August 2, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

ब्राहाणशाहीला प्राणघातक ठोसा – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

अखिल भारतीय दलित वर्ग परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले समारोपाचे भाषण….

नागपूर येथे दिनांक १८ व १९ जुलै १९४२ रोजी अखिल भारतीय दलित वर्ग परिषद भरविण्यात आली होती. या परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समारोपाचे भाषण केले.

अखिल भारतीय दलित वर्ग परिषदेच्या समारोपाचे भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
मित्रांनो,
मागच्या दहा वर्षात राजकीय चळवळींना मोठी गती आलेली आहे. तथापि, अस्पृश्यांचा जेथपर्यंत संबंध आहे तेथपर्यंत पाहाता तुम्ही आज जे ठराव पास केलेले आहेत त्यांनी अस्पृश्यांच्या नव्या युगाला सुरुवात झाली आहे, अशी मला खात्री आहे. तुम्हाला माहितच आहे की, उद्यापासून मी माझ्या नव्या ऑफिसची जबाबदारी स्वीकारणार आहे. म्हणून माझ्या मागील वीस वर्षाच्या मुखत्यारपदाचा हिशेब तुम्हास सादर केला.

मुसलमान आणि अस्पृश्य हे अल्पसंख्यांक समजल्या जात असले तरी त्यांच्या परिस्थितीत भक्कम असे अंतर आहे हे स्पष्ट केलेच पाहिजे. आपल्या जातीच्या मानाने मुसलमान जात अत्यंत श्रीमंत आहे. ब्रिटिश येईपर्यंत ते या देशाचे राज्यकर्ते होते. अशा तऱ्हेने त्यांच्यामागे उच्च असा दर्जा आहे व आपल्यापेक्षा त्यांची प्रगती कितीतरी अधिक झालेली आहे. शेकडो वर्षापासून आपली पिळवणूक झालेली आहे. आत्यंतिक दारिद्र्य ही आपली आर्थिक स्थिती आहे. केवळ एकट्या लोकसंख्येवरून आपली तुलना आपण मुसलमानांशी करू शकत नाही. पुर्णतः आपल्याच प्रयत्नांवर सुरुवातीपासून अवलंबून राहून आपणाला कार्य केले पाहिजे. आपणाला आपल्या जातीचा उद्धार करावयाचा आहे. माझ्या या नवीन नेमणुकीमुळे ही माझी जबाबदारी मला दुसऱ्याच्या खांद्यावर सोपवावी लागत आहे. अधिकारासंबंधी (office) मला मुळीच आवड नाही. मी चांगला सुरळीत होतो. साध्या ‘ डॉ. आंबेडकर ‘ मध्ये आणि ‘ नामदार डॉ. आंबेडकर ‘ मध्ये काही फरक आहे असे मला वाटत नाही. माझ्या नेमणुकीसंबंधी अधिक महत्त्वाचे मला वाटते ते हे की गव्हर्नर जनरलच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलवर दलित वर्गाच्या प्रतिनिधीसाठी एक जागा ठेवलीच पाहिजे अशी आता रूढी स्थिर झालेली आहे. ब्राह्मणशाहीला हा प्राणघातक ढोसा आहे. माझ्या नेमणुकीचे महत्व येथे आहे. अशा तऱ्हेचा प्रघात पडणे ब्राह्मणशाहीला मुळीच पथ्यकारक नाही. मला वाटते अस्पृश्यांचा हा फार मोठा विजय आहे.

माझ्यासंबंधी ज्यांची मते चांगली नाहीत असे बरेचसे लोक आहेत. वाचनात वेळ घालवून एकाकी जीवन जगणे हा माझा स्वभाव आहे. अशा माझ्या स्वभावाबद्दल पुष्कळांना असे वाटते की, मी लोकांशी नीट न वागता त्यांना टाळतो याचा हा पुरावाच आहे. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की, कोणाचाही कसलाही अपमान करावा अशी माझी मुळीच इच्छा नसते. माझे आयुष्य फार मर्यादित आहे. मला पुष्कळ गोष्टी करावयाच्या आहेत व मदतनीस तर नाही.

पुष्कळ हिंदू माझ्याकडे शत्रुत्वाच्या नजरेतून पाहतात. मी त्यांच्या भावना दुखविण्याइतके कठोर बोलतो अशी त्यांची तक्रार आहे. परंतु माझे हृदय अत्यंत कोमल आहे हे मला माहीत आहे. ब्राह्मणांमधून सुद्धा मला पुष्कळ मित्र आहेत. तथापि, कोमल हृदयाच्या माणसाने सुद्धा सत्य बोलून दाखविलेच पाहिजे. आपल्या अत्यंत प्रिय अशा आप्तेष्टांना कुत्र्यापेक्षाही वाईट वागविल्या जात असताना आणि त्यांची पुढील प्रगतीची द्वारे सर्व तऱ्हेने बंद झालेली आहेत हे दिसत असताना मी हिंदुंशी दयाळूपणाने वागावे अशी ते अपेक्षा तरी कशी करू शकतात ? सध्याच्या हिंदू पिढीने यासंबंधी काही केलेले नाही हे मला कळते. म्हणूनच माझ्या भावना आवरून माझ्या विरोधकांशीही सन्मानपूर्वक वागण्याचा मी प्रयत्न करतो. माझ्या विरोधकांशी माझी वागणूक दुष्टपणाची कधीच नसते. परंतु त्यांचे अपराधी मन खात असते.

या देशात राजकीय हक्क हिंदू, मुसलमान व दलित वर्ग यांच्यामध्ये विभागल्या जावेत असे माझे निश्चित मत आहे. हिंदू आणि मुसलमानासमवेत दलित वर्गालाही शासनामध्ये योग्य तो वाटा कायद्याने मिळाला पाहिजे. या तीन खांबाचा आधार असला तरच भविष्यकालीन घटना योग्यपणे कार्य करू शकेल. हे प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही सर्वांनी एका निशानाखाली संघटित झाले पाहिजे व केवळ एकच संघटना केली पाहिजे. आतापर्यंत आपल्या वाट्याला येणारे अधिकार घटनेमध्ये आपणाला प्राप्त झाले नाहीत, यास एकमेव कारण म्हणजे आपण अजून संघटित झालेलो नाही हेच होय. तुम्ही सर्व संघटित झालात व एका संस्थेखाली कार्य करू लागलात तर तुमच्या अधिकारपात्र अशा स्थितीला तुम्ही पोहचाल, याबद्दल मला मुळीच संदेह नाही.

काँग्रेस ही एक फार मोठी संघटना आहे. तिचा प्रभाव फार दूरवर पसरला आहे. कोणीही सहजच विचारतो की आपल्या संघटनेचा प्रचार असा दूरवर का पसरला नाही. काँग्रेसच्या हाताशी दोन गोष्टींची सुविधा आहे. काँग्रेसच्या पाठीशी भारतातील सर्व छापखाने उभे आहेत. त्यामुळे तिला पूर्णतः प्रसिद्धी मिळते. आपणाला तथाकथित राष्ट्रीय हिंदू वर्तमानपत्रातून प्रसिद्धी मिळत नाही. दुसरी गोष्ट काँग्रेसच्या हाताशी पैसा आहे. तुम्हाला आठवत असेल की काँग्रेसने एक कोटी रुपयांचा फंड जमविला आहे. तिच्या यशाचे रहस्य या अवाढव्य फंडात आहे. परंतु आपल्या जातीच्या कार्यासाठी मी कधीच फंड मागितलेला नाही. जी काही संघटना व प्रगती आपण केली आहे ती कोणत्याही फंडाच्या मदतीशिवाय केलेली आहे. परंतु आपले संघटन करण्याच्या दृष्टीने फंड गोळा करणे अत्यंत आवश्यक आहे हे मी तुम्हास सांगितलेच पाहिजे. फंडाशिवाय आपला समाज पुढे वाटचाल करण्यास असमर्थ ठरेल व आधीच सुसंघटित झालेल्या जातीच्या बरोबरीने चालणे आपणास कठीण जाईल.

सार्वजनिक जीवनात चुका घडतातच पण त्यामुळे आपली हिम्मत खचू देऊ नये. चुकांच्या द्वारेच आपणास आपले दोष दिसून येतात व मगच आपण ते घालवू शकतो.

अखिल भारतासाठी एक संघटना असावी असा जो ठराव तुम्ही पास केला आहे तो पाहून मला अत्यंत आनंद झाला आहे. प्रत्येक प्रांतात तिच्या शाखा आता तुम्ही स्थापन कराव्या. सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व संघटना या अखिल भारतीय संस्थेमध्ये विलीन होतील इकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे.

कार्यालय व चळवळीचे केन्द्र म्हणून प्रत्येक प्रांतातच नव्हे तर प्रत्येक शहरी आपल्या संघटनेच्या इमारती असाव्यात अशी माझी मोठी अपेक्षा आहे. काल रात्री वेळ्याच्या दशरथ पाटलांशी मी बोलत होतो. नागपूरमध्ये एखादा जमीनीचा तुकडा विकत घेऊन आपल्या संस्थांसाठी एक इमारत बांधण्यास मी त्यांना सांगितले. वीस ते पंचवीस हजाराच्या रकमेत तुम्ही हे करू शकाल. अशा तऱ्हेची इमारत तुम्ही नागपूरला बांधण्याची सिद्धता करू शकलात व इमारतीची कोनशिला बसविण्यासाठी मला निमंत्रण दिलेत तर हे निमंत्रण स्वीकारण्यात मला फार मोठा संतोष वाटेल.

🔹🔹🔹

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे