July 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

मत विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघातही आहे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ठाणे जिल्हा अस्पृश्य परिषदेच्या पहिल्या अधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण….

दिनांक २९ मार्च १९३६ रोजी ठाणे जिल्ह्यातील पालघर नजीकच्या वेढी या गावी ठाणे जिल्हा अस्पृश्य परिषदेचे पहिले अधिवेशन झाले. या परिषदेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे श्री. कमलाकांत चित्रे, संभाजीराव गायकवाड, श्री. वाघ, श्री. मडकेबुवा जाधव, श्री. गायकवाड, श्री. अनंतराव चित्रे, श्री. शांताराम पोतनीस, श्री. चांगदेव मोहिते, श्री. बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, श्री. रामचंद्र मोरे, श्री. केणी, जे. पी. वनमाळी मास्तर यांचेसह मुंबईहून निघून वसई स्टेशनवर पोहोचले असता वसई स्टेशनवर चांभार समाजाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयजयकाराने वसई स्टेशन दुमदुमले. त्यानंतर दुपारी अकरा वाजता वेढी गावानजीकच्या सपाला गावाच्या स्टेशनवर सर्वजण उतरले. सपाला स्टेशनवर परिषदेसाठी मुंबईहून आलेल्या सर्व मंडळींचे ठाणे जिल्ह्यातील अस्पृश्य समाजाने मोठ्या आदराने स्वागत करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जयघोष केला.

सपाला स्टेशनपासून वेढी हे गाव अदमासे ३-४ मैल दूर आहे. तिथे मुंबईहून परिषदेस आलेल्या मंडळीस नेण्यासाठी मोटार लाॅरीची व टांग्यांची १-२ दिवसांपूर्वीच आगाऊ तजवीज ठाणे जिल्ह्यातील अस्पृश्य समाजाने करून ठेवून भाड्याचा बयाणाही वाहनवाल्यास आगाऊच देऊन ठेवला होता. परंतु दिनांक २८ मार्च १९३६ रोजी रात्री म्हणजे परिषदेच्या आदल्या दिवशी सपाला येथील वाहनवाल्या लोकांची बैठक स्पृश्य लोकांच्या चिथावणीवरून होऊन त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या बरोबरच्या माणसांना आपल्या वाहनातून बसवून नेऊ नये म्हणून ठराव करून ठेवला होता. सपाला स्टेशनबाहेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिषदेकरिता आलेल्या मंडळींसह वाहनात बसण्यास आले. परंतु मोटरवाल्याने आपली मोटार नादुरुस्त असल्याचे सांगितले. दुसरी मोटार तर स्टेशनबाहेर नव्हतीच. तेव्हा सर्व मंडळी टांग्यात बसू लागली, परंतु टांगेवाल्यांनी अस्पृश्य मंडळींना आमच्या टांग्यात बसवून आम्ही नेणार नाही, आजपर्यंत आम्ही कधीही अस्पृश्य माणसांना आमच्या टांग्यात बसविले नाही व तुमचे भाडे न करण्याचा आमचा संप आहे असे स्पष्ट सांगितले. टांगेवाल्यांची ही संपाची भाषा ऐकून सर्व मंडळी पायानेच वेढी गावी जाण्याचा विचार करू लागली. इतक्यात संपात सामील असलेला एक मुसलमान टांगेवाला संपातून फुटून निघाला व आपण भाडे करण्यास तयार आहोत असे त्याने सांगितले. संपातून एक टांगेवाला फुटल्यावर दुसरे ३ भंडारी जातीचे टांगेवालेही संपातून बाहेर पडून भाडे करण्यास तयार झाले. अशारीतीने चार टांग्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व थोडीशी मंडळी वेढीस रवाना झाली. आपण अस्पृश्य म्हणून आज आपणाशी या टांगेवाल्यांनी अशी वागणूक केली हे पाहून हिंदू धर्मातल्या आपल्या स्थितीबद्दल अस्पृश्य मंडळींना खेद वाटल्याखेरीज राहिला नाही.

शेवटी १२ वाजता सर्व मंडळी वेढी येथील परिषदेच्या प्रशस्त आणि सुशोभित मंडपापाशी आली. परिषदेच्या मंडपात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर येताच त्यांच्या नावाचा जयघोष झाला. परिषदेसाठी ठाणे जिल्ह्यातील वसई येथील श्री. विष्णूपंत दांडेकर वकील, बोर्डीचे श्री. मुकुंदराव आनंदराव सावे, वेढी येथील नथोबा त्रिंबकराव म्हात्रे, विरारचे एच. जी. वर्तक, श्री. खंडुभाई शहा, देवमास्तर व वेढी गावची इतर स्पृश्य मंडळी हजर होती. ३-४ हजारावर अस्पृश्य समुदाय या परिषदेला हजर होता.

परिषदेच्या प्रारंभी ईशस्तवन झाले. त्यानंतर परिषदेचे स्वागताध्यक्ष श्री. शिवराम गोपाळ जाधव यांचे स्वागतपर भाषण झाले. त्यानंतर परिषदेचे नियोजित अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषणास उभे राहिले.

ठाणे जिल्हा अस्पृश्य परिषदेच्या पहिल्या अधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले,
स्वागताध्यक्ष, प्रिय भगिनींनो व बंधूजनहो,
आजच्या या सभेला एक प्रकारचे अपूर्व स्वरूप प्राप्त झाले आहे असे म्हणण्यास हरकत नाही. ज्या दिवसापासून मी सार्वजनिक कार्यात भाग घेऊ लागलो तेव्हापासून या भागात परिषद झाली नव्हती. १६ वर्षापूर्वी या भागातील टेंभुर्णी गावी परिषद झाली, त्यानंतर आज परिषद भरत आहे. या जिल्ह्यातील लोक आज इतके वर्षांनी येथे एकत्र जमत आहेत, ही मोठ्या आनंदाची गोष्ट आहे.

ही परिषद घडवून आणण्यासाठी या जिल्ह्याचे पुढारी श्री. शिवराम गोपाळ जाधव यांनी फार परिश्रम घेतले, कष्ट व मेहनत केली याबद्दल मी श्री. जाधव यांचे प्रथम अभिनंदन करून आभार मानतो.

सद्गृहस्थहो, पाल्हाळीक भाषण करून तुमचा वेळ मी घेणार नाही, परंतु मी दोन मुद्द्यांसंबंधी सांगतो. पहिला मुद्दा धर्मांतराचा. यासंबंधी काही लोक म्हणतात की, तुम्ही धर्मांतर करून काय साधणार आहात ? त्याचे उत्तर अनेक तर्‍हेने देता येईल, पण मी साध्या शब्दात त्याचे उत्तर देतो. धर्मांतराचा प्रश्न अत्यंत गहन व तत्त्वज्ञानाचा आहे. त्याची तुमच्या मनाला व बुद्धीला पटेल अशारीतीने चर्चा करणे जरूर आहे.

तुम्ही आज अपंग स्थितीत आहात. तुम्ही अशिक्षित व दरिद्री आहात व तुम्हास कोणत्याही प्रकारचे सामर्थ्य नाही, या गोष्टीचा पुरावा नको. ज्या खेडेगावात तुम्ही राहता, त्यात तुमची वस्ती व इतर लोकांची वस्ती याची तुलना केली तर तुम्हास समजेल की, तुमची स्थिती निकृष्ट आहे. पशु-पक्षी व जनावरे निसर्गाने दिलेल्या गोष्टीवर समाधान मानून राहतात. निसर्गाने पृथ्वीवर ज्या वस्तू उत्पन्न केलेल्या आहेत त्यावर त्यांचे जीवन अवलंबून असते, पण मनुष्याची वासना व महत्त्वाकांक्षा आपणास निसर्गाकडून मिळाले, त्यापेक्षाही काही जास्त मिळावे अशी असते. अशी इच्छा सर्व मानवी समाजाची असते की, आपली वाढ व्हावी. त्याप्रमाणेच आपलीही इच्छा आहे की, आपलीही सर्वांगीण उन्नती व वाढ व्हावी. तुम्ही ज्या दारिद्र्यात आहात ती परिस्थिती बदलवून, तुम्हास पुढे जावयाचे आहे. तुम्ही आपले पायावर उभे राहू शकाल काय ? याचा विचार करा. मी जो आज तुमच्या स्थितीचा अभ्यास केला आहे, त्यावरून माझी अशी खात्री झाली आहे की, तुम्हास कोणाचे तरी सहाय्य घेतले पाहिजे. आज तुमच्यात फारसे शिक्षित लोक नाहीत. त्याकरिता तुम्हास शिक्षण घेतले पाहिजे व तेही उच्च दर्जाचे शिक्षण घेतले पाहिजे. एक काळ असा होता की चार पुस्तके शिकलेला स्पृश्य माणूस मामलेदार होत असे, पण आज तो काळ बदलला आहे. आज उच्च शिक्षण घेतल्याखेरीज कोणासही सरकारी नोकऱ्या मिळू शकत नाहीत. तुम्हास आज अन्न खाण्यास नाही, ते तुम्ही लोक आपल्या मुलांना बी. ए., एम. ए. कसे करू शकाल ? तुमच्यामध्ये असा कोणीही माणूस नाही की, तो आपल्या ऐपतीवर मुलास सुशिक्षित करील. याकरिता जो समाज तुम्हास शिक्षणाचे बाबतीत तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा न करिता जर तुमचा स्वाभिमान सांभाळून मदत देईल तर अशा समाजाशी तुम्ही सहकार्य करून स्पृश्य हिंदुंच्या स्पर्धेत अग्रेसरत्व मिळविले पाहिजे.

आज आपले पुष्कळ लोक काबाडकष्ट करून पोट भरतात. त्यांनी जर काबाडकष्ट केले, रोजगार धंदा केला तरच त्यांना पोटभर अन्न व अंगभर वस्त्र कसेतरी मिळू शकते. आपणास आज जो रोजगार धंदा मिळतो तो स्पृृश्य लोकांकडून मोठ्या मिनतवारीने मिळतो. तुम्हास स्वतंत्र धंदा नाही, स्वतंत्र शेती नाही, स्वतंत्र व्यापार नाही व त्याची साधनेही नाहीत व स्वतंत्र साधने उत्पन्न करण्याची तुम्हास ऐपत नाही व ऐपत असली तर संधी नाही. सरकारने कायदा करून आपणास सरकारच्या ताब्यातील सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा हक्क दिला आहे पण आपणास असा अनुभव आहे की, स्पृश्य लोक त्या पाणवठ्यावर आपणास मुळीच पाणी भरू देत नाहीत. जर आपण त्या पाणवठ्यावर पाणी भरले तर स्पृश्य लोक तुमच्यावर बहिष्कार टाकतात. त्यावेळी तुमचे अत्यंत हाल होतात. त्या हालाच्या, छळणुकीच्या व संकटाच्या वेळी त्याच गावचे मुसलमानही तुम्हास बहिष्कारातून, संकटातून आणि छळणूकीतून तुमची सोडवणूक करण्यास मदतीला येत नाहीत. त्यावेळी धीराने आपण संकटे सोशीत राहतो. त्या संकटग्रस्तप्रसंगी आपली स्थिती असहाय होते. अशावेळी आपण ज्या स्थितीत असतो त्यावेळी आपणास काही करता येत नाही. त्याकरिता आपणास आजच्या स्थितीत दुसऱ्याचे सहाय्य घेणे जरूर आहे.

आज ज्या त्या हिंदू समाजातील जाती आपस्वार्थी बनून आपआपल्या जातीस मदत करीत आहेत; पण ह्या हिंदू स्पृश्य जाती आपल्या अस्पृश्य समाजाला मदत करीत नाहीत. कारण त्या स्पृश्य हिंदु जातीचे लोकांचे व आपले लागेबांधे नाहीत. त्याकरिता आपणास जे मदत करतील व आपल्या असहाय्य स्थितीत संरक्षण करतील, त्यांचे बरोबर ऋणानुबंध जोडून घेतला पाहिजे. आज आपण हिंदू समाजाचे सर्व देव-धर्म पाळीत आहोत, तरीही पण आपली हिंदुधर्मीय स्पृश्यांकडून उपेक्षा झालेली आहे. हिंदुधर्मीय आपणाकरिता काहीही करू शकत नाहीत. नुकताच महात्मा गांधींनी हरिजनात लेख लिहिला आहे. त्यांच्याकडे अस्पृश्य वर्गाच्या काही विद्यार्थ्यांनी आपणास विद्यार्जनाच्या बाबतीतल्या अडचणीतून काढण्यासाठी अर्ज केले होते व स्कॉलरशिपांची मागणी केलेली होती. त्या अर्जास महात्माजींनी उत्तर दिले आहे की, जर सवलती मिळविण्यासाठीच तुम्हास हिंदू धर्मात राहावयाचे असेल, तर तुम्ही हिंदू धर्म सोडून गेला तरी चालेल. महात्माजीसारख्यांची ही भावना झाली, मग इतर सामान्य लोकांची कशा प्रकारची असू शकेल ?

यावरून व अनेक गोष्टीवरून हिंदू धर्माच्या लोकांकडे आशा ठेवून राहणे चूक होईल. तुम्हास तुमची उन्नती व प्रगती करून घेणे असेल तर तुम्हास सह्रदय व सामर्थ्यवान, शीलसंपन्न, निस्वार्थी अशा समाजाशी लागाबांधा जोडला पाहिजे आणि असा लागाबांधा दुसरे समाजाशी जोडून घेणे याचाच अर्थ धर्मांतर.

मुसलमान, ख्रिस्ती व शिख हे आपणासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यास तयार आहेत. तर त्यांच्याउलट हिंदुधर्मियांची प्रवृत्ती कशी आहे ते पहा. महात्मा गांधींनी स्वराज्य संपादनासाठी ज्यावेळी हिंदू समाजाकडे मदतीची याचना केली त्यावेळी त्यांना कोट सवा कोट, रुपये मिळू शकले, पण त्यांनी ज्यावेळी अस्पृश्यांच्यासाठी हिंदू समाजाकडे पैशाची मागणी केली त्यावेळी त्यांना अखिल हिंदुस्थानात, मोठ्या मिनतवारीने आठ लाख रुपये मिळाले. त्यापैकी चार लाख रुपये दोन वर्षात खर्चून टाकले गेले व राहिलेले चार लाखही या वर्षा सहा महिन्यात कसे तरी खर्च होणार असे समजते. यावरून हिंदू समाज स्वराज्याकरिता किती स्वार्थत्याग करण्यास तयार आहे व अस्पृश्योद्धारासाठी किती स्वार्थत्याग करण्यास तयार आहे हे स्पष्टपणे दिसून येते.

मुसलमानांच्या एका सभेने एक कोटी रुपये जमावावेत व आपल्याकरिता खर्च करावेत असा विचार केला, तर शीख समाजाने लाखो रुपये जमवून तुमचे उन्नतीसाठी खर्च करण्याचा निर्धार केलेला आहे. याच्याउलट हिंदू समाज स्वस्थ डोळे झाकून बसला आहे. डोळ्यावर बळेच कातडे ओढून बसलेल्या या हिंदू समाजाकडून तुम्हास मदत तर नाहीच पण तो समाज तुमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे उत्पन्न करीत आहे. त्यामुळे तुमचा त्यांचेकडून उद्धार होणार नाही. आजच्या प्रगतीच्या काळात आपण आपला मार्ग हिंदू धर्माचे लोकांपासून अलग स्वतंत्रपणे चोखाळला पाहिजे. स्वाभिमानाला व सन्मानाला धक्का न देता, जे आपल्या प्रगतीला समतेने मदत करतील अशा समाजाशी आपण सहकार्य केले पाहिजे.

पूर्वजांचा धर्म उराशी कवटाळून बसण्यात काय अर्थ आहे ? खोट्या अभिमानाचा आपण त्याग केला पाहिजे. हिंदू धर्मात चातुर्वर्ण्याची घातक प्रथा आहे व ती मोडण्याची चिन्हेही दिसत नाहीत. या चातुर्वण्याने व वर्णाश्रमधर्माने आपले अत्यंत नुकसान केलेले आहे. वर्णाश्रमधर्म व्यवस्थेमुळे, ब्राह्मणाशिवाय इतर कोणीही विद्या संपादन करू नये, क्षत्रियांशिवाय कोणी शस्त्र धारण करू नये. अशा वर्णव्यवस्थेमुळे आपले पूर्वजास अज्ञानी व निर्बल करण्यात आले होते. या वर्णाश्रमधर्माने आपणास ज्ञान, सत्ता, शस्त्र व संपत्ती याचा उपयोग घेऊ दिलेला नाही. या वर्णाश्रमधर्माने आपल्या पूर्वजांची प्रतिकारशक्ती नाहीशी केली, त्याचे प्रगतीपर मार्गावर पाऊलच पडू दिले नाही. आज आपली तशी स्थिती नाही. हल्ली सर्वास शिक्षणाचा मार्ग खुला आहे. शस्त्रधारणाची वाट मोकळी आहे. प्रगतीचा मार्ग खुला आहे. अशा स्थितीत, पूर्वजांच्या धर्माला आजही तुम्ही कवटाळून बसलात, तर तुमची कधीच उन्नती होणार नाही. तुम्ही ज्ञान व शक्ती संपादन करून व खोट्या रूढीची बंधने तोडून, धडाडीने स्वोन्नतीचा मार्ग चोखाळा, हे मी तुम्हास निक्षून सांगत आहे. याचा खोलबुद्धीने व शांतचित्ताने विचार करा व प्रगतीच्या मार्गावर पाऊले टाकून उज्वलतेचा रस्ता धारा.

आता राजकारणासंबंधी दुसरा प्रश्न आहे. एका वर्षानंतर मुंबई इलाख्यात व हिंदुस्थानात नवी राज्यघटना निर्माण होणार आहे. त्या राज्यघटनेसंबंधी तुमचे कर्तव्य काय आहे, हे दाखवून देण्याची माझी इच्छा आहे. आजपर्यंत तुमची अशी दृष्टी असे की, आपणास ज्या अडचणी येतील त्या नाहीशा होण्यासाठी सरकारी अधिकाऱ्याकडे अर्ज करावयाचे. या अर्जापासून तुमची संकटे दूर होतील, अशी तुमची कल्पनाही होती. कलेक्टर हा राजा आहे, अशी तुमची भावना. कलेक्टर हा एका दृष्टीने राजा होता. कारण आजकाल नोकरशाहीची सत्ता आहे, पण ही परिस्थिती पुढल्या वर्षापासून पालटली जाणार आहे. एक वर्षानंतर राजकारणात, नोकरशाहीस स्वतंत्र स्थान व सत्ता राहणार नाही. नवीन राज्यघटनेप्रमाणे सर्व अधिकार कायदेमंडळाकडे जातील व कायदेमंडळाच्या हुकुमतीखाली कलेक्टरांना व मामलेदारांना मान वाकवून वागावे लागेल. म्हणजे कायदेमंडळ हे पुढे महत्त्वाचे स्थान होणार. त्या कायदेमंडळात आपल्याला महत्त्व प्राप्त झालेले आहे. राजकारणाचे भवितव्य कायदेमंडळावर अवलंबून आहे. याकरिता कायदेमंडळावर चांगली माणसे गेली पाहिजेत. शेठ, सावकार, पैसेवाले कायदेमंडळावर डोळे ठेवून आहेत. या लोकांकडून गरीब जनतेचे मुळीच कल्याण होणार नाही. याकरिता, गोरगरिबांमध्ये मिळून मिसळून काम करणाऱ्या, गोरगरिबांच्या आकांक्षांची जाणीव असलेल्या निस्वार्थी, निर्भीड, लायक व मतदारांशी इमानीपणाने वागणार्‍या गोरगरिबांच्या प्रतिनिधींची आपणास निवड केली पाहिजे. आपल्या खऱ्याखुऱ्या हितचिंतकांना जर आपण कायदेमंडळावर निवडून दिले, तरच आपले पाऊल पुढे पडेल व आपले हितवर्धन होईल.

कायदेमंडळावर निवडून देण्यासाठी आपणास मताचा अधिकार आहे. हा अधिकार फार महत्त्वाचा व मोठा आहे. तेव्हा आपली मतदानाची बहुमोल शक्ती भलत्याच ठिकाणी वाया जाता उपयोगी नाही. आपले खरे कळकळीचे व इमानी हितचिंतक कोण आहेत हे मी आपणास वेळेवर सांगेन, त्यांनाच तुम्ही मतदान करा.

सध्या आपल्या देशात सधन लोक मते विकत घेतात, पण मते ही विकण्याची वस्तू नाही. ती आपल्या संरक्षणाची साधनशक्ती आहे. मते विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघातही आहे. मते विकून नालायकांची खोगीरभरती कायदेमंडळावर केल्याने देशाचे अपरिमित नुकसान होऊन राष्ट्र अधोगतीस जाते. स्वतः नालायक व अपात्र असून पैशाच्या जोरावर कायदेमंडळावर जाऊ इच्छिणारे काही लोक तुम्हास द्रव्याचे आमिष दाखवतील, दारिद्र्यामुळे तुम्हास मते विकावी की काय असा मोह उत्पन्न होईल. अशा कोणत्याही मोहास तुम्ही बिलकुल बळी पडू नका. मोहास बळी पडलात तर तुम्ही आपल्या पायावर पर्यायाने समाजाच्या पायावर धोंडा पाडून घ्याल ही धोक्याची सूचना मी आज सर्वांना देत आहे. मते विकत मागणाऱ्या माणसाला समाजाचा पाठिंबा नसतो म्हणून तर तो द्रव्याच्या बळावर आपली लायकी प्रस्थापित करण्याचा अट्टाहास करतो. अशा नालायक माणसाकडून समाजहिताची अगर राष्ट्रहिताची कार्ये होत नाहीत. पैसेवाला जर कायदेमंडळात सभासद म्हणून गेला, तर तो द्रव्यवाल्या लोकांचेच हितसंरक्षण करील व तो आपल्यासारख्या गोरगरिबांच्या हिताच्या आड येईल. म्हणून मत विकण्याचे पाप तुम्ही करू नका व तुम्ही तसे करणार नाही अशी माझी खात्री आहे. पैसेवाल्यांच्या कसल्याही प्रकारच्या आमिषाला व भुलभुलावणीला, गोडीगुलाबीच्या मायावी भाषणाला आणि पैशाला तुम्ही बळी पडू नका व आपली दिशाभूल करून घेऊ नका.

आपणाला मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराचा जर आपण चांगल्या तर्‍हेने उपयोग केला तर आपण चांगलीच माणसे कायदेमंडळावर निवडून आणू व त्यापेक्षा जास्त आपली उन्नती आपण करू शकू. आपणास कोणाची निवड कायदेमंडळावर करावयाची त्याबद्दल मी वेळेवर सांगेन.

शेवटी ही परिषद यशस्वी करण्यासाठी तुम्ही लांबलांबून येथे येण्याचे जे कष्ट घेतलेत व माझेवर जो लोभ दाखविलात त्याबद्दल मी तुमचे व या परिषदेचे स्वागताध्यक्ष श्री. शिवराम गोपाळ जाधव यांचे आभार मानून आपले भाषण पुरे करतो.

🔹🔹🔹

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाल्यावर खालील ठराव मांडण्यात आले. पहिले दोन ठराव अध्यक्षांनी म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडले.—

ठराव १ ला – मरहूम बादशहा पंचम जॉर्ज यांच्या शोचनीय निधनाबद्दल या परिषदेस अत्यंत दुःख वाटत आहे.

ठराव २ रा – बादशहा आठवे एडवर्ड यांना ही परिषद दीर्घायुरारोग्य चिंतीत आहे.

ठराव ३ रा – येवले मुक्कामी आपल्या अस्पृश्य समाजाने जी धर्मांतराची घोषणा केलेली आहे त्या घोषणेस या परिषदेचा पूर्ण पाठिंबा आहे. ठराव मांडणार लक्ष्मण जानबा गायकवाड. अनुमोदन देणार गंगाराम माधव जाधव, श्री. चांगदेव मोहिते, श्री. वनमाळी, श्री. मडकेबुवा जाधव.

ठराव ४ था – या जिल्ह्यातील सार्वजनिक तलाव, विहिरी वगैरे पाणवठ्याचा समानतेने उपभोग घेण्याबद्दल ठाणे डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डाने आपल्या ताब्यातील पाणवठ्यावर सर्वांनी पाणी भरावे अशा पाट्या लावल्या आहेत. तरी पण बहुसंख्य स्पृश्य समाजाकडून अस्पृश्यांना त्या पाणवठ्यावर पाणी भरण्यास मज्जाव होत आहे या बाबतीत सरकारने लक्ष घालून अस्पृश्यांना या पाणवठ्यावरून पाणी भरण्याचे वेळी स्पृश्य समाजाकडून येणारा अडथळा दूर होईल अशी तजवीज करावी. ठराव मांडणार चांगदेव मोहिते. अनुमोदन देणार जनार्दन पद्माजी लोखंडे.

ठराव ५ वा – अस्पृश्य व रानटी म्हणून ओळखल्या जाणार्‍या जातीतील लोकांना सरकार केवळ त्यांची जात लक्षात घेऊन जेलमध्ये मलमूत्र काढण्याचे काम करावयास भाग पाडते. या व अशाच अनेक प्रकारच्या अन्यायमूलक परंपरेचा पुरस्कार करणाऱ्या सरकारबद्दल ही परिषद आपला संताप व्यक्त करीत आहे व हा अन्याय ताबडतोब दूर करावा अशी सरकारकडे विनंती करीत आहे. ठराव मांडणार श्री. मोरे. अनुमोदन देणार आढाव व जाधव

ठराव ६ वा – अखिल अस्पृश्य समाजाचे मुखपत्र ‘ जनता ‘ आहे. या आपल्या वर्तमानपत्राचे प्रत्येक गावच्या अस्पृश्य समाजाने वर्गणीदार व्हावे. तसेच कार्यप्रसंगी जनता पत्रास आर्थिक मदत देऊन पत्राच्या उत्कर्षासाठी व वाढ होण्यासाठी सर्व अस्पृश्य समाजाने सदैव खटपट करावी, अशी या परिषदेची सर्वांना आग्रहाची विनंती आहे. ठराव मांडणार धोंडीराम गायकवाड. अनुमोदन देणार सदाशिवराव साळवी.

ठराव ७ वा – जर या भागातील अस्पृश्य समाज लग्नप्रसंगी काही जुन्या रुढींचे अवलंबन करीत असेल तर त्यांनी यापुढे त्या रूढींचा त्याग करावा व लग्नप्रसंगी शिक्षणासारख्या समाजहित वर्धनाचे कार्यास मदत करावी. ठराव मांडणार श्री. लक्ष्मण मानोजी गायकवाड. अनुमोदन देणार गोपाळ महादेव जाधव.

ठराव ८ वा – येत्या मे महिन्यात मुंबई येथे अखिल महार समाजाची परिषद भरणार आहे. त्या परिषदेत या भागातील सर्व महार बंधूंनी भाग घ्यावा अशी या परिषदेची विनंती आहे. ठराव मांडणार दिवाकर पगारे. अनुमोदन देणार संभाजी बाबा गायकवाड.

ठराव ९ वा – ही परिषद यशस्वी करण्याकरिता ज्यांनी ज्यांनी मेहनत केली त्या सर्वांचे ही परिषद आभार मानते. ठराव मांडणार गायकवाड. अनुमोदन देणार जाधव.

वरील सर्व ठरावांवर जोरदार उद्बोधक भाषणे झाली व सर्व ठराव टाळ्यांच्या कडकडाटात एकमताने पास झाले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुन्हा दोन कळकळीचे शब्द सांगितल्यावर आभार प्रदर्शनानंतर प्रचंड जयघोषात या परिषदेचे कार्य अत्यंत यशस्वी रीतीने पार पडले. परिषदेहून मंडळी परत येताना वसई स्टेशनवर नाशिकच्या महिपतराव विठूजी निळे, दामोजी नामदेव निळे, वाघूजी करडक मिस्त्री, पुलाजी उमाजी पाटारे, नानासाहेब गणोजी बोराडे, श्रावण भैरवराव वगैरे मंडळींनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा व परिषदेहून आलेल्या मंडळीचा मोठा गौरवपर सत्कार करून त्यांना फलाहार दिला.

⚫⚫⚫

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे