डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये यूथ असेंब्लीच्या उद्घाटनप्रसंगी केलेले भाषण….
दिनांक २ मे १९५४ रोजी मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यूथ असेंब्लीचे उद्घाटन केले. त्याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये यूथ असेंब्लीचे उद्घाटन केले तेव्हा केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
मी गेली कित्येक वर्षे विद्यार्थी चळवळीचे निरीक्षण करीत आहे. परंतु केवळ शिक्षणाच्या प्रश्नांकडे किंवा विद्यार्थांच्या अडीअडचणींकडे विद्यार्थ्यांच्या एकाही परिषदेने लक्ष दिलेले मला दिसले नाही. विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या संस्था, निरनिराळ्या राजकीय पक्षाच्या चाकाला बांधलेल्या असतात. एवढेच नव्हे, तर काही विद्यार्थी संघटना कम्युनिस्ट राष्ट्रांना तर काही संघटना लोकशाहीवादी राष्ट्रांना पाठिंबा देण्यासाठीच जन्माला आल्या आहेत असे मला वाटते. त्यामुळे शिक्षणाच्या प्रश्नाकडे लक्ष न देता केवळ वादाच्या नादाने भलतीकडेच त्या वहात जातात.
स्वातंत्र्य, समता व भ्रातृभाव यांच्या आपण खूप गप्पा मारतो. नव्हे, या त्रयीवर आपण व्याख्यानेही झोडू शकतो. परंतु या तिन्हीपैकी एकतरी आपल्या भारतीय समाजात बसत आहे की नाही याचा विचारही आपण करीत नाही. जणू काही तत्त्वांची आणि व्यवहारांची सांगड घालण्याची आपणावर काहीच जबाबदारी नसल्याचे वाटते !
भारतामध्ये बहुसंख्य जनता अज्ञान आणि भोळसर खुळ्या कल्पनेत गुरफटून गेली आहे. नव्हे, येथील समाज रचनाच खुळ्या कल्पनांना जन्म देते. म्हणून उपास-तापास, नवस-सायास, देव-देवऋषी करणे म्हणजे धर्मपालन करणे अशी लोकांची भावना झालेली आहे. या खुळ्या आणि धर्मभोळ्या जनतेची या कल्पनेतून सुटका करावयास पाहिजे. विद्यार्थ्यांनी चाळीचाळीत जाऊन जनतेचे अज्ञान आणि खुळ्या समजूती दूर केल्या पाहिजेत; तरच आपल्या शिक्षणाचा जनतेला काही तरी लाभ होईल. आपण आपल्या ज्ञानाचा केवळ परीक्षा पास करण्यासाठीच उपयोग करून चालणार नाही. ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या बांधवांची सुधारणा, प्रगती करण्याकरिता केला पाहिजे. तरच भारत उन्नतावस्थेला जाईल.
जगातील अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सुटलेले नाहीत. ते सोडविण्याचा मानव सारखा प्रयत्न करीत आहे. त्यासाठीच निरनिराळे सिद्धांत पुढे मांडण्यात येतात. कार्लमार्क्स आज आपणापुढे खरा प्रश्न आहे. आजचे प्रश्न सोडविण्यास मार्क्सच्या विचारसरणीऐवजी दुसरी एखादी प्रभावी विचारसरणी उपयोगी पडेल काय ? हाच आजच्या काळाचा प्रश्न आहे. आपले सारे प्रश्न सोडविण्यास कार्लमार्क्सचे सिद्धांत समर्थ ठरतील की नाही हीच आजची समस्या आहे. ही समस्या आजच्या पिढीने शक्य तितक्या लवकर सोडविली पाहिजे.
या देशात बहुसंख्य लोक अज्ञानात आणि दारिद्र्यात आहेत. वरिष्ठ वर्ग या लोकांची सारखी पिळवणूक करीत आहे. म्हणूनच मी सांगू इच्छितो की, वरिष्ठ वर्गानी वेळीच जागे होऊन बहुसंख्य पददलित लोकांच्या आशा-आकांक्षा, भावना विचारात घेतल्या पाहिजेत. त्यांनी वेळीच आपले वर्तन सुधारले नाही तर त्यांचा संपूर्ण निःपात होण्यास फार वेळ लागणार नाही!
🔹🔹🔹
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर