July 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बदललेली परिस्थितीच सामाजिक उन्नतीस कारण – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मुंबई डेव्हिड मिल चाळीपुढील सैतान चौकीच्या मैदानावर झालेल्या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण….

पूर्वी जाहीर झाल्याप्रमाणे शुक्रवार दिनांक १ एप्रिल १९३८ रोजी रात्री मुंबई डेव्हिड मिल चाळीपुढील सैतान चौकीच्या मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा भरली होती. या ठिकाणी जवळ जवळ १५ ते २० हजारापर्यंतच्या समुदायाची भरलेली ही पहिलीच सभा होय. सभेच्या चालक मंडळींनी या जाहीर सभेसाठी लाऊडस्पीकरची सोय केली होती. प्रथम धों. ना. गायकवाड व या सभेचे खरे कार्यकर्ते श्री. खैरमोडे यांची प्राथमिक भाषणे झाल्यावर आमदार के. एस. सावंत यांनी या सभेचे महत्त्व सर्वांना पटवून दिले आणि सभेच्या चालक मंडळीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांना बोलण्याची विनंती केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलावयास उभे राहाताच त्यांच्या गगनभेदी जयजयकारात टाळ्यांचा कडकडाट झाला.

मुंबई डेव्हिड मिल चाळीपुढील सैतान चौकीच्या मैदानावर झालेल्या जाहीर सभेत केलेल्या आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
येथे जमलेल्या हजारों बंधु भगिनींचे मी अभिनंदन करतो, आनंद व्यक्त करतो. माझी येथे सभेला येण्याची ही दुसरी वेळ आहे. परंतु गेल्या सात-आठ वर्षापूर्वी मी जेव्हा येथे सभेला आलो होतो तेव्हाच्या आणि आजच्या सभेत जमीन-अस्मानचे अंतर आहे. आजच्या सभेत त्यावेळच्या सभेपेक्षा कल्पनातीत फरक पडलेला दिसून येईल. मी ज्यावेळी पहिल्याने येथे सभेला आलो त्यावेळी साळुंके नावाच्या एका गोसाव्याचा कीर्तन सप्ताह येथे चालू होता. माझ्या भाषणापेक्षा येथील लोकांना त्याच्या कीर्तनाची उत्सुकता लागली होती. मी फक्त आठ-दहा मिनिटेच बोललो आणि निघून गेलो. आज त्याच जागेत येथे हजारांनी जमलेले लोक माझेच भाषण ऐकण्यास इतके आतूर झालेले पाहून मला एक प्रकारचे कौतुक व आश्चर्य वाटते. लोकांच्या मनावर गेल्या आठ-दहा वर्षात झालेला परिणाम किती परिणामकारक आहे, याची तत्काळ खात्री पटते. अशातऱ्हेने आपल्या गेल्या दहा वर्षाच्या स्वाभिमान व स्वावलंबनाच्या लढ्याच्या चळवळीचा परिणाम आपल्या अस्पृश्य बांधवांवर किती झालेला आहे ते पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही. आज येथील मंडळी माझ्या भाषणाशिवाय इतर कोणाही वक्त्याचे भाषण ऐकावयास तयार नाही. आज बदललेल्या परिस्थितीचे मूळ आणि मुख्य कारण म्हटले म्हणजे आपल्या समाजात सामाजिक, धार्मिक व आर्थिक उन्नतीच्या दिशेने झालेले यशस्वी प्रयत्नच आहेत.

🔹🔹🔹

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे