August 2, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

साम्राज्यशाहीपेक्षा ब्राह्मण्य हजारोपट वाईट – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

धुळे विजयानंद थिएटरमध्ये जाहीर सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….

दिनांक ३१ जुलै १९३७ रोजी धुळे येथे कोर्टाच्या कामाकरिता जात असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर शुक्रवारी रात्रीच्या गाडीने निघून दिनांक ३१ जुलै १९३७ रोजी पहाटे ५ वाजता चाळीसगाव येथे पोचले. डॉ. बाबासाहेब चाळीसगावाहून धुळे येथे जाणार असल्याची बातमी ऐकून हजारो अस्पृश्य बंधु-भगिनी त्यांचे हार्दिक स्वागत करण्याकरिता मोठ्या पहाटे पासून चाळीसगाव स्टेशनवर येऊन थांबले होते. सर्व स्टेशन स्त्री-पुरुष व मुलांनी फुलून गेले होते व हा प्रचंड जनसमुदाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा सारखा जयघोष करीत तेथे उभा होता.

गाडी पहाटे ५ वाजता स्टेशनमध्ये आली. डॉ. बाबासाहेब हास्यवदन करीत गाडीतून उतरताच ” आंबेडकर झिंदाबाद ” असा त्रिवार प्रचंड जयघोष झाला. प्रथम मे. एस्. एस्. कर्णिक, चीफ ऑफीसर व अस्पृश्योद्धारक बोर्डिंग बिल्डिंग फंड कमिटीचे सेक्रेटरी व मे. चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली. नंतर श्री. दिवाण चव्हाण यांच्या बोर्डिंगतर्फे आणलेला हार श्री. डी. जी. जाधव, बी.ए., एम.एल.ए. यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गळ्यात घातला. त्यानंतर रांजणगाव येथील भगिनी श्रीमती सखुबाई कन्नडकर, सोनाबाई कन्नडकर, सावित्रीबाई अहिरे वगैरे भगिनींनी बाबासाहेबांची पंचारती केली व त्यांना वंदन केले. वेडाबाई सरदार, शांताबाई चव्हाण, शांताबाई जाधव यांनी विद्यार्थी वर्गातर्फे हार अर्पण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्योद्धारक बोर्डिंग पहावयास येतील असे कित्येकांना वाटल्यावरून बराच मोठा जनसमुदाय बोर्डिंगच्या आवारात जमा झाला होता म्हणून श्री. शामराव कामाजी जाधव व श्रावण धर्मा जाधव यांनी बोर्डिंगला भेट देण्याची बाबासाहेबांना विनंती केली. परंतु वेळेअभावी रात्री ८-३० वाजता येण्याचे बाबासाहेबांनी कबूल केले. त्यामुळे बोर्डिंगमध्ये जमलेला जनसमुदाय बाबासाहेबांचा गगनभेदी जयजयकार करीत स्टेशनवर आला. डॉ. बाबासाहेबांवरील अस्पृश्य लोकांचे अलौकिक प्रेम व बाबासाहेबांच्या कामगिरीविषयीचा त्यांचा उत्साह पाहून चाळीसगाव येथील स्पृश्य जनतेने आश्चर्याने तोंडात बोटे घातली. बाबासाहेबांच्या दर्शनासाठी अस्पृश्य बांधवांचा हा अपूर्व उत्साह कौतुकास्पद नाही असे कोण म्हणेल ? कारण बाबासाहेब कोणत्याही कार्यक्रमाकरिता या भागात आले नव्हते. ते फक्त आपल्या कोर्टाच्या कामासाठी जात असतानासुद्धा लोकांना त्यांच्या दर्शनाची इतकी आतुरता वाटावी हा बाबासाहेबांच्या अलौकिकत्वाचा पुरावाच म्हणावा लागेल.

खरे तर हा दिवस बाजाराचा असूनही लोकांनी आपली खरेदी-विक्री चटकन आटोपली व ते बायकामुलांसह चाळीसगाव स्टेशनवर आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आगमनासंबंधी हैंडबिले वगैरे काहीच काढली नव्हती. नुसत्या ऐकिव बातमीने हा सारा अफाट जनसमुदाय बाबासाहेबांच्या दर्शनासाठी जमला होता हे विशेष होय !

यानंतर डॉ. बाबासाहेबांनी सर्वांचा प्रेमभराने निरोप घेतला व सकाळच्या ६-४५ च्या गाडीने ते धुळ्यास गेले. त्यांच्याबरोबर मे. डी. जी. जाधव व दत्तात्रय मागाडे हे उत्साही तरुण समाजकार्यकर्तेही होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रात्री बोर्डिंगला भेट देणार हे ऐकून तेथे दिवाबत्ती, रोषणाई वगैरेची तयारी सुरू होती. डॉ. बाबासाहेबांच्या आगमनाची वाट पाहण्याकरिता बोर्डिंगपासून ते स्टेशनपर्यंत दोन फर्लांगावर लोक ठिकठिकाणी दुतर्फा उभे होते. लोकांची शिस्त ठेविण्याकरिता पहिलवान धावजी यांनी आपल्या आखाड्यासह एकंदर व्यवस्था ठेवली होती. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्टेशनवरून आणण्याकरिता श्री. हरिभाऊ पाटसकर, वकील यांची पत्नी सौ. वारूबाई पाटसकर यांनी आपल्याकडील मोटारगाडी पाठवून दिली होती. श्री. पाटसकर कुठे बाहेरगावी गेल्यामुळे ते यावेळी डॉ. बाबासाहेबांना भेटू शकले नाहीत.

शनिवार दिनांक ३१ जुलै १९३७ रोजी सकाळच्या गाडीने कोर्टाच्या कामासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर धुळे येथे निश्चित येणार आहेत, असे मि. पाटील वकील यांचेकडून समजताच समतावादी दलित मंडळाच्या कार्यकारी मंडळींनी अगोदरच कडेकोट तयारी केली होती. त्याप्रमाणे दिनांक ३१ जुलै १९३७ रोजी ७०-८० स्काऊटसह हजारो अस्पृश्य बंधुभगिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हार्दिक स्वागत करण्यासाठी मोठ्या पहाटेस उत्सुकतेने धुळे स्टेशनवर हजर होते. धुळे स्टेशन स्त्री-पुरुष व मुलांनी फुलून गेले होते व ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सारखा जयघोष करीत व सामाजिक पदे गात उभे होते. स्वागतास श्री. ए. आर. सावंत, पुनाजीराव लळिंगकर, तुकारामजी पहिलवान, श्री. ढेंगे, जी. एस्. अहिरे, आर. बी. अहिरे, सुकदेव पहिलवान, धोंडिराम पहिलवान, सखाराम पहिलवान, देवरामपंत अहिरे वगैरे मंडळी प्रामुख्याने हजर होती.

गाडी सकाळी ८-२० वाजता धुळे स्टेशनवर आली. डॉ. बाबासाहेब हास्यवदन करीत श्री. डी. जी. जाधव, एम. एल. ए. यांच्यासह गाडीतून उतरताच, ” आंबेडकर कौन है। दलितोंका राजा है। “, ” आंबेडकर झिंदाबाद ” असा त्रिवार प्रचंड जयघोष झाला. आरंभी श्री. सावंत, ढेंगे, बैसाणे, पुनाजीराव लळिंगकर वगैरे मंडळींनी बाबासाहेबांची भेट घेतली. समतावादी दलित मंडळाचे सेक्रेटरी श्री. तुकाराम पहिलवान यांनी संघातर्फे व सौ. पार्वताबाई अहिरे यांनी चोखामेळा बोर्डिंगतर्फे आणलेले हार डॉ. बाबासाहेबांच्या गळ्यात घातले. स्टेशनपासून ट्रोवलर्स बैंगलोपर्यंत मि. पाटील वकील यांच्या मोटारीतून डॉ. बाबासाहेबांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी, आंबेडकर चौक, लळिंग, अवधान, वर्व्हाळ, जुने धुळेमील येथील स्काऊटच्या मंडळींनी उत्तमप्रकारे शिस्त ठेवली होती. मिरवणूक सदरहू बंगल्यापर्यंत येताच तेथेही बाहेर गावाहून आलेल्या स्त्री, पुरुष व मुलांचा अफाट समुदाय जमला होता. इतकेच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेबांचे दर्शनास लळिंग येथील अनेक मोळविक्या स्त्रियाही आल्या होत्या. सदरहू बंगल्यातून डॉ. बाबासाहेबांचे दर्शन झाल्याशिवाय अस्पृश्य स्त्री, पुरुष हालेनात. नंतर डॉ. बाबासाहेब हास्यवदन करीत बंगल्याचे बाहेर आले. त्यांनी मंडळींना आता कोर्टाचे काम आहे ते संपल्यानंतर आपण मला ज्या ठिकाणी बोलवाल त्या ठिकाणी मी येईल, असे सांगून सर्व मंडळींना जाण्यास सांगितले.

दुपारी कोर्टाचे काम संपल्यानंतर ठरल्याप्रमाणे डॉ. बाबासाहेबांना हरिजन सेवक संघाचे चिटणीस श्री. बर्वे वकील यांच्या घरी बरोबर चार वाजता श्री. जाधव, एम.एल.ए., श्री. सावंत, श्री. पुनाजीराव लळिंगकर, श्री. तुकाराम पहिलवान व श्री. ढेंगे वगैरे मंडळीसह टी पार्टी झाली. तेथे काँग्रेसची काही मंडळी हजर होती. तेथे बरीच चर्चा झाली. नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजेंद्र हरिजन छात्रालयाला व चोखामेळा बोर्डिंगला भेट दिली. तेथेही डॉ. बाबासाहेबांना स्वोद्धारक वसतिगृह, हरिजन छात्रालय व चोखामेळा बोर्डिंगतर्फे हार-गुच्छ अर्पण करण्यात आले.

नंतर धुळे विजयानंद थिएटरमध्ये डॉ. बाबासाहेबांचे फारच जोरदार भाषण झाले. सदरहू थिएटर अफाट स्पृश्यास्पृश्य स्त्री-पुरुषांनी दुमदुमून गेले होते. जागेच्या अभावी कित्येकांना बाहेर उभे राहावे लागले.

याप्रसंगी केलेल्या भाषणात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
उद्या ता. १ ऑगस्ट रोजी गुढीपाडव्याप्रमाणे स्वराज्याचा प्रारंभ दिन म्हणून साजरा करावा, असे काँग्रेसने फर्माविले आहे. काँग्रेस पक्षानी राज्यकारभाराची सूत्रे हातात घेतली म्हणून ते स्वराज्य झाले आणि आमच्यासारख्याने कोणी दिवाणपद घेतले तर मात्र ते स्वराज्य नव्हे, हे म्हणणे योग्य आहे काय ? भावना व तत्वज्ञान क्षणभर बाजूला ठेवून व्यवहारी दृष्टीने विचार केला तर असे दिसून येईल की, गळे कापणारे सावकार, मजुरांना नाडणारे गिरण्यांचे मालक व आपल्याला अन्य तऱ्हेने गांजणारे लोक जसे होते तसेच या देशात राहणार आहेत. जमीनदार लोक, पाटील लोक हे सर्व तसेच राहणार, इंग्रज लोक निघून गेले तरी हे लोक कायम राहणार आहेत. म्हणून पूर्वीपेक्षाही आपणाला जास्त चिंता बाळगली पाहिजे. इतके दिवस एक गोष्ट आम्हाला पोषक होती. ती अशी की, इंग्रज मनुष्य जातीविषयक भावना व स्पृश्यास्पृश्य विचार पाहात नव्हता. यापुढे तुम्हाला गांजणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता गेली आहे. आता आपल्या लोकांची दाद घेणार तरी कोण ? हे स्वराज्य नसून इतर लोकांचे आमच्यावर राज्य होणार आहे. म्हणून संघटना करणे हे तुमचे कर्तव्य आहे. संघटना न केल्यास तुमची दैना शतपट होईल. आज महारांवर जुलूम झाला तर पाटील, शिपाई, मामलेदार कोणी त्याला मदत करीत नाही. इतकेच नव्हे तर एक महारही दुसऱ्या महाराला मदत करीत नाही. म्हणून जातीय संघटन अवश्य करा. अन्यायाच्या वेळी तरी त्याला मदत करा. पैशाशिवाय काही काम होत नाही. वकील, साक्षीदार, कोर्टाची प्रोसेस, मोटारचे भाडे या सर्व गोष्टींना पैसा लागतो. सबब न्याय मिळविण्यासाठी जातीचा फंड उभारा.

एका गावात प्रयत्न करून तुम्ही न्याय मिळविला तर त्याची दहशत इतर गावावर पडेल. तुमचे काम दुसऱ्याने करावे, अशी अपेक्षा का करता ? तुमच्यासाठी श्री. बर्वे यांनी छात्रालय काढावे किंवा गांधींनी काढावे असे का ? महाराष्ट्रात दहा लाख महार अस्पृश्य लोक आहेत. प्रत्येकाने एक रुपया दिला तर दहा लाखाचा फंड जमा होईल.

इंग्रज आता काही करू शकत नाही. याचे मी उदाहरण देतो. मंत्रीमंडळात होता होईल तो अल्पसंख्यांकांचे प्रतिनिधी घ्यावेत, असे बादशहाने गव्हर्नरला दिलेल्या आज्ञापत्रिकेत म्हटले आहे. हल्लीचे मंत्रीमंडल गांधींच्या सांगण्यावरून तयार झाले. मुंबईच्या मंत्रीमंडळात महार-मांगांचा एकही प्रतिनिधी नाही तरी पण गव्हर्नराने त्यात हात घातला नाही.

*मी काँग्रेसला का मिळालो नाही, असा प्रश्न काही लोक विचारतात. त्याची कारणे अशी आहेत :—*
(१) काँग्रेसच्या राजकारणात जर काही निष्पन्न झाले असेल तर ब्राह्मण्याचा उदय झाला एवढेच मला दिसते. सहा प्रांतात कोण लोक दिवाण झाले ते पाहा. ब्राह्मण मुख्य प्रधान झाले आहेत. साम्राज्यशाहीपेक्षा ब्राह्मण्य हजारोपट वाईट आहे.

(२) मी अस्पृश्यांकरता जी चळवळ करतो ती बंद करा, असे मला सांगण्यात येते ; परंतु मला पगाराची मातब्बरी नाही किंवा मान मिळविण्याचीही मला पर्वा नाही. तुम्ही लोकांनी स्वाभिमानी बनावे हीच माझी आकांक्षा आहे व त्याकरता स्वतंत्र चळवळ करणे मला अवश्य आहे. तुमच्यात व माझ्यात फरक एवढाच की तुमच्यापेक्षा मला जास्त ज्ञान आहे. म्हणून मी जास्त पाहू शकतो व धोका कोठे आहे, हे मला समजते. काँग्रेसच्या लोकांनी काहीही म्हटले तरी मला त्याची पर्वा नाही. तुम्ही माणसे झालात म्हणजे माझे श्रम सफल झाले. हे स्वराज्य धोकादायक आहे. ज्यांच्या हाती सामाजिक सत्ता होती त्यांच्याच हाती राजकीय सत्ताही गेली आहे. तरी आता दरएक गावाने दहा रुपये तरी फंडाला द्यावे. म्हणजे तुम्हा लोकांना न्याय मिळविता येईल. आपल्या स्वतंत्र मजूर पक्षाची पंधरा माणसे मुंबईच्या असेंब्लीत आहेत. ही माणसे एका दावणीत पक्की बांधलेली आहेत. एकाचे तोंड एकीकडे व दुसऱ्याचे दुसरीकडे असे नाही. यामुळे काँग्रेस पक्षाला कोणाची भीती वाटत असेल तर ती आमच्या पक्षाची आहे. काँग्रेस पक्षाला मुसलमानांची भीती वाटत नाही किंवा लोकशाही पक्षाची भीती वाटत नाही. ही गोष्ट वल्लभभाई यांनी पुणे येथे जे भाषण केले त्यात उघड झाली. आपण निवडणुकीच्या वेळी संघटनेने वागलो म्हणून हे फळ मिळाले. निवडणुकीच्यावेळी जी शपथ घेतली ती कायम ठेवा. आपल्या संस्थेची शाखा प्रत्येक जिल्ह्यात स्थापन केली पाहिजे. वरून मदत करणारा दाता कोणी नाही, जो कष्ट करील त्याची सत्ता असते. प्रत्येक संस्थेत आपली जास्त माणसे जातील, अशी एकजुटीने खटपट करा. काँग्रेसला हरिजनांची दया असती तर कोणतीही शर्त न घालता एखादा हरिजन त्यांनी मंत्रीमंडळात घेतला नसता काय ? पण यासाठी आपण कोणाजवळ भिक्षा मागू नये. मी काँग्रेसच्या मंडळीशी कधी मसलत केली नाही. सव्वा मैल दूर राहिलो.

खानदेशात आपल्या पक्षाचे श्री. दौलत गुलाजी जाधव हे निवडून आलेले आहेत, त्यांच्याकडून काम करवून घ्या. या देशात आपणाला माणुसकीने वागवीत नाहीत, ही गोष्ट तुम्ही विसरता, परंतु मी कधीच विसरू शकत नाही. सतत जागृत राहा म्हणजे यश मिळेल.

🔹🔹🔹

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्याख्यान झाल्याबरोबर सौ. नर्मदाबाई वाघ, लळींगकर, दशरथ धांकू वाघ, जुने धुळे व इतर तालुक्यातील हार बाबासाहेबांना अर्पण केले व सभा विसर्जित झाली.

या पश्चिम खानदेश जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक कार्यासाठी कधीही आले नव्हते व इतर जिल्हयातील अस्पृश्य पुढाऱ्यांनीही सामाजिक कार्यासाठी केव्हाही चालना दिली नाही. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विद्वता व अपूर्व कामगिरी पाहून स्वाभिमानी अस्पृश्य जनता खडबडून जागी झाली यात संशय नाही.
नंतर स्काऊटसह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकर चौकास भेट दिली व डॉ. बाबासाहेबांची मोटार सायंकाळी ६ वाजता धुळे स्टेशनवर गेली.

या दिवशी म्हणजेच दिनांक ३१ जुलै १९३७ रोजी धुळे प्रताप मिल चालू होती. ती पाच वाजता बंद होते. मिलची सुट्टी झाल्यावर पुन्हा स्टेशनवर अनेक स्त्री-पुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शनास जमले होते. तेथे स्काऊटच्या लाठीकाठीची डॉ. बाबासाहेबांना सलामी देण्यात आली. त्यावेळी भीमराव साळुंखे, वेसा पहिलवान, शंकरराव घोडे, किसनराव वगैरे मंडळीनी लाठीचे हात फिरविले. याठिकाणीही अनेक स्त्री-पुरुषांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हार अर्पण केले. नंतर ६-४० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व मंडळीना निरोप दिला व गाडी चाळिसगावी गेली.

पूर्वी ठरल्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रात्री ८-३० वाजता चाळिसगावला नक्की येणार हे ठरल्यासारखेच होते परंतु इतक्यात एक बातमी आली की, डॉक्टरसाहेबांना घेऊन येणाऱ्या आगगाडीचे इंजिन वाटेत जामदे स्टेशन सोडताच सीक झाले. त्यामुळे लोकांमध्ये निराशा उत्पन्न झाली. १-२ तासात इंजिन नीट होऊन गाडी फारतर दोन तास उशीरा येईल, अशी लोकांची कल्पना होती. डाॅ. बाबासाहेबांच्या स्वागतासाठी श्री. झिपरू तुकाराम जाधव, नथ्थू दोनू जाधव, जावरसाहेब, मांगो आनंदा जाधव हे स्टेशनवर गेले होते. बोर्डिंगमध्ये जमलेल्या लोकांचे मनोरंजन करण्याकरिता मे. भास्कर मास्तर, जगन्नाथ सुंदरनाथ यांचे पोवाडे गायन व वेडाबाई चव्हाण, शांताबाई जाधव यांच्या बोधपर पदांचे गायन वगैरे कार्यक्रम झाले. भगिनी वर्गाची बसण्याची वगैरे व्यवस्था उत्तम ठेवली होती. श्रीमती ध्रुपताबाई दिवाण, झेलाबाई पोम मोरे, सखुबाई आनंदा जाधव, सावित्रीबाई तोताराम जाधव, नारदाबाई नानाजी जाधव, भागाबाई उरवा सरदार, दयाबाई रामाजी जाधव वगैरे प्रमुख स्त्रिया हजर होत्या. शेवटी पहाटे तीन-चार वाजता गाडी स्टेशनवर येईल अशी बातमी श्री. रायला मास्तर यांनी आणली. झाले, लोकांनी बोर्डिंगचे आवार सोडून रात्री बारा वाजता स्टेशन गाठले. यापूर्वीच आजूबाजूच्या खेड्यातील लोकांची स्टेशनवर गर्दी झाली होती, त्यात हा जमाव येऊन मिळाल्यामुळे स्टेशनचा सर्व भाग माणसांनी पूर्णपणे भरून गेला. लोक पहाटे चार वाजेपर्यंत जागरण करीत होते. एकदाची स्टेशनमध्ये गाडी आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषाने सारे वातावरण दुमदुमून गेले. डॉ. बाबासाहेब गाडीतून उतरताच तेथील समाजातर्फे श्री. रायला मास्तर यांनी त्यांना हार अर्पण केला. त्याचवेळी आठ मैलाचा पायी प्रवास करीत श्री. डी. जी. जाधव यांचे वडील व आई बाबासाहेबांच्या भेटीस आले होते. त्या उभयतांनी डॉ. बाबासाहेबांना वंदन केले. इंजिनाच्या नादुरुस्तीमुळे बाबासाहेबांना उशीर झाला होता आणि लगेच ५ वाजताच्या गाडीने त्यांना मुंबईस जावयाचे असल्यामुळे त्यांना बोर्डिंगमध्ये जाता आले नाही. जमलेल्या लोकांनी स्टेशनवरच बाबासाहेबांचे स्वागत केले. निरनिराळ्या संस्थांकडून बाबासाहेबांना अनेक हार अर्पण करण्यात आले. बाबासाहेबांनी त्यांचा प्रेमाने स्वीकार केला आणि आपल्या चळवळीसाठी थोडासा उपदेश करून सर्वांचा निरोप घेतला. हा अपूर्व सत्कार समारंभ चाळीसगाव शहरात दिवसभर गाजून राहिला होता.

🔵🔵🔵

✍🏻 संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे