November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

भयग्रस्त बौध्दानो – निर्भय व्हा , निर्भय जगा : समाजभुषण आद. आयु.सयाजी वाघमारे

तुम्ही कितीही करा हल्ला , मजबतू आहे आमच्या भिमाचा किल्ला ह्या गाण्याची रिंगटोण होती , एका बौध्द तरूणांच्या मोबाईलवर सार्वजनिक ठिकाणी ऐकून , जात अभिमानी हिंदू तरूणांची माथी भडकली . त्यांनी भरदिवसा , बौध्द तरूणाचा खून केला .

हायवे वरून सुसाट वेगाने कार चालविणाऱ्या तरूणाला , ओव्हरटेक करून दुसरा तरूण पुढे जातो म्हणजे काय ? पुढे गेलेल्या कारच्या पाठीमागे जयभीम लिहीलेले वाचून , पहिल्या कारच्या ड्रायव्हर सिटवर बसलेला तरूण स्वतःशी उद्गारतो साले जयभीमवाले फारच माजलेत . त्यांच्या बरोबरचे गाडीत असलेले तरून त्याला दुजोरा देत , एकसाथ कलगा करतात घ्यारे त्याला . त्याच्या गाडीचा वेग वाढतो . दहा – पंधरा मिनिटात पुढच्या गाडीला , आडवी गाडी घालून ड्रायव्हर सिटवरच्या तरुणाला बाहेर खेचून त्याला काही कळण्यापूर्वीच खेल खल्लास ,

मी स्वतः सकाळी नॅशनल पार्कात मॉनिगवॉकसाठी जातो . दररोज समोरा समोर भेट होत असल्यामुळे समोरच्या दोघांच्या पैकी एक जण मला ‘ हरि ओम साद घालीत असे . त्याच्या ‘ हरि ओम ‘ साद घालण्याला मी स्मित करून एक हात उंचावून प्रतिसाद देत होतो . मी हरि ओम म्हणत नाही ही बाब त्याने हेरून , एक दिवस माझ्या समोर उभा राहत त्याने आवाज मोठा करून ‘ हरि ओम ‘ म्हणून साद घातली . त्याला माझ्याकडून ‘ हरि ओम ‘ म्हणून प्रतिसाद अपेक्षित होता , तो माझ्या समोरच उभा राहिल्यामुळे मला संवाद करणे भाग पडले . मी त्याला विचारले हरि ओम म्हणजे काय ? त्याचा उच्चार का करायचा ? माझ्या प्रश्नावर त्यांच्या जवळ उत्तर नाही . म्हणून तो गप्प उभा आहे हे पाहून त्याला सोडून मी पुढे चालू लागलो . त्या प्रसंगानंतर त्याचे ‘ हरि ओम ‘ साद घालणे आणि माझ्याकडे बघणे बंद झाले .

वरील प्रमाणे तीन प्रसंगात बौध्द तरूण आणि समोरचे गुडघ्यात मेंदू असलेले हिंदू एक दुसऱ्याच्या ओळखीचे नाहीत . ना त्यांच्यामध्ये काही वेगळी देणे – घेणे . बौध्द तरूण उठून दिसतो तो थाटामाटात आहे . हे बघूनच हिंदूची माथी फिरतात . आणि खुले आम बौध्दांच्या हत्या केल्या जातात कारण हेतू हा आहे की , बौध्दांनी बरोबरीने येण्याचा विचारच करता कामा नये .

भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत समता , स्वातंत्र्य , बंधुत्वाचा उद्घोष केलेला आहे . ती तत्वे ह्या देशातील हिंदू मंडळी स्विकार करण्यास राजी नाहीत . आणि तिच मंडळी सत्तास्थानी असल्यामुळे संविधान प्रमाण मानणारा बौध्द समाज भयग्रस्त आहे . बौध्द समाज भयग्रस्त आहे . हे माझ विधान आमच्या बौध्द बांधवाना रुचणारे नाही . तुम्ही गणपतीची दहिहंडीची , सत्यनारायणाची पुजा वर्गणी कां देता ? आपण बौध्द आहोत , म्हणून तुमची ओळख कां नाही ह्या प्रश्नात तुम्ही भयग्रस्त असल्याचे उत्तर आहे .

मला सांगण्यास अभिमान वाटतो सन १९७० साली संस्थापक सरचिटणीस म्हणून विक्रीकर खात्यात मागास वर्गीयांची संघटना स्थापन करण्यास मी पुढाकार घेतला . मागासवर्गीयांचे प्रश्न आणि ते सोडविले जावे म्हणून शासनाची धोरणे ह्याचा सांगोपांग अभ्यास असल्यामुळे येणारा प्रत्येक खातेप्रमुख विक्रीकर आयुक्त , अप्पर विक्रीकर आयुक्त आमच्या प्रश्नाला न्याय देत होते . संघटनेचे प्रश्न हाताळताना सार्वजनिक हिताचे प्रश्न राखीव जागेचा कोटा भरला जावा . २३ जून १९७४ पासून पदोन्नतीमध्ये आरक्षणाच्या संखेचे प्रमाण राखले जाते . हे महत्वाचे प्रश्न सोडवित असताना खाते निहाय चौकशी , विना परवानगी गैरहजेरी , अधिकाऱ्याकडून होणारी छळवणूक , गैरसोयीची बदली खाते निहाय होणाऱ्या परीक्षेत अधिक संधी मिळावी . ह्या सारखे व्यक्तीगत खूप प्रश्न संघटनेकडे येत असत . व्यक्तीगत प्रश्न लवकर सुटावे म्हणून मागासवर्गाकक्ष ( सेल ) ची निर्मिती करून घेतली . परंतू एक सुध्दा अधिकारी – कर्मचारी आपली तक्रार , गा-हाणे मांडण्यास पुढे आला नाही . आम्ही व्यक्तीगत त्यांचे प्रश्न सोडवावेत . आपले गा-हाणे मांडले म्हणजे आपण डोळ्यावर येवू ही भिती आज देखील आमचा बौध्द अधिकारी – कर्मचारी जो सार्वजनिक क्षेत्रात असो वा खाजगी क्षेत्रातला असो बाळगतो आहे .

मागासवर्गीयांना म्हणजेच प्रामुख्याने बौध्दांना जगण्यासाठी संरक्षण मिळावे म्हणून अॅट्रोसिटी कायद्याची निर्मिती झाली आहे . त्याचे परिणाम लिहीणे स्वतंत्र विषय आहे . जगण्याचा हक्क मागून मिळत नाही . आज बौध्द समाज जे जीवन जगतो त्याला जगणे म्हणण्याचे धाडस करणे वेडेपणाचे होईल . बळी बकरी – कोंबड्याचा दिला जातो . बौध्दांनी बकरी – कोंबड्यासारखे जगण्याच्या मानसिकतेतून बाहेर आले पाहिजे .

समाज भुषण  आद. आयु.सयाजी वाघमारे
📞 98 92 06 69 67, 70 39 48 34 38
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

 

संकलन : विलास पवार ,रायगड
📞91 37 66 2424