दिनांक ८ एप्रिल १९३३ रोजी बहिष्कृत समाजातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मानपत्र देऊनू स्वागत केले. या स्वागत समारंभात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण……
दिनांक ८ एप्रिल १९३३ रोजी क्लार्क रोड, बी. आय. टी. चाळ, मुंबई येथे मे. सुभेदार वि. गं. सवादकर यांच्या अध्यक्षतेखाली बहिष्कृत समाजातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या समारंभाला इतकी गर्दी जमली होती की, चाळीतील कंपाऊंडमधील मैदान तुडूंब भरून जाऊन कंपाऊंडच्या बाहेरही लोकांची गर्दी झाली होती. स्वागत समारंभाच्या अध्यक्षस्थानी मे. सुभेदार वि. गं. सवादकर यांच्या नावाची सूचना रा. धोत्रे यांनी मांडली व त्या सूचनेला रा. तांबेशास्त्री यांनी अनुमोदन दिल्यावर मे. सुभेदार वि. गं. सवादकर यांनी अध्यक्षपदाचा स्वीकार केला. त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात, आपणास अध्यक्षस्थान दिल्याबद्दल लोकांचे आभार मानून सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजास सामाजिक व राजकीय हक्क मिळवून दिले आहेत त्याबद्दल त्यांना मानपत्र देणे योग्य आहे. परंतु मानपत्र देऊनच आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, तर त्यांनी आरंभिलेले कार्य व्यवस्थितशिर, योग्यरीतीने चालविणे हे आपले कर्तव्य आहे. विघ्नसंतोषी माणसे सर्व समाजात असतात तशी ती आपल्या समाजातही आहेत. तेव्हा अशा लोकांपासून आपण सावध राहिले पाहिजे. तसेच तालुका व जिल्हा संघ काढून आपण आपली संघटना केली पाहिजे इत्यादी.
अध्यक्षांच्या भाषणानंतर रा. आबाजी आनंदराव खरात यांनी मानपत्र वाचून दाखविले व सोनेरी फ्रेममध्ये मढवलेले ते मानपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अध्यक्षांच्या हस्ते देण्यात आले. मानपत्राबरोबरच एक रौप्यपात्रही अर्पण करण्यात आले. हारतुरे अर्पण केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण करावयास उभे राहिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सत्कार समारंभास उत्तर देताना म्हणाले,
सभाधिपती, प्रिय भगिनी व बंधूजनहो,
आज ह्या ठिकाणच्या रहिवाशांनी हा जो मानपत्राचा प्रसंग घडवून आणिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मी गेल्या जानेवारी महिन्यात (१९३२) विलायतेहून मुंबईस आल्यापासून मला मानपत्रे देण्याची एक मोठी साथच पसरली आहे. ही साथ बंद करावी, निदान तिला आळा घालावा असे माझ्या मनात आले होते. परंतु लोकांच्या उत्साहापुढे माझा नाईलाज आहे. आजचे मानपत्रसुद्धा त्याच मन:स्थितीत मी स्वीकारीत आहे.
या मानपत्राबद्दल मला असे सांगावयाचे आहे की, आत्तापर्यंत जी मानपत्रे मला दिली गेली त्यापेक्षा आजच्या मानपत्राचे वैशिष्ट्य आहे. या मानपत्राचा गाजावाजा विशेष झाला. अगोदर जी मानपत्रे दिली गेली ती दिली जाणार याबद्दल वर्तमानपत्री मुळीच गाजावाजा झाला नव्हता. परंतु या मानपत्राच्या अंतस्थ भानगडी ” लोकमान्य ” व ” प्रभात ” पत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या, म्हणून हे मानपत्र और परिस्थितीत दिले जात आहे असे मला वाटते. आता आम्ही इकडे येत असतांना सांगण्यात आले की, रस्त्यावर ‘ सवादकर बायकाॅट ‘ अशी पाटी लाविली आहे. (सभेत शेम शेमचा आवाज) तरी ती टाळण्याकरता आपण दुसऱ्या रस्त्याने जावे. परंतु मी सांगितले की, आपण पाटीच पाहून जाऊ. आम्ही ती आता पाहिली आहे. पाटी लावणारांना धीर न झाल्यामुळे त्यांनी माझा बायकाॅट केला नाही ! या चार चाळीत पुढाऱ्यांचे मोठे पेव आहे हे मी जाणून आहे. मुंबईत पुढारी शोधावयाचे झाल्यास त्यांनी या चौकात यावे. या पुढाऱ्यांनी आतापर्यंत काही ना काही खुसपट काढून चळवळीस अडथळा केला आहे. एकावेळी हे पुढारी असे म्हणत होते की, डॉ. आंबेडकर महाराला सोडून चांभारांना जवळ करतात व महार जातीचा घात करतात. परंतु असे म्हणणारे हे लोक देवरूखकरासारख्या सबंध महार जातीला शिव्या देणाऱ्या चांभारांबरोबर संगनमत करतात व अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात.
एकदा रा. शिवतरकर मास्तर यांनी आपल्या घरी सहभोजन करविले. त्या सहभोजनास मी स्वतः व काही महार पुढारी हजर होते. सहभोजनाला अनुसरून पुढे देवरूखकराने हॅन्डबिल काढले की, ‘ शिवतरकर महाराबरोबर जेवले सबब त्यांच्यावर बहिष्कार घालावा, कारण रा. शिवतरकरांनी महारासमवेत भोजन केले. ‘ सबंध महार जातीची त्यावेळेस देवरुखकराने अवहेलना केली होती. अशा प्रकारे अनेक वेळा ज्या माणसाने महार जातीची अब्रू लुटली त्याशी हे लोक कसे संगनमत करू शकतात ! या पुढाऱ्याचे दुसरे म्हणजे असे की, डॉ. आंबेडकर हे कोकणस्थ असून देशस्थांचा परामर्श घेतात व कोकणस्थांचा घेत नाहीत. देशस्थ व कोकणस्थ वाद इतका माजविला होता की, थोड्याच दिवसात आपापसात मारामारीचा प्रसंग आला असता. परंतु त्याच लोकांनी देशस्थांशी संगनमत करून ११९ पुढाऱ्यांची सभा भरविली. मग सुभेदार सवादकरालाच का खड्यासारखे वगळले ? ते समजत नाही, ते तर हाडामासाचे कोकणस्थच आहेत ना ? सांगावयाचे हे की, ह्या वादाला काही मूळ किंवा तत्त्व नाही. तत्वदृष्ट्या विरोध असला तर चालेल. परंतु तत्त्वाशिवाय विरोध असेल तर त्यात काही तरी आपमतलबीपणा असला पाहिजे यात शंका नाही. सर्व पुढाऱ्यांची एकी का करीत नाही असा एक प्रश्न आहे. पण जेथे व्यक्तीविशिष्ट भांडण आहे तिथे कोण काय करणार ? तत्वाचा प्रश्न असेल तर गोष्ट निराळी. म. गांधींनी मंदिर प्रवेशाबद्दल माझे मत विचारले असता मी सांगितले की, मंदीर प्रवेश मिळून जातिभेद मोडत असेल तर तो मला पाहिजे आहे. तसे होत नसेल तर मंदिर प्रवेशाची आम्हास जरूर नाही. या वादात तत्त्व आहे. या पुढार्यांच्या भांडणात असे काहीच नाही. असे जरी असले तरी मला आनंद होतो की, कोणीही तुमच्यात फाटाफूट करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही त्याला फसत नाही. स्वतःचे स्वातंत्र्य असण्यासाठी माणसाला नोकरी तरी पाहिजे किंवा वडिलोपार्जित इस्टेट तरी पाहिजे. तसे नसेल तर चोरी करून, भीक मागून किंवा दुसऱ्यांची हाजी हाजी करून पोट भरावे लागते. आपल्यात पुष्कळ लोक बेकार आहेत व इतर समाजाजवळ पुष्कळ पैसे आहेत. पुढच्या निवडणुकीच्या वेळेस असा प्रसंग येणार आहे की, इतर लोक पैसे देऊन आपल्या लोकांची मते विकत घेण्याचा प्रयत्न करतील व आपल्यातील बेकार व स्वाभिमानशून्य असे काही पुढारी त्यांना मदतही करतील. तरी या गोष्टीपासून तुम्ही सावध असले पाहिजे. या बाबतीत आपल्या नकली व स्वयंमान्य पुढाऱ्यांपासून तुम्ही सावध रहा.
डॉ. आंबेडकरांचे काम अडवण्यासाठी वरिष्ठ समाजाचे पुष्कळ लोक टपलेले असतात. असे लोक आपल्यातील लाचलुचपतीला चटावलेल्या लोकांना जवळ करणारच. माझा असा अनुभव आहे की, मी हिंदुस्थानात नसल्यावर या लोकांचे फावते.
मी या महिन्याच्या २२ तारखेला विलायतेस जाणार आहे. म्हणून मी गेल्यावर हे लोक तुमच्यात दुफळी करतील. तुम्ही कोणाच्याही नादी न लागता एकीने वागाल अशी मला आशा आहे. आजचा प्रसंग आणून दिल्याबद्दल पुन्हा सर्वांचे आभार मानून मी माझे भाषण संपवितो.
🔹🔹🔹
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर