बौद्ध संस्कृतीने या देशाला जे अनेक, सर्वोत्तम असे आविष्कार दिले त्यात प्रस्तारात कोरलेले लेणीं, स्तंभ आणि त्या वरील शिल्प हे केवळ अद्वितीयच! बाराबर लेणीं किंवा अशोक स्तंभ आणि आपले राष्ट्रीय चिन्ह – चार सिंहाचे शिल्प यांची झिलाई (चकाकी) आजही संशोधकांना आश्चर्यचकित करते. अशा पॉलिशला जगभरात “अशोकन किंवा मोरियन पॉलिश” म्हटले जाते. आजची लेझर टेक्नॉलॉजी देखील एवढ्या नजाकतीने असे कोरीव काम करू शकणार नाही !
भारतामध्ये सम्राट अशोकांनी लेणीं कोरण्याचा प्रारंभ केला. बिहार राज्यातील जहानाबाद जिल्ह्यातील बाराबर आणि नागार्जुनी डोंगरावर भारतातील सर्वात पहिली लेणीं कोरण्यात आली. त्यानंतर ही शिल्पकला बिहार, ओरिसा, बंगाल, आंध्र प्रदेश मार्गे महाराष्ट्रात आली आणि येथे तिचा उत्कर्ष झाला. भारतात जवळपास १२०० लेणीं आहेत ज्यात मुख्यतः ८५% या बुद्ध लेणीं, १०% हिंदू लेणीं (काही संशोधकांकब्या म्हणण्यानुसार ब्राह्मण लेणीं) आणि ५% जैन लेणीं आहेत.
लेणीं, त्यातील शिल्पकाम व शिलालेख हे बौद्ध संस्कृतीची देणं आहे. या सर्व लेणीं अंदाजे इ.स. पूर्व २०० ते इ.स. ८०० या कालावधीत कोरून बौद्ध भिक्खूंसाठी दान देण्यात आल्या होत्या.
या बुद्ध लेणीं असल्या तरीही काही ठिकाणी यांना “पांडव लेणीं” अथवा कोणत्यातरी देवतेच्या नावाने ओळखल्या जातात. हे “नामांतर” साधारणतः १८व्या शतकानंतर झाल्याचे दिसते. याला जरी अनेक कारणे असली तरी बुद्ध लेणींवर अतिक्रमण करून या सर्व देवता, लेणींत स्थापन करण्यात आल्या हे सत्य आहे आणि मग हे स्थान या देवीदेवतांची कसे यांचे माहत्म्य सांगणाऱ्या कथा रचण्यात आल्या. अशीच कथा रचून यातील अनेक लेणींना “पांडव लेणीं” म्हणायला सुरुवात झाली.
इतिहास किंवा पुरातत्त्वशास्त्र हे प्रत्येक गोष्टींचे पुरावे मागत असते. स्पष्ट भाषेत सांगायचे झाल्यास – बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल हा पुरातत्वशास्त्राचा निकष आहे! त्यांच्या दृष्टीने श्रद्धा ही एक मान्यता आहे जी मानसिक असते आणि म्हणूनच श्रद्धा ही पुरावा होऊ शकत नाही.
ऐतिहासिक किंवा पुरातत्त्वीय प्रमाण म्हणजे शिलालेख, हस्तलिखित, प्राचीन वास्तू अथवा उत्खनन मध्ये सापडलेले पुरावे हेच महत्त्वाचे प्रमाण.
ऐतिहासिक दृष्ट्या पांडव होऊन गेले याचा कुठलाही लिखित किंवा पुरातत्त्वीय पुरावा नाही. इथल्या काही तथाकथित इतिहासकारांनी किंवा साहित्यिकांनी ओढून ताणून पांडवांचा संपूर्ण इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र जागतिक स्तरावर अशा कथांना “मिथक कथा” हे सार्थ नांव देण्यात आले आहे.
बौद्ध संस्कृतीतील अनेक स्थळे अथवा डोंगरातील नैसर्गिक कपारी किंवा जंगले, पांडवांच्या नावाने प्रसिद्ध केली गेली!
जेव्हा स्वतःच्या संस्कृती मध्ये काही नवीन आविष्कार करण्याची धमक नसते, किंवा त्या संस्कृतीला चेहरा द्यायचा असतो, तेव्हा इतर संस्कृतीची प्रसिद्ध ठिकाणे encroach करून काबीज करणे हे मानसिक दिवळखोरीचे लक्षण आहे.
प्राचीन काळी पालि भाषेला मागधी आणि प्राकृत भाषेला अर्धमागधी या नावाने संबोधण्यात येत असे. तसेच या दोन्हीही भाषा, राजभाषा म्हणून मानण्यात येत होत्या. मगधाचे राज्य जवळपास संपूर्ण भारतवर्षावर होते आणि म्हणूनच पालि भाषा या सर्व प्रदेशात बोलली जायची. मराठी भाषेतील जवळपास ८0% शब्द हे पालि भाषेमधील आहेत!
पालि भाषेत “पंडू” या शब्दाचा अर्थ पिवळा किंवा फिकट पिवळा असा आहे (उदा.पंडुरोग). त्याकाळी सर्वसामान्य जणांना बौद्ध भिक्खूंना “भिक्खू” म्हणतात हे माहित नव्हते. आजही अनेक ठिकाणी भिक्खुंना महाराज, साधू किंवा गुरुजी म्हणण्यात येते. ज्या लेणींमध्ये हे बौद्ध भिक्खु राहत त्या लेणींचे आजूबाजूच्या गावांत जाऊन हे भिक्खू भिक्षाटन करीत आणि भिक्षा घेऊन डोंगरातील बुद्ध लेणींत परतत. गावातल्या लोकांना जर कोणी विचारले कि या डोंगरातील लेणींवर कोण राहते, तेव्हा त्यांचे उत्तर असे – पंडू वस्त्रधारी राहतात. बौद्ध भिक्खू हे “चीवर” घालतात जे पिवळ्या किंवा गडद भगव्या रंगाचे होते. त्यामुळे या लेणींना सुरुवातीच्या काळात “पंडू वस्त्रधारी रहात असलेली लेणीं” असे म्हणण्यात आले. नंतरच्या काळात, हे भले मोठे नांव म्हणण्या ऐवजी “पंडू लेणीं” म्हणायला सुरुवात झाली. (ASI च्या जुन्या ब्रिटिश रेकॉर्ड मध्ये देखील हीच नोंद आहे, मात्र आता बदलली आहे). कालांतराने या पंडू लेणींना “पांडू लेणीं” म्हटले जाऊ लागले (ब्रिटिश उत्तरार्ध काळात)आणि नंतर पुढे अंदाजे १८व्या शतकाच्या दरम्यान, “पांडव लेणीं” बोलण्यात येऊ लागले.
जेव्हा हा शब्द रूढ झाला, त्यानंतर हे नाव कसे योग्य यासाठी पांडवांची कथा रचायला किंवा आधीच अस्तित्वात असलेल्या पांडवांच्या कथेचा या लेणींशी संबंध जोडला जाऊ लागला. या बुद्ध लेणीं बाबत मग पांडवांच्या आख्यायिका जोडल्या जाऊ लागला. त्यामुळे बुद्ध लेणींना “पांडव लेणीं” म्हणण्याची प्रथा सुरू झाली जी आजतागायत आहे. काही ठळक उदाहरणे पाहू यात –
१. मध्य प्रदेशातील पचमढी येथील “श्री पांडव लेणीं” ही सहा लेणींचे समूह असून, इ.स पहिले शतक आणि इ.स. सहा ते सातवे शतक या दोन कालखंडात, बौद्ध भिक्खूंसाठी कोरली गेली आहे. मिथकानुसार या ठिकाणी पांडवांनी १२ ते १३ वर्ष वनवास केला होता व त्याच दरम्यान प्रत्येक भावासाठी एक एक लेणीं आणि द्रौपदी साठी एक लेणीं कोरली होती!
२. गोवा येथील बिचोलिम या ठिकाणी पांडव लेणीं ही ६व्या शतकातील बुद्ध लेणीं आहे. लेणींच्या शेजारी भ.बुद्धांचे एक मोठे शिल्प दगडात कोरले होते. नंतर हे नष्ट करण्यात आले, मात्र त्याच्या उरलेले शिल्पातून हा विध्वंस लक्षात येतो. मिथकानुसार पांडवांनी येथे लेणीं कोरून त्यात आश्रय घेतला होता.
३. नाशिकची प्रसिद्ध आणि सर्वात प्राचीन वास्तू असलेली पांडव लेणीं जिचे मूळ नाव शिलालेखानुसर त्रिरश्मी बुद्ध लेणीं आहे. ही लेणीं इ.स.पूर्व २०० ते इ.स. ८०० या कालावधीत कोरून बौद्ध भिक्खूंना दान देण्यात आली आहे असे येथील २७ शिलालेख स्पष्ट सांगतात. मात्र तरीही मिथकानुसार येथे पांडवांनी वनवास केला आणि त्याच दरम्यान येथे एका रात्रीत लेणीं कोरून त्यात राहू लागले!
४. कर्नाटक राज्यातील मंगळूर येथील पांडव लेणीं ही ६व्या शतकातील आहे. याच डोंगराच्या पायथ्याशी प्राचीन काळी “कंदरिका विहार” होते. या विहारात बोधिसत्त्व लोकेश्वरचे ५ फूट उंचीची ब्रँझ धातूचे सुंदर शिल्प आहे ज्याच्यावर पायाजवळ ९व्या शतकातील शिलालेख आहे जो स्पष्ट सांगतो की “अलुपु राजवंशाने हे लोकेश्वरचे शिल्प कंदारिका विहारामध्ये स्थापन केले” मात्र या शिल्पाला आज ब्रह्मदेव म्हणण्यात येते.येथे आणखीन दोन ब्रॉंझ धातूची शिल्प आहेत – अवलोकितेश्वर (सध्या नारायण म्हणतात) आणि भ.बुद्ध (सध्या वेदव्यास म्हणतात). १४व्या शतकानंतर या बुद्ध विहाराचे शैव मंदिरात रूपांतर झाले. पूर्वीचे कंदरिका विहाराचे रूपांतर आता “कद्री मंजुनाथ” मंदिरात झाले आहे. मिथकानुसार पांडवांनी या डोंगरावरची लेणी व शंकराची मूर्ती कोरली कारण ते शैव पंथाचे होते.
कोंकणात व इतरत्रही अशा अनेक लेणीं आहेत ज्यांचे नामकरण पांडव लेणी म्हणून झाले आहे. आजचे पुरातत्त्वीय अभ्यास आणि संशोधन आपल्याला सांगते कि मुळातूनच या बुद्ध लेणीं आहेत आणि त्यातील शिलालेखानुसार त्यांना नांव देखील होते. ज्या दानदात्यांनी अतिशय श्रद्धापूर्वक या लेणीं कोरून बौद्ध भिक्खूंना दान दिल्या, त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी, त्यांनी या लेणींना दिलेले नांव आम्ही का बरे अंमलात आणू शकत नाही?
अनेक बुद्ध लेणींचे अतिक्रमण करून, त्यांचे नामांतर केले गेले.
भारतातील प्रत्येक बुद्ध लेणींना, त्यांना कोरलेल्या डोंगरावरून अथवा गावावरून अथवा तेथे राहणाऱ्या भिक्खू संघाच्या नावाने ओळखले जात होते. तेथील शिकलेखांवरून ही माहिती आपल्याला कळते. मग ASIच्या अधिकाऱ्यांना हे कळत नाही का? कळते, पण असे केल्याने बौद्ध संस्कृतीची उत्कृष्ट कलाकृतीला केवळ मान्यताच नाही तर त्यांच्या जाहिरातींमधून त्याचा प्रसार ही झाला असता ना? या बुद्ध लेणींवर अनेक इतिहासतज्ज्ञ, पुरातत्वविदांनी Ph.D मिळवलेली आहे, मात्र “ही लेणीं बौद्ध धर्माची आहे” या एका ओळी पलीकडे त्या लेणींचे मूळ नांव किंवा त्यासाठी संशोधन केले जात नाही! ज्या बुद्ध लेणींवर संशोधन करून प्रसिद्धी मिळवली, त्या लेणींचे संवर्धन, संरक्षण अथवा मूळ नांव देण्यासाठी किती संशोधकांनी ASI ला जाब विचारला अथवा लोकजागृती केली?
ज्ञान हे प्रवाही असले पाहिजे नव्हे तसे ते असतेच. तसेच ते परिवर्तनीय देखील असतेच. नवनवे संशोधन जसे पुढे येत जाते, तसे जुने ज्ञान किंवा विचार हे बदलणे अपेक्षित असते. प्रत्येक ज्ञानशाखेत असे प्रवाह निर्माण होत असतात. इतिहास किंवा पुरातत्त्वशास्त्र या शाखेत अविरत संशोधन चालू आहे. मात्र तरीही काही इतिहासप्रेमी, तज्ञ अथवा पुरातत्वशास्त्रज्ञ हे जुन्या शब्दांना किंवा कंसेप्ट्स यांना बदलायला तयार नसतात. मग भले तुमचे संशोधन कितीही ताकदीचे, तर्कशुद्ध पुराव्यांसकट असोत!
मुळातच या लेणींना पांडव लेणीं म्हणायचा अट्टाहास का? सगळे पुरावे समोर असताना, या लेणींना “बुद्ध लेणीं” म्हणायला किंवा ठळकपणे मांडायला नकार देणारे इतिहासतज्ज्ञ, पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि इतिहास व संस्कृती प्रेमी एवढ्या कोत्या मनाचे कसे? अनेक बुद्ध लेणीं अतिक्रमण करून मंदिरे स्थापन करण्यात आली व त्यांचे अवैधरित्या नामकरण करण्यात आले, ती अतिक्रमणे किंवा नामकरण यांना चालते कसे? उदा. कार्ले बुद्ध लेणीं किंवा कपिचित बुद्ध लेणीं (लेण्याद्री), जाखिनवाडी बुद्ध लेणीं, इ.
ज्या बौद्ध संस्कृतीने या देशाची संस्कृती घडवली, ज्या संस्कृतीमुळे भारताचे नांव सर्व जगभरात झाले, त्या संस्कृतीबद्दल एवढी अनभिज्ञता की द्वेष?
म्हणूनच लोकजागृतीच्या माध्यमातून या बुद्ध लेणींना आम्हीं वरचेवर भेटी दिल्या पाहिजे, त्या समजून घेतल्या पाहिजे आणि त्या समजावून सांगितल्या पाहिजे. या प्राचीन बौद्ध वारसाची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे हे लक्षात घ्या. या बुद्ध लेणींकडे जेव्हा तुमचे पाय वळतील, तेव्हा अतिक्रमणाला आळा बसेल. मित्रांनो, म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतोय हे समजून घेतले पाहिजे!
त्रिवार वंदन सम्राट अशोकांना ज्यांनी ही बौद्ध संस्कृती शिल्पात कोरून ठेवली!
त्रिवार वंदन मेगेस्थेनेस, प्लिनी, ईत्सिंग, फा-हियान, हुयान त्सांग आणि इतर प्रवासी ज्यांनी या संस्कृतीचे वर्णन त्यांच्या प्रवास वर्णनात लिहून ठेवली!!
त्रिवार वंदन त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना विशेषतः जेम्स प्रिन्सेप आणि अलेक्झांडर कांनींघम ज्यांनी उत्खनन करून या संस्कृतीचे पुरावे जगासमोर आणले!!!
जाता जाता – पांडवांनी जर या लेणीं कोरल्या असतील तर त्यांनी सगळीकडे त्यांच्या गुरुची मूर्ती न कोरता, फक्त भ.बुद्धांच्याच किंवा बौद्ध संस्कृतीशी निगडित प्रतिमा का बरे कोरल्या असतील ?
अतुल मुरलीधर भोसेकर
9545277410
More Stories
“मुंबई महाराष्ट्रातच का राहिली पाहिजे ?” – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतीय लोकशाहीची मूल्ये आणि बुद्ध विचार – अतुल भोसेकर
नालंदा – बोधिसत्वांची मांदियाळी : अतुल मुरलीधर भोसेकर