August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

भिमा कोरेगाव – पूर्वजांच्या शौर्याचा इतिहास कायम ठेवा

आताच्या बौद्ध आणि पूर्वाश्रमीच्या महार जातीच्या पराक्रमी इतिहासाची मोठी परंपरा आहे. लढवय्या महारांना आपल्या पूर्वजांकडून मिळालेल्या अंगभूत नैसर्गिक साहसी गुणांमुळे त्यांना आपला इतिहास घडवता आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक अशा सर्वच आघाड्यांवर प्रस्थापितांच्या अन्यायाविरुद्ध दिलेली कडवी झुंज याची साक्ष आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूलभूत तत्वांसाठी त्यांनी ब्रिटीश, आणि नंतर नवस्वतंत्र भारतातील राज्यकर्त्यांच्या विरोधाला न जुमानता अखंडपणे तीव्र संघर्ष केला. यातून महारांच्या पूर्वजांच्या शौर्य, साहस आणि पराक्रमाची प्रचिती येते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी बाबा स्वतः ब्रिटीशांच्या सैन्यात सुभेदार होते. त्यांच्याकडूनच त्यांना सत्यासाठी साहसी आणि कडवी झुंज देणारे व्यक्तिमत्त्व लाभले.
महार सैनिकाला खऱ्या अर्थाने ओळख प्राप्त झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. १६ व्या शतकात शिवाजी महाराजांनी इथल्या महारांमध्ये आढळणाऱ्या शौर्य, धाडस, चिकाटी या गुणांमुळे त्यांना स्वराज्याच्या मोठ्या आणि अतिशय महत्त्वाच्या पदांवर नियुक्त केले. एवढेच नाही तर स्वतःचे अंगरक्षक, राज्य विस्तार आणि राज्य सुरक्षिततेतील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या महार सैनिकांवर सोपवून त्यांच्या शौर्याला न्याय दिला.
१८ व्या शतकात ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने महारांमधील या पराक्रमाला लक्षात घेऊन सर्वप्रथम बॉम्बे रेजिमेंट महार बटालियनची स्थापना केली. भिमा कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ रोजी पहिल्या महार रेजिमेंटच्या द्वितीय बटालियनच्या ५०० महार सैनिकांनी पेशव्यांच्या २० हजार घोडेस्वार आणि ८ हजार पायदल सैनिकांसोबत निकराची झुंज दिली आणि पेशवाईचा दारुण पराभव केला. ५०० महार सैनिकांनी २८ हजार पेशव्यांच्या केलेल्या पराभवामुळे ब्रिटीशांनी भिमा कोरेगाव येथे विजयस्तंभाची ऐतिहासिक उभारणी करून महार सैनिकांच्या शौर्याचे स्मारक उभारले.
२१ व्या आणि २७ व्या महार रेजिमेंटच्या तुकडीने १८५८ च्या युद्धात मोठा पराक्रम केल्याची नोंद आहे. १८९२ पर्यंत ब्रिटीश भारतात सैन्यामध्ये महार बटालियनचे आपले स्वतंत्र महत्त्व अबाधित होते त्यानंतर मात्र १८९२ मध्ये महार बटालियन बंद करण्यात आली. ब्रिटीश सरकारने सैन्य भरतीत नवीन धोरण स्विकारून क्लास रेजिमेंट या नावाने नवीन भरती करणे सुरू केले. त्यामुळे महार सैनिकांची भरती बंद झाली तत्कालिन कमांडर-इन-चिफ जनरलनी महार बटालियन ला ब्रिटीश सैन्यातून बाद‌ केले. ब्रिटीश सरकारला या धोरणामुळे बराच असंतोष आणि विरोधाचा सामना करावा लागला. दरम्यानच्या काळात महार समाजातील अनेकांनी विविध मार्गांनी आपली नाराजी व्यक्त केली. गोपाल बाबा वलंगकर यांनी १८९४ मध्ये ब्रिटिश सरकारला निवेदन देऊन महार बटालियन पूर्ववत सुरू करून महार सैनिकांना सामावून घेण्याचा आग्रह धरला. १९०४ मध्ये शिवराम जानबा कांबळे यांनीसुद्धा महार बटालियनच्या पुनर्गठनासाठी ब्रिटीश सरकारला विनंती केली आणि ब्रिटीश सरकारने अंगिकारलेल्या तत्कालीन सैन्य भरती धोरणाचा विरोध केला. मात्र, त्याला यश आले नाही. अखेर पहिल्या महायुद्धात ब्रिटीश सैन्याची अवस्था वाईट झाल्यामुळे महार बटालियनमध्ये पुन्हा सैन्य भरतीला मंजूरी द्यावी लागली, हा महार सैन्याचा गौरवच म्हणावा लागेल.
१९१७ ला पुन्हा १११ सैनिकांची महार बटालियनच्या सैन्यात भरती करण्यात आली तर १९२० मध्ये महार बटालियनला ७१ व्या पंजाब रेजिमेंटमध्ये सामावून घेण्यात आले. मात्र, १९२१ ला पुन्हा महार बटालियन बरखास्त करण्यात आली. १८१८ च्या आधीचा एक काळ असा होता की, ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या बॉम्बे आर्मीमध्ये १/६ सदस्य हे महार बटालियनचे होते, परंतु १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या पूर्वार्धात महार बटालियनच्या संदर्भात ब्रिटीश सरकारने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयामुळे महार सैनिकांच्या पराक्रमावर अन्याय झाला.
जुलै १९४१ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची व्हाईसरॉय एक्झिक्युटिव्ह कौन्सिलच्या डिफेन्स ॲडवायझरी कमिटीवर‌ नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून महार बटालियनची स्थापना करण्यासाठी ब्रिटिश सरकारवर दबाव आणला. त्यामुळे अखेर १ ऑक्टोबर १९४१ रोजी लेफ्टनंट जनरल कर्नल जोहन्सन यांच्या १३ व्या फ्रंटियर फोर्स रायफल्सच्या तुकडीत महार रेजिमेंट बटालियनची बेळगाव, कर्नाटक येथे स्थापन करण्यात आली
तसेच महार बटालियनची दुसरी महार रेजिमेंट बटालियन लेफ्टनंट जनरल कर्नल किरवान आणि मेजर भोलाजी रांजणे यांच्या नेतृत्वात कामठी, नागपूर येथे स्थापन करण्यात आली.
महार बटालियनचे कॅप्टन मोर्टलेमांस यांनी महार रेजिमेंटच्या टोपीवरील बिल्ल्यावर ऐतिहासिक भिमा कोरेगाव विजय स्तंभाचे चिन्ह अंकित करून त्यावर वर्ल्ड महार असे नोंदवून महार सैनिकांच्या अचाट पराक्रमाला जागृत ठेवले होते, हा इतिहास आहे.
महार बटालियन मधील सैनिकांनी विविध विभागात पराक्रम गाजवून तत्कालिन ब्रिटीश आणि स्वतंत्र भारताच्या सैन्यामध्येसुद्धा अनेक शौर्य विक्रम केले. त्यामुळे आजही भारतीय सैन्यात महार बटालियनचे नाव सन्मानाने घेतले जाते. महार रेजिमेंटच्या सैनिकांनी युद्धकाळात आणि शांतीकाळात आपल्या कर्तव्यदक्षतेमुळे जगभरात किर्ती मिळविली. महार रेजिमेंटने‌ ९ युद्धक्षेत्र सन्मान आणि १२ रणक्षेत्र सन्मान मिळविले आहेत. तसेच १ परमवीरचक्र, १ अशोकचक्र, ९ परम विशिष्ट सेना पदक, ४ महावीरचक्र, ४ किर्तीचक्र, १ पद्मश्री, ३ उत्तम युद्ध सेवा पदक, १६ अतिविशिष्ट सेवा पदक, ३० वीरचक्र, ३९ शौर्यचक्र पदक, २२० सेना मेडल आणि बरेच इतर पुरस्कार मिळविलेले आहेत. याशिवाय महार रेजिमेंटने २ चिफ ऑफ आर्मी स्टाफ, तसेच २ आर्मी कमांडर भारतीय सेनेला देण्याचा मान मिळविला आहे विशेष म्हणजे या महार रेजिमेंटने २ लष्कर प्रमुख आणि ५ राज्यपालपद भूषविणाऱ्या व्यक्ती देशाला दिल्या आहेत.
महार रेजिमेंटच्या या कामगिरीमुळेच शूरवीर आणि लढवय्या महारांनी भारतीय सैन्याची मान सदैव उंच ठेवली. सैन्यातील शौर्याला एका सन्माननीय उंचीवर पोहचविले. प्रचंड देशभक्ती आणि देशाच्या संरक्षणासाठी तत्परता यासाठी महार बटालियन सदैव अग्रेसर राहिलेली आहे.
महार समाजात जन्म घेणाऱ्या प्रत्येक माणसाला त्यांच्या पूर्वजांनी गाजविलेला इतिहास उजागर करून त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी नव्या पिढीला प्रोत्साहन दिले पाहिजे.

सौजन्य : दैनिक सम्राट
जय भिम..नमो बुद्धाय..जय संविधान