July 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

आपण सात कोटी अस्पृश्य एकाच वेळी धर्मांतर करू – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

१ मे १९३६ रोजी वर्धा येथे कार्यकर्त्यांना धर्मांतराबद्दलच्या चर्चेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले मार्गदर्शन….

दिनांक १ मे १९३६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वर्धा येथे आले असता तेथील अस्पृश्य समाजाने मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत केले. तसेच सेठ जमनालाल बजाज व महात्मा गांधी यांनी सेठ वालचंद हिराचंद यांच्यासह डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली. त्याचप्रमाणे त्यांनी नालवाडीस भेट दिली. निर्भय तरुण संघाने त्यांच्या वर्धा येथील मुक्कामात चांगला बंदोबस्त ठेवला होता. म. गांधींच्या भेटीसाठी ते शेगाव ( बहुतेक वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामसाठी शेगाव हा उल्लेख असावा. ) येथे गेले होते.

वर्ध्याच्या या भेटीत अस्पृश्य समाजाचे कार्यकर्ते पुरुषोत्तम खापर्डे, शंकरराव सोनवणे, गोमाजी टेंभरे यांच्याशी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराबद्दल चर्चा केली.

कार्यकर्त्यांशी केलेल्या या चर्चेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितले की,
” मुसलमानी अथवा ख्रिस्ती धर्माचा पुरस्कार करण्यास मी अजूनही कोणास सांगितले नाही. जे कोणी स्वतःच्या जबाबदारीवर मुसलमानी किंवा इतर धर्माचा पुरस्कार करीत असतील ते स्वतः फसतील. याचा जबाबदार मी नाही. मी धर्मांतराची घोषणा केली खरी. परंतु अमुकच धर्म स्वीकारा असे अजून स्पष्ट सांगितले नाही. तोपर्यंत सर्वांनी धर्मांतराचा प्रचार करीत असावे. पण कोणत्याही विशिष्ट धर्माची तरफदारी करू नये. जेव्हा मी सांगेन, तेव्हाच आपण सर्व ७ कोटी अस्पृश्य एकदम धर्मांतर करू. ”

त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इतर अस्पृश्य पुढाऱ्यांशी खाजगीत चर्चा केली.

***

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे