July 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

कूपमंडूकपणाची वृत्ती सोडून सार्वजनिक कामाला पैसा द्या – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

अस्पृश्य समाजातर्फे कुर्ला, मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र अर्पण करून त्यांचा सत्कार केला. या सत्कार समारंभात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….

रावबहादुर एस्. के. बोले, एम.एल.सी., जे. पी. मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २२ एप्रिल १९३३ रोजी जी. आय. पी. रेल्वे पोर्टर चाळ, कुर्ला, मुंबई येथे रात्री साडेनऊ वाजता अस्पृश्य समाजातर्फे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र व ऐंशी रुपयांची थैली अर्पण करून त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आल्यानंतर समारंभापूर्वी कुर्ला स्टेशन पासून डॉ. आंबेडकर रोड, जुम्मा मस्जिद रोड, शिवाजी रोड या रस्त्यांवरून त्यांची मिरवणूक काढण्याचे ठरले होते व त्यासाठी तेथील अस्पृश्य जनतेने मोठ्या उत्साहाने तशी तयारी ठेवली होती. परंतु वेळेअभावी मिरवणुकीचा कार्यक्रम पार पाडता आला नाही, त्यामुळे लोकांची खूपच निराशा झाली. परंतु तरीही मुख्य कार्यक्रम अत्यंत उत्साहाने पार पडला.

सभेचे नियोजित अध्यक्ष रावबहादूर बोले हे रीतसर सभेच्या अध्यक्षपदी स्थानापन्न झाल्यावर रा. कर्डक यांनी मानपत्र वाचून दाखविले व अध्यक्षांच्या हस्ते मानपत्र व ८० रुपयांची थैली डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली. तसेच विविध संस्था आणि व्यक्तींच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हारतुरे घालून गौरव केला गेला. त्यानंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर बोलावयास उभे राहिले.

या सत्कार समारंभात बोलतांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
जमलेल्या समुदायाकडे पाहून मला पाच-सात वर्षापूर्वी घडलेल्या एका प्रसंगाची आठवण होते. कुर्ल्यात येण्याची ही माझी दुसरी वेळ होय.

पाच-सात वर्षांपूर्वी मी अध्यक्ष व्हावे असे आमंत्रण येथील लोकांनी मला दिले होते. ते दिवस पावसाचे असूनही मी ठरलेल्या वेळी आलो होतो. परंतु आश्चर्य हे की, सभेच्या ठिकाणी कोणीच नव्हते. मला त्याचे अत्यंत मोठे आश्चर्य वाटले. प्रत्येक ठिकाणी माझ्या सभेला असंख्य लोक जमत असून येथे असे का झाले याची चौकशी केल्यावर मला समजले की, त्या सभेचे हॅन्डबिल फक्त नाशिक जिल्ह्याच्या लोकांनीच काढले होते. त्यावर नगर, सातारा इत्यादी जिल्ह्यांच्या लोकांची नावे नव्हती म्हणून असे झाले. ज्या वेळेस या समारंभाचे आमंत्रण देण्यास येथील लोक आले त्यावेळेस मी त्यांना सांगितले की, सर्व लोकांतर्फे कार्यक्रम होत असेल तर मी येतो. त्यांनी ते कबूल केले व त्याचप्रमाणे घडवून आणिले, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करितो. सर्वांनी जुटीने वागणे अत्यंत जरूर आहे. एकाचे दुःख ते सर्वांचे दुःख अशी वृत्ती सर्वांनी ठेविली पाहिजे. आपल्यापुरते पाहण्याची व कूपमंडूकपणाची वृत्ती सोडून द्या. तुम्ही सर्व एक झाल्याबद्दल मला आनंद होत आहे. मानपत्र अर्पण करून तुम्ही जो माझा गौरव केला आहे त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.

थैलीत दिलेले हे पैसे मी माझ्या प्रपंचाला लावणार नाही. यापूर्वी पुष्कळ पैसे मला मिळालेले आहेत. परंतु त्यापैकी एक पैही मी माझ्यासाठी घेतली नाही. हे सर्व पैसे मी सार्वजनिक कामाला लाविले आहे व तुम्ही आज दिलेले पैसेही मी सार्वजनिक कार्याला देणार आहे. या ठिकाणी जमलेले लोक पाच-सहा हजार तरी होतील. एवढ्या लोकसमुदायाकडून फक्त ८० रुपयेच सार्वजनिक कार्याला मिळतात, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आता त्याबद्दल काही करता येणार नाही. परंतु पुढे केव्हा तरी याची भरपाई होईल, अशी मला आशा आहे. सार्वजनिक काम पैशाशिवाय होत नाही. काम करणाऱ्याला वेतन देणे जरूर आहे. काही माणसे सार्वजनिक काम फुकट करतात. परंतु सर्वच लोक फुकट काम करणे शक्य नाही. आपल्या ‘ जनता ‘ पत्रामध्ये ५-६ माणसे लिहिण्याचे काम करतात. इतर ठिकाणी अशा कामाबद्दल दरमहा १००-२०० रु. द्यावे लागतात. परंतु पाच-सात वर्षांपासून हे लोक मोबदला न घेता अग्रलेख वगैरे लिहिण्याचे काम करतात. तीच गोष्ट ‘ भारत भूषण ‘ प्रेसची. या छापखान्यात व्यवस्थापक वगैरे जी मंडळी आहेत त्यांना कमीत कमी पगार दिला जातो. हे लोक स्वार्थत्याग करणारे आहेत म्हणून ठीक आहे. परंतु नेहमीच असे चालणे शक्य नाही. म्हणून तुम्ही पैसे दिले पाहिजेत.                                                                                                                                                                                                                                                                                                                  🔹🔹🔹

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे