July 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

आपला उद्धार इतर करणार नाहीत त्यासाठी आपणच कंबर कसली पाहिजे – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

आपल्या समाजाच्या भवितव्याविषयीचे निवेदन करताना सामाजिक, धार्मिक आणि राजकीय अशा सार्वजनिक कार्याचा त्रोटक आढावा घेतांना दिनांक २६ एप्रिल १९४२ रोजी मुंबई येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….

मी सार्वजनिक कार्यामध्ये पदार्पण करून आज तेवीस वर्षे झाली आहेत. १९२० साली कोल्हापूर संस्थानात माणगाव मुक्कामी मी जाहीर सभेचा अध्यक्ष या नात्याने प्रथम भाषण केले. तेव्हापासून तो आतापर्यंत मी सार्वजनिक कार्य करीत आहे. *या तेवीस वर्षातील सार्वजनिक कार्याचा आढावा काढला तर त्या कार्याचे तीन भाग पडतील. सामाजिक, धार्मिक आणि राजकीय हे ते भाग होत.

१९२० सालापूर्वीची सामाजिक स्थिती आणि आजची आपली सामाजिक स्थिती यांचा विचार केल्यास आपण मोठी सामाजिक क्रांती घडवून आणली आहे, असे म्हणावयास कोणतीच हरकत नाही. पूर्वी सर्वजण मृतमांस खात होते. त्यात त्यांना काहीच कमीपणा वाटत नव्हता किंवा लाजही वाटत नव्हती. परंतु आज ? आपल्यातील सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो, पुरुष असो किंवा स्त्री असो, प्रत्येकाच्या मनावर आपण पूर्वी करीत होतो त्या गोष्टी निंद्य आहेत, असा ठसा बसला आहे. आपले खास हक्क वतन म्हणून आपण त्यापूर्वी जतन करीत होतो. परंतु त्या गोष्टी आता आपण वर्ज्य केल्या आहेत. जनावरे ओढण्याची पाळी आता ब्राह्मण, मराठ्यांवर आली आहे. हे मी काल्पनिक सांगत नसून सत्य ते सांगत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात महाड मुक्कामी कृष्णा नावाचा एक महार होता. तो तेथील कार्यकर्ता होता. महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रह चळवळीनंतर तेथील एका ब्राह्मणाची म्हैस मेली. ब्राह्मणाने कृष्णाला एकांतात नेऊन म्हैस ओढून नेण्याबद्दल विनविले. परंतु कृष्णा म्हणाला, ” तात्या हे कसे होईल ? ” तेव्हा निरूपायाने त्या ब्राह्मणानेच आपल्या मुलास मदतीस घेऊन ती म्हैस जवळच गावाबाहेर ओढून टाकली ! पण ती म्हैस कुजून, दुर्गंधी सुटली. ब्राह्मणाने पुनः कृष्णाची विनवणी करून अठरा रुपये देण्याचे आमिष दाखविले. परंतु कृष्णाने त्याला स्पष्ट नकार दिला. अर्थातच त्या ब्राह्मणाला स्वतःच ती म्हैस तशा स्थितीत ओढून गावापासून दूर तीन मैल अंतरावर नेऊन टाकावी लागली. या उदाहरणावरून, मी माणूस आहे, माझ्यात पुरुषार्थ आहे, ही जाणीव आपल्यातील प्रत्येकास झाली आहे हे दिसून येते. तेव्हा, ही एक सामाजिक क्रांती नव्हे काय ?

धार्मिकदृष्ट्या आपण जेवढी क्रान्ती केली आहे तेवढी क्रान्ती कोणत्याही अन्य समाजाने केलेली नाही, हे कोणालाही नाकारता येणार नाही. न्याय, नीती, समता, बंधुत्व यावर या हिंदू धर्मामध्ये भर नाही. मनुष्याला जाळणाऱ्या उपाधी मात्र भरपूर आहेत. धर्माच्या नावाखाली आपणाला जे विघातक ते आपण सर्व करीत होतो. परंतु आज धार्मिकदृष्ट्या आपण जितके उज्ज्वल दिसतो तितका दुसरा कोणताच हिंदू समाज दिसत नाही. मराठा, भंडारी या जातींमध्ये शिमग्यातील सोंगे-ढोंगे अद्याप सर्रास चालू आहेत. त्यात त्यांना आनंद आणि अभिमान वाटतो. पण आपण हे सर्व सोडून दिले आहे. आपण आता पूर्वीप्रमाणे भक्तिभावाने पोथ्या-पुराणे वाचीत नाही. आपल्यातील मंत्र-तंत्र, साधु-संत सर्व नामशेष झाले आहेत आणि त्यामुळे आपला समाज अगदी धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ दिसू लागला आहे.

राजकीय प्रगतीबद्दलही तोच प्रकार आहे. अत्यंत अल्प अशा काळामध्ये आपण राजकीय उन्नती करून घेतली आहे, तेवढी इतर कोणत्याही समाजाची झालेली नाही, हे प्रत्येकास मान्य करावे लागेल. सरकारी नोकऱ्या आणि म्युनिसीपालिट्या, डिस्ट्रिक्ट बोर्डस् इत्यादि स्थानिक स्वराज्य संस्था ही स्पृशांची कायमची खोती बनून गेली होती. आपण फक्त त्यांची गलिच्छ कामे करण्यासाठी होतो. आपला एकही अधिकारी नव्हता. पण आज अशी एकही स्थानिक स्वराज्य संस्था नाही की जीमध्ये आपले लोक नाहीत. ज्यांची सावली घेण्यात येत नव्हती, जे राजकारणात अनाधिकारी ठरले होते ते अस्पृश्य लोक ब्राह्मणांच्या मांडीला मांडी लावून आज देशाच्या कारभारात लक्ष पुरवीत आहेत.

हा सर्वसाधारण असा त्रोटक आढावा आहे. कित्येक लोक म्हणतात की डॉ. आंबेडकरांनी काही केलेले नाही ! आजच्याच एका साप्ताहिक वृत्तपत्रात माझ्यावर टीका आली आहे. मी, हिटलर आणि कर्वे असे आम्ही तिघेजण एकाच आठवड्यात जन्मलो. या आधारावरून सदर पत्रकाराने असा निष्कर्ष काढला आहे की हिटलरने कार्य केले, कर्व्यांनी कार्य केले, पण डॉ. आंबेडकरांनी मात्र काहीच केले नाही ! मी काही केले किंवा नाही, हे सांगण्याची मला जरुरी नाही. मला माझे पुढारीपण कोणापुढे मिरवावयाचे नाही. परंतु याबाबतीत एक गोष्ट स्पष्ट करणे जरूर आहे. माझ्याविषयी कोणी काहीही म्हणोत मला त्याची पर्वा नाही. परंतु आपण जी क्रांती केली आहे ती एक मोठी क्रांती आहे, हे आपण विसरता कामा नये.

ही पूर्वपीठिका मी आजच्या प्रसंगी का निवेदन केली ? मला तुम्हाला आज आपल्या समाजाच्या भवितव्याविषयी जे निवेदन करावयाचे आहे आणि ज्या निवेदनासाठी मी आजच्या प्रसंगी मुद्दाम हजर राहिलो आहे, ते सांगण्यापूर्वी आपल्या चळवळीचे आतापर्यंतचे स्वरूप नीट ध्यानात यावे म्हणून ही पूर्वपीठिका निवेदन केली. आपण आपल्या मुक्कामाच्या – ध्येयाच्या जवळ आलो आहोत, असे मला वाटत होते. एकेकाळी मला वाटत होते की, कालांतराने आपण स्पृश्य समाजात समरस होऊ. कालांतराने अशी स्थिती येईल की स्पृश्यास्पृशातील भेदभाव नष्ट होईल. नाशिक, महाड येथे जी चळवळ केली तिचा हाच मुख्य हेतू होता. सार्वजनिक स्थळांचा आणि पाणवठ्यांचा उपभोग आम्हाला पाहिजे या भावनेने उद्दीप्त होऊन आपण सत्याग्रह केले. पण हिंदू लोक आपणास समानतेने सामील करून घेण्यास सिद्ध होत नाहीत.

हे आम्हास स्वानुभवाने दिसून आले. म्हणून आम्ही आपली कार्याची दिशा बदललेली आहे, ही गोष्ट आपण आणि स्पृश्य हिंदुंनीही पूर्ण लक्षात ठेवावी, असे माझे सांगणे आहे.

जर हिंदू समाजात आम्हास समतेचे आणि ममतेचे स्थान नाही, तर आमचे राजकारण आम्ही आमच्याच हाती घेतले पाहिजे. दोन भावांचे भांडण झाले तर त्याचे विभक्तिकरण होते. तसे स्पृश्य हिंदुंचे आणि आमचे हक्कांबाबत विभक्तिकरण झाले पाहिजे. स्पृश्य आणि आपण यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची ऐक्यभावना उरलेली नाही. आपले उभयतांचे अशा प्रकारचे हक्कांबाबत विभक्तिकरण झाल्याखेरीज हे भांडण कदापि मिटणे शक्य नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. यात माझे कोणाशी वैयक्तिक वैर नाही. हे भांडण, एक भाऊ दुसऱ्या भावाच्या जुलूमाला कंटाळून विभक्त होऊ इच्छित असताना दुसरा भाऊ ते मान्य करीत नाही, अशा स्वरूपाचे आहे. परंतु याप्रसंगी मला स्पृश्य हिंदुंना जाहीरपणे असे निक्षून सांगावयाचे आहे की, आधी आमचा वाटा द्या. आमचा वाटा आम्हाला मिळाल्यास तुमचे स्वातंत्र्य मिळविण्याचे भांडण लढण्याची जबाबदारी मी घेतो. स्पृश्य हिंदुंप्रमाणेच हा देश त्वरित स्वतंत्र व्हावा, असे आमचे मत आहे. इतकेच नव्हे तर, इंग्रजांचे राज्य या देशात एक दिवसही राहू नये, या मताचा मी आहे. परंतु ज्या राज्यसत्तेवर आपल्या अखिल समाजाचे भवितव्य अवलंबून आहे त्या राज्यसत्तेचा हिस्सा देण्याचे हिंदुंनी नाकारले तर तो साध्य करण्यासाठी मी समर्थ आहे.

यापुढे आपल्या समाजाने अत्यंत सावध राहिले पाहिजे. क्रिप्सच्या वाटाघाटी अयशस्वी होऊन ते परत गेले. क्रिप्सची योजना फेटाळली गेली ही आपल्यावर अत्यंत मोठी कृपा झाली आहे. ही योजना पाहून इंग्रजांच्या प्रामाणिकपणाबद्दल मला अत्यंत आश्चर्य वाटले. घटना समितीची मागणी काँग्रेसने केली होती. तिला सर्व अल्पसंख्यांकांनी विरोध केला होता. त्याप्रमाणे सरकारनेही घटना समितीची काँग्रेसची मागणी अमान्य केली होती.

स्वयंनिर्णायक घटना समितीची योजना मान्य केली तर आपले हक्क ठरविण्याचा अधिकार सर्वस्वी स्पृश्यांच्या हाती जाईल. याप्रमाणे या घटना समितीच्या योजनेने आपल्या समाजाच्या भवितव्यावर मोठा घाला आला होता.

सरकारला वाटते की अस्पृश्य लोक गरीब, अल्पसंख्यांक दरिद्री आहेत. म्हणून आपले हक्क देण्याची त्यांना बुद्धी नाही. तेव्हा याउपर आपण योग्य तो धडा घेतला पाहिजे. आपले न्याय्य हक्क संपादन करण्याकरिता लढण्यास सिद्ध झाले पाहिजे. चारी दरवाजे बंद करून आपला कोंडमारा करण्याचा कोणी प्रयत्न केला तर कायदेशीर आणि बेकायदेशीर अशा दोन्ही मार्गांचा अवलंब करून आपण आपले अस्तित्व झगडून टिकविले पाहिजे. आपला उद्धार इतर करणार नाहीत त्यासाठी आपणच कंबर कसली पाहिजे. तरच काही तरी तरणोपाय आहे.

🔹🔹🔹

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे