“अखिल भारतातील दलित जनतेला स्वतःच्या विकृत स्थितीची जाणीव झाल्यामुळे मी आता आपले जीवन परिपूर्णतेला नेण्याकरिता सुसंघटितरित्या उभी ठाकली असल्यामुळे तिच्या वाट्याला उज्ज्वल भविष्यकाळ येणार, ही परिस्थिती पाहून मला आनंदाचे भरते येते. मी त्यादिवशी व्हाइसरॉयला स्पष्ट शब्दात सांगितले, “तुम्ही मला पाचारण केले नसते तर मी तुम्हाला भेटण्यास आलोच नसतो. इंग्रजांच्या मागे धावत फिरण्याची माझी मुळीच इच्छा नाही.”दलित जनतेच्या सुख संवर्धनाची जबाबदारी एकीकडे इंग्रजांनी स्वतःवर घेतली होती. इंग्रज आपल्या शब्दाला जागतील व आपल्यावरील जबाबदारी पार पाडण्याकरता पुढे पाऊल टाकतील, असे मला त्यावेळी वाटले होते. पण तसे घडले नाही. इंग्रज हिंदुस्तान सोडून जात आहेत, याची मला मुळीच पर्वा नाही. परंतु आपणास ज्या सवलती घटनेत हव्या होत्या त्याची काहीच तरतूद करण्याचा प्रयत्न न करता ते जात आहेत. त्यांचे हे वागणे योग्य आहे की नाही याचा त्यांनीच निवाडा करावा. अस्पृश्यांच्या हितसंरक्षणाची काहीतरी तरतूद करण्याची आवश्यकता मी त्यांना शंभर वेळा प्रतिपादन केली. इंग्रजांनी ते काम करण्याचे नाकारले तरी सहा कोटी अस्पृश्यांचा भाग्यकाल उज्वल आहे याची मला खात्री आहे असे मी म्हणतो. मजूर सरकारने जरी न्याय्य
हक्क दिले नाहीत तरी सहा कोटी अस्पृश्य वर्ग कोणत्याही सहकार्याची व शक्तीची पर्वा न करता जे पाहिजे आहे ते मिळविलच मिळविल, याची माझ्या मनात किंचितही शंका नाही.
शेवटी सर्वांना सुबुद्धी आठवून या गोष्टीची जाणीव होईल व आपणास जे साध्य करायचे आहे, ते हस्तगत करता येईल, अशी मला आशा आहे, यासाठी आपणास फक्त संघटनेची गरज आहे. आपल्या अव्याहत प्रयत्नामुळे आपणास जे राजकीय हक्क प्राप्त होतील ते एका विवक्षीत काल मर्यादेपर्यंतच अबाधित राहतील हे तुम्ही लक्षात ठेवा. हिंदुस्थानात असा एक काळ येईल की ज्यावेळी केवळ आपलेच नव्हे तर सर्व समाजाचे राखीव हा हक्क नष्ट केले जातील. कारण त्यांची मुळीच आवश्यकता पडणार नाही. जेव्हा असे घडेल तेव्हा आपणास आपली संघटना, शक्ती व एकी यांच्या बळावर अवलंबून राहावे लागेल. म्हणून अभेद्य संघटना निर्माण करण्याचा दृढ निश्चय करा.
हाल-अपेष्टा सहन करण्यातच तुमची अभ्युन्नती आहे व म्हणून आपत्कालीन धीर सोडू नका. त्यातूनच तुमच्यात दिव्य तेज निर्माण होईल, हा एकच एक संदेश मला द्यावासा वाटतो. काही खेड्यात आपल्या दलितांवर होत असलेल्या अन्यायामुळे व अत्याचारामुळे तुम्ही हिंमत सोडता कामा नये. पूर्ण संघटित होण्याच्या कृतनिश्चयाने प्रेरित होऊन नव्या दमाने, प्रफुल्लित अंत:करणाने व नवोत्साहाने अव्याहत कार्य करण्याच्या मार्गाला आपण लागलो पाहिजे म्हणजे या देशातील कोणत्याही हालअपेष्टांची आपणास मुळीच मातब्बरी वाटणार नाही.”!!!
🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड- १, भाग-३, पान नंबर-६९)
दि. १४ एप्रिल १९४७,बाबासाहेबांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांना उद्देशून बाबासाहेबांचे भाषण.
🔹 संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर.
Buddhism In India
More Stories
मुलांना शिक्षण देण्यात कसूर करू नका – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
आंबेडकरानंतर बौद्ध समाज
बौद्ध धम्मात धर्मांतर