November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

लोकांच्या धर्मभोळेपणाचा फायदा घेणाऱ्यांपासून सावध रहा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

अस्पृश्य वर्गाकडून जाहीर सभेत मानपत्र अर्पण करण्यात आल्यानंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उत्तरादाखल केलेले भाषण….

मुंबई, सँडहर्स्ट रोड (वाडीबंदर) नजीक जी. आय. पी. रेल्वेच्या चाळीजवळील पटांगणात मुद्दाम उभारलेल्या मंडपात श्री. आर. डी. कवळी (बी. ए., एलएल. बी.) यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक ४ मार्च १९३३ रोजी रात्री साडे नऊ वाजता अस्पृश्य वर्गाची जाहीर सभा झाली. ह्या सभेत अखिल अस्पृश्य वर्गाचे पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र अर्पण करण्यात आले. या सभेस अस्पृश्य वर्गीय स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने हजर होते. श्री. शिवतरकर, श्री. नाईक, सहस्त्रबुद्धे, दिवाकर पगारे, शा. उपशाम, कमलाकांत चित्रे, मेश्राम इत्यादी मंडळीही सभेला हजर होती.

प्रथम रा. पुंजाजी जाधव यांनी अध्यक्षाची सूचना आणली व या सूचनेस रा. कर्डक यांनी अनुमोदन दिले. रीतसर अध्यक्ष स्थानापन्न झाल्यावर रा. दिवाकर पगारे यांनी मानपत्र वाचून दाखविले. त्या मानपत्रावर ८५ दीर्घायुरारोग्य चिंतणाऱ्यांची नावे होती.

मानपत्र पुढीलप्रमाणे आहे. —

“जातिभेदविध्वंसक, समाजक्रांतिकारक, हितमार्गदर्शक मूकनायक डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (एम. ए., पीएच.डी., डी.एससी., बार-ॲट-लॉ.)
एम. एल. सी., जे. पी., मुंबई,

परमप्रिय डॉ. बाबासाहेब! आपले चरणसेवेशी, मुंबई, सॅण्डहर्स्ट रोड, वाडीबंदर नजीक जी. आय. पी. रेल्वे चाळीमधील नाशिक जिल्ह्यातील ‘ अस्पृश्य ‘ मानण्यात येणाऱ्या आपल्या सर्व आज्ञाधारक व नम्र अनुयायांचा सप्रेम जोहार सादर असो !

आपला प्रत्येक क्षण बहुमोलाचा आहे तरी पण आम्हा गरिबांच्या उत्कट इच्छेनुरूप आज येथे येण्याची आपण कृपा केलीत, त्यामुळे आम्हाला फार धन्यता वाटली. आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत.

आपण अत्यंत गुणशाली आहात तसेच अमूप धैर्यशालीही आहात. आपल्या अतुल बुद्धिमत्तेची आणि अप्रतिम शौर्यवृत्तीची कसोटी पाहणारे आणि साक्ष पटविणारे अनेक लहान-मोठे प्रसंग आपल्या आतापर्यंतच्या आयुष्यक्रमात येऊन गेले आहेत. आपली यशप्रद विद्यार्थीदशा, महाड व नाशिक सत्याग्रहप्रसंगीचे आपले स्फूर्तिदायी नेतृत्व, राऊंड टेबल परिषदेतील आपली समाजहितप्रद कामगिरी व पुणे कराराच्या वेळी प्रगट झालेला आपला प्रबल आत्मविश्वास हे आपल्या विशाल बुद्धिमत्तेची व अचाट धैर्यवृत्तीची साक्ष पटविणाऱ्या आपल्या आयुष्यातील विविध प्रसंगांपैकी अगदी ठळक असे काही थोडे प्रसंग आहेत. यशस्वी विद्यार्थी, कुशल मुत्सद्दी व धैर्यवान पुढारी अशी आपली कीर्ती या प्रसंगांमुळे दिगंत पसरून अजरामर झालेली आहे. जसजसा काळ लोटेल तसतसा आपला हा कीर्तिदीप अधिकाधिक प्रज्वलित होणार हे निश्चित आहे.

महाराज, आपण आमचा मार्ग प्रकाशित केला आहे. आमच्या हृदयात अभिनव चैतन्याची दिव्य ज्योत आपण पेटविली आहे. युगानुयुगांच्या अज्ञानांधकाराला भेदून प्रकाश दाखविणारी व पूर्वी कधी कोणी आम्हाला न दिलेली नवी ज्ञानदृष्टी आपण आम्हाला प्राप्त करून दिली आहे. केवळ जगाच्या दृष्टीनेच नव्हे तर खुद्द आमच्या दृष्टीनेही आमची किंमत आपण वाढविली आहे. आमचा स्वाभिमान आपण जागविला आहे. आम्हाला आत्मसन्मानाचे महत्त्व आपण पटवून दिले आहे.

आपणच आमचे अनन्य पुढारी, आमचे अचूक मार्गदर्शक, आमचे सन्मित्र, आमचे सर्वस्व आहात. आमचा देव आणि आमचा धर्म, आमचे राजकारण आणि आमचे समाजकारण आपल्या शब्दात आणि आपल्या धोरणात सामावलेले आहे.

सन्माननीय महाराज, आम्ही गरीब असलो तरी आमचे आपल्या ठायीचे प्रेम, आमची आपल्याविषयीची निष्ठा व आमचा आपल्यावरील विश्वास ही समर्थ व अढळ आहेत. त्यांच्या जोरावर आपण सांगाल तो मार्ग-मग तो कितीही बिकट असो-चालून जाण्याचा आम्ही अंतःकरणपूर्वक व जिवापाड प्रयत्न करू, असे आपल्याला आश्वासन देण्याची या प्रसंगी आम्ही परवानगी घेतो. आणि आमच्या निष्ठेचे, कृतज्ञतेचे व आम्हा सर्वांच्या वतीने आपणास जाहीरपणे दिलेल्या आजच्या या आश्वासनाचे आणि आजच्या या भाग्यशाली दिवसाचे एक अल्पसे स्मारक व एक लहानसा पुरावा म्हणून फुल नाही फुलाची पाकळी या न्यायाने हे मानपत्र आपल्या चरणी आम्ही आज सादर करीत आहोत. त्याचा स्वीकार करून आम्हाला कृतार्थ करावे.

नंतर अध्यक्षांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र अर्पण करण्यात आले. त्या प्रमाणेच एक चांदीची कपबशी व हारतुरे देऊन डॉ. बाबासाहेबांचा सन्मान करण्यात आला. एवढे झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर उतरादाखल भाषण करण्यास उभे राहिले.

प्रथम झालेल्या गौरवावदल आभार प्रदर्शन करून  डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
या मानपत्रात माझ्या संबंधाने गौरवपर जे काही लिहिले आहे ते कितपत खरे आहे, हे सांगणे कठीण आहे. परन्तु एवढे मात्र खरे की, त्यात स्तुतिपर अलंकारयुक्त भाषेने तुम्ही तुमच्याच सारख्या एका माणसास गुणातीत ईश्वर बनविले आहे. हे जर खरे मानले तर या तुमच्या भावना स्वहितनाशक आहेत, असेच मी समजतो व आज मूले कुठार: म्हणूनच प्रथम दोन शब्द सांगणे प्राप्त आहे. दुसऱ्याला ईश्वर बनवायचे व आपल्या उद्धाराचा भार त्याच्यावर टाकावयाचा ही भावना तुम्हास कर्तव्यपराङ्मुख करणारी आहे. या भावनेला जर का चिकटून बसलात तर तुम्ही प्रवाहाबरोबर वाहणारे लाकडाचे ओंडके बनून तुमच्या अंगी वास करीत असलेली शक्ती निकामी ठरेल व या नवयुगात प्राप्त झालेली राजकीय सत्ता निरर्थक ठरेल. आजपर्यंत तुम्ही या नादान भावनेस तुमच्या मनात घर करू दिल्यामुळे तिने तुमच्या वर्गाचा समूळ नाश केला आहे. मी याच्याही पुढे जाऊन असे सांगतो की, असल्या नादान भावनेने तुमचाच काय पण सर्व हिंदू समाजाचा नाश केला आहे. आपल्या या हिंदुस्थान देशाच्या हीनत्वाला काही कारण असेल तर हे देवपण होय.

इतर देशातील लोक समाजात काही बखेडा माजल्यास किंवा समाज संकटात सापडल्यास एकोपा करून व सर्व सामर्थ्य एकवटून आपला स्वतःचा उद्धार करून घेतात. परन्तु आपल्या धर्माने आमची अशी समजूत करून दिली आहे की, माणूस काही करू शकत नाही. समाजावर मोठे संकट आल्यास किंवा समाजाची प्रगती खुंटल्यास देव आपल्यामध्ये अवतार घेतो व आपले संकट निवारण करतो, सार्वत्रिक रीतीने संकटास तोंड न देता ईश्वराच्या अवताराची वाट पाहात बसतात.

आमचा हिंदू धर्म पुरातन आहे. ग्रीक, रोमन इत्यादि पुरातन व प्रसिद्ध राष्ट्रे लयाला गेली, परन्तु आमचा हिंदू समाज अद्याप जिवंत आहे अशी हिंदू लोक शेखी मिरवितात. परन्तु नुसत्या जगण्यात कवडीची किंमत नाही. मनुष्य इज्जतीने जगतो की नाही याला महत्त्व आहे. या दृष्टीने पाहिल्यास हिंदू समाजाने जिवंत राहून काय दिग्विजय लावला आहे ? दुसऱ्याचे लाजिरवाणे दास्य पत्करण्यापलिकडे त्याने काय केले आहे ? असल्या जगण्यात काही अर्थ नाही. मर्दुमकी गाजवून दोन दिवस जगणे हे दुसऱ्याचे गुलाम होऊन १०० वर्षे जगण्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठपणाचे लक्षण होय. दोघांच्या झुंजीत एकजण पलायन करूनही जिवंत राहतो व जगतो, तर दुसरा प्रतिपक्षाचा पाडाव करून जगतो. पळून जाऊन व दुसऱ्याचे वर्चस्व स्वीकारून जीव जगविणारा मनुष्य काय मिळवितो ? दुसऱ्याचा गुलाम बनतो, स्वत्व विसरून जातो व गुलामांचा तांडा अधिक वृद्धिंगत करतो आणि नामर्दपणाचा फैलाव करतो. यापेक्षा मरणे काय वाईट ? आता हिंदू समाज दुसऱ्यांचा दास किंवा गुलाम होऊनच का राहिला याचा विचार केल्यास, तो आपल्या उद्धारासाठी ‘ ईश्वराची वाट ‘ पाहात बसला हेच त्याला कारण आहे, अशी माझी दृढ समजूत आहे.

या जगात ईश्वर असो किंवा नसो त्याचा विचार करण्याची तुम्हास काही जरूरी नाही. एवढी गोष्ट मात्र खरी आहे की, जगात ज्या हरघडी घडामोडी होतात त्या माणसेच करीत असतात. काही थोडे सुशिक्षित व स्वार्थपरायण लोक दुसऱ्या असंख्य लोकांना अज्ञानांधकारात ठेवून त्यांना ईश्वराविषयीच्या खोट्या कल्पनांच्या पाठीमागे लावून व त्यांच्या धर्मभोळेपणाचा फायदा घेऊन आपले स्वतःचे हित साधीत असतात. कारण या क्लृप्तीने तुमची संघशक्ती नष्ट होऊन तुम्ही मेंढरासारखे पोकळ भावनांच्या पाठीमागे लागता व तुम्हाला सर्वतोपरी लुबाडण्याचा त्यांचा मार्ग निष्कंटक होतो. आज आपण दीनावस्थेस पोहोचलो आहोत. त्या स्थितीतून बाहेर पडून तुमचा उद्धार करून घ्यावयाचा असेल तर तुम्ही या कल्पनांना अजिबात फाटा दिला पाहिजे. तुम्ही सर्वांनी-स्त्रीपुरुषांनी-खात्री बाळगली पाहिजे की, तुमचा उद्धार करण्यास दुसरा कोणीही येणार नाही, किंवा तो मीही करणार नाही. जर मनात आणाल तर तुमचा उद्धार तुम्हीच करून घेण्यास समर्थ व्हाल. मला सांगण्यात आनंद वाटतो की, आपल्या वर्गात चळवळीचा वारा चोहीकडे पसरला आहे, पण ही जागृती जरी झाली असली तरी सुद्धा मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगावयाची आहे ती ही की, यापुढे तुमचे सर्व भवितव्य राजकारणात आहे, दुसऱ्या कशातही नाही. पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, काशी, हरिद्वार वगैरे यात्रा करून किंवा शनीमहात्म्य, शिवलीलामृत, गुरुचरित्र इत्यादि पोथ्यांची पारायणे करून किंवा एकादशी, सोमवार वगैरे उपवास धरून तुमचा उद्धार होणार नाही. तुमचे वाडवडील हजारो वर्षे या गोष्टी करीत आले तरीही तुमच्या शोचनीय स्थितीत एक तसूभर तरी फरक पडला आहे काय ? पूर्वीच्या फाटक्या चिंध्या तुमचे अंगावर, अर्ध्याकच्च्या भाकरीचेच तुकडे अद्याप तुमच्या पोटास, गुराढोरापेक्षाही गलिच्छ अशी आजतागायत तुमची राहणी व कोंबड्याप्रमाणे रोगराईस बळी पडण्याची पूर्वीचीच तुमची निर्बलता, या दुःसह परिस्थितीत अद्याप का बदल झाला नाही ? एकच औषध घेऊन रोग बरा होत नाही तर आपल्याला औषधात फेरबदल करावयास नको का ? वैद्य बदलावयास नको का ? तुमच्या आजपर्यंतच्या वाऱ्या तुमच्या कामी आल्या नाहीत, किंवा तुमचे उपवास जन्माची उपासमारी टाळण्यास समर्थ झाले नाहीत.

तुमची स्थिती पालटण्यास, तुमचा उद्धार करून घेण्यास आता तुम्हाला एकच उपाय आहे आणि तो म्हणजे राजकारण – कायदे करण्याची शक्ती ! तुम्हास पोटभर खाण्यास मिळत नाही, तुम्हाला लहानशा खोलीत गर्दी करून राहावे लागते, तुम्हाला द्रव्यार्जन करण्याचे साधन मिळत नाही व तुम्हाला बेकार राहावे लागते, याचे कारण काय ? देव का दैव ? या दोन्ही गोष्टी कारण नाहीत. तुम्हाला अन्न, वस्त्र, वसतिस्थान व शिक्षण देणे हे देशातील कायदे करणाऱ्या सत्तेचे काम आहे व या सत्तेचा कारभार तुमच्या सामर्थ्याने यापुढे चालणार आहे. या कायदे करणाऱ्या शक्तीत तुमचा समावेश झालेला आहे. संसार सुखाचा करून घेण्याकरिता त्या प्रकारचे कायदे तुम्ही करून घेतले पाहिजेत. समजा आज या रेल्वेच्या चाळीत तुम्हास प्रत्येक कुटुंबास एकच खोली मिळते परंतु कायदा होईल तर तो तुम्हास २-२ खोल्या सुद्धा मिळवून देईल.

तुमच्या मुलास शिक्षण देण्यास तुमच्याजवळ पैसा नाही परंतु कायदा होईल तर तुमच्या मुलांच्या शिक्षणाची सर्व सोय लागेल. तुमच्यात पुष्कळसे लोक बेकार आहेत. सर्व लोकास काम देणे किंवा काम नसेल त्या वेळेस त्यांना पोसणे हे सरकारचे कर्तव्य आहे. असा कायदा होईल तर बेकारीत उपाशी मरण्याची पाळी तुमच्यावर येणार नाही.

श्रीमंत लोक आजारी पडले तर पैसे खर्च करून औषधोपचार करतात व बरे होतात. परंतु गरिबांची आजारपणात कायद्यानेच सोय होईल. सारांश, सध्या सर्व सुखाचे आगर कायदा आहे. म्हणून आपण सर्वांनी कायदा करण्याची शक्ती पूर्णपणे हस्तगत करून घेतली पाहिजे. म्हणून ‘ जप, तप, पूजा-अर्चा करणे ‘ इकडील आपले लक्ष काढून राजकारणाची कास धरणे हाच तुमच्या उद्धाराचा मार्ग आहे. हीच गोष्ट आज प्रामुख्याने मला तुम्हाला सांगावयाची होती आणि ती तुम्हास स्पष्टपणे सांगितली आहे.

थोड्या दिवसापूर्वी काँग्रेसचे व वरिष्ठ वर्गाचे लोक असे म्हणत असत की, आम्हाला हवे तसे स्वराज्य दिल्याशिवाय आम्ही ते चालविण्यास मदत करणार नाही. परंतु आज ते निराळीच भाषा वापरू लागले आहेत.

कालच कायदेभंग करून तुरुंगात शिक्षा भोगत असलेले काँग्रेसचे एक पुढारी सरकारची माफी मागून बाहेर आले आहेत व ते म्हणू लागले आहेत की, ” म. गांधींची कायदेभंगाची चळवळ चुकीची आहे. मी यापुढे कायदेभंग करणार नाही. ” त्यापूर्वी महात्मा गांधींचे पट्टशिष्य श्री. राजगोपालाचारी यांनी जाहीर केले आहे की, नवीन सुधारणा मिळाल्यावर कॉंग्रेस शक्यतर त्यांचा स्वीकार करील. केसरीचे रा. केळकर यांचे म्हणणे आहे की, नवीन मिळणाऱ्या सुधारणा अपुऱ्या असल्या तरी सुद्धा त्या मान्य करण्यास आम्ही कबूल आहोत.

सारांश, हे लोक आज आपली पूर्वीची भाषा बदलीत आहेत. हे जे मतपरिवर्तन झाले आहे ते का झाले आहे ? या प्रश्नाचे उत्तर अगदी साधे आहे. आता बहिष्कार पुकारणाऱ्या लोकांना असे वाटू लागले आहे की, जर यापुढेही काँग्रेसच्या लोकांनी बहिष्कार तसाच चालू ठेवला तर येणारी सत्ता इतर समाजातील लोक बळकावून बसतील. म्हणून त्यांच्या दृष्टीने नको असलेली सुधारणाही ते स्वीकारण्यास तयार झाले आहेत. सारांश, जे लोक बहिष्काराची घोषणा करीत होते ते देखील स्वहित साधण्यास दक्ष आहेत.

यापुढे हिंदुस्थानात जो लढा चालू राहणार आहे तो ब्रिटिश लोक व हिंदुस्थानातील लोक यांच्यात चालू राहणार नसून हिंदुस्थानातीलच पुढारलेले लोक व मागासलेले लोक यांच्यात चालणार आहे. तुम्ही कदाचित असे म्हणाल की, मागासलेला वर्ग बहुसंख्यांक आहे म्हणून त्यास पुढारलेल्या वर्गापासून भीती बाळगण्याचे कारण नाही. परंतु तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे की, एखादा समाज बहुजन समाज आहे, एवढ्यावरच भागणार नाही तर तो जागृत, सुशिक्षित, स्वाभिमानी असेल तरच त्याचे सामर्थ्य वाढेल. नाहीतर गिरणीच्या मालकाने किंवा एखाद्या श्रीमंत सावकाराने तुम्हास लाचलुचपत दाखविली व त्यासाठी तुम्ही आपली मते त्यांना विकली तर तुमच्या समाजाचे वैशिष्ट्य नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या वर्गातील माणसांशिवाय भाडोत्री माणसे तुमच्या समाजाचे कवडीचेही कल्याण करू शकणार नाहीत. आपल्या समाजाला काही तरी वैशिष्ट्य आहे, ही भावना नेहमी जागृत ठेवली पाहिजे. तसेच आपसातील मतभेद दूर करून आपण आपले संघटन वाढविले पाहिजे व परिस्थितीचे ज्ञान करुन घेतले पाहिजे. यासाठी आपल्या समाजातील प्रत्येक माणसाने जनता पत्राचे वर्गणीदार होऊन परिस्थितीचे ज्ञान करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण परिस्थितीचे बरोबर ज्ञान झाल्याशिवाय तुमचा फायदा तुम्हास करून घेता येणार नाही. शेवटी व्हॉलिंटिअर समता सैनिक दल बद्दल मला काही सूचना करावयाच्या आहेत. व्हॉलिंटिअर म्हणजे आमचा ज्ञानवान व जाणता माणूस आहे, हे मी समजतो. नुसते खाकी रंगाचे कपडे अंगावर घातले म्हणजे लगेच व्हॉलिंटिअर होतो असे मी समजत नाही. आपल्या समाजाला सज्ञान करणे हे व्हॉलिंटिअर लोकांचे मुख्य कर्तव्य आहे. अज्ञान समाजाला ‘ जनता पत्र ‘ वाचून दाखवून त्यात काय लिहिले आहे हे समजावून देणे हे त्यांचे कर्तव्य आहे व ते आपले कर्तव्य बजावतील, अशी मला आशा आहे. आपणा सर्वांचे पुन्हा आभार मानून मी आपली रजा घेतो.

🔹🔹🔹

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे