमा करतील अशी आशा आहे.
” आपण काँग्रेसमध्येच राहणार आहोत, काँग्रेसमध्येच राहून आपल्याला ज्या टोळक्याने इतक्या नीच रीतीने वागविले त्या टोळक्याशी आपण दोन हात करणार आहोत.” असे डॉ. खरे सांगत आहेत. अर्थात त्यांनी तसे केले तर आमचे काही म्हणणे आहे अशातली मुळीच गोष्ट नाही. पण या कामात त्यांना कितीसे यश मिळेल याची मात्र मला शंकाच वाटते. डॉ. खरे प्रधानमंत्री होते त्या वेळी त्यांच्या हातात अधिकार होता. मध्यप्रांताचे मुख्यप्रधान म्हणून जनतेच्या दृष्टीने मानाचे वैभव त्यांना प्राप्त झाले होते, पण इतक्या गोष्टी हाताशी असता त्या वेळीही वर्किंग कमिटीच्या विरुद्ध त्यांना काही करता येणे शक्य झाले नाही. मग आता केवळ एक काँग्रेस पक्षाचा सामान्य सभासद म्हणून राहून त्यांना तीच गोष्ट साध्य करून घेता येणे कसे शक्य होईल हे मला समजत नाही. पण काही लोक असे असतात की, अधिकार स्थानावर असल्या वेळेपेक्षा स्थानभ्रष्ट झाल्यावेळीच त्यांचे धैर्य द्विगुणित होत असते. डॉ. खरे हेही अपवादात मानलेल्या व्यक्तिंपैकी असू शकतील.
मी येथे राजकीय प्रचारासाठी बोलत नाही अथवा आमच्या स्वतंत्र मजूर पक्षासाठी सभासद मिळविण्यासाठीही मला प्रचारकार्य करावयाचे नाही. तथापि, एक गोष्ट मात्र मला अगदी स्पष्ट व मनःपूर्वक सांगाविशी वाटते ती ही की, तुम्हाला जर लोकशाही हवी असेल तर दोन गोष्टी तुम्हाला केल्या पाहिजेत.
लोकशाहीला जरूर असलेली पहिली गोष्ट पक्षपद्धती ही होय. यापैकी एक पक्ष अधिकारारूढ तर दुसरा विरोधी असला पाहिजे. विरोध करणारा पक्ष अस्तित्त्वात नसेल, तर देशाच्या कारभारात जनता लक्ष घालू शकणार नाही.
प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. एवढेच नव्हे, पण परवाच स्टेट्स् मन नावाच्या एका इंग्लिश मुत्सद्याने असे म्हटल्याचे मला आठवते की, एखाद्या प्रश्नाला दोन बाजू आहेत असे दाखविणे हेच राजकारणी पुरुषाचे काम किंबहुना कर्तव्यच असते, मग त्या प्रश्नाला दोन बाजू खरोखरच असोत किंवा नसोत. प्रत्येक प्रश्नाला दुसरीही एक बाजू आहे हे कळून घ्यावयास पाहिजे. काँग्रेस जी सांगते तीच त्या प्रश्नाची एकच एक बाजू होय. दुसरी बाजू तिला नाही असे मानता कामा नये.
दुसरी एक गोष्ट आपण शिकावयास पाहिजे ती ही की, सरकारची नेहमीच कसोटी घेत राहिल्या खेरीज लोकशाही सुरक्षित राहणे शक्य नाही. सुलतानशाही अथवा एकसत्ता आणि लोकशाही अथवा लोकसत्ता यामधला फरक काय ? राज्यशास्त्राचे पंडित याची व्याख्या काय देतील हे मला ठाऊक नाही, पण राजकारणी इसम या नात्याने मला त्यामध्ये हाच एक खरा फरक दिसतो की, सुलतानशाहीमध्ये सरकारची कसोटी अथवा चौकशी कधीच होऊ शकत नाही. एकदा स्थापना झाली की, ती अव्याहत चालूच राहाते. मग ती हिंदी संस्थानातल्याप्रमाणे वंशपरंपरेने चालो, अथवा काही युरोपियन देशातल्याप्रमाणे एका डिक्टेटरशाहीच्या चाकोरीतून चालो, कशीही ती चालली, तरी एक गोष्ट स्पष्ट आहे ती अशी की, लोकशाहीमध्ये सरकारची कसोटी दरक्षणी लागत असते. आपल्या अस्तित्त्वाचे समर्थन प्रत्येक दिवशी सरकारला पटवून द्यावे लागते. आपल्या प्रत्येक कृत्याच्या रास्ततेबद्दलचा जाब द्यावा लागतो. तशी स्थिती सुलतानशाहीत नसते. सुरक्षितता तुम्हाला हवी असेल. प्रगती व्हावी अशी इच्छा असेल, तर सर्वचजण एकाच संस्थेला चिकटून राहू नका ! मग, इतर लोक काय वाटेल ते म्हणू द्या. त्याची पर्वा करू नका. मी काँग्रेसमध्ये जात नाही याचे कारण मला माझ्या कर्तृत्वाला व बुद्धीला साजेलशी जागा मला तेथे मिळू शकणार नाही हे नव्हे. मला तेथे दडवून टाकता येणे कोणालाही शक्य होणार नाही. काँग्रेसमध्ये मी जात नाही याला तसेच कारण आहे आणि ते कारण हेच की, त्या संस्थेबाहेर राहणे हेच मला अधिक व अत्यंत आवश्यक वाटते. टीकाकाराची भूमिका स्वीकारून प्रत्येक प्रश्नाची दुसरी बाजू उलगडून दाखविणे हेच मला अधिक श्रेयस्कर वाटते आणि जनतेची फसवणूक करता येऊ नये म्हणूनच ही भूमिका मला पत्कराविशी वाटत आहे.
आपल्या लोकांच्या अंगचे वैशिष्ट्य सध्या व्यक्त होऊ लागल्याची जाणीव मला सध्या होऊ लागली आहे. इंग्लंडमध्ये चालू असलेल्या जबाबदार राजसत्तेसारखी सत्ता आपल्या देशात स्थापन करण्यासाठी आपण झगडलो आणि आमच्या राज्यघटनेत तिचा अंतर्भाव करण्यास भाग पाडले. पण त्या राजसत्तेला निराळेच विशिष्ट स्वरूप प्राप्त होत चालल्याचे जाणवू लागले आहे. जबाबदार राज्यपद्धतीला आज वर्षानुवर्षे आपण पारखे झालो आहोत. आतापर्यंत सुलतानांचीच सत्ता आपल्यावर चालत आली. आपले भवितव्य इतरांच्या हातात देऊन स्वस्थ बसणे हे आपले आतापर्यंतचे वैशिष्ट्य. आपले धनी हा आपला देव आणि त्याची पूजा करीत राहणे हाच आपला धर्म. हेच वैशिष्ट्य सध्याही प्रस्थापित होऊ पहात आहे. मालकाचेच म्हणणे खरे, त्याच्याविरुद्ध टीका करणे आपले काम नव्हे, अशी मतदारांची वृत्ती व्हावयासही हेच वैशिष्ट्य कारण आहे. पण अशा अंधभक्तीने जबाबदार राज्यपद्धतीला मात्र गोड फळे कदापि येऊ शकणार नाहीत. पण जबाबदार राज्यपद्धती नांदावयाची तर सरकारची कसोटी पाहण्यासाठी एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे सहजपणे वळण्याची तयारी असलेल्या लोकसमुदायाची प्रथमतः गरज असते. असा लोकसमुदाय निर्माण झाला नाही, तर असा प्रकार घडून येईल की, ब्रिटिशांकडून जी काही सत्ता आपण मिळवू शकू, ती बहुजन समाजाच्या हाती न जाता एखाद्या टोळक्याच्या हाती जाईल आणि पूर्वीपेक्षाही वाईट परिस्थिती ओढवल्याचे प्रत्ययाला येईल. ह्यापेक्षा आणखी अधिक बोलण्याची माझी इच्छा नाही. शेवटी मी डॉ. खऱ्यांना एवढेच सांगतो की, आम्ही आज येथे बहुजनसमाजाला राजकीयदृष्ट्या अत्यंत जिव्हाळ्याच्या व महत्वाच्या असलेल्या अशा ह्या प्रश्नाबाबत त्यांना शक्य त्या प्रकारे पाठिंबा देण्यासाठी जमलो आहोत. पक्षविशिष्ट राजकारणाच्या कक्षेबाहेरचा सर्वसामान्य असा हा प्रश्न आहे व म्हणून साऱ्यांचा त्याशी संबंध पोचत आहे. डॉ. खरे यांच्या या लढ्यात त्यांना पूर्ण यश मिळो असे मी इच्छितो.
🔹🔹🔹
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणानंतर डॉ. खरे यांनी उत्तरादाखल भाषण केले. यानंतर श्री. ना. म. जोशी यांनी छोटेसे भाषण करून आभारप्रदर्शन केल्यानंतर समारंभ समाप्त झाला.
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर