July 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

आपला देश दोन राष्ट्रात विभागला आहे. एक वरच्या लोकांचे, दुसरे खालच्या लोकांचे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भंडारा येथे निवडणूक प्रचार दौऱ्यात दिनांक २१ एप्रिल १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण…

भंडारा संसद पोटनिवडणुकीत चार उमेदवार उभे होते. चारही उमेदवारांचा निवडणूक प्रचार या भागात अगदी शिगेला पोहोचला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूरहून निवडणूक प्रचारासाठी दिनांक २१ एप्रिल १९५४ रोजी भंडारा येथे आले. या प्रचार सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घेण्यासाठी व त्यांचे भाषण ऐकण्यासाठी वीस-वीस, पंचवीस-पंचवीस कोसावरून हजारो स्त्री-पुरुष भंडाऱ्यात आले होते.

नव्या तलावाशेजारी विस्तीर्ण मैदानावर प्रशस्त व्यासपीठ व शामियाना उभारण्यात आला होता. सायंकाळी सात वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभास्थानी येताच त्यांच्या स्वागतासाठी आतुर झालेल्या हजारोंच्या जनसमुदायाच्या “आंबेडकर जिंदाबाद “, “आंबेडकर कोण आहेत ? आमचा राजा आहे. ” अशा घोषणांनी सारे वातावरण दुमदुमले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सविता (माईसाहेब) आंबेडकर
तसेच शे. का. फे. चे सरचिटणीस श्री. राजभोज, श्री. कांबळे, श्री. गायकवाड आदी मंडळी व्यासपीठावर चढली.
व्यासपीठावर भूतपूर्व म. प्र. शे. का. फे. चे अध्यक्ष श्री. दशरथ पाटील, बॅरिस्टर खोब्रागडे, श्री. आवळे, श्री. ना. ह. कुंभारे, श्री. भाऊसाहेब दलाल, श्री. निनावे वकील आदी मंडळीही होती.

व्यासपीठावरून समोरच्या जनसमुदायाकडे पाहाताच कोणालाही पं. नेहरू यांच्या सभेला लोटणाऱ्या गर्दीची सहज आठवण होई. या सभेला कमीत कमी दोन लाख लोक मोठ्या उत्साहाने हजर झाले होते. भंडाऱ्यात एवढी प्रचंड जाहीर सभा कधीच झाली नव्हती. सभेच्या सुरुवातीला भजनाचा कार्यक्रम झाला आणि हा कार्यक्रम चालू असतानाच बाबासाहेबांना अनेक संस्थांकडून आणि व्यक्तींकडून हार अर्पण करण्यात येत होते. हार समर्पणानंतर बाबासाहेबांना सुयश चिंतणारे आणि त्यांना निवडून आणण्याचे आश्वासन देणारे एक सुंदर गाणे खड्या आवाजात गायले गेले.

तसेच या सभेत डाॅ. बाबासाहेबांविषयी आपला आदर आणि भक्ती व्यक्त करण्यासाठी कारंजाचे श्री. महादेव बोरकर यांनी ५०१ रुपये व श्री. चंद्रभान श्यामकुवर यांनी १०१ रुपये बाबासाहेबांना अर्पण केले.

सभेच्या सुरुवातीला नागपूर प्र. शे. का. फे. चे अध्यक्ष बॅ. खोब्रागडे यांनी प्रास्ताविक भाषण करून पोटनिवडणुकीची पार्श्वभूमी थोडक्यात सांगितली.

त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलण्यासाठी उभे राहिले आणि त्या दोन लाखांच्या जनसमुदायाने पुन्हा एकदा उच्चरवाने बाबासाहेबांचा जयजयकार केला. जवळपास दीड तास बाबासाहेबांचे भाषण झाले.

या निवडणूक प्रचार सभेच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
जी दोन माणसे संसदेत पाठवायची आहेत त्यापैकी मी एक उमेदवार म्हणून उभा आहे. मला निवडणुकीत उभे रहाण्याची आवश्यकता नाही कारण मी वरच्या राज्यसभेचा सभासद आहे. पण खेदाची गोष्ट अशी की, या वरिष्ठ सभागृहात काहीही काम होत नाही, असे मी पाहिले आहे. मध्यवर्ती सरकारला वरिष्ठ राज्यसभेची बैठक वारंवार भरवून देशहिताचे कार्य तिच्याकडून करून घेण्याची इच्छा नाही म्हणून मी शेवटी संसद निवडणुकीत उभे राहावयाचे ठरविले.

दोन जागांसाठी चार उमेदवार उभे असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. कोणाला मत द्यावे, हे निश्चितपणे लोकांना सांगण्यासाठी मी हा दौरा सुरू केला आहे. मला प्रकृतीच्या कारणास्तव सर्वच ठिकाणी जाता येणे शक्य नसल्याने दोन-चार प्रमुख ठिकाणीच जाणार आहे. पण आज येथे काही कारणांमुळे उपस्थित नसलेल्यांना माझे विचार तुम्ही पोचवाल अशी आशा आहे.

संसदेतील ५०० पैकी सुमारे ४०० सदस्य कॉंग्रेसचे आहेत. अशी स्थिती असूनही हरेक मतदान क्षेत्रात कोणी उमेदवार उभा राहिला की, त्याला विरोध करणे हे लोकशाहीला लज्जास्पद आहे आणि ही झुंज ते लढवितात ते मारवाड्यांच्या पैशाच्या जोरावर. काँग्रेसने दोन उमेदवार उभे केले आहेत. त्यांचा हेतू काय ? तर काँग्रेसवाले सांगतात की, पंडित नेहरू यांचे हात बळकट करण्यासाठी या दोघांना संसदेत पाठवा. पण तसा पाठिंबा देण्याच्या लायकीचे पं. नेहरू आहेत काय ? याचा विचार अवश्य करावा लागेल.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सात वर्षाची मुदत मिळाली. त्या मुदतीत कर्तबगार पुरुष अस्मान खाली आणू शकेल. पण पं. नेहरू यांनी काय केले ? आम्ही ब्रिटिशांच्या राजवटीत स्वातंत्र्य का मागितले ? जे अनेक प्रश्न ब्रिटिश राजवटीत उत्पन्न झाले, त्यांची सोडवणूक आम्ही करू असे हे नेते त्यावेळी म्हणत. सध्याचा मुख्य प्रश्न विषमता हा आहे पण त्याविषयी कोणी बोलतच नाही. तसे पाहिले तर आपला देश दोन राष्ट्रात विभागला गेला आहे. एक राष्ट्र वरच्या लोकांचे आणि दुसरे खालच्या लोकांचे. सर्व मंत्री वरच्या वर्गाचेच, एखादा अपवाद सोडून. सामान्य माणसांना त्या स्वातंत्र्याचा यत्किंचितही फायदा मिळालेला नाही.

गेल्या वर्षी प॔. नेहरू यांनी एका सभेचे उद्घाटन करताना सांगितले की, माझ्या दृष्टीने अस्पृश्यता हा सामाजिक प्रश्नच नाही. ते कामगार आहेत आणि इतर कामगारांबरोबर त्यांचेही प्रश्न सुटतील. गांधी लाजेकाजेस्तव का होईना, अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक आहे व तो धुवून टाकावा असे म्हणत. तेवढेसुद्धा हा माणूस म्हणत नाही.

सर्वोदय म्हणजे मला ढोंग वाटते. एक माणूस कसा सर्वोदय करू शकेल हे कळत नाही. व्यवहारात ” मात्स्य न्याय ” आहे. सर्वांचेच हित पाहिले पाहिजे, या म्हणण्यावर तुमचा विश्वास बसतो काय ? सर्वोदयाच्या अनुषंगाने मला विश्वामित्राची आठवण येते. विश्वामित्राने ब्रह्मदेवाशी स्पर्धा करून प्रतिसृष्टी निर्माण केली. तिचे वर्णन करताना मुक्तेश्वराने सांगितले आहे की, या विश्वामित्राच्या सृष्टीत जन्मजात हाडवैरी असलेले मुंगुस आणि साप प्रेमाने क्रीडा करीत होते, उदीर मांजरीचे दूध पीत होते व सिंह आणि हत्ती परस्पर प्रेमाने नांदत होते. वास्तविक हे असे घडणे शक्य नाही. पण कवी मुक्तेश्वराने पुढे सांगितले आहे की, हे सर्व कपटजाल होते. सर्वोदय मजुरांबरोबर श्रीमंतांचे हित पाहाणार असेल, त्यांना प्रेमाने एकत्र नांदवू इच्छित असेल तर ते कपटजाल आहे असेच म्हणावे लागेल.

लाचलुचपत का होते याचे कारण हे आहे की, पंडित नेहरू यांच्या अंगी ताकद नाही. स्वतः पंडित नेहरू प्रामाणिक आहेत. त्यांच्याविषयी मला काही म्हणावयाचे नाही. पण त्यांचा दोष एकच की त्यांनी एखाद्याला मित्र म्हटले की, ते त्याला कायमचा आश्रय देतात. मेनन यांचे जीप प्रकरण तर प्रसिद्धच आहे. मी मंत्रीमंडळात असताना पंडित नेहरू यांना सांगितले होते की , हे इतके जागोजाग वकील का नेमता ? बेधडकपणे ८ कोटी रुपये दरसाल या वकिलातीवर खर्च करण्यात येतात. तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगतो की, अमेरिका व कॅनडा येथील सरकारांनी, ” तुमच्या वकिलांना परत बोलवा ” अशी मागणी केली. तुर्कस्तान मधील वकिलाने अन्न खरेदीत गोंधळ घातला. परदेशात ज्या माणसांनी आपले आणि देशाचे नाव बद्दू केले त्यांना इकडे आल्यावर काय शिक्षा मिळते ? अशा एका माणसाला तो भारतात आल्यावर गुन्हेगार करण्यात आले आणि नंतर पुन्हा वकील म्हणून परदेशी पाठविण्यात आले. पंडित नेहरू हे गाजरपारखी आहेत. आपल्या आवडीची माणसे आणि देशाचे हित यात काहीच फरक नाही का ? पण पं. नेहरू यांना हा फरक कळत नाही आणि अशा माणसाला पाठिंबा द्यायचा काय ?

पंडितजीचे पूर्वज ३०० वर्षापूर्वी भारतात आले. पण आजही त्यांना वाटते की, मी प्रथम काश्मिरी आहे आणि नंतर भारतीय आहे. तेव्हा मला आश्चर्य वाटते की, जो माणूस स्वतःला अभिमानाने प्रथम हिंदी म्हणवून घेत नाही, त्याला भारताचा पंतप्रधान होण्याचा काय हक्क ?

काश्मीरसाठी माझ्या भारताचे रक्तशोषण किती करावे याचा विचार ते करीत नाहीत. काश्मीरच्या राजाला एकूण ९ लाख रुपये वार्षिक तनखा आहे. पण त्यापैकी काश्मीर सरकार फक्त ३ लाख रूपये देते आणि बाकीचे ६ लाख भारत सरकार या देशातील जनेतवर कर बसवून मिळालेल्या पैशातून देते. मी निवडून गेलो तर मी त्यांना हे विचारणार आहे की, गेल्या सात वर्षात काश्मीरमधील आपल्या सैन्यावर किती रुपये खर्च झाले आहेत ? त्यांनी हे मुद्दाम गुप्त ठेवले आहे. माझ्या मते हा खर्च २०० कोटींवर गेला असावा. पण इकडे भारताची प्रजा उपाशी मरत असताना एवढा खर्च कसा करावा असा विचार पं. नेहरू यांना कधी सुचत नाही.

पं. नेहरू हे दुसऱ्या कोणी सुचविलेली चांगली गोष्ट घेण्यास तयार नाहीत आणि स्वतः काही नवीन सुचवावयास त्यांची बुद्धी नाही.

हल्ली लोक जसे सिनेमा स्टारचे वेडे होतात, तसे पं. नेहरूंसाठी वेडे झाले आहेत. पण सिनेमा स्टारच्या मागे लागून वेडा होणारा तरुण आपल्या आवडीच्या नटीचा सिनेमा पाहून घरी आल्यावर बायकोवर प्रेम करतो आणि सुखी होतो. पण पं. नेहरू यांच्याबाबतीत असे घडत नाही. ते सर्वजण पं. नेहरू यांनाच चिकटून बसतात.

महाभारतात सांगितले आहे की, द्रोण आणि भीष्म पांडवांची बाजू खरी आहे असे म्हणत. पण ऐन लढाईच्या वेळी मात्र ते कौरवांच्या बाजूने लढले. लोकांनी प्रश्न विचारला तेव्हा भीष्मानी सरळ सांगितले की, ” अर्थस्य पुरुषो दासः ” आज काँग्रेसला श्रीमंत मारवाडी लोक सढळ हाताने पैसा पुरवित आहेत. याचा परिणाम काय होईल ते तुम्ही जाणताच. ” अर्थस्य पुरुषो दासः ” हे सूत्र येथेही लागू पडतेच.

पार्लमेंटमधील किती काँग्रेस सभासद किती भाषणे करतात हे त्यांना विचारा. बोरकर येथे असते तर मी त्यांना विचारले असते की, तुम्ही काय करणार आहात ? ते काय करू शकतात ? त्यांना कायद्याचे ज्ञान आहे का ? भत्त्याचे ३० रुपये मिळवण्यासाठी ते जात आहेत, या पलिकडे काय ? पार्लमेंटच्या कामाला पुनमचंदजी कितपत लायक आहेत हे मला माहीत नाही. लोकांचा आपल्यावर विश्वास आहे असे काँग्रेसला वाटते. पण वाटेल त्या माणसाला आमच्या नावावर मते द्या असे त्या विश्वासाचा दुरुपयोग करणे म्हणजे विश्वासघात नव्हे काय ? काँग्रेसचे लोक इतके निर्लज्ज बनले आहेत, धिक्कार असो त्या काँग्रेसच्या लोकांचा. ” चोरांपासून सावध राहा ” अशा पाट्या आपण नेहमी वाचतो. मी तुम्हाला सांगतो की, काँग्रेसपासून सावध राहा, कारण ती चोर आहे.

माझा सर्व विश्वास अस्पृश्य वर्गाच्या मतदारांवर आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या लाचलुचपतीला बळी पडता कामा नये. मत ही एक अमोल चीज माना. आप ” गिरी हुयी ” जात का ? लक्षात घ्या की, आपल्याला काही अधिकार नाही, ब्राह्मणांचे धार्मिक सामर्थ्यही आपल्याला नाही, सामाजिक सामर्थ्यही नाही म्हणून आपल्यासाठी मत ही राजकीय क्षेत्रातील एक अमोलिक चीज आहे. ती विकता कामा नये. आपण अल्पसंख्यांक आहोत. तेव्हा आपण एकेक दाणा निवडून भरला तरच पोते भरेल. ज्याला ज्याला मतदानाचा अधिकार आहे, त्याने अवश्य मतदान केले पाहिजे, तरच मी विजयी होईन.

मी राखीव जागेसाठी उभा आहे. पण ज्या स्पृश्यांना माझे धोरण केवळ अस्पृश्यांपुरतेच मर्यादित नसून, माझा दृष्टिकोन देशव्यापी आहे, असे वाटते, त्यांनीही मला मते द्यावीत. मी हे त्यांना सांगितले पाहिजे असे नाही.

दुसऱ्या मताचे काय करणार, असा प्रश्न विचारण्यात येतो. त्याचा खुलासा करणे अवश्य आहे. आम्ही काँग्रेसचा विरोध करीत आहोत. तेव्हा काँग्रेसला उपयोगी पडेल असे काहीही करता कामा नये. बोरकर आणि मी दोघेही आपलेच म्हणून तुम्ही जर माझ्याबरोबर बोरकरला मत दिले, तर माझे डिपॉझिटही जप्त होईल. मी विजयी व्हावे असे वाटत असेल, तर तुम्ही बोरकरला मुळीच मत देता कामा नये. आता उरले दोघे जण, श्री. राका आणि श्री. मेहता.

मी समाजवादी पक्षावर नाराज आहे. त्याचा कारभार अनागोंदी आहे. मला अशी आशा होती की, ते इतर देशातल्याप्रमाणे तात्त्विक बैठकीवर आपली पक्ष संघटना उभी करून पुढे येतील. म्हणून मी त्यांना गेल्या निवडणुकीत मदत केली. पण आमचे त्यात फार मोठे नुकसान झाले आहे. आमच्या लोकांनी मते दिली म्हणूनच त्यांचे उमेदवार निवडून आले. पण त्याविषयी आभाराचा साधा शब्दही त्यांनी कधी बोलून दाखविला नाही. असे असल्यामुळे मला त्यांच्याविषयी खंतही नाही आणि आदरही नाही. त्रावणकोर-कोचीनमध्ये ते कम्युनिस्टांशी खांद्याला खांदा लावून लढले आणि निवडणुकीनंतर मात्र त्यांनी पगडी फिरवून ” तुमचा आमचा संबंध नाही ” असे सांगितले. त्यांना सगळी मंत्री पदाची घाई.

श्रीमती सुचेता कृपलानी यांनी मला पत्र पाठवून अशोकला पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. तसेच श्री. अशोक मेहतांचेही मला पत्र आले आहे म्हणून आणि श्री. अशोक हे श्री. राकांपेक्षा राजकारणात अधिक मुरलेले आणि अधिक विद्वान आहेत यासाठी त्यांना आपले दुसरे मत द्या. ते सोशॅलिस्ट पक्षाचे उमेदवार आहेत म्हणून नव्हे तर ते ” अशोक ” आहेत म्हणून तुम्ही त्यांना आपले दुसरे मत द्या.

काँग्रेसविरोधी उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्याल अशी मला आशा आहे.

🔹🔹🔹

यानंतर श्री. राजभोज यांनी आभार मानल्यानंतर ही प्रचंड सभा हळूहळू विसर्जन पावली.

” या सभेला अलोट जनसमुदाय लोटलेला होता. उन्हाळ्याच्या दिवसामुळे लोक तहानेने व्याकूळ झाले होते. हाॅटेलवर पाण्यासाठी होत असलेली गर्दी पाहून मालकाने एक ग्लास पाण्याची किंमत दोन आणे ठेवली. तरीही लोकांची गर्दी वाढतच होती. तसेच हॉटेलमधील खाद्यपदार्थ चुटकीसरशी संपले व त्यांची किंमतही होटेल मालकाला वाजवीपेक्षा जास्त मिळाली. ”
⚫⚫⚫

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे