April 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

देवदर्शनाशिवाय कोणी मरत नाही – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

मु. निपाणी, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र व थैली अर्पण करण्याच्या समारंभात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….

दिनांक २३ मे १९३२ रोजी कर्नाटकातील बहिष्कृत वर्गातील निरनिराळ्या संस्थांच्या मार्फत श्री. दि. बा. लठ्ठे, एम. ए. ; एलएल. बी. यांच्या अध्यक्षतेखाली मु. निपाणी, ता. चिकोडी, जिल्हा बेळगाव येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र व थैली अर्पण करण्याचा भव्य असा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी डाॅ. बाबासाहेब निपाणीस जात असताना क. कागल, ज. कागल येथील अस्पृश्य समाजाने महारवाड्यातील तक्क्याचे इमारतीत डाॅ. बाबासाहेबांसाठी पान सुपारीचा कार्यक्रम केला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागतासाठी कागल जहागिरीतील अस्पृश्य समाज चार-पाच हजारावर जमला होता. हा समाज आपापली गावं सोडून जवळजवळ तीन-चार फर्लांग अंतरावर बाबासाहेबांच्या स्वागतासाठी उभा राहिला होता. डाॅ. बाबासाहेब तिथे पोहोचताच सर्व परिसर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयजयकाराने दुमदुमला. तेथून डाॅ. बाबासाहेबांची मिरवणूक काढली आणि बाबासाहेबांच्या मोटारीच्या सभोवार हाताची साखळी करून बंदोबस्तात व बॅंडच्या वाद्यांसह वाजत-गाजत, बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करीत मिरवणूक समारंभाच्या ठिकाणी पोचली. या चार-पाच हजार जनसमुदायाशिवाय सभास्थानीही चार-पाच हजारावर जनसमुदाय जमला होता. मिरवणूक सभास्थानी पोचताच जमलेल्या प्रचंड जनसमुदायाने एकमुखाने डाॅ. बाबासाहेबांचा हर्शोल्लासात जयजयकार केला.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्थानापन्न झाल्यावर मि. भीमराव संताजी कांबळे मास्तर यांनी वेळेअभावी थोडक्यात डाॅ. बाबासाहेबांबद्दल गौरवपर दोन शब्द सांगितले. डाॅ. बाबासाहेबांना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात केली. सुरुवातीला स्वागतपर गीतं गायली गेली. उच्चासनावर मे. बागडे वकील, पुणे, भाऊराव पाटील, सातारा, दत्तोबा पोवार, कोल्हापूर, गणेशाचार्य वकील, कोल्हापूर, मलगौडा पाटील बेनाडीकर व इतर बरीच मंडळी विराजमान झाली होती. स्वागतपर गीतं झाल्यावर मे. मारूतीराव राव यांनी अध्यक्षपदाची सूचना मांडली व या सूचनेला रावसाहेब पापाणा, बेळगाव यांनी अनुमोदन दिल्यावर टाळ्यांच्या कडकडाटात मा. दि. ब. लठ्ठे यांनी सभेचे अध्यक्षस्थान स्विकारले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र व थैली अर्पण करण्यात आल्यानंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तरादाखल भाषण केले.

या सत्कार समारंभाच्या उत्तरादाखल केलेल्या भाषणात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
दि. ब. लठ्ठेसाहेब व सदगृहस्थहो !
आपण या ठिकाणी मला आणण्याचा योगायोग जुळवून आणिला याबद्दल मी आपला आभारी आहे.
आज हिंदुस्थान देशामध्ये देशद्रोही, देश विघातक, हिंदू धर्म विघातक व हिंदू-हिंदूत दुफळी पाडणारा असे अत्यंत मोठ्या प्रमाणावर जर कोणास म्हणण्यात येत असेल, देशात अत्यंत मोठा शत्रू असे जर कोणास म्हणण्यात येत असेल तर ते मलाच होय. परंतु हे वादळी वातावरण शांत झाल्यानंतर राऊंड टेबल परिषदेच्या कार्याची जर आजचे माझे टीकाकार काळजीपूर्वक छाननी करतील तर त्यांना हीच गोष्ट कबूल करावी लागेल, ती ही की, डॉ. आंबेडकर यांनी राष्ट्रासाठी काहीतरी केले आहे. जर ही गोष्ट हल्लीचे दूषित वातावरण बदलल्यानंतरही त्यांनी कबूल केली नाही तरी त्यांना मी कवडीचीही किंमत देणार नाही. माझ्या कार्यावर माझ्या दलित समाजाचा विश्वास आहे, हीच गोष्ट मी अत्यंत मोठी समजतो आणि ज्या समाजात माझा जन्म झाला आहे व ज्यांच्यात मी वावरत आहे आणि ज्यांच्यात मी मरणार आहे त्यांच्यासाठीच मी कार्य करीत राहणार आहे. माझ्या टीकाकारांची मला पर्वा नाही. मी देशाचे कार्य करीत नाही असा माझ्यावर आरोप आहे. आज शंभर वर्षापासून सुधारक, दुर्धारक, जहाल, मवाळ लोकांचे राष्ट्राचे नावावर आपल्या जातीच्या लोकांचे पोट भरण्याचे कार्य चालले आहे. त्या लोकांनी माझ्या समाजासाठी काही केले नाही. मग माझ्यापासूनच त्यांनी राष्ट्रकार्याची अपेक्षा का करावी ? मला माझ्या समाजाची सेवा केली पाहिजे.

महाड, नाशिक आणि इतर ठिकाणच्या सत्याग्रहावरून माझी अशी खात्री झाली आहे की, हिंदू लोकांची अंतःकरणे दगड विटांच्या भिंतीप्रमाणे निर्जीव आहेत. त्यांना माणसाला माणूस म्हणण्याची, इतरांना बरोबरीचा हक्क देण्याची चाड नाही. दगडाच्या भिंतीवर डोके आपटून आपला कपाळमोक्ष केला तर शेवटी रक्तच येणार परंतु त्या भिंतीच्या ठिकाणची कठोरता नाहीशी होणार नाही. त्याचप्रमाणे हिंदू लोकांच्या अंतःकरणाची कठोरता नाहीशी होणार नाही. तेव्हा याबाबतीत माझे पूर्णपणे मतपरिवर्तन झाले आहे. आजपर्यंत आपल्याला हिंदूंच्या देवाचे दर्शन झाले नाही म्हणून आपण मेलो नाही किंवा आजपर्यंत हिंदूंच्या देवळात जाणारी गाढवे, कुत्री, मांजरे वगैरे जनावरे ‘ माणसे ‘ झाली नाहीत. ते आम्हास शिवून घेत नाहीत तर आम्हीही त्यांना शिवून घेणार नाही.

यापुढे आम्ही सरकारी अंमलदारांचे तंबू मारणारे व झाडलोट करणारे राहणार नाही. इतरांप्रमाणे आम्ही राजकीय सत्ता हाती घेणार आणि आपले सामाजिक स्वातंत्र्य प्रस्थापित करणार. यापुढे आम्ही कोणाचेही गुलाम राहणार नाही असा आमचा कृतनिश्चय आहे.

🔹🔹🔹

यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले भाषण संपविले व ७-८ हजार लोकसमुदायाच्या टाळ्यांच्या गजरात या गोड समारंभाची सांगता झाली.

⚫⚫⚫

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे