November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

धर्मांतराने अस्पृश्यांना समानतेचा हक्क प्राप्त होणार आहे – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

अखिल मुंबई इलाखा मातंग परिषदेच्या अधिवेशनात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण…..

मुंबई इलाखा महार परिषदेच्या भव्य मंडपात दादर-नायगाव येथे
मंगळवार दिनांक २ जून १९३६ रोजी रात्री ९ वाजता अखिल मुंबई इलाखा मातंग परिषदेचे अधिवेशन भरले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवले येथे केलेल्या धर्मांतराच्या घोषणेस पाठिंबा देण्याकरिता ही मातंग बांधवांची मुंबई इलाख्यातर्फे परिषद भरविण्यात आली होती. या परिषदेस सात-आठ हजार मातंग स्त्री-पुरुषांचा समुदाय व मुंबई इलाख्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधी हजर होते. परिषदेच्या आरंभी नाशिकचे श्री. डी. जी. रोकडे, श्री. माने, श्री. फाळके यांचे स्वागतपर पद्य गायन झाले. त्यानंतर स्वागताध्यक्ष रामचंद्र नाथोबा काळोखे यांचे स्वागतपर भाषण झाले. यानंतर श्री. दौलतराव चिलोबा वायदंडे यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी सूचना मांडली गेली. या सूचनेस श्री. मारुतराव तूपसौंदर, बाबूराव रामजी कांबळे, श्री. के. एस्. सकाटे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर अध्यक्षांना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मोठ्या जयघोषात पुष्पहार अर्पण करण्यात आल्यावर अध्यक्ष श्री. बोताळने यांचे भाषण झाले.

परिषदेच्या यश चिंतनाप्रित्यर्थ निरनिराळ्या ठिकाणच्या पुढाऱ्यांकडून संदेश आले होते. त्यात श्री. शंकरराव शिवरामजी साठे (नगर), गणपत जयवंत पवार, अनंतराव दौलत लोखंडे (कोल्हापूर) वगैरे मंडळीचेही संदेश होते. या परिषदेस मे. रामचंद्र केरू जाधव (सोलापूर) दौलतराव गायकवाड (सोलापूर), पांडुरंग नाना वडेकर (कऱ्हाड), रामचंद्र पुनाजी सकट (दौंड), किसन भाऊराव वाघमारे (नगर), सीमाराम बाबाजी लांडगे (पुणे), दादोबा शेंडगे (पुणे), रामचंद्र काळोखे (जुन्नर), शांताबाई श्रावण सकाटे (खडकी), भागवत पवार (जुन्नर), शंकर शिवराम शिंदे (जुन्नर), आर. एस. फाळके (पुणे) आबा गेणू खंडाळे (जेजुरी), मोहना मल्हारी साठे (नगर) वगैरे प्रमुख प्रतिनिधी मंडळी आली होती.

अखिल मुंबई इलाखा मातंग परिषदेमध्ये पास झालेले ठराव….

ठराव १. (अ) – ही अखिल मुंबई इलाखा मातंग परिषद पूर्ण विचारांती असे ठरविते की, समता आणि स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मातंग समाजाला धर्मांतर केल्याशिवाय उपाय नाही.
ठराव १. (ब) ही परिषद असे जाहीर करते की, अखिल अस्पृश्यांचे एकमेव पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेवर मातंग समाजाचा पूर्ण विश्वास असून त्यांचे बरोबर मातंग समाज सामुदायिकरित्या धर्मांतर करण्यास तयार आहे.ठराव मांडणार – केरू रामचंद्र जाधव (सोलापूर),
अनुमोदन देणार – सीमाराम बाबाजी लांडगे (पुणे), आर. एस्. फाळके (मुंबई), कु. शांताबाई श्रावण सकाटे (मुंबई), रामचंद्र पुनाजी सकट (दौंड), बाळकृष्ण बडेकर (सातारा), किसन भाऊराव वाघमारे (अहमदनगर).

ठराव क्र. २ – मुंबई इलाख्यातील शहरोशहरी असणाऱ्या पोलीस खात्यात पोलीसांकडून जी दवंडी थाळी पिटविण्यात येते त्या कामाकरिता मातंग जातीचा गृहस्थ ठेवण्यात यावा. तसेच खेडोपाडी दवंडी पिटविण्याच्या कामी काही एक वेतन मिळत नसल्यामुळे दवंडी देणारास भरपूर वेतन द्यावे अशी ही परिषद सरकारास विनंती करते.
ठराव मांडणार – के. एस्. सकाटे.
अनुमोदन देणार – के. एम. काळोखे.

ठराव क्र. ३ – मुंबई इलाख्यातील लागवडीस उपयोगी पडणाऱ्या फॉरेस्ट जमीनी आम्हा मातंग समाजास काही ठराविक मुदतीने सारा न घेता लागवडीस द्याव्या व मुदतीनंतर उत्पन्नाच्या मानाने एक चतुर्थांश सारा घ्यावा.
ठराव मांडणार – के. एम. काळोखे.
अनुमोदन देणार – शंकरबुवा सकाटे, बाबुराव रामा कांबळे, डी. सी. वायदंडे, के. जी. कुचेकर, मारुती ज्ञानू तुपसौंदर.

ठराव क्र. ४ – मातंग समाजातील ज्या ज्या इसमास दाखले असतील ते दाखले व भिकार हजेरी बंद करून सदरहू जात गुन्हेगार सदरातून वगळून टाकण्यात यावी अशी ही परिषद सरकारास विनंती करते.
ठराव मांडणार – सीमाराम बाबाजी लांडगे (पुणे).
अनुमोदन देणार – के. एम. काळोखे, एस्. के. देशमुख, बाबूराव दौलतराव गायकवाड.

ठराव क्र. ५ – मुंबई इलाख्यातील सरकारी खात्यांमध्ये मातंग जातीच्या लोकास पट्टेवाल्यापासून तो वरच्या अधिकाऱ्यांपर्यंतच्या नोकऱ्या देण्याबद्दल या परिषदेची सरकारला विनंती आहे. ठराव मांडणार – एस्. के. देशमुख.
अनुमोदन देणार – केरू रामचंद्र जाधव.

ठराव क्र ६ – ग्रहण अमावस्याचे वेळी भिक्षा मागण्यासारख्या व इतर अनेक जुन्या अनिष्ट रूढ्या ताबडतोब बंद कराव्यात अशी ही परिषद मातंग समाजातील रूढीप्रिय बंधुभगिनींना ताकीद देत असून, या अनिष्ट, समाजाला काळीमा लावणाऱ्या रूढींचा त्याग त्यांनी न केल्यास त्या व्यक्तीचे गर्हणीय वागणुकीबद्दल मातंग समाजाला विचार करावा लागेल. ठराव मांडणार – अध्यक्ष.

ठराव क्र. ७ – नगर जिल्ह्यातील लोकल बोर्डात मातंग समाजाचा नाॅमिनेटेड मेंबर असावा अशी ही परिषद सरकारास विनंती करते.
ठराव मांडणार – अध्यक्ष.

ठराव क्र. ८ – मातंग समाजात शिक्षणाचा प्रसार होण्याकरिता वसतिगृहांची अत्यंत जरूरी आहे. तरी या कामी एक मध्यवर्ती मंडळ स्थापून त्यास वसतिगृह उघडण्याच्या कामी समाजाने सहाय्य करावे. तसेच मातंग विद्यार्थी हितचिंतक मंडळ, मुंबई याससुध्दा आर्थिक मदत करावी. ठराव मांडणार – डी. सी. वायदंडे.
अनुमोदन देणार – के. जी. कुचेकर, पांडुरंग नाना बडेकर.

परिषदेत ठराव पास झाल्यानंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले.

याप्रसंगी बोलतांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
नुकताच तुम्ही जो धर्मांतराचा ठराव पास केला त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करू इच्छितो. तुम्ही जो ठराव पास केला त्याबद्दल मला आनंद वाटणे अगदी साहाजिक आहे. धर्मांतराची घोषणा ही काही एकाच जातीकरता नसून सर्व अस्पृश्यांकरिता आहे. जेवढ्या अस्पृश्यातील जाती धर्मांतराला अनुकूल होतील, तेवढ्या मला हव्या आहेत. असे जरी आहे तरी धर्मांतराविषयी मी आपणापुढे काही बोलू इच्छित नाही. धर्मांतराची साधक – बाधक चर्चा जी करावयाची ती मी महार सभेत केलेली आहे. तिची पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे असे मला वाटत नाही. दुसरे असे की, धर्मांतराचा ठराव तुम्ही आताच पास केला आहे. तेव्हा पास झालेल्या ठरावावर बोलणे निरर्थक आहे. खरे म्हटले असता धर्मांतराच्या ठरावावर तुमच्या सभेत भाषण करावयाची माझी मुळापासून इच्छा नव्हती. मातंग सभेत येऊन मी भाषण करावे अशाप्रकारची सूचना जेव्हा तुमच्या स्वागत कमिटीकडून मला करण्यात आली तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, मला भाषण करण्यास काही हरकत नाही, परंतु मी धर्मांतराविषयी सभेत काही बोलणार नाही. त्याचे कारण असे की, सभेत मी धर्मांतराविषयी भाषण केले असते व तद्नंतर धर्मांतराचा ठराव करण्यात येऊन तो पास करण्यात आला असता तर क्षुद्र बुद्धीच्या लोकांनी असा गैरसमज पसरविला असता की, माझ्या भिडेमुळे किंवा दडपणामुळे मातंग लोकांनी धर्मांतराचा ठराव पास केला. असे जर झाले असते तर तुम्ही केलेल्या धर्मांतराच्या ठरावाला जेवढी किंमत देणे योग्य आहे तेवढी किंमत देण्यात आली नसती व तुमच्या परिषदेचे महत्त्व निष्कारण कमी झाले असते. धर्मांतर हे जबरदस्तीने किंवा सक्तीने करता येणे शक्य नाही. त्या बाबतीत भीड घालणे योग्य नव्हे व तिचा उपयोगही होणे शक्य नाही. ज्याच्या मनाला पटेल तोच धर्मांतर करील. तेव्हा धर्मांतरावर न बोलण्याचे जे मी ठरविले आहे त्याबद्दल तुम्हा कोणाला वाईट वाटणार नाही व तुम्हा कोणाचा त्यासंबंधी गैरसमज होणार नाही अशी मला आशा आहे.

मी आज या सभेत बोलण्याकरिता जो उभा आहे तो फक्त महार-मांग समाजात एकोपा कसा व्हावा हे सांगण्याकरताच उभा आहे. महार-मांग समाजामध्ये खेडोपाडी वितुष्ट आहे. त्यांच्यात सूत नाही, सलोखा नाही ही गोष्ट लपवून ठेवण्यात काही अर्थ नाही. त्यांच्यामध्ये वितुष्ट आहे. हे वितुष्ट नाहीसे कसे होईल याचा विचार करणे हे तुम्हा-आम्हाला कर्तव्य आहे. ही तेढ बरेच दिवसांपासून उत्पन्न झालेली आहे व जेव्हापासून ती माझे कानावरती आली आहे तेव्हापासून मांग लोकांचे काय म्हणणे आहे हे ऐकून घेण्याची संधी मिळावी व महार लोकांतर्फे जे मला सांगावयाचे ते सांगण्याची संधी मिळावी म्हणून माझ्याजवळ ज्या मांग लोकांची ये-जा आहे अशा मांग लोकांना ५/६ वर्षापासून तुम्ही मांग लोकांची कोठेतरी सभा भरवा व मला बोलवा असे मी सांगत आलो आहे. परंतु तशाप्रकारची सभा त्यांना आजवर भरविता आली नाही, म्हणून मी दिलगीर होतो. ज्या संधीची मी वाट पाहून राहिलो होतो ती संधी आज मला मिळाली याबद्दल मला धन्यता वाटते व ज्या मंडळींनी ही सभा भरवून ही संधी प्राप्त करून दिली त्यांचा मी आभारी आहे. मांग समाजात जी सुधारणेची चळवळ चाललेली आहे त्या चळवळीचे बारकाईने निरीक्षण केले असता असे दिसून येईल की, त्या चळवळीचा सारा कटाक्ष महार लोकांच्याविरुद्ध आहे. महाराशी व्यवहार ठेवू नका, महाराचे अन्न खाऊ नका, त्यांना केरसुणी विकू नका, त्यांचा विटाळ माना असे मांग पुढारी मांगांना सांगत आहेत असे मी ऐकले आहे. या त्यांच्या शिकवणीचा मला काही खेद वाटत नाही. तुमच्या स्वाभिमानाला वाटत असेल की महार आपल्या हातचे खात नाहीत तर मांगांनी तरी त्यांच्या हातचे का खावे, तर तुम्ही त्यांचे हातचे खाऊ नका. परंतु मला जो प्रश्न विचारावयाचा आहे तो हा की. महारच तुमचे हातचे खात नाहीत अशातला काही भाग नाही. ब्राह्मण लोक तुमचे हातचे खात नाहीत, नव्हे कोणत्याच जातीचे लोक तुमच्या हातचे खात नाहीत, ही जर गोष्ट खरी आहे तर मग तुमचे पुढारी ब्राह्मणांचे हातचे खाऊ नका असा उपदेश का करीत नाहीत. जे जे लोक मांगांच्या हातचे खात नाहीत, त्या त्या जातीच्या हातचे मांगांनी खाऊ नये असा उपदेश जर मांगांचे पुढारी करतील तर त्यांच्यावर कोणीही दोषारोप करणार नाही. उलट त्यांचा उपदेश मी तरी शिरसावंद्य मानीन कारण स्वाभिमान हा सर्वांना आहेच. नव्हे, सर्वांना असलाच पाहिजे. परंतु ब्राम्हणांचे हातचे खाऊ नका, मराठ्यांचे हातचे खाऊ नका, असा उपदेश कोणीही मांग पुढाऱ्यांनी केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. उलट महारांचे हातचे खाऊ नये एवढीच शिकवण त्यांच्याकडून मांग लोकांना देण्यात येते. ही शिकवण द्वेषमूलक आहे ही गोष्ट तुम्हा मांग पुढाऱ्यांना नाकबूल करता येणार नाही.

मी स्वतः उच्चनीच असा भेदभाव मानीत नाही व महार जातीनीही उच्चनीच भेद पाळावयाचे सोडून दिले आहे. चांभार स्वतःला उच्च मानतात व महारामांगांचे हातचे आपण खाणार नाही असे म्हणतात. तुम्हीही त्यांच्याप्रमाणे महारांचे हातचे आपण खाणार नाही असे म्हणू लागला आहात. खरे म्हटले असता अमुक एक जात अमक्यापेक्षा उच्च आहे असे म्हणावयाला काही आधार किंवा पुरावा नाही. कोणा जातीला श्रेष्ठत्त्वाचा काही ताम्रपट दिलेला नाही. कोण कोणाच्या हातचे खातो व कोण कोणाच्या हातचे खात नाही या एका गोष्टीवर हिंदू समाजात जातिश्रेष्ठत्व अवलंबून असलेले आपल्याला दिसून येते. अमुक एक जात अमुक एका जातीपेक्षा श्रेष्ठ का ? तर ती त्या जातीच्या माणसाच्या हातचे अन्न खात नाही एवढे कारण लोकांना पुरेसे होते आणि म्हणून पुष्कळशा जाती इतर जातींपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत हे दर्शविण्यासाठी इतर जातींशी अन्नोदक व्यवहार करण्याचे सोडून देतात. तुम्ही देखील याच मार्गाचा अवलंब केलेला दिसून येतो. महारापेक्षा मोठे म्हणवून घ्यावयाचे याशिवाय महाराच्या हातचे अन्न खाऊ नका अशा शिकवणीचा दुसरा कोणता तरी हेतू असेल असे मला तरी वाटत नाही. परंतु अशी शिकवण देणाऱ्या मांग पुढाऱ्यांनी एक-दोन गोष्टींचा विचार केला असल्याचे मला दिसत नाही. महारापेक्षा श्रेष्ठ म्हणवून घेण्यात मांगांचे काय हित साधणार आहे हे मला समजत नाही. महारांपेक्षा मोठे म्हणवून घेतल्याने ब्राह्मण लोक, मराठे लोक इत्यादि वरच्या वर्गाचे लोक जर मांगांचे मोठेपण कबूल करून त्यांना आपल्यात आत्मसात करण्यास तयार असतील तर गोष्ट निराळी. महारांपेक्षा मोठे म्हणवून घेण्याने जर ब्राह्मण लोक मांगांना आपल्या मुली देण्यास व मांगांच्या मुली करण्यास तयार असतील तर महारापेक्षा मांग श्रेष्ठ आहेत असे सिद्ध करण्याकरता महारांच्या हातचे न खाण्याचा निर्धार जर मांगांनी केला तर त्यात काही हशील आहे, असे म्हणता येईल. तेव्हा ब्राह्मण लोक व इतर स्पृश्यवर्गीय हिंदू लोक तुम्हाला आत्मसात करून घ्यावयास तयार आहेत किंवा नाहीत याचा विचार तुम्ही पूर्णपणे करावयास पाहिजे. ते जर तयार नसतील तर विनाकारण महार लोकांशी अहमहमिकेची भूमिका घेऊन खोटा दंभ वाढवून तुम्ही मांग लोक आपले नुकसान करून घ्याल अशी मला भीती वाटते. दुसरे असे की, मांग व चांभार लोक महारांच्या हातचे आपण खाणार नाही असे जर म्हणू लागले तर चांभारांच्या व मांगांच्या हातचे आपण खाणार नाही असे महार लोकांना देखील म्हणता येईल. असे काही महार लोक आहेत, जे म्हणतात की, चांभार व मांग यांच्यामध्ये जो दुराभिमानाचा पारा चढलेला आहे तो साफ उतरवून टाकावा. ते जर आपल्याशी खात पीत नाहीत तर महारांनीही त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवू नये व मी तुम्हास असे सांगू इच्छितो की, महार लोकांनी जाती अभिमान धरला व मांगा-चांभाराशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवावयाचा नाही असे जर त्यांनी मनात धरले तर ते मांगांचे व चांभारांचे पुष्कळ नुकसान करू शकतील. अस्पृश्यांमध्ये महार ही बहुसंख्यांक जात आहे. त्यांच्याशिवाय अस्पृश्यांची कोणत्याही प्रकारची चळवळ तसेच अस्पृश्यांचे राजकारण त्यांच्या मदतीशिवाय शक्य होणार नाही. महारांच्या सहाय्याशिवाय मांग व चांभार काही करू असे म्हणत असतील तर ती त्यांची गैरसमजूत आहे हे त्यांना कळून येण्यास उशीर लागणार नाही. परंतु कोणी वासरू मारले म्हणून आपण गाय मारावी ही गोष्ट जशी न्याय्य होऊ शकत नाही, तसेच मांग व चांभार हे दुराभिमानाने पीडित होऊन महारांशी संबंध ठेवणार नाहीत असे म्हणू लागले म्हणून महारांनी त्यांच्याशी संबंध ठेवू नये हे म्हणणे मला स्वतःला पसंत नाही आणि तशाप्रकारची शिकवण मी महार समाजाला दिलेली आहे. महार लोकांना जाती अभिमान धरावयाचा नाही किंवा मांगापेक्षा किंवा चांभारापेक्षा श्रेष्ठ म्हणवून घ्यावयाचे नाही. त्यांना आपली तशीच सर्व अस्पृश्यांची संघटना करावयाची आहे आणि म्हणूनच महार लोक खोट्या अभिमानाला बळी न पडता सर्व अस्पृश्य लोकांना कवटाळून चळवळ करू इच्छित आहेत. महार लोक जातीभेद पाळीत नाहीत असे ते नुसते तोंडाने म्हणत आहेत असा आरोप कोणालाही करता येणार नाही. ते ही गोष्ट कृतीत उतरवीत आहेत, हे मी पुराव्यानिशी सिद्ध करून देईन. पुण्याला एक अस्पृश्य वसतिगृह आहे ही गोष्ट तुम्हापैकी काही जणांना माहीत असेल. हे वसतिगृह सरकारमार्फत चाललेले आहे. त्यात महार, मांग, चांभार वगैरे अस्पृश्य जातींची मुले आहेत. तेथे पूर्वी एकच स्वयंपाकी सर्व मुलांचे जेवण करण्याकरिता ठेवण्यात आला होता व सर्व मुले एकाच पंगतीस बसून जेवत असत. काही काळाने चांभार पुढाऱ्यांनी चांभार मुलांना फूस दिली की, तुम्ही महार-मांगांच्या बरोबर जेवू नये व त्यांच्या हातचे अन्न खाऊ नये. त्याचा परिणाम असा झाला की, या विद्यार्थी वसतिगृहात महार, मांग, चांभार वगैरे जातींच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठे वितुष्ट माजले व महार मुलेही आपणही कोणाच्याच हातचे खाणार नाही म्हणून आम्हालाही आमच्या जातीचा स्वतंत्र स्वयंपाकी पाहिजे, असा आग्रह धरू लागली.

हे वितुष्ट इतके वाढले की, मला स्वतः मुंबईहून पुण्यास जावे लागले व तेथे जाऊन मी महार मुलांची समजूत करून चांभार मूर्ख झाले तर महारांनी मूर्ख का व्हावे ? असा प्रश्न केला. चांभार जरी मांगाशी जेवत नसले तरी तुम्ही व मांग एकत्र जेवावे असा सल्ला दिला. मला जर जाती अभिमान असता तर महारांच्या मुलांना, चांभार व मांग तुमच्याशी जेवत नाहीत तर तुम्हीदेखील त्यांच्याशी जेवू नका असा सल्ला मला देता आला असता, पण मी तसा सल्ला दिला नाही. मी स्वतः सोलापूरला एक बोर्डिंग काढलेले होते. त्याला महार जातीशिवाय दुसऱ्या जातीची मदत नव्हती. तथापि, त्यात सर्व अस्पृश्य जातीतील मुले घेण्यात येत होती. मांग होते, चांभार, महार, ढोर व भंगीही होते. बरेच दिवसपर्यंत सर्व मुले एकाच पंगतीला बसून एकाच स्वयंपाक्याने केलेले अन्न खात असत. परंतु काही दिवसांनी चांभार-ढोरांच्या मुलांनी वाद उपस्थित केला व आपणाला चांभार स्वयंपाकीच पाहिजे असे ते म्हणू लागले. तेव्हा मी सांगितले की, सर्वात कनिष्ठ अशी जात जी भंगी जात त्या जातीतला स्वयंपाकी आपण ठेवू म्हणजे कोणालाच तक्रारीला जागा राहणार नाही. त्याला महारांची मुले कबूल झाली, पण बाकीची मुले तयार होईनात. अखेर ते बोर्डिंग मोडले. परंतु आम्ही तत्त्वापासून ढळलो नाही. ज्या ब्राह्मण लोकांच्या किंवा मराठे लोकांच्या नादाने तुम्ही वागता ते लोक हे करू शकतील काय ? अशाप्रकारचे आश्वासन ते जर तुम्हाला देत असतील तर तुम्ही खुशाल त्यांचेकडे जा. आम्हाला कर्तव्य नाही. मला तुम्हाला एवढेच सांगावयाचे आहे की, महार ही ब्राह्मण व मराठे यांच्यापेक्षा हजारोपटीने सुधारलेली जात आहे. जातीभेद मानावयास ते तयार नाहीत. सर्व समदुःखी लोकांशी सहकार्य करावयास ते तयार आहेत. तुम्हाला जर त्यांच्याशी सहकार्य करावयाचे असेल तर त्यांनी तो मार्ग खुला करून ठेवलेला आहे. तुम्ही आमच्यात या. महारांच्या सामर्थ्याचा व संघटनेचा फायदा तुम्हाला मिळू शकेल. जे काही राजकीय हक्क अस्पृश्यांना मिळालेले आहेत ते मिळविण्याकरता खटपट कोणी केली ? त्याच्याकरता तुम्ही मांग लोकांनी किंवा चांभार लोकांनी कोणता प्रयत्न केला ? मी निर्भयपणे असे सांगू इच्छितो की, या राजकीय हक्कांकरिता जर कोणी स्वार्थत्याग केला असेल तर तो एका महार जातीनेच केला आहे. परंतु त्याचा फायदा तुम्हा सर्वांना मिळालेला आहे. नाशिक पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये आज जो अस्पृश्यांचा शिरकाव झालेला आहे, तो कोणाच्या खटपटीमुळे झालेला आहे ? हे ट्रेनिंग स्कूल स्थापन झाल्यापासून त्यात अस्पृश्य जातीचा केव्हाही प्रवेश झाला नव्हता. इतकेच नव्हे तर ज्या जातीचा सामाजिक दर्जा हलका आहे अशा जातींना त्या शाळेत घेऊ नये, असा निर्बंध सरकारने घातला होता. तो निर्बंध काढून टाकण्याकरता कोणत्याही मांग पुढाऱ्याने अगर चांभार पुढाऱ्याने खटपट केलेली नाही. त्यांच्याकरिता मी खटपट केलेली आहे व त्या शाळेचे द्वार अस्पृश्यांना खुले करून दिले आहे. पण या सवलतीचा फायदा कोणाला मिळाला ? या सवलतीचा फायदा महारांना तर मिळाला नाहीच तो फक्त मांगांना व चांभारांना मिळालेला आहे. जे दोन पोलीस इन्स्पेक्टर आज अस्पृश्यांपैकी म्हणून पोलीस खात्यात नोकरी करीत आहेत त्यांपैकी एक मांग आहे, एक चांभार आहे. महारांचे जे उमेदवार होते, ते या दोघांपेक्षाही अनेकपटीने हुशार होते व लायक होते. परंतु त्यांपैकी एकालाही घेण्यात आले नाही. उलट जे जे म्हणून महाराचे उमेदवार कमिटीपुढे परीक्षेकरिता गेले, त्या त्या उमेदवारांना त्यांच्या लायकीसंबंधाने प्रश्न विचारण्याचे सोडून देऊन तुम्ही किती विहिरी बाटविल्या ? तुम्ही अस्पृश्यांच्या चळवळीत भाग घेता का ? वगैरे वगैरे नादानपणाचे प्रश्न विचारून त्यांना घालवून देण्यात आले. तथापि, महारांनी कोणत्याही प्रकारची तक्रार केलेली नाही. आम्ही झगडलो व दुसऱ्यांनी लूट केली, अशाप्रकारची तक्रार महारांनी कधीही केली नाही.

मुंबईत पोलीस खात्यात अस्पृश्यांची भरती सरकार जातीभेदाच्या अडचणीमुळे करावयास तयार नव्हते. आज त्याच पोलीस खात्यात अस्पृश्यांचे कितीतरी पोलीस नोकरीत आहेत. ही गोष्ट करण्यास सरकारास कोणी भाग पाडले ? चांभार किंवा मांग लोकांनी याच्याकरिता कधीतरी खटपट केली होती काय ? या खटपटीचा फायदा मांग-चांभार यांनी घेतला किंवा नाही ? महार लोकांनी चळवळ करावी व इतर जातींनी त्याचा फायदा घ्यावा याचे हे दुसरे उदाहरण आहे. आज डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डात, म्युनिसीपालिटीत, तालुका लोकल बोर्डात अस्पृश्यांचे कितीतरी प्रतिनिधी असल्याचे दिसून येते. त्यांपैकी त्यात कितीतरी मांग व चांभार असतील. या जागा मिळविण्याकरता चांभार व मांग या जातींनी काय खटाटोप केला ? या जागा मिळविण्याचे सर्व श्रेय महार लोकांना आहे. तथापि, त्याचा फायदा मांगांनीही घेतला आहे व चांभारांनीही घेतला आहे. जेव्हा जेव्हा म्हणून लोकल बोर्डाच्या किंवा म्युनिसीपालिटीच्या जागेकरिता माझी शिफारस मागण्याकरिता लोक आलेले आहेत तेव्हा तेव्हा मी त्यांना असे सांगितले आहे की, मांगाचा १२ आण्याचा माणूस पुढे आला तर महाराच्या १६ आणे किंमतीच्या माणसास मी मागे बसावयास लावीन. याच्यापेक्षा जास्त व्यापकदृष्टी कोणता समाज ठेवू शकेल असे मला वाटत नाही. नवीन राज्यघटनेत वतनदारी ही मताधिकाराच्या लायकीकरिता ज्या अनेक बाबी ठरविण्यात आल्या आहेत त्यांपैकी एक बाब आहे. महार लोक वतनदार असल्याकारणामुळे अर्थात त्यांना या बाबीचा फायदा मिळाला आहे व इतर जातींना मिळू शकत नाही, या गोष्टीचा विपर्यास करून काही लोक असे भासवीत आहेत की, मी मुद्दाम पक्षपात बुद्धीने प्रेरित होऊन निव्वळ महारांचा फायदा करण्याच्या हेतूने मताधिकाराच्या लायकीच्या कोष्टकात वतनदारी ही बाब घालून घेतली. या आरोपात काही सत्य नाही. केवळ महार-मांगांमध्ये वितुष्ट वाढविण्याच्या हेतूने हा आरोप करण्यात आला आहे. वतनदारी ही बाब मताधिकाराकरिता जमेस धरण्यात यावी ही सूचना माझी नव्हे. ही सूचना मुळात प्रांतिक सरकारने केलेली सूचना आहे. तिच्या बऱ्यावाईटाची जबाबदारी माझ्यावर नाही. दुसरे असे की, केवळ मुंबई इलाख्यातील अस्पृश्य वतनदारांना मताधिकार दिला आहे असे नसून साऱ्या हिंदुस्थानातील अस्पृश्य वतनदारांना देण्यात आलेला आहे. मद्रास, यु. पी. वगैरे सर्व प्रांतातून ज्या अस्पृश्य जातींना वतनदारी आहे त्या त्या जातींना हा लाभ मिळाला आहे. असे असताना फक्त मुंबई इलाख्यात तो लागू करण्यात आला आहे, असे म्हणणे धादांत खोटे आहे. मी याच्याही पुढे जाऊन असा प्रश्न विचारतो की, मुंबई इलाख्यात तरी हा हक्क महारांनाच मिळाला आहे काय ? हा हक्क महारांना मिळालेला नसून वतनदारांना मिळालेला आहे. कानडी भागात महार वतनदार नसून मांग लोक वतनदार आहेत. अर्थात वतनदारीमुळे त्या भागात जो फायदा होणार आहे तो कोणाचा? मांगांचा का महारांचा ? अशारितीने तुम्ही विचार केलात तर तुम्हाला स्पष्ट दिसून येईल की, ज्या लोकांनी हा गिल्ला चालविला आहे ते लोक एकतर अज्ञानी असले पाहिजेत किंवा पाजी असले पाहिजेत. अशा लोकांच्या उपद्व्यापापासून तुम्ही सावध असले पाहिजे असा इशारा तुम्हाला देणे मला आवश्यक वाटते. महारांचे राजकीय वैभव वाढवावे व बाकीच्यांचे कमी करावे अशी जर माझी वृत्ती असती तर काल महारांच्या राजकीय परिषदेत मी जे भाषण केले ते केले नसते. कालच महारांच्या सभेत मी स्पष्टपणे सांगितले की, येत्या नव्या कायदे कौन्सिलमध्ये ज्या १५ जागा अस्पृश्यांकरिता दिलेल्या आहेत त्यापैकी काही जागा मांग लोकांना दिल्या पाहिजेत. ब्राह्मणेतरात अस्पृश्यांप्रमाणे लहान लहान गट आहेत. अस्पृश्यांप्रमाणेच ब्राह्मणेतरांना देखील सात राखीव जागा दिलेल्या आहेत, परंतु त्यापैकी एकही जागा ब्राह्मणेतरात ज्या लहानसहान अल्पसंख्यांक जाती आहेत त्यांना आपण देऊ, अशाप्रकारचे आश्वासन एकही मराठा जातीचा पुढारी देऊ शकत नाही. परंतु मी ते आश्वासन तुम्हाला देऊ शकतो इतकेच नव्हे तर त्याप्रमाणे ते आश्वासन कृतीत उतरवण्याचा मी प्रयत्न करीन असेही आश्वासन मी तुम्हास देऊ इच्छितो. जे औदार्य मराठा समाज दाखवू शकत नाही ते औदार्य महार समाज दाखवू शकतो. ही गोष्ट साधी आहे किंवा सोपी आहे असे कोणी म्हणू शकणार नाही.

हे मोठे अवघड व कठीण असे काम आहे. कोणतीही जात झाली तरी तिला स्वार्थ आहे आणि तो स्वार्थ बाजूला ठेवून आपल्या प्राप्तीचा काही वाटा दुसऱ्यास देणे हे व्यावहारिकदृष्ट्या लहानसहान काम नव्हे. नुसता प्राप्तीचा वाटा देण्याकरिता महार लोकांची तयारी आहे इतकेच नव्हे तर महार-मांग हा जातीभेद मोडून त्यांची एक जात करण्याकरिता देखील महार जातीची तयारी आहे. ही गोष्ट महार जात धर्मांतर करावयास तयार आहे व तुम्हीसुद्धा त्यांच्याबरोबर धर्मांतर करावे असे आग्रहाने ते जे सांगत आहेत यावरून सिद्ध होत आहे. धर्मांतराचे जे काही अनेक हेतू असतील त्यांपैकी अस्पृश्यातील जातीभेद काढून टाकणे हा एक प्रमुख हेतू आहे. सर्व अस्पृश्यांनी धर्मांतर केल्याशिवाय अस्पृश्यातील जातिभेद मोडू शकणार नाही. जातीभेद मोडल्याखेरीज जातीमत्सर निघून जाणार नाही. धर्मांतर हे केवळ महारांचे विशेष कल्याणाकरिता काढलेले आहे अशातला काही भाग नव्हे. सर्व अस्पृश्यांना एका सूत्रात गोवून त्यांच्यातला भेदभाव नाहीसा करून त्यांना सामर्थ्यवान व संघटित करणे हाच धर्मांतराचा मुख्य हेतू आहे. धर्मांतर हे एक प्रकारचे अमृत आहे. त्या अमृताने आम्ही शुद्ध होऊ अशी आमची खात्री आहे. परंतु, आम्हीच शुद्ध व्हावे, एवढाच आमचा हेतू नसून मांगांनी व चांभारांनीदेखील धर्मांतराचे अमृत पिऊन शुद्ध व्हावे अशी आमची इच्छा आहे. हे अमृत सर्वांकरिता आहे. तुकाराम महाराजांनी एका अभंगात सांगितल्याप्रमाणे, ” सेवोनिया रस वाटितो अनेका। घ्यारे होऊ नका रानोरान || ” असा सल्ला ते तुम्हाला देत आहेत. धर्मांतराने तुम्हाला महारांशी रोटीबेटी व्यवहाराचा, समानतेचा हक्क प्राप्त होणार आहे व तो समानतेचा हक्क देण्यास महार लोक तयार आहेत. एवढे औदार्य दुसरा कोणता समाज दाखवू शकेल ? कौन्सिलातील जागा देण्यापेक्षा ही देणगी मोठी नव्हे का ? एवढे औदार्य महार जात दाखविण्यास तयार आहे. त्या औदार्याची तुम्हाला जर किंमत नसेल तर तुमचा मार्ग तुम्हास मोकळा आहे. ज्या वाटेने तुम्हास जावयाचे असेल त्या वाटेने तुम्ही खुशाल जा. आमचा उद्धार आम्ही करून घेऊ. त्याकरिता आम्हाला आमची शिरे द्यावी लागली तरी आम्ही देऊ. चांभार-मांगांच्या सामर्थ्याची आम्हाला काही जरूरी नाही. परंतु आम्हाला तसे म्हणावयाचे नाही. महारांना जातीचा अभिमान बाळगावयाचा नाही किंवा आपल्या जातीचे महत्त्व त्यांना वाढवावयाचे नाही. त्यांना जातीभेद मोडून टाकावयाचा आहे आणि सर्व अस्पृश्य जातीचा एक समाज करावयाचा आहे. नुसते मांग म्हणून राहाणे यात काही हशील आहे असे मला वाटत नाही. तुम्ही जर जातीचा खोटा अभिमान बाळगाल तर तुमचा सर्वस्वी नाश होईल, असा इशारा याप्रसंगी देणे मला अगत्याचे वाटते.

●●●

वरीलप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाल्यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला.

मुंबई इलाखा मातंग परिषद यशस्वीरितीने पार पाडण्यास व कार्याचा प्रसार करण्याच्या कामी मे. कृष्णा गुंडाजी कुचेकर, रामचंद्र गुंडाजी कुचेकर, यशवंत लक्ष्मण वायदंडे, शंकरबुवा सकटे, बाबू रामा कांबळे, ज्ञानू दाजी इवळे, मारुति ज्ञानू तुपसौंदरे, धोंडीबा तानू कांबळे, केशव धोंडी देवकुळे, गंगाराम सखाराम यादव, लाला पिरा यादव, भागाराम जाधव, लहू लक्ष्मण अल्हाट, केशव धोंडी देवकुळे, हन्या केशव बोताळजे, तुकाराम यशवंत चव्हाण, रत्नाकर खंडूजी आवळे, शंकर नाथा आवळे, निवृत्ती डी. शिंगोणकर, दाजी संतू कांबळे, चिंगाजी वायदंडे, के. डी. वायदंडे, आबा गेणू खंडाळे, लहू अंकूष मोहिते, के. एम. काळोखे, शंकर शिंदे, बाळू सखाराम यादव, एस्. के. देशमुख, मार्तंड तयापा माने, राऊ मलू माने वगैरे सद्गृहस्थांनी जिवापाड मेहनत करून परिषदेचे कार्य निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल, नायगाव बी. डी. चाळ नं. ४ आणि १३ येथील मुलामुलींनी स्वागतपर गायन सुस्वरात गाईल्याबद्दल त्यांना व त्यांचे शिक्षक रामचंद्र गुंडाजी कुचेकर व पेटी वाजविण्यात प्रविण असलेले मास्टर लक्ष्मण कुचेकर यांना त्यांच्या परिश्रमाबद्दल, मे. कांबळे बँड मास्तर यांनी कुलाब्यातील मुलांना तालीम देऊन त्यांना थोड्याच मुदतीत प्रविण केल्याबद्दल, कुलाबा बँड, कुलाबा स्काऊटस्, सैतानचौकी स्काऊटस्, वडाळा स्काऊटस्, नायगाव स्काऊटस्, डिलाईलरोड स्काऊटस् यांनी येऊन परिषदेस शोभा आणून उत्तमतऱ्हेची व्यवस्था राखल्याबद्दल, तसेच मुंबई शहरवासीयांनी हे एवढे अवाढव्य कार्य पार पाडण्यासाठी जी शक्तिनुसार आर्थिक मदत केली त्याबद्दल त्यांचेही आभार मानण्यात आले. तसेच पुणे, अहमदनगर, दौंड, सोलापूर, कऱ्हाड, नाशिक वगैरे ठिकाणाहून प्रतिनिधी येऊन त्यांनी कार्यास शोभा आणली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

***

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे