भाकरीचा चंद्र पोटात ढकलण्यासाठी दिला असतात,
तर चांदण्यांचे गोडवे मीही गायले असते.
पत्थरांच्या मुखवट्यांचे अवास्तव अवडंबर माजविले नसतेत,
तर फुलांचे कोमलपण मीही अजमावले असते.
धर्माच्या नावाने अधर्म केला नसतात,
तर मीही गर्वाने म्हटले असते.
मित्रा,
तुमच्याच हाताने तुम्ही जर मनुस्मृतीला वेळीच आग लावली असतीत,
तर कदाचित प्रेमकाव्येसुध्दा मी प्रसविली असती.
श्रावणात घननिळा गायला असता,
आनंदी आनंद गडे पाह्यला असता,
भातुकलीचा खेळ मांडून पाडगांवकरालाही खिजविले असते,
तुझ्या उसाला लागल कोल्हा म्हणून गदिमालाही लाजविले असते.
म्हणून सांगतो मित्रा,
पुन्हा माझ्याकडून असल्या कवितांची अपेक्षा करू नकोस.
तुला वाटल्यास तू भरल्या पोटी……
चंद्राची कविता लिही,
चांदण्यांची लिही,
फुलांची लिही नाहीतर मुलांची लिही.
माझे काहीही म्हणणे नाही.
पण मी मात्र…….
फक्त संघर्षाचीच कविता लिहणार आहे,
फक्त संघर्षाचीच कविता!
– विवेक मोरे
मो.९४५१९३२४१०
More Stories
बाबा तुम्ही नसतात तर
बुद्धपौर्णिमेचं चांदणं
रात्र ती वैरीण