November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

वैशाखी पौर्णिमेचे महत्त्व Significance of Vaishakhi Poornima

वैशाख पौर्णिमेला पाली भाषेत वैसाख मासो’ म्हणतात. ही पौर्णिमा साधारणतः मे महिन्यात येते. भगवान बुद्धाच्या जीवनासंबंधी जन्म, विवाह, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिब्बाण या घटना याच पौर्णिमेला घडल्यात. त्यामुळे या पौर्णिमेला सर्व पौर्णिमांमध्ये अग्रस्थान आहे. या पौर्णिमेला ज्या घटना घडल्यात. त्यासंबंधी परिचय असा

१) सिद्धार्थाचा जन्म

दुल्लभो पुरिसाजञ्ञो, न सो सब्बत्थ जायति । यत्थ सो जायती धीरो, तं कुलं सुखमेधति ॥ (धम्मपदं १९३) (उत्तम पुरुषाचा जन्म दुर्लभ असतो, तो सर्वच ठिकाणी उत्पन्न होत नाही.

ज्या कुळात तो धीर पुरुष उत्पन्न होतो, त्या कुळात सुखाची वृद्धी होते.)

सिद्धार्थ गौतमाचा जन्म ख्रिस्तपूर्व ५६३ व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला.. त्याच्या पित्याचे नाव शुद्धोदन आणि आईचे नाव महामाया. शुद्धोदन हा मोठा योद्धा होता. शुद्धोदनाने जेव्हा शूरपणा दाखविला तेव्हा त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती मिळाली. त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली. ती महामायेची थोरली बहीण होती.

शुद्धोदनाला शाक्य राजा संबोधित होते. शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती. सर्व शाक्य लोक आणि राज घराण्यातील मंडळी हा महोत्सव सात दिवस साजरा करीत असत. उत्सवाच्या सातव्या दिवशी महामाया मोठ्या सकाळी उठली. सुगंधी पाण्याने स्नान केले. तिने चार लक्ष मोहरा दानधर्मात वाटल्या. मौल्यवान अलंकार परिधान केले. ●आवडीच्या पदार्थाचे सेवन केले. व्रताचरण करून निद्रेसाठी ती शयनकक्षेत गेली.

त्या रात्री शुद्धोदन व महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला. पलंगावर पहुडली असताना ती तशीच झोपी गेली. तिला एक स्वप्न पडले.

त्या स्वप्नात सुमेध नावाचा एक बोधिसत्त्व तिच्यापुढे प्रकट झाला. तिला म्हणाला, “मी माझा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील का?” तिने उत्तर दिले, “मोठ्या आनंदाने.” त्याच क्षणी महामायेला जाग आली.

पात्रातील तेलाप्रमाणे दहा महिने बोधिसत्त्वाला तिने आपल्या गर्भात धारण केले. प्रसूतीसाठी तिने आपल्या माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली, “माझ्या पित्याच्या देवदह नगरीला मी जाऊ इच्छिते.” राजाने संमती दिली.

देवदहला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्यविरहित अशा वृक्षांच्या गर्द वनराईतून महामायेला जावे लागणार होते. त्याला ‘लुंबिनी वन’ म्हणतात.

तेथील मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात तेथे क्रिडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. महामाया पालखीतून खाली उतरली. तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या बुंध्याजवळ ती चालत गेली. शालवृक्षाच्या एका फांदीला घरावे, ● अशी तिची इच्छा झाली. वाऱ्याच्या झुळूकीने एक फांदी खाली आली. तशीच महामायेने ती फांदी हाताने धरली. अचानक फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली. तिला प्रसूतींच्या वेदना असहय होऊ लागल्या. शालवृक्षाची

फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला. तो दिवस वैशाख पौर्णिमेचा होता. त्या मुलाचे पुढे नाव ‘सिद्धार्थ’ ठेवण्यात आले. अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला.

२) सिद्धार्थाचा विवाह

उय्युञ्जन्ति सतीमन्तो, न निकेते स्मन्ति ते। हंसाव पल्लुलं हित्वा, ओकमोकं जहन्ति ते ।। ( धम्मपदं : ९१ )

(स्मृतिमान व्यक्ती (समाधीत) मग्न असतात, घरात रमत नाहीत. ज्याप्रमाणे हंस क्षुद्र जलाशय सोडून जातात, त्याप्रमाणे ते घर सोडून निघून जातात)

सिद्धार्थाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरण विधी चालू असतानाच महामाया एकाकी आजारी पडली. आपला अंतकाळ जवळ आला आहे असे समजून राजा शुद्धोदनाला व प्रजापतीला जवळ बोलविले. प्रजापतीला म्हणाली, “माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करते आहे. त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील.” असे म्हणून महामायेने प्राण सोडला.

सिद्धार्थाच्या मातेचे देहावसान झाले तेव्हा तो अवघा सात वर्षांचा होता. वयाच्या आठव्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासास सुरुवात झाली. सब्बमित्ताच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने सर्व दर्शनशास्त्रे आत्मसात केली. शेतामध्ये एकांतस्थळी जाऊन समाधी लावण्याचा प्रयत्न करीत असे. तो क्षत्रिय कुळात जन्मलेला असल्यामुळे त्यास धनुर्विद्येचे आणि इतर शस्त्रे चालविण्याचे शिक्षण मिळाले होते. त्याचे बालपण परमोच्च भावनेने व्यापलेले होते. सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती की, देवदत्त या चुलत भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्ष्याचा जीव वाचविणे त्याने अधिक पसंत केले.

सिद्धार्थ गौतम सोळा वर्षांचा झाला होता. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे दंडपाणी नावाच्या शाक्याने आपल्या मुलीच्या स्वयंवरात भाग घेण्यासाठी शेजारच्या सर्व देशातील युवकांना निमंत्रणे पाठविली होती. सिद्धार्थ गौतमलाही निमंत्रण पाठविण्यात आले.

दंडपाणीची यशोधरा नावाची मुलगी आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती. तिने सोळाव्या वर्षात पदार्पण केले होते. सिद्धार्थाच्या मातापित्याने देखील निमंत्रणानुसार स्वयंवरास जाण्यास आणि यशोधरेचे पाणी ग्रहण करण्यास सांगितले. सिद्धार्थाने मातापित्याच्या इच्छेला मान दिला.

स्वयंवरात जमलेल्या सर्व युवकातून यशोधरेने सिद्धार्थ गौतमालाच मनोमन बरिले. परंतु दंडपाणीला हा बुवक पसंत नव्हता. कारण तो संन्यस्त वृत्तीचा आहे. हे दंडपाणीला आवडत नव्हते. हा विवाह होऊ नये यासाठी दंडपाणींनी धनुर्विद्येचे दाखविण्याची परीक्षा घेतली जावी, असे फर्माविले.

सुरुवातीला सिद्धार्थ या बाबतीत तयार नव्हता. त्याने नकार दिल्यास त्याचा पिता, त्याचे कूळ व सर्वात अधिक यशोधरा यांना लाजेने खाली मान घालण्याचा प्रसंग येईल, हे त्याच्या लक्षात आले. स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येतात आपले कौशल्य दाखविले. गौतमाची पाळी सर्वात शेवटी आली. परंतु त्याची विनचूक निशानबाजी सर्वश्रेष्ठ ठरली. तद्नंतर विवाह समारंभ झाला. शुद्धोदन व दंडपाणी ह्या दोघांनाही आनंद झाला. त्याचप्रमाणे यशोधरा व महाप्रजापतीलाही अत्यानंद झाला. विवाह होऊन अनेक वर्षे लोटल्यानंतर यशोधरेला एक पुत्र झाला. त्याचे नाव ‘राहुल’ असे ठेवण्यात आले.

३) सिद्धार्थाची ज्ञानप्राप्ती

यस्स जितं नावजीयति

जितमस्स नो याति कोचि लोके। तं बुद्धमनन्त गोचरं, अपदं केन पदेन नेस्सथ ||  ( धम्मपदं : १७९ )

( ज्याचा विजय पराभवात परिवर्तित होऊ शकत नाही, ज्याच्या विजयापर्यंत लोकांत (जगात) कोणी पोहचू शकत नाही, त्या अपद-ज्ञानी बुद्धाला कोणत्या उपायाने अस्थिर करू शकाल ? ) ”

वयाची वीस वर्षे झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत होती. संघाचे सभासद व्हावे लागत होते. सिद्धार्थ संघाचा सभासद झाला. शाक्य संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा वृत्तांत सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वी बराच वेळ अगोदर राजवाड्यात पोहोचला होता. घरी परतताच सिद्धार्थ गौतमाने पाहिले की त्याचे मातापिता रडत आहेत. ते दुःखमग्न झाले आहेत.

नंतर सिद्धार्थ यशोधरेच्या महालात गेला. तिला पाहून तो स्तब्ध राहिला. यशोधरा म्हणाली, “कपिलवस्तू येथे संघाच्या सभेत काय घडले, ते सर्व मला समजले. ”

त्यावर सिद्धार्थ म्हणाला, “यशोधरा, मला सांग, परिव्रज्या घेण्याच्या माझ्या निश्चयाबद्दल तुला काय वाटते?” त्यावर यशोधरा म्हणाली-

“ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात, त्याअर्थी आपण एक असा नवीन जीवनमार्ग शोधून काढा की, तो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल, ही एक केवळ माझी इच्छा आहे.”

याचा सिद्धार्थ गौतमावर मोठा परिणाम झाला. त्याने सर्वांचा निरोप घेतला आणि पित्याच्या वात्सल्य दृष्टीने राहुलकडे पाहिले आणि तो निघून गेला.

त्याने कपिलवस्तू सोडले आणि तो अनोमा नदीच्या दिशेने जाऊ लागला. परिव्रज्या ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय एकोणतीस वर्षांचे होते.

कपिलवस्तू सोडल्यावर मगध देशाची राजधानी राजगृह येथे जाण्याचा सिद्धाथनि विचार केला. हा सगळा प्रवास ४०० मैलांचा होता. गौतम राजगृहात असताना तेथे आणखी पाच परिव्राजक आले. हे पाच परिव्राजक म्हणजे कौण्डिण्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्रिक होत. गौतमाचे रूप पाहून ते देखील थक्क झाले.

गौतमाने नव्या प्रकाशाच्या शोधात भृगूऋषीच्या आश्रमात प्रवेश घेतला. आलारकालाम यांची भेट घेतली. तिथे सांख्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास वैशाली येथील आश्रमात केला. आलारकलामांनी त्यास ध्यान मार्गाचे शिक्षण दिले. त्यानंतर ध्यानमार्गाची सर्वोच्च पायरी शिकण्यासाठी तो रामपुत्ताच्या आश्रमात गेला. श्वासोच्छवास थांबवून चित्ताची एकाग्रता साधण्याची दुःखदायक प्रक्रिया आत्मसात करण्यात सिद्धार्थ यशस्वी झाला.

त्यानंतर गौतम वैराग्यमार्गाचा अभ्यास करण्यासाठी गया नगरीत गेला. गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेश यांचे स्वरूप अतिशय उग्र होते. अशाप्रकारची त्याची तपश्चर्या आणि आत्मक्लेश सहा वर्षेपर्यंत चालले होते. त्याचे शरीर क्षीण झाले होते. तरी त्याला नवीन प्रकाश दिसत नव्हता. शेवटी तो स्वतःशीच विचार करू लागला, ‘हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही.’

खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्यप्रकारे लाभते, हा विचार सिद्धार्थाच्या मनात आला. त्याने सुजाताचे अन्न ग्रहण केले, हे लक्षात येताच त्याचे सोबत असलेले पाच तपस्वी तिरस्काराने त्याला सोडून गेले.

अन्न ग्रहण करून ताजातवाना झाल्यानंतर गौतम आपल्या अनुभवाविषयी विचार करू लागला. पद्मासन घालून पाठ सरळ ठेवून तो पिंपळवृक्षाखाली बसला. ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने तो स्वतःशीच म्हणाला, “कातडी, स्नायू आणि हाडे हवी तितकी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्तमांस शुष्क झाले तरी चालेल परंतु पूर्ण ज्ञान प्राप्ती झाल्याशिवाय हे आसन मी सोडणार नाही.”

ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी गौतमाला चार आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. चार पायऱ्यांनी त्याने संपूर्ण ज्ञान प्राप्त करून घेतले. चवथ्या आठवड्याच्या शेवटी त्याचा मार्ग प्रकाशित झाला. त्याला स्पष्टपणे दिसून आले की जगात दोन समस्या आहेत. जगामध्ये दुःख आहे, ही पहिली समस्या आणि दुःख नाहीसे कसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे, ही दुसरी समस्या. या दोन्ही प्रश्नांचे बिनचूक उत्तर त्याला मिळाले, ते उत्तर म्हणजे सम्यक् संबोधी. हीच खरी ज्ञानप्राप्ती होय. हा दिवस वैशाख पौर्णिमेचा होता.

४) सिद्धार्थ गौतमाचे महापरिनिब्बाण

परिजिण्णमिदं रूपं, रोगनिळं पभड़गुरं।

भिज्जती पूतिसन्देहो, मरणन्तंहि जीवितं ।। ( धम्मपदं : १४८ )

(हे शरीर जीर्ण-शीर्ण झाले आहे, हे रोगाचे घर आहे. ते क्षणभंगुर आहे. सडून भग्न होणारे आहे; सर्व जीवितांना मरण असतेच.)

ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्त्व होता. ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले.

बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाला दहा जीवन अवस्थांमधून जावे लागते. त्या अवस्था

आहेत मुदिता, विमलता, प्रभाकारी, अर्चिष्मती, सुदुर्जया, अभिमुखी, दुरंगमा, अचल, साधूमति, धम्ममेघ.”

बुद्ध झाल्यानंतर ते सारनाथ येथे आले. त्यांनी प्रथम पाच परिव्राजकांना विशुद्ध मार्गाचे पहिले प्रवचन दिले. त्यानंतर ते आयुष्यभर धम्माचा उपदेश देत राहिले.

आपल्या अंतिम प्रवासास निघण्यापूर्वी भगवान बुद्ध राजगृही गृध्रकूट पर्वतावर राहात होते. त्यानंतर ते अम्बलठ्ठिका, नालंदा, वैशाली, भण्डग्राम, पावा असा प्रवास करीत निघाले.

भगवान बुद्ध पावा येथे आले असून ते आपल्या आम्रवनात उतरले आहेत, असे चुन्दाने ऐकले. चुन्दाने दिलेले भोजनाचे निमंत्रण बुद्धांनी स्वीकारले.

दुसऱ्या दिवशी चुन्दाने आपल्या घरी खीर वगैरे मिष्टान्नाबरोबर ‘सुकरमद्दवा’ची सिद्धता केली. चुन्दाने सिद्ध केलेले भोजन भगवंताला मानवले नाही. त्यांना घोर आजार जडला. त्यानंतर भगवान आनंदाला म्हणाले, “चला, आपण कुशिनाराला जाऊ.”

कुशिनारा येथे आगमन होताच भगवंत थोडासा रस्ता चालून गेले. तेव्हा भगवंत आनंदाला म्हणाले, “आनंदा, वस्त्राची घडी करून माझ्याकरिता बिछाईत कर. मी थकलो आहे, काही काळ मला विश्रांतीची गरज आहे.”

तिथे आसनस्थ झाल्यावर आनंदाने भगवंतासाठी जलाशयाचे पाणी आणले.

ते प्राशन करून ते बिछान्यावर पहुडले. त्यासमयी सुभद्र नावाचा परिव्राजक कुशिनारा येथे राहात होता. सुभद्र परिव्राजकाच्या कानावर लोकवार्ता पडली की, ‘आजच्या रात्रीच्या अखेरच्या प्रहरी गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण होणार आहे.’ तेव्हा सुभद्राच्या विनंतीनुसार बुद्धाने स्वतः सुभद्राला दीक्षा दिली. तोच अखेरचा श्रावक ठरला.

त्यानंतर भगवान बुद्ध आनन्दाला म्हणाले, “आनंदा, कदाचित तू असे म्हणशील, गुरूची वाणी आता लोपली. आता आम्हाला कोणी गुरू उरला नाही. पण आनंद तुला असे वाटता कामा नये. जो धम्म मी शिकवला, सांगितला आहे, तोच माझ्या पश्चात तुमचा गुरू!”

तथागतांनी असे सांगितल्यावर स्थविर आनंद म्हणाला, “भगवान! आपण बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, जगाच्या अनुकंपेसाठी तसेच देव व मानवांच्या कल्याणासाठी कल्पांतापर्यंत राहण्याची कृपा करावी.’

यावर तथागत म्हणाले, “बस्स, बस्स, आनंद! तथागतांची अधिक विनवणी करू नकोस, अशी विनंती करण्याचा समय निघून गेला. ”

त्यानंतर स्थविर अनुरुद्ध व स्थविर आनंद ह्या उभयतांनी धार्मिक चर्चेत रात्र व्यतीत केली. रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात तथागतांना महापरिनिब्बाण प्राप्त झाले. त्या दिवशी वैशाखी पौर्णिमा होती. इ.स. पूर्व ४८३ मध्ये ही घटना घडली. १

वैशाखी पौर्णिमेला सिद्धार्थाचा जन्म, सिद्धार्थाचा विवाह, सिद्धार्थाची ज्ञानप्राप्ती आणि सिद्धार्थाचे महापरिनिब्बाण ह्या घटना घडल्यात. या वैशाली पौर्णिमेला ‘बुद्धजयंती’ म्हणून संपूर्ण जगात साजरी केली जाते. वैशाखी पौर्णिमा सर्व पौर्णिमेत सर्वश्रेष्ठ मानली जाते.