February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

आपल्या कार्यकर्त्याने राजकीय, धार्मिक आणि आर्थिक प्रश्नांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

मराठवाडा शेड्युल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या वतीने मराठवाडा भागातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….

मराठवाडा शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या वतीने मराठवाडा भागातील कार्यकर्त्यांची जुलै १९५३ मध्ये बैठक बोलावली होती. (बैठकीची तारीख आणि स्थळ उपलब्ध होऊ शकले नाही.) या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शनपर भाषण केले.

मराठवाडा भागातील कार्यकर्त्यांच्या या बैठकीत केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
कार्यकर्त्यांची अशी भावना झाली आहे की, निवडणूक म्हणजेच राजकारण. निवडणुकांशिवाय राजकारणाला दुसरा काही अर्थच नाही अशीही भावना दिसते. म्हणूनच निवडणुकीच्या वेळी तिकीट मिळविण्यासाठी सर्वांची धडपड चाललेली असते आणि निवडणुका संपल्या की जो तो आपला स्वस्थ बसतो. परंतु समाजाचे आयुष्यात राजकारण हे एक अल्प कारण आहे. राजकारण म्हणजेच काही सर्वस्व नव्हे. खरे पाहिले तर पॉलिटिक्स, राजकारण जे काय आहे ते शेष अन्न आहे. समाजाची काही उन्नती होते, ती केवळ राजकारणाने होत नाही. समाज उन्नतीची अनेक कारणे आहेत. सामाजिक, आर्थिक या बाबी काही कमी महत्वाच्या नाहीत. समाजाची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी या सर्व बाबींकडे सारख्याच प्रमाणात कार्यकर्त्यांनी लक्ष देणे जरुर आहे.

राजकारण हीच एक महत्त्वाची बाब आहे अशी भावना झाल्यामुळेच निवडणुकीच्या वेळी तिकीट मिळविण्यासाठी धडपड करणे, तिकिट न मिळाल्यास समाजात फाटाफूट करणे, निवडणुकीत पडल्यास निराश होऊन स्वस्थ झोपणे आणि निवडून आल्यास असेंब्लीमध्ये जाऊन तोंड बंद करून बसणे एवढेच कार्य आहे, असा कार्यकर्त्यांचा समज होत असतो.

या हैद्राबाद विभागात आज जवळ जवळ दोन वर्षे असेंब्लीचे कामकाज चालू झालेले आहे. या विभागात राखीव जागेवर एकंदर ३१ सभासद अस्पृश्य समाजाचे वतीने निवडून आले आहेत. परंतु या दोन वर्षात त्यांनी तेथे जाऊन काय केले ? असेंब्लीमध्ये एकंदर तीन प्रकारे काम करावयाचे असते. असेंब्लीमध्ये – (१) ठराव आणणे, (२) बिल मांडणे आणि (३) बजेटचा अभ्यास करून बजेटवर भाषण करणे, या तिन्ही गोष्टींपैकी, एखादी तरी गोष्ट या ३१ लोकांपैकी एखाद्याने केलेली आहे काय ? माझ्या तरी निदर्शनास यापैकी काहीच आलेले नाही. मग कदाचित असेंब्लीच्या कामकाजाचा वर्तमानपत्रात वृत्तांत येत नसतो म्हणून मला माहीत होत नसेल. सांगण्याचा उद्देश एवढाच की, असेंब्लीमध्ये निवडून गेल्यावर निदान या गोष्टी तरी आपल्या सभासदांनी करावयास पाहिजेत. राजकारण हाच जर कार्यकर्त्यांच्या समोर मुख्य उद्देश असेल तर त्यांनी तो तरी कार्यक्रम चांगल्याप्रकारे पार पाडला आहे काय ? मला हे सुद्धा दिसत नाही.

या ३१ लोकांनी एका उद्देशाने, एका निश्चयाने, एका जमावाने जर वागायचे ठरविले तर मला खात्री आहे की काँग्रेस सरकारच नव्हे तर काँग्रेस आणि इतर पक्षही आपल्या लोकांना घाबरल्याशिवाय राहाणार नाहीत.

या ज्या राखीव जागा मिळविल्या आहेत त्या अस्पृश्य समाजाच्या हितासाठी मिळविल्या आहेत. जी माणसे आमच्यासाठी पाठविली, ज्यांच्यावर आमचा विश्वास आहे अशा निवडून आलेल्या माणसांनी अस्पृश्य समाजाचे हितासाठी झगडावयास नको काय ? माझा जो गांधींशी विरोध होता किंवा देशातील लोकांचा आणि काँग्रेसचा जो मी विरोध सहन केलेला आहे, त्याचे कारण एकच. अस्पृश्य समाजाचे हितासाठी ते लोक काहीच करू शकत नाहीत, हेच ते कारण आहे. सरकारने किंवा या देशातील लोकांनी आमचे म्हणणे ऐकले, आमच्या मागण्या मान्य केल्या, तर मग विरोधाचे आणि लढ्याचे काहीच कारण राहाणार नाही. पण हे असे होत नाही, म्हणूनच आपणास लढावे लागते.

राजकारण कोणास करावयाचे असेल, तर राजकारणाचा चांगला अभ्यास केला पाहिजे. अभ्यासाशिवाय जगामध्ये कोणालाच काहीच साधता येणार नाही. आपल्या समाजातील प्रत्येक कार्यकर्त्याने राजकीय, धार्मिक आणि आर्थिक या सर्व प्रश्नांचा चांगला बारकाईने अभ्यास करावयास पाहिजे. ज्यांना पुढारी व्हावयाचे असेल त्यांनी पुढाऱ्याची कर्तव्यकर्मे, पुढाऱ्याची जबाबदारी काय आहे याची जाणीव ठेवावयास पाहिजे. कारण आपल्या समाजातील पुढाऱ्यांवर अत्यंत मोठी जबाबदारी आहे. इतर समाजाच्या पुढाऱ्यांसारखी आपल्या समाजातील पुढाऱ्यांची स्थिती नाही. इतर पुढाऱ्यांचे काय ? सभेत जाणे, लांबलचक भाषण करणे, टाळ्या मिळविणे आणि शेवटी हार गळ्यात घालून घरी येणे, एवढेच काम इतर पुढाऱ्यांकडे असते. आपल्या समाजातील पुढाऱ्यांना हे करून भागणार नाही. चांगला अभ्यास करणे, विचार करणे, समाजाच्या उन्नतीसाठी स्वतः रात्रंदिवस सतत अंगमेहनत करणे, हे आपल्या तरी पुढाऱ्यांना करावे लागेल. तरच तो लोकांचे थोडेफार भले करू शकेल, तोच खरा पुढारी ठरू शकेल.

तुम्हाला वाटते पुढारी होणे फार सोपे आहे पण माझ्या मते पुढारी होणे फारच अवघड काम आहे. मला स्वतःला पुढारीपण फार जड वाटते कारण इतरांसारखे माझे पुढारीपण नाही. मी ज्यावेळी चळवळ सुरू केली त्यावेळी कसल्याही तऱ्हेची संघटना नव्हती. मलाच स्वतःला सर्व कामे करावी लागत होती. संघटना करावयाची म्हटले तर मला स्वतःलाच ती करावी लागत असे. वर्तमानपत्र काढावयाचे म्हटले तर मलाच काढावे लागले. म्हणूनच ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’, ‘जनता’ वगैरे वृत्तपत्रे मला स्वतःलाच काढावी लागली. प्रेस चालवावयाचा म्हटले तर मला स्वतःच प्रेसची जुळवाजुळव करावी लागली. थोडक्यात सांगायचे म्हटले म्हणजे मला शून्यातून सर्व निर्माण करावे लागले. मी असे म्हणत नाही की जे काय झाले आहे ते पूर्ण झाले आहे. तर मी असेच म्हणतो, मी जे काही केले ते व्हावयास पाहिजे त्याचा शतांश देखील झालेला नाही. अद्याप पुष्कळ करावयाचे शिल्लक आहे. रस्ता पुष्कळ चालून जावयाचे आहे. आतापर्यंत जे झाले ते फक्त रोपटे लावले आहे. चळवळीचा अद्याप वृक्ष वाढावयाचा आहे. सांगायचा उद्देश हाच की, आपल्यातील पुढार्‍यांवर पुढारीपणाची फारच मोठी जबाबदारी आहे.

लोकात जागृती निर्माण करणे, त्यांची संघटना करणे हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. ते दरेक पुढाऱ्याने केले पाहिजे. आपल्या कार्यकर्त्यांच्या अंगी फारच धैर्य असावयास पाहिजे. ज्याच्या अंगी धैर्य नाही तो पुढारीच होऊ शकत नाही. जो मनुष्य मरावयास तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो असे समजावे. या देशातील हिंदू लोक आपणाला पुष्कळ त्रास देतील, आपल्या मार्गात अनेक अडचणी निर्माण करतील. परंतु काही झाले तरी आपण जो मार्ग स्वीकारलेला आहे, ज्याला आपण इन्सानियत म्हणतो, माणुसकी म्हणतो, तो मिळविण्याचा मार्ग आपण कधीच सोडता कामा नये. यासाठीच आपला प्रत्येक कार्यकर्ता धैर्यवान असावयाच पाहिजे. मान सन्मानाने वागणे हे आपले परम कर्तव्य आहे, असे समजले पाहिजे आणि त्याच्यासाठी आपली चळवळ चालू आहे.

दुसरी गोष्ट आपल्या लोकात देवभोळेपणा फारच शिरला आहे. जो तो उठला सुटला पंढरी-पैठण-आळंदीला जातो. मला आपणास हे विचारावयाचे आहे की पंढरी-पैठण-आळंदीला जाऊन आपण काय मिळविले आहे ? पंढरीला जाऊन कोणाचे भले झाले आहे काय ? किंवा आळंदीला जाऊन कोणाचा उद्धार झाला आहे काय ? तुम्ही एकनाथाला फार मोठा मानता, त्याने काय केले ? एक भागवत ग्रंथ लिहिला पण त्याची कथा मी आज तुम्हाला सांगतो. तो मेला त्यावेळी त्याची प्रेतयात्रा एका रस्त्याने जात होती. त्याच रस्त्याने एक सासुरवाशीण एका महार सोबतीला घेऊन सासरी जावयास निघाली होती. तिने ते एकनाथाचे मढे पाहिले. हा मला अपशकून झाला असे ती महारास बोलली. हे तिचे बोलणे एकनाथाच्या मढ्याने ऐकले तेव्हा एकनाथ तिरडीवर उठून बसला आणि त्या सासुरवाशीणीस बोलला ” मी आज मरत नाही. कारण तुला अपशकून होत आहे. ” असे म्हणून तो परत घरी गेला. नंतर पुढे एकनाथ व त्याची बायको यांनी नदीत जीव दिला. त्यांनी जीव का दिला याचा अद्याप शोध लागला नाही. आता तुम्हीच सांगा, कोणाचे तरी मढे जिवंत झाल्याचे तुम्ही ऐकले किंवा पाहिले आहे काय ?

दुसरे ज्ञानेश्वराने तरी काय केले ? त्याने भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचे सार काय ? तर जग हे ब्रह्ममय आहे. सर्व जगच जर ब्रह्म आहे तर मग महार मांगातही ब्रह्म असावयास पाहिजे. मग ज्ञानेश्वर महार मांगात का राहिला नाही ? ब्राह्मणाने आपणास परत घ्यावे म्हणून त्याने प्रयत्न का केला ? ब्राह्मणाने त्याला वाळीत टाकल्यानंतर त्याने त्यांना सांगावयास पाहिजे होते की, तुम्ही जरी मला जातीत घेतले नाही तरी हरकत नाही. मी महार-मांगात जाऊन राहीन कारण जग हे ब्रह्ममय आहे. असे ज्ञानेश्वराने का सांगितले नाही. सर्वसाधारण जनतेला भुलविण्यासाठी हे सर्व थोतांड रचलेले आहे आणि या थोतांडाला तुम्ही सर्व भुललेले आहात. तेव्हा तुम्ही पंढरी-आळंदी किंवा जेजुरीला किंवा दुसऱ्या कोणा देवाच्या नादी लागलात तर तुम्हाला वाळीत टाकण्याचा मला हुकूम द्यावा लागेल. त्याच्याशिवाय तुमचा देवभोळेपणा जाणार नाही आणि तुमची सुधारणाही होणार नाही. आजचे हे युग विचाराचे युग आहे. कोणीही कसलेही थोतांड रचले तरी ते थोतांड आहे हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे. कारण यापुढे तुम्हाला जगात वागताना विचार करूनच वागले पाहिजे.

आपण आपली संघटना मजबूत करावयास पाहिजे. आपसातील सर्व मतभेद बाजूस सारून एक विचाराने आपण वागले पाहिजे. कारण संघटना असल्याशिवाय जगात आपणास कोणीच विचारणार नाही. मला माहीत आहे की निवडणुकीच्या वेळी आपणास दुसऱ्या कोणाशी तरी हातमिळवणी करावी लागेल. पण आपली जर संघटनाच नसेल तर इतर लोक आपणाकडे येणार नाहीत. आपणास विचारणार नाहीत. पॉलिटिक्स करावयाचे असेल तर ते चांगल्या रीतीने केले पाहिजे. त्याकरिता लोकात जागृती निर्माण करून संघटना केली पाहिजे. मला पुढार्‍याचे भय नाही. पुढारी जर चांगले वागले नाहीत, त्यांनी लोकांचे काम केले नाही तर त्यांना काढून टाकण्यास मी मुळीच घाबरणार नाही. म्हणून प्रत्येक विभागात निदान वर्षातून एक तरी परिषद घेतली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे सभा, स्नेहसंमेलने, चर्चामंडळे, कॅम्प्स् वगैरे घेतले पाहिजेत. म्हणजे आपले कार्यकर्ते वेळोवेळी एके ठिकाणी येतील, चळवळीचा अभ्यास करतील आणि कार्य जोमात होईल.

शेवटी मला सांगावयाचे आहे की मी व्यक्तीशः कोणत्याही कार्यकर्त्यावर प्रेम करीत नाही. प्रेम फक्त कार्यावरच असते. जो कार्य करील तोच फक्त मला आवडतो.

🔹🔹🔹

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे