November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

वकिलीच्या व्यवसायात नीतीमत्ता राखली पाहिजे – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

दिनांक २३ जुलै १९५० रोजी औरंगाबाद येथील सेशन्स कोर्टाला भेट देऊन, तेथील मुनसिफ कोर्टात उर्दूमधून चालणारे कामकाज ऐकल्यानंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….

दिनांक २१ जुलै १९५० रोजी दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर औरंगाबादला येऊन दाखल झाले. स्टेशनवर त्यांच्या स्वागताकरिता तालुकेदार श्री. गोविंदराव देशपांडे, पोलीस सुपरिटेंडेंट श्री. हरिश्चंद्र व इतर अधिकारी, स्थानिक पुढारी, वकील व शे. का. फेडरेशनचे हजारो लोक उपस्थित होते.

गार्ड ऑफ ऑनर

हार अर्पण करण्यात आल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर खाली उतरले. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलीस दलाची सलामी स्वीकारून गार्ड ऑफ ऑनरची पाहाणी केली. त्यानंतर अनेक घोषणांच्या निनादात शे. का. फे. च्या लोकांनी व इतरांनी हार अर्पण करून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे जंगी स्वागत केले.

तेथून प्रिन्सिपल चिटणीस व श्री चित्रे यांच्यासह डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या इमारतीकडे रवाना झाले व तेथील पाहणी करून सलूनमध्ये परत आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कॉलेजच्या समारंभाला उपस्थित राहून कॉलेजच्या नवीन इमारत बांधण्याच्या जागेची पाहाणी केली. इमारतीची कोनशिला बसविण्याचा समारंभ डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते होणार आहे.

कोर्टाला भेट

दिनांक २३ जुलै १९५० रोजी औरंगाबादच्या नवीन कॉलेजची जागा पाहिल्यावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी तेथील सेशन्स कोर्टाला भेट दिली. सेशन्स कोर्टाचे जज्ज श्री. चंद्रकांत गोडसे यांनी बाबासाहेबांचे स्वागत करून स्वतः त्यांना कोर्ट व बार असोसिएशन फिरून दाखविले.

यानंतर डॉ. बाबासाहेबांसंबंधी बोलताना डॉ. आंबेडकर हे आधुनिक मनू आहेत असे उद्गार श्री. गोडसे जज्ज यांनी काढले. यानंतर डॉ. बाबासाहेबांनी मुनसिफ कोर्टातील उर्दूमधून चालणारे कामकाज ऐकले.

या कामकाजाला उद्देशून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
उर्दूमधील कामकाज मला कळले नाही तरी ते समाधानकारक असले पाहिजे असे माझे मत बनले आहे.

कोर्टातील भाषा कोणती राहावी याच्या विचाराने माझे मन व्यग्र होते. काही लोक म्हणतात कोर्टाची भाषा हिंदी राहावी ; तर काहींच्या मते ती इंग्रजी राहावी. स्थानिक भाषातून कायद्यातील शब्द व्यक्त करता येत नाहीत, असा अनुभव आहे. उदाहरणार्थ इक्विटीला योग्य असा शब्द नाही. याकरिता स्थानिक भाषा कोर्ट भाषा होणे सर्वांनाच फायदेशीर होणार नाही. त्यामुळे राज्यकारभारात कितीतरी अडचणी उद्भवतील. अर्थात राष्ट्रीय भाषा कार्यक्षम झाल्यावर तिला तिथे योग्य स्थान मिळेलच.

मला वकिलीचा धंदा फार आवडतो. पण या धंद्याविषयी लोकात आदर नाही. भारतात वकिलावर कित्येक आरोप केले जातात. मध्यवर्ती सरकारातून मुक्तता झाल्यावर मी वकिलीलाच वाहून घेणार आहे. आज या देशात लायक असे वकील थोडेच आहेत आणि लायक वकील नसतील तर खात्याची अधोगती होईल. आज या धंद्याला अवनत कळा आली आहे. याचे एक कारण म्हणजे या धंद्यात काम करणारे लोक निवृत्त होऊन तरुण वकिलांना संधी देत नाहीत. अर्थात धंद्याची प्रतिष्ठा राहावी म्हणून तरुण वकिलांना संधी दिली जाणे अवश्य आहे.

यानंतर या धंद्यात काही झाले तरी नीतीमत्ता राखली पाहिजे असे सांगून, त्यांनी कायदे पंडितांनी स्वातंत्र्य, हेबीअस कॉर्पस व इतर कामकाजाचे महत्त्व ओळखून राष्ट्राची सेवा करावी अशी सूचना केली.

🔹🔹🔹

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे