July 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

आर्थिक लूट थांबविण्यासाठी राष्ट्रीय समाजवादाचा अवलंब करणे हा एकच मार्ग – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मुंबई येथे श्री. विष्णूपंत वेलणकर यांच्या सत्कार समारंभात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले समारोपाचे अध्यक्षीय भाषण ….

दिनांक १२ एप्रिल १९४७ रोजी मुंबई येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध संस्थांकडून श्री. विष्णुपंत वेलणकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

आपल्या या सत्कारप्रसंगी श्री. विष्णुपंत वेलणकर म्हणाले,
आज मुंबईत पाहिले तर महाराष्ट्रीय लोक म्हणजे कारकुनी करणारे तात्या व बोजा उठविणारे घाटीच आढळतात. ही दु:स्थिती घालविण्यासाठी महाराष्ट्राने पुढे आले पाहिजे. सर्व गोष्टी पैशाने होतात. महाराष्ट्राला मान नाही याचे कारण लाखालाखांचे चेक लिहिणारे लोक महाराष्ट्रात नाहीत. गांधींच्या चळवळी पैशावर आधारल्या आहेत. आपले लोक हजारोंनी फासावर गेले तरी सोन्याचा मुलामा नसला म्हणजे त्यांना तेज नाही. सर्व गोष्टी लक्ष्मीबाईच्या चमचमाटाने चालल्या आहेत. तेव्हा तरुणांनो ! लेखणीला व्यापाराची जोड द्या, पैसा मिळवा, शरीर कमवा म्हणजे राजकारणात यशस्वी व्हाल हाच माझा तुम्हाला संदेश आहे.

श्री. वेलणकर यांच्या भाषणानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समारोपाचे भाषण केले.

श्री. विष्णुपंत वेलणकर यांच्या सत्कार समारंभाच्या समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
विष्णूपंतांचा व माझा पूर्वपरिचय नाही, त्रोटक चरित्र नुकतेच वाचले त्यावरून मला दोन तीन गोष्टी बोधप्रद वाटल्या. पहिली महत्त्वाची गोष्ट, शिक्षणात विष्णुपंतांची गती नव्हती तरी ते निराश झाले नाहीत, तर त्यांनी दुसरे कार्यक्षेत्र निवडले, त्यात यश मिळविले ही होय. दुसरी गोष्ट म्हणजेच त्यांचे उद्योगधंद्यातील स्थान. पैसा नसेल तर व्यक्तीचे स्वातंत्र्य, समाजाचे स्वातंत्र्य व देशाचे स्वातंत्र्य ह्या शब्दांना काही अर्थ नाही. अमेरिका प्रबळ का ? पैशाच्या जोरावर आज इंग्लंड अमेरिकेच्या तालावर नाचताना दिसते आहे. का तर पैसा नाही. अमेरिकेजवळ तो मागावा लागतो.

श्री. विष्णुपंतांनी पैसा मिळविण्यास ब्रम्हचर्य लागते हे सांगितले ते मला पटत नाही. असे असते तर सारेच मारवाडी व गुजराती ब्रम्हचारी आहेत असे म्हणावे लागले असते ! एका हाताने ओकासा खात त्यात दुसऱ्या हाताने ते पैसा मिळविताना आढळतात ! त्यांना ना विद्या ना कला. पण आपले व आपल्या सात पिढ्यांचे कोटकल्याण व्हावे म्हणून ते अर्थ संचय करतात.

महाराष्ट्रीय लोक लहान उद्योगधंदे करून पुढे येतील हे अशक्य आहे. मोठे उद्योगधंदे त्यांना काढता येणार नाहीत. परप्रांतीयांनी व परकीयांनी चालविलेली लूट थांबविण्यासाठी राष्ट्रीय समाजवादाचा अवलंब करणे हा एकच मार्ग राष्ट्रासमोर आहे.

🔹🔹🔹

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे