धर्मांतराच्या जाहीर घोषणेस पाठिंबा देण्याकरिता पार पडलेल्या ठाणे जिल्ह्यातील पूर्व व दक्षिण भागातील अस्पृश्य समाजाच्या जंगी जाहीर परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण….
धर्मांतराच्या जाहीर घोषणेस पाठिंबा देण्याकरिता कल्याण येथे रविवार दिनांक १७ मे १९३६ रोजी ठाणे जिल्ह्यातील पूर्व व दक्षिण भागातील अस्पृश्य मानलेल्या समाजाची जंगी जाहीर परिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरीतीने पार पडली.
परिषदेचे नियोजित अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मुंबईहून येणार असल्याची बातमी आगाऊ हस्तपत्रकांच्याद्वारे प्रसिद्ध झाल्यामुळे मोठ्या उत्सुकतेने कल्याण स्टेशनवर डाॅ. बाबासाहेबांचे हार्दिक स्वागत करण्याकरिता सुमारे शे-दीडशे खेड्यातून आलेला तीन-चार हजार अस्पृश्य समुदाय स्टेशनबाहेर गाडीची चातकाप्रमाणे वाट पाहात उभा होता. दुपारी ३ वाजता कल्याण स्टेशनवर डॉ. बाबासाहेब उतरताच कल्याणच्या प्रमुख कार्यकर्त्या मंडळींतर्फे स्टेशनवर पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
स्टेशनच्या बाहेर येताच ” डॉ. आंबेडकर की जय “, ” आंबेडकर जिंदाबाद “, ” थोडे दिनमें भीमराज ” इत्यादी गगनभेदी घोषणांनी तेथील सर्व वातावरण दुमदुमून गेले होते. डॉ. बाबासाहेबांच्या दर्शनास उत्सुक असलेल्या समाजास बाबासाहेबांचे दर्शन झाल्यावर सर्वांची अंतःकरणे आनंदित होऊन जिकडे-तिकडे नवचैतन्य उत्पन्न झाले होते. नंतर चार हजार लोकांच्या समवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शहराच्या प्रमुख भागातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या दोन्ही बाजूंनी स्वयंसेवकांची पथके शिस्तीने डॉ. बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करीत चालली होती. मिरवणुकीच्या पुढे बॅंड, वाजंत्री इत्यादि वाद्ये वाजत होती. मधून-मधून लाठीकाठीचे खेळ निरनिराळ्या तालमी करीत होत्या. त्यावेळचा तो देखावा पाहणार्यास मूक जनतेच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांवरील निस्सीम प्रेमाला आणि स्वाभिमानाला पाहून कोणालाही धन्यताच वाटली असेल.
धर्मांतर घोषणेला पाठींबा देण्यासाठी भरलेल्या या परिषदेत भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
आज आपण मुख्यतः धर्मांतरासंबंधी मी काय सांगणार आहे हे ऐकण्याकरता आला आहात. त्याबद्दल मला खुलासेवार सांगणे प्राप्त आहे. काही लोक धर्मांतरासंबंधी असा प्रश्न करतात की, आम्ही धर्मांतर का करावे ? परंतु याला माझा उलट प्रश्न असा आहे की, आम्ही धर्मांतर का करू नये ? मी धर्मांतर का करावे याची कारणे माझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या अनेक प्रसंगावरून तुम्हाला सहज समजू शकतील. माझ्याप्रमाणेच आपल्याही आयुष्यामध्ये अशाप्रकारचे प्रसंग उद्भवले असतील. ज्या कारणांमुळे मला धर्मांतर करावे असे वाटते ती कारणे सिद्ध करून देण्याकरिता माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही चार-पाच गोष्टींचा माझ्या मनावर कायमचा ठसा उमटला आहे, त्यापैकी मी आपणाला आजच्या प्रसंगी दोन-तीन गोष्टी सांगणार आहे.
माझा जन्म महू, इंदोर येथे माझे वडील पलटणीत असताना झाला. त्यावेळी माझे वडील पलटणीत सुभेदार होते. आम्ही पलटणीतच राहात असल्यामुळे आम्हाला बाहेरच्या जगाचा संपर्क झाला नव्हता. त्यामुळे अस्पृश्यतेसंबंधी कोणत्याही प्रकारची कल्पना मला नव्हती. परंतु जेव्हा माझ्या वडिलांनी पेन्शन घेतले तेव्हा आम्ही सर्वजण साताऱ्यास येऊन राह्यलो. माझी आई मी अवघ्या पाच वर्षाचा असताना निवर्तली. सातारा जिल्ह्यात गोरेगावी दुष्काळ पडला होता. म्हणून दुष्काळी कामे सरकारने काढली. यावेळी एक पाण्याचा तलाव सुरू करण्यात आला होता. या तलावाचे काम करणाऱ्या मजूरांना पगार वाटण्याच्या कामावर माझ्या वडिलांची नेमणूक झाली. ते गोरेगावी गेले व आम्हा चार मुलांना साताऱ्यास ठेविले. जवळ जवळ चार पाच वर्षे आम्ही भातावर काढली. आम्ही साताऱ्यास आल्यापासून आम्हाला खऱ्या अस्पृश्यतेची जाणीव होऊ लागली. प्रथम आमचे केस कापण्यास आम्हाला न्हावी मिळेना. आमची मोठी पंचाईत झाली. मग माझी वडील बहीण ती अजून जिवंत आहे. ती आम्हा चार मुलांच्या हजामती ओट्यावर बसून करीत असे. साताऱ्यास इतके न्हावी असूनही ते आमची का हजामत करीत नाहीत हे मला प्रथमच कळले. दुसरा एक प्रसंग असा घडला की, आमचे वडील गोरेगाव येथे असताना ते आम्हाला पत्र पाठवीत असत. त्यांनी आम्हाला एकदा ‘ गोरेगावला या ‘ असे पत्र पाठविले होते. गोरेगावला आम्ही आगगाडीत बसून जाणार म्हणून मला फार आनंद झाला होता. तोपर्यंत मी आगगाडी पाहिली नव्हती. वडिलांनी पाठविलेल्या पैशाचे आम्ही चांगले कपडे केले व मी, माझा भाऊ आणि बहिणीच्या मुली इतके जण वडिलांना भेटावयास निघालो. त्यापूर्वी त्यांना पत्र लिहिले होते. परंतु ते पत्र नोकराच्या हलगर्जीपणामुळे त्यांना मिळाले नाही आणि त्यामुळे आम्ही गोरेगावी केव्हा येणार हे त्यांना कळले नाही. आम्ही मात्र वडील आम्हाला नेण्याकरिता नोकर वगैरे पाठवितील या आनंदात होतो. परंतु या बाबतीत आमची निराशा झाली. आम्ही आगगाडीतून उतरताच नोकराची वाट पाहिली. माझा पोशाख ब्राह्मणासारखा दिसत होता. गाडी येऊन निघून गेली. आम्ही अर्धा-पाऊण तास स्टेशनवर वाट पाहात राहिलो. स्टेशनवर आम्हाशिवाय कुणीच राहिले नाही. तशात आम्ही सर्व जण मुले पाहून स्टेशन मास्तर आमच्याजवळ येऊन आम्हास कुठे जायचे, तुम्ही कोण वगैरे विचारू लागला. आम्ही ‘ महार ‘ असे म्हणताच स्टेशन मास्तरला धक्का बसल्यासारखा झाला. तो दचकून पाच-सहा कदम मागे हटून गेला. तरीपण आमच्या पोशाखावरून आम्ही कोणीतरी सुखवस्तू महाराची मुले आहोत हे त्यांनी जाणले व आम्हाला गाडी करून देण्याचे ठरविले. परंतु संध्याकाळी सहा-सात वाजेपर्यंत एकही गाडीवान आम्हाला (आम्ही महाराची मुले म्हणून ) घेऊन जायला तयार होईना. शेवटी एक गाडीवान तयार झाला. परंतु त्याने अशी अट घातली की, आपण काही गाडी चालविणार नाही. मी पलटणीत दिवस काढल्यामुळे मला गाडी हाकणे कठीण वाटले नाही. आम्ही कबूली देताच गाडीवान गाडी घेऊन आला व आम्ही गोरेगावच्या मार्गाला लागलो. गावच्या बाहेर बरेच दूर गेल्यावर आम्हाला एक नाला लागला. ‘ येथेच तुम्ही भाकरी खाऊन घ्या. पुढे तुम्हाला पाणी प्यायला मिळणार नाही ‘ असे गाडीवानाने सांगितले. आम्ही खाली उतरलो. भाकरी खाल्ल्या. नाल्याचे पाणी इतके अस्वच्छ होते की त्यात बऱ्याच प्रमाणात शेणाचे मिश्रण होते. गाडीवान तेवढ्यात कुठे तरी भाकरी खाऊन आला. पुन्हा आमची गाडी चालू झाली रात्र बरीच झाली तेव्हा गाडीवान हळूच गाडीत येऊन बसला. रस्त्यावर दिवा नाही, माणूस तर कोणी दिसेना. आम्हाला रडू कोसळले. अशारीतीने आम्ही रात्री बारा वाजेपर्यंत वेळ काढली. मनात तर्क-कुतर्क चालू होतेच. आपण काही गोरेगावास जात नाही, असे वाटले. इतक्यात एका टोल नाक्यावर आमची गाडी येताच आम्ही गाडीतून उड्याच घेतल्या. भाकरी खाण्याकरिता टोल नाक्यावरील मनुष्यास विचारले. मला पर्शियन भाषा चांगली येत असल्यामुळे त्या मनुष्याशी बोलण्यास अडचण पडली नाही. परंतु त्याने मला उर्मटपणाने उत्तर देऊन पाण्यासाठी समोरचा डोंगर दाखविला. शेवटी कशीतरी ती रात्र टोल नाक्यावर काढली. सकाळी पुन्हा गाडी चालू केली व शेवटी दुपारी अर्धमेल्या अवस्थेत गोरेगावी येऊन पोहोचलो.
माझ्या आयुष्यातील तिसरा प्रसंग म्हटला म्हणजे बडोदे सरकारची नोकरी. बडोदे सरकारची स्कॉलरशिप मिळाल्यावर मी विलायतेला जाऊन उच्च शिक्षण घेतले. तेथून परत आल्यावर स्कॉलरशिपच्या अटीप्रमाणे मला बडोदे संस्थानात नोकरी करणे भाग होते. परंतु बडोद्यात मला राहावयास एकही घर मिळेना. हिंदू किंवा मुसलमान कोणीच राहावयास जागा देईना. शेवटी एका पारशी धर्मशाळेत पार्शी म्हणून राहण्याचे ठरविले. विलायतेहून परत आल्यावर मी दिसायला रुबाबदार व गोरा दिसत होतो. शेवटी मी एदलजी सोराबजी असे पार्शी नाव धारण करून राहिलो. परंतु रोजी दोन रुपये घेऊन राहावयास जागा देण्याचे धर्मशाळेच्या रखवालदाराने कबूल केले. यापूर्वीच श्रीमंत महाराज सरकारने बडोद्यास एक शिकलेले महाराचे पोर आणले आहे, ही कुणकुण लोकांना कळली होती. माझे पार्शी म्हणून धर्मशाळेत गुप्तपणे रहाणे वगैरे गोष्टी लोकांना शंका येण्यास कारणीभूत होऊन माझ्या गुप्तपणाचा स्फोट झाला. धर्मशाळेत राहाणारा मीच तो महार हे तेथील पार्शी लोकांना कळले. दुसरे दिवशी मी जेवण वगैरे करून ऑफिसला जाण्याकरिता निघालो असताना पंधरा-वीस पार्शी हातात काठ्या घेऊन मला ठार करण्याकरिता तेथे आले. त्यांनी प्रथम ” तू कोण आहेस ? ” असे विचारले. मी फक्त ” हिंदू आहे ” असे उत्तर दिले. परंतु त्यांचे या उत्तराने समाधान झाले नाही. त्यांनी हमरी-तुमरीवर येऊन जागा ताबडतोब सोडण्यास सांगितले. त्यावेळी माझ्या मनोधैर्याचे मला विलक्षण पाठबळ मिळाले. मी त्यांच्याजवळ निर्भयपणे आठ तासांची मुदत मागितली व ती त्यांनी दिली. मी सबंध दिवस राहावयास जागा मिळविण्याचा कसून प्रयत्न केला. परंतु मला कुठेच जागा मिळेना. कित्येक मित्रांकडे गेलो. त्यांनी निरनिराळी कारणे सांगून मला वाटेला लावले. मी शेवटी इतका कंटाळलो की, आता पुढे काय करावे हेच मला कळेना. मी एका ठिकाणी खाली बसलो. माझे मन उद्विग्न बनले व डोळ्यातून सारखा अश्रूप्रवाह याहू लागला. (यावेळी डॉ. बाबासाहेबांच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. अस्पृश्यतेच्या भडाग्नीने त्यांचे अंतःकरण होरपळून गेलेले दिसत होते.) शेवटी अगदीच नाइलाज झाल्यावर मला बडोद्याची नोकरी सोडून रात्रीच्याच गाडीने मुंबईस यावे लागले. माझ्यावरील प्रसंगाप्रमाणे तुमच्यावरही असले अनेक प्रसंग येऊन गेले असतील. म्हणून म्हणतो की, ज्या समाजात माणुसकी नाही, थारा नाही त्या समाजात निष्कारण मानहानी भोगीत जीवन कंठण्यात काय अर्थ ! जो असल्या निर्दय धर्मात राहिल तो गुलाम आहे. ज्याला माणुसकी पाहिजे तो या सैतानी धर्मात राहणार नाही.
माझे वाडवडील या हिंदू धर्मात राहिले परंतु त्यांना हिंदू धर्माच्या नियमाप्रमाणे शिक्षण घेता आले नाही. त्यांना शस्त्र हातात धरण्याची धर्माने परवानगी दिली नव्हती. मुबलक संपत्ती मिळविणे धर्माच्या नियमाप्रमाणे त्यांना अशक्य होते. यामुळे आमच्या वाडवडिलांना या तिन्ही गोष्टी संपादन करता आल्या नाहीत. मला उच्च शिक्षण घेताना संस्कृत भाषा शिकावयाची होती. परंतु ती गोष्ट मला धर्म बंधनामुळे त्यावेळी शक्य झाली नाही. परंतु आता विद्या शिकणे, संपत्ती मिळविणे व शस्त्र हाती धरणे शक्य झाले आहे. अशा परिस्थितीत ज्या धर्माने तुमच्या पूर्वजांना गुलामगिरीत खितपत ठेवले, कोणत्याही परिस्थितीचा उपयोग करू न देता तुम्हाला अज्ञानात व दारिद्र्यात राहावयास भाग पाडले त्या हिंदू धर्माची तुम्ही का पर्चा बाळगता. वाडवडिलांप्रमाणेच त्या हतबल, स्वाभिमानशून्य परिस्थितीचीच पाऊलवाट तुम्हाला आक्रमण करावयाची असल्यास तुम्हाला कुणी विचारणार नाही. तुमची कोणीही पर्वा बाळगणार नाही. धर्मांतराच्या प्रश्नाचे आज महत्त्व आहे ते याचमुळे. हिंदूधर्मात राहिल्याने तुम्हाला गुलामापेक्षा श्रेष्ठ दर्जा प्राप्त होणार नाही. मी जरी अस्पृश्य राहिलो तरी हिंदू समाजातील एखादी व्यक्ती जे करू शकेल ते मला सहज करता येईल. माझ्या हिताहिताचा प्रश्न सोडविण्यास
हिंदू धर्मात राहिल्याने किंवा न राहिल्याने काहीही फरक पडणार नाही. मी आजच्या परिस्थितीत हायकोर्टाचा जज् होऊ शकेन, कायदे कौन्सिलमध्ये मिनिस्टरचीसुद्धा जागा मिळवू शकेन, परंतु केवळ तुमच्या माणुसकीकरीता मला धर्मांतर करणे अगदी आवश्यक झाले आहे. आपल्या मातीमोल आयुष्याला सोन्याचे दिवस प्राप्त होण्यासाठीच मला धर्मांतराची आवश्यकता भासत आहे. तुमची स्थिती सुधारण्यासाठी माझ्या सहकारी मित्रांकडून अवश्य सहाय्य मिळेल, अशी मला खात्री वाटते. तुम्हाला कर्तबगार बनविण्यासाठी मला धर्मांतर करावयाचे आहे. माझ्या हिताच्या प्रश्नाबद्दल मी अगदी बेफिकीर आहे. आज जे मी कार्य करीत आहे ते सर्व तुमच्याच हितासाठी करीत आहे. मला तुम्ही ईश्वर मानता. परंतु मी ईश्वर नाही. मी तुमच्यासारखाच एक माणूस आहे. माझ्यापासून तुम्हाला जी काही मदत पाहिजे आहे, ती मी द्यायला तयार आहे. तुम्हाला तुमच्या आजच्या वाईट स्थितीतून मुक्त करण्याचे मी ठरविले आहे. माझ्यासाठी मी काही करीत नाही, तुम्हाला कर्तबगार बनता येईल इतके कसोशीचे प्रयत्न मात्र मी करीत राहणार. तुम्ही आपल्या परिस्थितीची जाणीव करून घ्या व मी जो मार्ग दाखवीन तो अनुसरा. म्हणजे तुमचे हित, तुमची कर्तबगारी फळास आल्याशिवाय राहाणार नाही.
🔹🔹🔹
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर