स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीसाठी पुण्यात सुरू असलेल्या सत्याग्रहासंबंधाने पुणे येथील अहिल्याश्रमात आयोजित केलेल्या सभेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….
स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीसाठी पुण्यात सत्याग्रह सुरू होता. या सत्याग्रहाच्या संबंधाने दिनांक २१ जुलै १९४६ रोजी पुणे येथील अहिल्याश्रमात दुपारी ३.३० वाजता सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला स्त्री-पुरुषांचा प्रचंड जनसमुदाय जमला होता.
पुण्याच्या अहिल्याश्रमात झालेल्या या सभेत जमलेल्या प्रचंड जनसमुदायास संबोधित करताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
भगिनींनो आणि बंधुंनो,
आज या ठिकाणी जे आपण सर्वजण जमलो आहोत त्याचे कारण येथे जो सत्याग्रह चालू आहे त्याचा आढावा घेण्यासाठी. आपल्या या सत्याग्रहाचा सर्व वृत्तान्त वर्तमान पत्रातून थोडा थोडका का होईना देण्यात आलेला आहे. परंतु आपणा सर्वांना हे दिसून येईल की या वर्तमानपत्रांनी सत्याग्रहाची जी छाननी केली आहे तिच्यात त्यांनी सत्याग्रहाबद्दल थोडी देखील आपुलकी किंवा आदर दाखविलेला नाही. त्यांच्या मते, त्यांनी लिहिले आहे की, ह्या सत्याग्रहात फक्त महारच सामील आहेत. कारण मी फक्त महारांचाच पुढारी आहे. माझ्या पाठिशी दुसरे कोणीही नाही, असा त्यांनी प्रचार केला आहे. हा प्रचार काही आजकालचा नाही. त्यांचा हा प्रचार सतत चालू आहे. त्याचा परिणाम विलायतेत देखील थोडासा झाला आहे, असे दिसून येते. काल पार्लमेन्टमध्ये कमिशनच्यावतीने एक भाषण करण्यात आले आहे. त्यात असे सांगण्यात आले आहे की मी हिंदुस्थानचा पुढारी नाही. माझ्या पाठीशी मध्यप्रांत व मुंबईतील काही लोक आहेत. परंतु हे विधान किती असत्य, लबाड व घातक आहे, हे माझ्या बंगालमधून झालेल्या निवडणुकीवरून सहज सिद्ध झाले आहे.
माझ्या मागे हिंदुस्थानातील सर्व अस्पृश्य समाज आहे, याला बंगालमधीलच निवडणुकीचा पुरावा देता येईल. कारण बंगालमध्ये काही महार नाहीत. बंगालमध्ये ‘ नामशूद्र ‘ जात आहे. मग या नामशूद्रांनी मला निवडून दिले आहे. आता माझा त्यांना सवाल आहे की, मी हिंदुस्थानातील सर्व अस्पृश्यांचा पुढारी नाही, असे जर तुम्ही म्हणता तर मी बंगालमधून कसा निवडून आलो ?
अस्पृश्य समाज ही हिंदुस्थानातील एक स्वतंत्र जमात आहे, अशी ब्रिटिश लोकांनी अनेक वेळा घोषणा केली, परंतु कॅबिनेट मिशनने आपल्या योजनेत अस्पृश्य समाजाचा थोडा देखील नामनिर्देश केला नाही. अस्पृश्य समाजाला त्यांनी वगळले, त्याचवेळी मी घटना समितीमध्ये जाण्याचा निश्चय केला.
अस्पृश्य समाजाच्या कल्याणासाठी माझे घटना समितीमध्ये जाणे अत्यंत जरुरी होते. मी घटना समितीमध्ये निवडून येऊ नये म्हणून काँग्रेसने सर्व ठिकाणी कुलूपे लावली. महाराष्ट्रात जी काही थोडी माणसे मोठी आहेत त्यामध्ये नामांकित म्हणून माझी गणना होणार नाही, असे म्हणणारा माणूस मूर्ख असला पाहिजे. घटना समितीच्या निवडणुकीसाठी तुम्ही उभे राहा म्हणून मि. जयकर यांना काँग्रेसने पत्र धाडले, मि. मुन्शींना बोलावण्यात आले आणि पुष्कळांना आमंत्रणे निमंत्रणे धाडली. इतक्या सुवासिनींमध्ये मला देखील त्यांनी कुंकू लावावयास पाहिजे होते. परंतु मला कसे तरी रांडव करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. म्हणून मी मुंबई सोडून बंगालमध्ये सुखाने नांदावयास गेलो. त्याठिकाणी महार नसताना देखील निवडून आलो, हे माझ्या शत्रुंनी पक्के ध्यानात ठेवावयाला पाहिजे.
या सत्याग्रहात फक्त महारच आहेत, असे म्हटले जाते ते अगदी धादांत खोटे आहे. पकडलेल्या माणसांची यादी आताच आपणाला वाचून दाखविण्यात आलेली आहे. तीवरून दिसून येईल की या सत्याग्रहात महार, मांग, चांभार, वगैरे सर्व जातीचे लोक आहेत. मुंबई प्रांतात इतर जातीपेक्षा महार जातीच्या लोकांची संख्या फार आहे. अर्थातच अस्पृश्य समाजाच्या उद्धाराच्या चळवळीत महार बहुसंख्येने भाग घेत आहेत त्याबद्दल विषाद वाटण्याचे कोणालाच कारण नाही.
कोणत्या ना कोणत्या तरी आमिषाने पुष्कळशी माणसे काँग्रेसमध्ये सामील झालेली आहेत. कोणाला चामड्याचा व्यापार करावयाचा आहे म्हणून चामडे मिळवावयाचे आहे, कोणाला मस्क्याचा व्यापार करावयाचा म्हणून मस्क्यासाठी पांढरा पातळ कागद मिळवावयाचा आहे. कोणाला कॉन्ट्रॅक्टस् मिळवावयाचे आहेत म्हणून काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत, तर कोणाला नोकरी मिळवावयाची आहे. आमच्या चळवळीमध्ये मात्र स्वार्थासाठी कोणी आलेला नाही. आमच्याजवळ कोणाला देण्यासाठी नोकऱ्या नाहीत. आम्ही काही कोणाला कॉन्ट्रॅक्टस् देऊ शकत नाही किंवा मस्क्यासाठी द्यावयास आम्हाजवळ पांढरा कागद देखील नाही. (हंशा व टाळ्या) आपण सर्वजण निस्वार्थाने आपल्या स्वातंत्र्ययुद्धामध्ये भाग घेत आहोत. निस्वार्थ बुद्धीने भाग घेण्यातच आपल्या चळवळीचा विजय आहे.
आम्ही सत्याग्रह का करीत आहोत, यात फार मोठा गंभीर व न कळण्यासारखा खोल अर्थ आहे असे नाही. याचा अर्थ साध्या तिसरी पास झालेल्या मुलाला देखील कळेल. परंतु मुंबई प्रांताचे मुख्य प्रधान मि. खेर यांना मात्र याचा अर्थ कळत नाही, असे त्यांनी स्वतःच जाहीर केले आहे. पण इतके वेडात शिरण्याचे काहीच कारण नाही.
बाप मरत असता आपली इस्टेट कोणाकडे जावी याचे मृत्यूपत्र करीत असतो. इंग्रजांनी जाहीर केले आहे की हा देश आता ते सोडून जाणार आहेत. मरणार असलेल्या बापाप्रमाणे इंग्रजांनी आपले मृत्यूपत्र करून ठेवले आहे. बाप जसा आपल्या पाठीमागे आपल्या इस्टेटीचे वारस कोण हे ठरवीत असतो त्याचप्रमाणे इंग्रजांनी देखील या देशाचे वारस ठरविले आहेत. त्यांनी जाहीर केले आहे की या देशातील ब्रिटिश सत्तेचे वारस दोन, ते म्हणजे हिंदू आणि मुसलमान. अस्पृश्यांचा त्यांनी उल्लेख देखील केलेला नाही.
आम्हाला वाटत होते की, या देशातील सत्तेचे वारस ठरविताना आम्हाला देखील काही तरी वारसाहक्क मिळेल. हिंदू लोकांना आठ आणे मिळाले तर आम्हाला त्यातील निदान पावली तरी मिळेल, असा आमचा समज होता. परंतु अभिजात लबाड इंग्रजांनी अस्पृश्य समाजाला अजिबात फसविले.
सत्तेचे वारस हिंदू आणि मुसलमान झालेले आहेत. राज्यसत्तेचा हक्क हिंदुंना मिळाला आहे. या राज्यसत्तेमध्ये आमचा भाग काय, असा आमचा हिंदुंना साधा सवाल आहे. हा साधा अर्थ मि. खेरांना कळत नाही म्हणणे केवळ ढोंग आहे. परंतु वेड पांघरून पेडगावला जाण्यात काही अर्थ नाही. या देशात सुखाने नांदावयाचे असेल तर आमच्या प्रश्नाचे उत्तर हिंदुंना द्यावेच लागेल. हिंदू लोकांनी या प्रश्नाचे उत्तर अद्याप दिलेले नाही. म्हणूनच आमचे भांडण हिंदू लोकांशी जुंपले आहे. इंग्रज लोकांबरोबर झगडा करून काय फायदा आहे. मेलेल्या बापाबरोबर वारसा हक्काबद्दल झगडण्यात काय शहाणपणा आहे ?
आमचा लढा मुसलमानांशी नाही. कारण ते आम्हाला काही विरोध करीत नाहीत. मुसलमान बहुसंख्य प्रांतात आमच्या मागण्या देण्यास ते तयार आहेत.
काँग्रेसने मात्र आमच्या हक्कांबद्दल जाहीर खुलासा करावयास पाहिजे. नुसते वाऱ्यावर बोलून आता भागणार नाही. आमच्या मागण्यांसंबंधी श्वेतपत्रिका काँग्रेसने ताबडतोब जाहीर केली पाहिजे. नाहीतर पुण्यास सुरू झालेल्या सत्याग्रहाच्या ज्वाला सर्व देशभर पसरल्याशिवाय खास राहणार नाहीत. आमच्या मागण्या मिळविण्यासाठी सर्व प्रांतात आम्हाला लढा सुरू करावा लागेल.
आजचा आमचा लढा अहिंसात्मक आहे. कारण अहिंसेचे प्रभावी अस्त्र आम्ही हाती धरले आहे. गांधींची अहिंसेची एक व्याख्या आहे. माझी मात्र अहिंसेची व्याख्या गांधींहून अगदी निराळी आहे. तुकारामबुवांची अहिंसेची जी व्याख्या होती तीच माझी देखील आहे.
” दया तिचे नाव भूतांचे पाळण । आणीक निर्दाळण कंटकांचे ।। ” अशी तुकारामाची व्याख्या होती. प्राण्यांवर दया करावी पण त्याचप्रमाणे दुष्टांचे निर्दाळण देखील करावे, असा माझा देखील समज आहे. या व्याख्येप्रमाणे आम्ही अहिंसेने सत्याग्रह चालवूच चालवू पण त्याचप्रमाणे कंटकांचे देखील निर्दाळण करू.
आपल्या सत्याग्रहाचे नैतिक वजन जरी आज त्यांचेवर पडले नसले तरी काही दिवसांनी का होईना आपल्यापुढे त्यांची मान झुकविल्याशिवाय कदापिही राहाणार नाही. स्वतंत्र मतदार संघाची आपली मागणी त्यांना मान्य करावीच लागेल.
आपली स्वतंत्र मतदार संघाची मागणी काँग्रेसच्या लोकांच्या पोटात भीतीचा गोळा निर्माण करते. त्यांना वाटते की, आपणास जर स्वतंत्र मतदार संघ मिळाला तर देशाचे फार नुकसान होईल. परंतु त्यांनी असे घाबरून जाण्याचे काही कारण नाही. स्वतंत्र मतदार संघाने कोणाचेही नुकसान होणार नाही. शीख लोकांना स्वतंत्र मतदार संघ देण्यात आलेला आहे. त्यामुळे देशात काही दुफळी झालेली नाही.
१९३४ पर्यंत जिना काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमध्ये जिना असताना त्यांची काँग्रेसचे लोक एखाद्या देवासारखी पूजा करीत होते. त्यांच्या देशभक्तीचे स्मारक म्हणून काँग्रेसच्या लोकांनी मुंबईला ‘ जिना हॉल ‘ म्हणून एक इमारत बांधली आहे परंतु हेच जिना स्वतंत्र मतदार संघातूनच सतत निवडून आलेले आहेत, हे कोणीही विसरता कामा नये. जिनाच्या स्वतंत्र मतदार संघाने जर देशाचे नुकसान झाले नाही तर अस्पृश्यांना तो दिला तर देशाचे भले मोठे नुकसान होईल या म्हणण्यात काय अर्थ आहे ? मी २० वर्षे या देशाच्या राजकारणात आहे. या २० वर्षांच्या काळात देशाचे नुकसान होईल असे मी एक देखील कृत्य केलेले नाही. माझे मित्र गोखले यांना ही गोष्ट माहीत आहे. मि. गोखले मला मित्र समजतात की नाही कोण जाणे पण मी मात्र त्यांना माझा मित्र समजतो. (हंशा) ब्रिटिश लोकांना हडसून खडसून प्रश्न विचारणारा व्हाईसरॉयच्या कौन्सिलमध्ये फक्त मी एकटाच होतो. या लोकांनी खरा इंग्रज माणूस पाहिला नसेल, त्यांनी जर तो पाहिला तर त्यांची त्रेधा उडेल.
आमचे भांडण हे नेहमी तत्त्वासाठी असते. ६ कोटी अस्पृश्य समाजाच्या वतीने आमचे भांडण आहे. आम्हाला राजकीय संरक्षण पाहिजे. हे राजकीय सरंक्षण अशातऱ्हेने पाहिजे की मूर्खाच्या हातून किंवा लबाडाच्या हातून आमचे काहीही नुकसान होता कामा नये. आमच्या चळवळीमध्ये मूर्खाला किंवा लबाडाला थोडा देखील वाव नाही. लुच्च्या लफंग्याला जागा मिळणार नाही अशातऱ्हेची आम्हाला चळवळ करावयाची आहे. इतर लोकांप्रमाणेच आम्हालाही स्वातंत्र्य पाहिजे. आम्हाला कोणाचीही, परकियांची किंवा स्वकियांची गुलामगिरी पत्करावयाची नाही. आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आहे. परंतु त्याचबरोबर आम्हाला लोकशाही देखील पाहिजे आहे. राजकीय सत्ता काही ठराविक लोकांच्या हाती गेली तर आम्हाला चांगले दिवस येतीलच असे नाही, अशी आम्हाला भीती वाटते आणि ही भीती साधार आहे म्हणूनच राजकीय सत्ता सर्वसाधारण लोकांच्या हाती, खऱ्या अर्थाने शेतकरी – कामकऱ्यांच्या हाती असावयास पाहिजे, असा आमचा पक्का समज आहे.
दुसरे लोक काहीही म्हणोत आपणाला खरे स्वातंत्र्य पाहिजे आहे. या देशातील कोणत्याही जातीने, जमातीने किंवा वर्गाने आपणावर वर्चस्व गाजवता कामा नये. आपणा सर्वांना ह्या देशामध्ये उजळ माथ्याने वावरता आले पाहिजे, असे आपणास राजकीय हक्क पाहिजेत. गुलामगिरीला आपण ठोकरीने उडविले पाहिजे.
या देशातील ६ कोटी अस्पृश्यांचा लढा हा खरा स्वातंत्र्याचा लढा आहे. असे असताही या देशातील कोणीही आमच्या लढ्याला पाठिंबा तर देत नाही परंतु नुसती सहानुभूतीही कोणी दाखवित नाही. पोष्टाचा संप झाला तर त्याला सर्व लोकांचा पाठिंबा असतो. तसेच रेल्वे कामगारांचा संप असला तर त्याला देखील हजारो लोकांचा पाठिंबा मिळतो. अर्थात मी म्हणत नाही की तुम्ही त्यांना पाठिंबा देऊ नका. या देशात कम्युनिस्टस् आहेत, जहाल मतवादी आहेत, डावे आहेत, कोणी उजवे आहेत. परंतु या कोणाचाही आमच्या स्वातंत्र्य लढ्यास पाठिंबा नाही.
परंतु आपण सर्वांनी ही गोष्ट ध्यानात ठेवावयास पाहिजे की, आपणास कोणाचा पाठिंबा असो वा नसो आपणाला हा लढा जिंकलाच पाहिजे. हा लढा आपल्याच लोकबळावर आपणास जिंकावयाचा आहे. आपल्या शक्तीवर आपण भिस्त ठेवली पाहिजे. आपल्या मजबूत संघटनेच्या जोरावर आपणास सर्व अडचणी सहज ओलांडून जाता येतील. या सत्याग्रहाची सर्व जबाबदारी फक्त आपल्यावरच आहे. आता लढाई जुंपलेली आहे. शिर तुटो की पगडी पडो, शेवटपर्यंत लढण्याचा आपण निर्धार केला पाहिजे.
महिलांच्या बाबतीत मला दोन शब्द सांगावयाचे आहेत. स्त्रियांनी या सत्याग्रहात भाग घेतला आहे. ही एक फारच अभिमानाची गोष्ट झाली आहे. काँग्रेसच्या चळवळीमध्ये स्त्रिया भाग घेत होत्या म्हणून त्यांना त्याचा फार अभिमान वाटत होता. परंतु आजच्या परिस्थितीवरून दिसून येईल की, अस्पृश्य समाजातील स्त्रिया देखील इतर स्त्रियांपेक्षा कोणत्याही बाबतीत मागे राहिलेल्या नाहीत. आपल्या चळवळीचे लोण आज स्त्री-वर्गातही जाऊन पोहोचले आहे. आपणाला जर परिस्थिती अनुकूल असती तर याच्यापेक्षाही आपल्या जास्त महिला तुरुंगात गेल्या असत्या.
रेशनिंग सुरू असल्यामुळे आम्हाला पुष्कळ अडचणी उत्पन्न झालेल्या आहेत. त्यामुळेच सत्याग्रह आघाडीवर आम्हाला पुष्कळ माणसे आणता येत नाहीत. काँग्रेस सरकारने रेशनिंग नाहीसे करावे. माझे त्यांना आव्हान आहे की. मी कमीत कमी १ लाख तरी माणसे तुरुंगात सहज पाठवू शकेल.
मी देशविघातक असे काय केले आहे हेच मला कळत नाही. राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या वेळेपासून माझ्या अगदी अलिकडच्या सरकारी नोकरीपर्यंत माझी सर्व कामगिरी काँग्रेसवाल्यांनी नीट आठवावी. इंग्रजांच्याविरुद्ध दटावून सांगणाऱ्या मंत्र्यांमध्ये मी प्रमुख होतो आणि इंग्रजांना पाहिले तर ज्यांना अजून भीती वाटते असे मंत्री कायदेमंडळात जाऊन बसले आहेत. काँग्रेसच्या तिकीटावर जी १५ अस्पृश्य माणसे या प्रांतात निवडली आहेत त्यांना माझा प्रश्न आहे की, आपल्या आयुष्यात त्यांनी या समाजासाठी किंवा देशासाठी किती तास खर्चिले आहेत ? ज्यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी देह झिजविला त्यांना जागा न देता उपटसुंभांना आमदार करण्यात आले आहे. गोरगरिबांचे राज्य व्हावे, लोकशाहीचा राज्यकारभार चालवावा अशी कॉंग्रेसची इच्छा असेल तर २००० वर्षे ज्यांची गळचेपी झाली, त्या आज ६-७ कोटीपर्यंत असलेल्या अस्पृश्यांना त्यांचे योग्य हक्क मिळाले पाहिजेत.
🔹🔹🔹
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर