November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्ध आणि त्यांचा धम्म – भाग दुसरा – ६. समस्येचा नवीन दृष्टिकोणातून विचार

The Buddha and His Dhamma,

📚 बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 डॉ. भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ

प्रथम खंड :  भाग दुसरा  – कायमचा गृहत्याग.

🌼 ६. समस्येचा नवीन दृष्टिकोणातून विचार 🌼

१. शाक्यात आणि कोलीयात शांतता प्रस्थापित झाल्याचे पाच परिव्राजकांनी सांगितलेले वर्तमान सिद्धार्थाला अत्यंत अस्वस्थ करू लागले.

२. एकांतात तो आपल्या स्थितीचा पुनर्विचार करू लागला. परिव्राजक म्हणून पुढेही असेच जीवन जगण्याचे काही औचित्य आहे काय याचा तो विचार करू लागला.

३. “मी आपल्या लोकांना कशासाठी सोडले ?” त्याने स्वतःलाच प्रश्न केला.

४. युद्धाला माझा विरोध म्हणून मी गृहत्याग केला. आता युद्धाची शक्यताच समाप्त झाली. आता माझ्यासाठी कोणती समस्या शिल्लक आहे ? युद्ध समाप्त झाल्याने माझ्या समस्याही समाप्त झाल्या काय ?

५. गहन विचारांती त्याला नकारात्मक उत्तर मिळाले.

६. युद्धाची समस्या ही मुळातच हितसंघर्षाची समस्या आहे. युद्ध समस्या ही एका व्यापक बृहत् समस्येचा भाग आहे.

७. हा संघर्ष राजे आणि राष्ट्र यांच्यातच नाही तर, क्षत्रिय आणि ब्राह्मणात आहे. गृहस्था गृहस्थांत आहे, माता आणि पुत्रात आहे, पिता आणि पुत्रात आहे, भगिनी आणि बंधूत आहे, मित्रा मित्रांत आहे

८. राज्यातील संघर्ष हा प्रसंगोपात्त असतो. परंतु वर्गसंघर्ष हा निरंतर आहे आणि हेच या जगी वेदना आणि दुःखाचे मूळ कारण आहे.

९. मी युद्धाच्या कारणास्तव गृहत्याग केला आहे हे खरे आहे. परंतु शाक्य आणि कोलीय यांच्यातील युद्ध समाप्त झाले म्हणून मी काही स्वगृही परत जाऊ शकत नाही. मला स्पष्ट दिसते की माझी समस्या व्यापक विशाल रूप धारण करून माझ्या समोर उभी आहे. मला या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे निदान शोधावयाचे आहे.

१०. पुरातन प्रस्थापित दर्शने या समस्येचे कोणते निदान प्रस्तुत करतात ?

११. यापैकी एखादे सामाजिक दर्शन मला स्वीकारार्ह आहे काय ?

१२. त्याने स्वतःच प्रत्येक गोष्टीचे (दर्शनाचे) परीक्षण करण्याचा निर्धार केला.

भाग २ – कायमचा गृहत्याग
भाग २ समाप्त…..