July 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बुध्द धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे.

“आम्ही झगडतो आहोत ते इज्जतीकरिता! मनुष्यमात्राला पूर्णावस्थेस नेण्याकरिता आम्ही तयारी करीत आहोत, त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची तयारी आहे. मला एका गोष्टीचे माञ आश्चर्य वाटते. एवढा वादविवाद सर्वत्र होतो आहे. पण एकाही माणसाने’ मी बौद्ध धर्मच का स्वीकारला’ हा प्रश्न मला विचारला नाही. कोणताही दुसरा धर्म न स्वीकारता हाच धर्म का स्वीकारला, हा कोणत्याही धर्मांतराच्या चळवळीतील मुख्य आणि महत्त्वाचा प्रश्न असतो. धर्मांतर करताना धर्म कोणता व का घ्यावयाचा हे तावून सुलाखून पाहिले पाहिजे.आम्ही हिंदू धर्मत्यागाची चळवळ १९३५ पासुन येवले तेथे एक ठराव करून हाती घेतली.”मी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदु धर्मात मरणार नाही.” अशी प्रतिज्ञा मी मागेच केली होती आणि काल मी ती खरी करून दाखविली. मला इतका आनंद झाला आहे, हर्षवायूच झाला आहे. नरकातुन सुटलो असे मला वाटते. मला कोणी अंधभक्त नको आहेत. ज्यांना बौध्द धर्मात यावयाचे आहे त्यांनी जाणीवेने आले पाहिजे. त्यांना तो धर्म पटला पाहिजे.
मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला धर्मही अत्यंत आवश्यक वस्तू आहे. आमच्या वाटेने आम्ही जाऊ; तुमच्या वाटेने तुम्ही जावे. आम्हाला नवीन वाट मिळाली आहे. हा आशेचा दिवस आहे. हा अभ्युदयाचा, उत्कर्षाचा मार्ग आहे. हा मार्ग काही नवीन नाही. हा मार्ग कोठून आलेला नाही. हा मार्ग इथलाच आहे. भारतातीलच आहे. या देशामध्ये २००० वर्ष बौद्ध धर्म होता. खरे म्हणजे, यापूर्वीच आम्ही बौद्ध धर्मात का गेलो नाही, याचीच आम्हाला खंत वाटते. भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्वे अजरामर आहेत. पण बुद्धांनी मात्र तसा दावा केलेला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.”!!!
🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ -डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड -१८,भाग- ३, पान नं. ५२३)
सोमवार दि. १५ऑक्टोबर १९५६ रोजी सकाळी दहा ते बारा पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्ध धर्माचा स्वीकार यासंबंधी उद्बोधक ,स्फूर्तिदायक आणि अत्यंत तळमळीचे, माहितीपूर्ण असे भाषण.
🔹 संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर.