ठाणे अस्पृश्य विद्यार्थी वसतिगृह सहाय्यक मंडळाच्या विद्यमाने भरविलेल्या अस्पृश्य समाजाच्या जंगी जाहीर सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण ….
रविवार दिनांक २८ जुलै १९४० रोजी सकाळी १० वाजता दामोदर ठाकरसी हॉल, परळ, मुंबई येथे ठाणे अस्पृश्य विद्यार्थी वसतिगृह सहाय्यक मंडळाच्या विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्य समाजाची जंगी जाहीर सभा भरविण्यात आली होती.
प्रथम श्री. पी. एल. लोखंडे यांनी प्रिं. एम. व्ही. दोंदे, बी. ए. आणि श्री. एस्. जी. केणी, जे. पी. यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यानंतर श्री. लोखंडे, श्री. ए. बी. केणी, श्री. सी. एन. मोहिते आणि वि. का. उपशाम यांची भाषणे झाली. त्यानंतर टाळ्यांच्या कडकडाटात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
ठाणे अस्पृश्य विद्यार्थी वसतिगृह सहाय्यक मंडळाच्या विद्यमाने भरविलेल्या अस्पृश्य समाजाच्या सभेत केलेल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
आजच्या प्रसंगी विशेष भाषण करण्याची जरुरी नाही. ठाणे बोर्डिंग १९२६ साली काढण्यात आले. आज १४-१५ वर्षे समाजावर कोणत्याही प्रकारचा भार न टाकता ते चालविले. ह्या बोर्डिंगच्या बाबत मुंबई सरकारशी मी काही अटी ठरविल्या होत्या. त्यामध्ये प्रत्येक मुलामागे दरमहा १० रुपये देण्याचे ठरले होते. पण काँग्रेस सरकार अस्तित्वात आल्यावर त्यांनी माझ्याशी वाटाघाटी न करता मुलामागे १० रुपयांऐवजी ४ रुपयेच मंजूर केले. प्रत्येक मुलाचा खर्च ४ रुपयात भागवून बोर्डिंग चालविणे अतिशय कठिण काम आहे.
आता ठाणे बोर्डिंगची सारी जबाबदारी तुमच्यावर आहे. हिंदुंच्या दारी जाणे स्वाभिमानाच्या विरुद्ध आहे. आपण स्वतःच्या शिरावर जबाबदारी घेऊन बोर्डिंग अव्याहत चालविले पाहिजे. बोर्डिंग सतत चालविण्याच्या दृष्टीने आज मिळालेली मदत अपुरी आहे. कार्यकर्त्यांना काम करण्यास उत्साह येईल, अशी मदत करा. ती मदत कशी करावयाची ते तुम्ही ठरवा. पण मला वाटते आपल्यात सुशिक्षित शिक्षक, कारकून इत्यादी मंडळी प्रामुख्याने दिसत आहे. त्यांना दरमहा बोर्डिंगला मदत करणे शक्य आहे. म्युनिसीपल युनियनच्या कार्यकर्त्यांनी युनियनच्या सभासदांकडून वर्षाच्या काठी काही मदत मिळवून द्यावी. लग्नादी विधी होतात त्यावेळी बोर्डिंगला मदत करावी.
समाजात १०० च्या वर संस्था आहेत. त्यांनी वर्षअखेर २०-२५ रु. दिल्यास काही वावगे होणार नाही. पण मला वाटते पैशाच्या अभावी बोर्डिंग बंद पडणार नाही. आपल्या समाजात एकाग्र चित्ताने काम करणारा एकही मुनष्य आज वीस वर्षात मला दिसला नाही. कौन्सिलच्या किंवा म्युनिसीपालिटीच्या एका जागेकरिता १०० अर्ज तयार असतात. पण एकच काम एका मार्गाने, एकाच ध्येयाने करणारा एकही मनुष्य अजून माझ्यापुढे आलेला नाही. शिक्षण, सामाजिक आणि आर्थिक अडचणी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. ही कामे करण्यास प्रसिद्धीची अपेक्षा न करता काम करणारी माणसे पाहिजेत. जो तो प्रसिद्धीच्या मागे आहे. त्यामुळे पाहिजे तसे काम होत नाही. तात्पुरत्या कामाने महत्त्वाचे प्रश्न सुटत नाहीत. त्याकरिता अहोरात्र झटले पाहिजे. ब्राह्मण समाजाने आपल्या समाजावर अन्याय केला आहे. त्यांनी आपल्याला छळले आहे, हे सत्य आहे. पण त्यांची कामाची पद्धत इतकी चांगली आहे की, त्यांनी मिळविलेली सत्ता ते कायम टिकवून धरू शकतात. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता मूळ पायाला किंवा धोरणाला घट्ट चिकटून काम करीत राहणारे ध्येयवादी कार्यकर्ते त्यांच्यात निपजतात. आपल्या कार्यकर्त्या मंडळींनी अजून निश्चयाने, निष्ठेने आणि निमूटपणे कार्य करावयास सुरवात केल्यास आपली चळवळ पसरल्याशिवाय राहाणार नाही.
🔹🔹🔹
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाच्या वेळी देणग्यांचा वर्षाव सारखा सुरु होता. सभेत एकूण १८२ रू. जमले. श्री. जी. एम. जाधव यांनी एका वर्षात ७०० पायली तांदूळ ‘ म्युनिसीपल कामगार संघाच्या ‘ सभासदांकडून मिळवून देण्याचे अभिवचन दिले.
श्री. के. व्ही. सवादकर, मॅनेजर, ‘ जनता ‘ यांनी जनता पत्र व भारतभूषण छापखाना या संस्थेस मदत करणाऱ्या सद्गृहस्थांचे अंतःकरणपूर्वक आभार मानले. श्री. रामकृष्ण गंगाराम उर्फ बाबूराव भातणकर, एम. एल. ए., चेअरमन, ‘ ठाणे वसतिगृह सहाय्यक मंडळ ‘ यांनी ठाणे बोर्डिंगला मदत करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि बाबासाहेबांच्या भाषणाचा विचार करून प्रत्येकाने त्यांच्या आज्ञेनुसार वागण्याचा निश्चय करावा अशी जनसमुहास विनंती केली आणि सर्वांचे आभार मानल्यावर सभा बरखास्त झाली.
⚫⚫⚫
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर