July 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

तुम्हालाच तुमची जबाबदारी ओळखणे प्राप्त आहे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

नगर जिल्ह्यातर्फे मानपत्र अर्पण करून जाहीर सत्कार केल्याप्रसंगी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उत्तरादाखल केलेले भाषण….

नगर जिल्ह्यातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिनांक १२ एप्रिल १९३३ रोजी दामोदर हाॅल, परेल, मुंबई येथे मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

दिनांक १२ एप्रिल व १३ एप्रिल १९३३ रोजी परेल, मुंबई येथील दामोदर हॉलच्या पाठीमागील प्रांगणात नगर जिल्ह्यातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. सोळंकी साहेब यांना मानपत्रे अर्पण करण्याचा आणि प्रो. राव यांचा सन्मान करण्याचा समारंभ पार पडला.

पहिल्या दिवशी म्हणजेच दिनांक १२ एप्रिल १९३३ रोजी रा. आर. एच. आडांगळे यांनी अध्यक्षपदाची सूचना मांडली आणि त्या सूचनेला रा. सू. ता. रूपवते यांनी अनुमोदन दिल्यानंतर डॉ. सोळंकी साहेबांनी सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारले.

डॉ. सोळंकी साहेब आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले, डॉ. आंबेडकरांचा सन्मान करणे म्हणजे तुमचा आमचाच सन्मान करण्यासारखे आहे. यानंतर रा. रोहम यांनी मानपत्र वाचून दाखविल्यावर ते सुंदर रौप्य करंडकातून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण करण्यात आले.

मानपत्राचा स्वीकार केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
हा आजचा समारंभ नगर जिल्ह्यातील मंडळीकडून साजरा करण्यात येत आहे. त्यांच्याकरिता कोणतीही स्पेशल कामगिरी मी केली नसताना फक्त माझ्यावरील त्यांच्या प्रेमामुळेच हा समारंभ घडून येत आहे. याबद्दल या मंडळीचे मी आभार मानतो. नगर जिल्हा इतर जिल्ह्यांपेक्षा थोडा मागासलेला आहे. या जिल्ह्यातील सामाजिक परिस्थिती अडचणीची आहे हे मी जाणून आहे. या जिल्ह्यातील महार लोकांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केल्यामुळे दोन पंथ झाले आहेत. असे असता या जिल्ह्याकडे विशेष लक्ष पुरविणे मला शक्य झाले नाही, याबद्दल वाईट वाटते. मला नवीन असे काही सांगण्यासारखे राहिलेले नाही. तरीपण या खुर्चीवर बसल्यापासून माझ्या मनात खेदाचे प्रकार घुटमळू लागले आहेत. जमलेल्या लोकांना असे वाटत असेल की, आपण पुढारी झालो असतो तर किती चांगले झाले असते ! डॉ. आंबेडकरांचे नाव बऱ्या-वाईट प्रकारे वर्तमानपत्रातून वाचावयास मिळते, तसे आपले झाले असते. माझी स्वतःची अशी प्रबळ इच्छा आहे की, माझ्या स्थानी दुसरा कोणी येईल तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. माझ्या गळ्यात हार घालणाऱ्याला आनंद झाला असेल, परंतु त्याच्या उलट माझी स्थिती झाली आहे. तुम्ही माझी जी स्तुती केली आहे त्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. तुम्ही माझ्यापासून काही तरी कार्याची अपेक्षा करीत असता. मला पुष्कळ वेळा वाटते की समाजाची जबाबदारी न घेता मी एकटा राहिलो असतो तर दैववान झालो असतो. माझे सर्व आयुष्य विद्यार्थीदशेत जावे अशी माझी इच्छा होती. म्हणून जिभेला टाचा मारूनसुद्धा मी अनेक पुस्तके खरेदी केली. एखादी प्रोफेसरची नोकरी पत्करून पुस्तके वाचण्यात सुखाने काळ काढावा अशी माझी पहिली इच्छा होती. परंतु सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा मला अस्पृश्यांच्या चळवळीत पडावे लागले. आता मात्र यातून पाय काढण्याची मला भीती वाटते. अस्पृश्य समाजाची जबाबदारी साधी – सोपी नाही. निव्वळ स्तुतीने किंवा सभेने फायदा होईल, असे मला वाटत नाही. तसे असते तर यापूर्वीच सर्वकाही झाले असते. रोज मजकडे २५-३० पत्रे येतात. ती वाचणाऱ्याला पाझर फुटल्याशिवाय राहणार नाही. त्या कामात नित्य लक्ष घालणारी माणसे पाहिजेत. तुमच्यात जी थोडी बहुत माणसे आहेत ती माझ्या दुर्गुणामुळे म्हणा किंवा तुमच्या दुर्दैवामुळे म्हणा माझ्याबरोबर काम करण्यास तयार नाहीत. नुसता कार्य करणाऱ्या माणसांचा अभाव आहे एवढेच नसून पैशाचीही टंचाई आहे. मजकडे जो येतो तो हात हालवीत येतो. न पैसा, न माणूस, न बुद्धिमत्ता असे असताना या समाजाचे काम करणे मोठे कठीण आहे. डाॅ. सोळंकीनी मला या कामातून मुक्त करावे. इतर समाजातील लोक चतुर्थाश्रमात वयाची ५० वर्षे उलटल्यानंतर समाजकार्यास आरंभ करतात. परंतु मला वयाच्या २५ व्या वर्षीच समाजकार्य सुरू करावे लागले. आता आपल्या समाजाला राजकीय सत्ता मिळालेली आहे. याउपर माझी समाजाला विशेष आवश्यकता आहे, असे वाटत नाही. शिकलेली माणसे तयार होत आहेत, अजून जरी आयुष्याची काही वर्षे माझ्या स्वाधीन होतील तर मला माझे व्यक्तिगत हित साधता येईल. तुम्ही स्वतःचे पायावर काम करा. ज्यांना माझे व डॉ. सोळंकींचे वैषम्य वाटत असेल त्यांनी आम्हास सुचवावे. आम्ही एका पायावर तयार आहोत. प्रत्यक्ष सर्व प्रकारची जबाबदारी यापुढे मी घेऊ इच्छित नाही. सार्वजनिक कार्याची साधनसामग्री तुम्ही तयार केली पाहिजे. काँग्रेसने आपल्या चळवळीसाठी आतापर्यंत २ कोटी रुपयांपेक्षाही जास्त खर्च केला असेल. मुसलमानांनी आपल्या चळवळीसाठी तितकाच किंवा त्यापेक्षाही जास्त खर्च केला असेल. आपल्या लोकांनी आपल्या चळवळीसाठी किती खर्च केला ? फार तर दोन-तीन हजार रुपये ! असला सवंग सौदा मला लाभला आहे. यापुढे मात्र तुम्हाला तुमची जबाबदारी ओळखणे प्राप्त आहे. माझे बरेच दिवसांचे हृद्गत स्पष्ट शब्दात सांगितले. ते ऐकून घेतल्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानून आपली रजा घेतो.

🔹🔹🔹

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे