तिसरीला होतो मी तेव्हा. माझे वडील सहाय्यक पोलोस अयाक्ताच्या, पोलीस प्रशिक्षणासाठी पोलीस अकॅडेमी नाशिक येथे १९९२ मध्ये दाखल झाले. सायंकाळी त्यांचं ट्रेनिंग संपल्यावर ते घरी येत असायचे.आम्ही अकॅडेमीच्या शेजारीच राहायला घर घेतलं होतं. महात्मा नगरच्या क्रिकेट मैदानात आई-बापू मला सायकल शिकवायचे. मी वडिलांना बापू म्हणतो. ते दोघे गप्पा मारत बसायचे आणि मी सायकल चालवायचो.
मी आई बापुंजवळ आलो आणि म्हणालो, आज आपण कास्ट ची चर्चा का नाही केली? माझी आई म्हणाली, बेटा तू सायकल चालवत होतास, म्हणून म्हटलं तुझं झालं की जातीच्या विषयावर चर्चा करू. मी म्हटलं, हो आई.
जातीयवादासंबंधात चर्चा न करता आमचा दिवस क्वचितच जात असे. कदाचित सगळ्याच जातीने पीडित असणाऱ्यांच्या घरात हे घडत असावं. आमच्या कुटुंबाचं वैशिष्टय हे की मी तिसरी ईयत्तेत असतांनाही आई-बापू माझ्याशी गांभीर्याने चर्चा करीत असत. आता हेच बघाना, तिसरीच्या चीमुर्ड्याशी जातीप्रथा, जातीयवाद सारख्या गंभीर विषयांची चर्चा आणि ती सुद्धा रोजच. त्यामुळे त्या वयातच मला बाबासाहेब हळू-हळू कळायला लागले.
१९९८ मध्ये नाशिक मध्ये इंटरनेट च्या पहिल्या सबस्क्रायबर मध्ये आमचं कुटुंब होतं. मी त्या वेळी ९ वीत होतो. ७ वी ८ वि लाच मला सरकारी बंगल्यात स्वतंत्र रूम होती, कम्प्युटर होता. माझे वडील त्या वेळी नाशिक मध्ये, सहाय्यक पोलीस आयुक्त होते. १९९८ ते २००२ सलग ५ वर्षे आम्ही नाशिक सारख्या थंड हवेच्या ठिकाणी राहिलो. वडील कधी शहर पोलिसात, तर कधी ग्रामीण पोलिसात कार्यरत होते.
रोटरी क्लब च्या एका कार्यक्रमात, वडिलांना मुख्य पाहुणे म्हणून बोलावले होते. कार्यक्रमांतर ते घरी आले तेव्हा त्यांच्या सोबत रोटरीचे काही पदाधिकारीही आले होते. कुणालाही घरी घेऊन आले, तर ते मला आणि आई ला बोलावून ओळख करून देत असत आणि गरज पडल्यास चर्चेत सामील करून घेत असत. ती माझी वडिलांची नेहमीची सवय आहे. त्यांना चर्चा करायला खूप आवडते, विशेषतः सामाजीक विषयांवर. हाती घेतलेल्या टास्क ची अंमलबजावणी करण्यात माझ्या आई चा हातखंडा. आलेल्या पदाधिकार्यांना वडिलांनी म्हटले, हा संवेदन आता नववीत आहे, दहावीत गेल्यात जमा आहे. खूप बुद्धिमान आहे पण १० वी नंतर आम्ही त्याला सायन्स ला पाठविणार नाही आणि डॉक्टर इंजिनीअर ही बनविणार नाही. त्याला आम्ही समाज योग्य पद्धतीने चालावा यासाठी काही योगदान करता येईल का या दृष्टीने घडविण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रथम त्याचं बौद्धिक तसेच अनुभव विश्व समृद्ध करण्यासाठी जे काही लागेल ते आम्ही करणार आहोत. मला कळेना, या परक्या लोकांबरोबर बापू माझ्याबाबत ईतकं का सांगत आहेत? बापू त्यांना म्हणाले, तुम्ही ज्या International Youth Exchange बाबत बोलत होतात त्यात माझ्या मुलाला सहभागी करून घेता येईल का? ते म्हणाले, साहेब तुम्हाला अगोदर रोटरीचे सदस्य व्हावे लागेल. तुम्ही पोलीस अधिकारी आहात, त्यामुळेफ़ारतर आम्ही तुम्हाला मानद सदस्य करू शकतो. मी आई च्या मागेच लागलो, आई मला अमेरिकेत जायचंय. तेच झालं, आमचा इंटरव्युव्ह नागपुरात झाला. इंटरव्युव्ह मध्ये मी महाराष्ट्रात पहिला आलो, तर माझे आई वडील कुटुंब म्हणून पहिले आले. मी अमेरीकेला गेलो, आमच्या घरी स्वीडन ची मुलगी आणि त्या नंतर क्यानडा चा मुलगा वर्षभर राहिला. जाण्याच्या पूर्वी मला वडिलांचे प्रमुख कमिश्नर अंबालाल वर्मा साहेब होते, त्यांना भेटायला वडीलांनी नेले. जवळ जवळ एक तास त्या सरांशी मी ‘चर्चा’ केली. मला आजही आठवतं त्यांनी वडिलांना म्हटलं, देखो भाई अपरांती, आप क्या सिखाते हो बच्चे को? ए तो बडा सुलझा हुवा बच्चा है !
अमेरिकेहून परत आलो. दहा दिवसांची विपस्याना केली. Batch मधला मी सगळ्यात छोटा सदस्य होतो. वयाने लहान पण शरीराने आणि उंचीने दाढ्या मिशा वाढलेला तरुण. दहावीच्या परीक्षेला जाताना वडिलांनी माझी दाढी केली. म्हटले, परीक्षक घेणार नाही तुला, म्हणतील हा डमी कॅन्डीडेट दिसतोय.
नाशिक, जय हिंद कॉलेज मुंबई, सेंट झेविअर मुंबई ते कॅन्टरबरी इंग्लंड. मोठा प्रवास. कॅन्टरबरी च्या पदवी नंतर, मानवाधिकाराचा पदव्युत्तर प्रवास युनिवर्सिटी कॉलेज लंडन. इंग्लंडच्या प्रवासाची सुरुवात आणि नोकरीची सुरुवात एकाच वेळी. हे बघ तुला शिकायचं आहे ना इंग्लंड मध्ये मग स्वतः च्या जोरावर शिक. मी पैसे देईन, पण त्यासाठी मला चोऱ्या कराव्या लागतील. चालेल तुला? वडिलांनी विचारलं. मी म्हटलं बापू, मी विपस्याना केली आहे पंचशीलातलं एक शील चोरी करू नये हे आहे. मी नोकरी करीन, तुम्ही मला अडमिशन घेऊन द्या. म्हणून पहिल्या दिवसापासून नोकरी. खूप जग मला नोकरीने दाखवलं आणि मीही खूप शिकलो.
सतत पाच वर्षे अभ्यास करून एल.एल.बी.,एल.एल.एम., आणि अखेर बॅरीस्टर आणि ते ही बाबासाहेबांच्या ग्रेज इंन मध्ये. जीवनाचं सार्थक झाल्याचा आनंद आज मला आहे. एकदा काय झालं, केस सदर करतांना प्राध्यापक महोदयांनी म्हटलं जे सुद्धा बॅरीस्टर म्हणून तुमची प्रेरणा असतील त्यांच्या नावाने केस सदर करा. मी सुरुवात केली,
मी, भीमराव रामजी आंबेडकर,………. मला पुढचे शब्द फुटेनात…… माझा कंठ दाटून आला.
प्राध्यापक म्हणाले,…..”Saunvedan.. what happened ? (संवेदन… बोल थांबलास का ?)” मी काय बोलणार? बाबासाहेब, माझ्या जगण्याची, मीच काय माझा पूर्ण भारतीय शोषित, पिडीत, आणि वंचित समाज प्रतिष्ठे ने जिवंत राहण्यासाठीची, जिवंत असल्याची प्रेरणा होते. नुसते बॅरीस्टर होण्याची नाही. तो प्रसंग मला वाटत नाही मी आयुष्यात कधी विसरू शकेन. मी जेव्हा तो प्रसंग माझ्या आई-वडिलांना सांगितला तेव्हा त्यांनाही अश्रू अनावर झाले.
आई-वडिलांनी मला कायम सांगितलं, आमच्यापासून दूर आहेस चांगलं जेवण, भरपूर व्यायाम आणि रात्रीची पूर्ण झोप हे सूत्र अंगीकार आणि कसलाही त्रास तुला आयुष्यात होणार नाही. दिवसा कधीही झोपू नको. तुम्ही, जो मला, पहिलवानी थाटाचा, बलदंड शरीराचा पहाता तो त्याच शिकवणीचा परिपाक आहे. आमच्या घराचा नियम आहे, व्यायाम केला नाही तर घरात जेवण मिळण्याची शक्यता कमी होते. लहानपणी ताटावर बसण्यापुर्वीही आईने व्यायामाविशई विचारल्याचं मला आठवतं.कायद्याच्या तीन डिग्र्या, मी अभ्यासासोबतच व्यायामाच्या आधारे वेळेत पूर्ण केल्या. त्याचं श्रेय मी योग्य व्यायाम, योग्य आहार आणि आणि पुरेशी झोप यांना देतो. अर्थात पाचही वर्षे माझ्या आईने जी माझी काळजी घेतली आणि सुग्रास भोजनाचा मला आस्वाद, प्रेमाने न कंटाळता दिला, तो मुलभूत आधार मानूया. ‘चिंता करू नको’, बेटा, हे वडीलांचे आधाराचे शब्द अगदी मर्गळलेल्यालाही ताजातवाना बनविण्यास पुरेसे आहेत हे हाताखालच्या अनेक पोलीस अधिकाऱ्यानकडून मी नेहमीच ऐकलेले आहेत.
मागच्या वर्षी मला आणि माझ्या आईला कोविड झाला. आम्ही सही सलामत त्यातून बाहेर पडलो, कारण आम्ही तंदुरुस्त होतो. अनेक ब्रिटीश मेले. आम्ही मात्र घरीच ट्रीटमेंट घेतली आणि वाचलो, माझे छोटे वकील काकाही कोविड च्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावले. माझ्या वडिलांच्या डॉक्टरी सल्ल्यांनाही अर्थात त्याचं श्रेय जातं.
शिका! संगठीत व्हा! संघर्ष करा! हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा मूलमंत्र आपल्या समाजाचा खरा मार्गदर्शक आहे असं मी मानतो. शिकता-शिकता स्वयंप्रकाशित व्हा हे बुद्ध तत्वज्ञान आपल्याला स्वतंत्र बनवतं आणि योग्य पद्धतीने समाजाला मार्गदर्शन करण्याचं सूचित करतं. कसलीही वैचारिक प्रेरणांची कमतरता नसलेला, आंबेडकरी समाजच भविष्यात फक्त भारतातल्याच नव्हे, तर विश्व पातळीवर मानवाधिकाराचा आधारस्तंभ ठरेल, या बाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.
बुद्ध तत्वज्ञानाने आणि आंबेडकरी विचारांनी प्रेरित झालेले अनेक समाजबांधव मी पाहिलेत. माझ्या वडीलांच्या रुपात मी एक कृतीशील समाजसेवक आणि त्यांच्या कामात सावलीसारखी साथ देणारी माझी आई एक आदर्श पत्नी, जी मी पाहतो त्यात मला एक आदर्श दाम्पत्य दिसतं. मी त्यांना अद्वा-तद्वा भांडतांना कधी पाहिलंच नाही. मला त्यांचा हेवा वाटतो. ते एका धेय्याने पछाडलेत. समाजाला घडविण्याचं ते धेय्य. त्यातूनच २०१४ साली जन्म झाला अपरांती अकॅडेमिचा. आज आमच्या अकॅडेमिला ७ वर्षे झाली. २०० च्या वर विद्यार्थ्यांनी माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. गेलं एक वर्ष मी पहातोय. माझे वडील दररोज ३ तास लंडनवरून विद्यार्थ्यांना, झूम वरून, ऑनलाईन शिकवतात. अनेकदा मी समोर बसून त्यांच्या शिकवण्याचा लाभ घेतो.
माझे आजोबा, जे आता हयात नाहीत त्यांनी प्रत्यक्ष नागपूरला जाऊन बाबासाहेबांच्या हस्ते बुद्धधम्माची धम्मदीक्षा घेतली. माझी आज्जी मराठी साहित्यात एम. ए. असून मराठीत खूपच छान भाषण करते. आज्जीने ‘माझी मी’ नावाचं मराठी साहित्यात गाजलेलं तिचं स्वकथन लिहिलंय. माझ्या मोठ्या संघजा आत्याच्या यजमानांनी, लिहिलेला धडा मी अकरावीला असतांना त्यांच्याकडूनच शिकून घेतला. वडील पोलीसाच्या नोकरीत व्यस्त असल्याने माझ्या शालेय जीवनात मला आईनेच बरचसं शिकवलं. वडिलांनी शिकवलेल्या जगाच्या इतिहासाचे नकाशे आजही माझ्या संग्रही आहेत आणि मला कम्युनिझम आणि कॅपिटालीझम समजण्यासाठी साठी पुस्तकांचा आधार घ्यावा लागला नाही. एखादी गोष्ट लावून धरून करत राहणे म्हणजेच सातत्य टिकवणे हा माझ्या आईचा गुण आणि वडिलांचे वाक्चातुर्य मला आजही खूप अनुकरणीय वाटतं. माझी आई एम.ए. समाजशास्त्र फर्स्ट क्लास असून २००६ पासून लंडन मध्ये डोमेस्टिक व्हायलन्स ऑफिसर चं काम करताना तिने स्वतःच्या, एका वेगळ्या विश्वाला आकार दिलाय. बहीण संगिनी यंदा इंग्लंड मधून एम.बी.ए. होईल. शिक्षणाच्या क्षेत्रात वडिलांनी स्वतःचा एक वेगळाच दबदबा निर्माण केलाय. ते एम.बी.बी.एस., एम.डी. जेजे हॉस्पिटलचे मेडिकल डॉक्टर असून, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांमध्ये एम.ए. आहेत. ते एल.एल.बी. असून लंडनमधून त्यांनी गुन्हेगारीशास्त्राचा अभ्यास करून ग्रीनिच विद्यापीठातून एम.एस.सी. ही पदवी मिळविली आहे. सध्या ते जात निर्मूलनाच्या संदर्भात पी.एच.डी. करण्यासाठी लंडनला आले असून लौकरच ते एल.एल.एम. ची पदवी ग्रहण करतील. त्या दिशेने त्यांचे मार्गक्रमण चालू आहे.
चला समाज घडवूया.
मी बॅरीस्टर झालो. आता माझ्या समोर लक्ष्य आहे समाज घडविण्याचं. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं. बाबासाहेबांच्या पश्च्यात ९९ वर्षांनी, एक आंबेडकरी विचारांनी प्रभावित असलेला, अर्थातच आंबेडकरी विचारधारेवर मार्गक्रमण करणारा, माझ्या रुपात बॅरीस्टर घडला त्याचं श्रेय मी शाहू फुले आंबेडकरांना देतो. आई-वडील तर आहेतच पण वैचारिक विचारधाराही महत्वाची. बॅरीस्टरहोणे म्हणजे नक्की काय आणि ते किती कठीण आहे? ते मी सविस्तर माझ्या आगामी पुस्तकात मांडणार आहे. आणि हो, फी भरली कि बॅरीस्टर होतो हे कृपया विद्यार्थी तसेच पालकांनी डोक्यातून काढून टाकावे. नाहीतर उगाच अनुकरणाच्या नादात आर्थिक नुकसानीत जातील. काळजी घ्या. मी आहेना मार्गदर्शनासाठी ! समाज बांधवांना मार्गदर्शन करणे मी माझे कर्तव्य समजतो.
आजच्या क्षणाला आपल्याकडे बॅरीस्टर संवेदन ग्रुप पहिला आणि दुसरा असे मिळून ५०० सदस्य आहेत. आय.टी. आणि हॉस्पिट्यालीटी वगळता ईतरही मार्ग परदेशातल्या शिक्षणाचे आहेत हे मी नम्रपणे नमूद करू ईच्छितो.
एक वेब-पोर्टल डीझाईन करून मी त्या सगळ्या शैक्षणिक प्रवाहांची आणि त्यासोबतच विद्यापीठांची माहिती, कोर्स पिरिएड सह फी स्ट्रक्चर देणार आहे. जर शिष्यवृत्या उपलब्ध असतील तर तेही कळविले जाईल.
एक सशक्त, समृद्ध आणि प्रबुद्ध समाजाची निर्मिती करणे हे असणारआहे माझे धेय्य. माझ्या या धेय्याच्या यशस्वितेसाठी मार्ग आहे बुद्धाचा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा. अर्थात माझे आई-वडील आणि माझी बहीण संगिनी माझ्या सोबत आहेच. आपले सहकार्य मी गृहीत धरलेय धम्म बंधू-भगीनिंनो !
जय भिम !
आपला,
बॅरीस्टर संवेदन अपरांती,
ग्रेज इंन, लंडन.
More Stories
दीक्षाभूमीवर क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
कवी साहित्यिक किरण लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त काव्यसंमेलन, बक्षीस वितरण
बुद्ध धम्म समजणे म्हणजे काय ? What is understanding Buddha Dhamma ?