July 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

मी संघर्ष करून अस्पृश्यात जाज्वल्य स्वाभिमान निर्माण केला आहे – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

मुंबई राज्यातील व मध्य प्रदेशातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मुंबई येथे भरलेल्या परिषदेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण ….

परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सिद्धार्थ काॅलेजमध्ये रविवार दिनांक १७ ऑगस्ट १९५२ रोजी मुंबई राज्यातील व मध्य प्रदेशातील प्रमुख कार्यकर्त्यांची परिषद भरली होती. या सभेत अगोदर जाहीर केल्याप्रमाणे ” शेड्यूल्ड कास्ट्स इप्रुव्हमेंट ट्रस्ट ” तर्फे मुंबईत जो हॉल बांधण्याचा संकल्प डाॅ. बाबासाहेबांनी जाहीर केला होता त्यासंबंधी विचारविनिमय झाला.

दलितांचे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सभागृहात आगमन होताच सर्वांची अंतःकरणे आनंदातिशयाने भरून आली. टाळ्यांच्या प्रचंड गजरात, अभिमान भरल्या अंतःकरणाने जमलेल्या प्रचंड जनसमुदायाने त्यांचे स्वागत केले. इतक्या दिवसांनी आपल्या नेत्याचे पवित्र दर्शन घडल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना एक प्रकारचा अनिवार्य असा आनंद झालेला दिसून येत होता. मुंबई राज्यातील प्रमुख कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष वगैरे बरीच मंडळी सभेस हजर होती. प्रांताध्यक्ष दादासाहेब गायकवाड, ज. से. बापूसाहेब राजभोज, बॅरिस्टर बापूसाहेब कांबळे, दादासाहेब शिर्के, श्री. आर. जी. खंडाळे, दौंड, दादासाहेब पोवार, मनमाड, पी. जी. रोहम, नगर, सावंतसाहेब, सातारा, श्री. बी. सी. कांबळे, मुंबई शहरचे अध्यक्ष खरात, ज. से. भातनकर, श्री. बाबर सोलापूर जिल्हाध्यक्ष, श्री. पी. टी. मधाळे, सातारा वगैरे प्रमुख कार्यकर्ते या परिषदेला हजर होते.

मुंबई राज्यातील व मध्य प्रदेशातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या या परिषदेत बोलताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
बंधुंनो,
अस्पृश्यांच्या उद्धारासाठी एका माणसाला एका युगात जे काही करता येणे शक्य होते ते मी केले आहे. माझे काही मार्ग यशस्वी झाले; काही झाले नसतील पण माझे कार्य मी धैर्याने चालूच ठेवले आहे. २५ वर्षात मी तुमच्यासाठी जे कार्य केले ते एवढ्या अवधीत एका व्यक्तीने कधीही, कुठेही केलेले नाही. हे मी गर्वाने सांगत नाही तर आत्मविश्वासाने सांगतो. ही वस्तुस्थिती आहे. माझ्या कार्याची दिशा तीन पद्धतीची होती !

एक, अस्पृश्य समाजात प्रथम स्वाभिमान निर्माण करणे ! हे कार्य पृथ्वीमोलाचे मला वाटले. मी राजकारणात पडण्यापूर्वी अस्पृश्य समाज कोणत्या पातळीवर होता, कसा माणुसकीहीन बनला होता, याचे मी एक उदाहरण देतो.

वीस पंचवीस वर्षापूर्वी जळगाव येथे दरवर्षी ब्राह्मण भोजने घालण्याची प्रथा होती. ती भोजने झाल्यावर त्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या ते उकिरड्यावर टाकीत असत. तेथे आमचे अस्पृश्य बसत असत आणि त्या पत्रावळ्या गोळा करून उकिरड्यावरून नेत असत. काहीकाही वेळा त्यांच्यात या उष्ट्या पत्रावळ्याबद्दल मोठे तंटे माजत असत. या अवस्थेत अस्पृश्य समाज होता. केवळ तो माणुसकीहीन बनला होता असे नव्हे तर तसे मानण्यात तो धन्यवाद मानीत होता. मानवी अधःपाताची ती कमाल होती.

मी गेली पंचवीस वर्षे झगडून त्यांना सर्वस्वी सुखी करू शकलो नसलो तरी त्यांच्यात जाज्वल्य स्वाभिमान निर्माण केला आहे. अन्यायाविरुद्ध झगडण्याचे सामर्थ्य निर्माण केले आहे. हे काही साधे-सुधे काम नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना राजकीय हक्क प्राप्त करून देण्याची. आपल्याला पूर्वी दिल्ली कॅबिनेटमध्ये झाडूवाल्याचेसुद्धा काम मिळत नसे. आज २५ वर्षांनंतर तेथे अस्पृश्य समाजाचा मंत्री नेऊन बसविला आहे.

तिसरी गोष्ट शिक्षण क्षेत्रातील. २५ वर्षांपूर्वी अस्पृश्य समाजाला शिक्षणाची सारी दारे बंद होती. ती मी उघडी करून दिली आहेत. अस्पृश्य मुलांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सरकारशी झगडून स्कॉलरशिप्स व फ्रिशिप्स मिळवून दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर त्यांना ‘ आपले म्हणता येईल ‘ असे प्रगतिमान ” सिद्धार्थ ” नावाचे कॉलेज मी यांच्यासाठी काढून दिले आहे. या कॉलेजात ३०० अस्पृश्य विद्यार्थी आहेत. दरवर्षी त्यांना २,००० रुपयाच्या स्कॉलरशिप्स दिल्या जातात. यांना राहाण्यासाठी जोडूनच बोर्डिंग काढले आहे. तसेच औरंगाबादला याच कॉलेजची शाखा उघडली आहे.

आता एक गोष्ट करण्याची माझ्या मते अपूरी राहिली आहे. ती म्हणजे मुंबई शहरात आपल्या समाजाच्या मालकीचा एक हॉल बांधण्याचा माझा हेतू फार भिन्न आहे. मुंबईत इतर हॉल आहेत. तेथे नाटके, तमाशा वगैरे खेळ होतात. केवळ तशा तऱ्हेच्या करमणुकी करण्यासाठी हॉल बांधण्याचा माझा हेतू नाही.

हा हॉल बांधण्यात माझा एक महत्त्वाचा उद्देश आहे. अस्पृश्य समाजावर हरघडी स्पृश्य हिंदुंकडून खेड्यांवर अन्याय होत आहेत. आजच मला एक पत्र आले आहे की, औरंगाबादच्या एका खेड्यात अस्पृश्य समाजाच्या वस्तीभोवती स्पृश्यांनी तारेचे कुंपण घालून त्यांना कोंडून टाकून त्यांचे जीवन असह्य केले आहे . अशा एक ना दोन हजारो तक्रारी प्रत्यही माझ्याकडे येत आहेत.ती दुःखे तुमच्यापेक्षा मला जास्त कळतात. ह्या दुःखाचे  निवारण करण्यास एक मध्यवर्ती निधी हवा आहे, पैशाची जरूरी आहे.

दुसरी गोष्ट ही की, या सर्व तक्रारी एकत्र जमवून ठेवण्यासाठी मुंबईला आपल्या समाजाची एक मध्यवर्ती कचेरी हवी आहे. त्या कचेरीत काम करणाऱ्या लोकांना पगार द्यायला हवा. पण या गोष्टी जमणार कशा ? तेव्हा हा हॉल बांधून झाला तर वर्षाला लाख-भर रुपये भाड्याच्या रूपाने आम्हाला मिळतील. हे ठिकाण मध्यवर्ती आहे. तेव्हा हा हॉल बांधून झाला तर ही एक मोठी अडचण दूर होईल.

केवळ माझे नाव घेऊन जयजयकार करण्यापेक्षा जी गोष्ट माझ्या दृष्टीने अत्यंत मोलाची आहे ती करण्यासाठी प्राणाच्या मोलाने तुम्ही झटा. मी हॉल बांधण्याच्या कार्याला फार मोठे महत्त्व देतो. त्यामुळे अस्पृश्य समाजावर खेडोपाडी घडणाऱ्या अत्याचाराचे तात्काळ आपल्याला निर्दालन करता येईल. तेव्हा तीन महिन्याच्या आत तुम्ही या कार्यासाठी खेड्यापाड्यातून एक लाख रुपये जमवून पाठवा. प्रत्येक गावामधून ‘ दहा दहा ‘ रुपये जमवा आणि मुंबईला शेड्यूल्ड कास्ट्स् इंप्रुव्हमेन्ट ट्रस्टचे सेक्रेटरी श्री. शांताराम अनाजी उपशाम यांच्याकडे पाठवा. तो हॉल बांधण्यास मला दसऱ्याला सुरूवात करावयाची आहे. मला एक लाख रुपयांची तूट आहे. तेव्हा प्रत्येक गावाकडून दहा दहा रुपयेप्रमाणे प्रत्येक तालुक्यातून एक एक हजार रुपये जमवून पाठविण्याचे कामास आजपासून लागा.

🔹🔹🔹

संकलन -आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे