📚 बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 लेखक : भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ
प्रथम खंड : भाग पहिला – जन्म ते प्रव्रज्या.
🔷 ६. बालपण आणि शिक्षण 🔷
१. जेव्हा सिद्धार्थ बोलू चालू लागला तेव्हा शाक्य समुदायातील थोर मंडळी एकत्र बसली. त्यांनी शुद्धोदनाला सूचित केले की बालकास ग्रामदेवी अभया हिच्या मंदिरात न्यावे.
२. शुद्धोदनाने यास सहमती दर्शविली व महाप्रजापतीला बालकाला वस्त्रालंकृत करण्यास सांगितले.
३. जेव्हा महाप्रजापती सिद्धार्थाला वस्त्र प्रावरणांनी अलंकृत करीत होती तेव्हा सिद्धार्थ मृदू आवाजात आपल्या मावशीला विचारता झाला की, त्याला कोठे नेण्याची तयारी होत आहे. जेव्हा त्याला समजले की, त्याला मंदिरात नेणार आहेत तेव्हा त्याने स्मित हास्य केले. शाक्यांच्या चालीरीतीचे पालन म्हणून तो मंदिरात गेला.
४. वयाच्या आठव्या वर्षी सिद्धार्थाचा शिक्षणक्रम सुरू झाला.
५. महामायेच्या स्वप्नाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी ज्या आठ ब्राह्मणांना आमंत्रित करण्यात आले होते आणि ज्यांनी त्या बालकाचे भविष्य वर्तविले होते ते आठ ब्राह्मण सिद्धार्थाचे प्रथम गुरू होत.
६. त्या ब्राह्मणांनी त्यांना अवगत ज्ञान सिद्धार्थाला दिल्यानंतर शुद्धोदनाने उदिच्च देशातील विद्वान घराण्यातील विद्वत्तासम्पन्न व उच्चकुलोत्पन्न अशा सब्बमित्ताला गुरू म्हणून आमंत्रित केले. सब्बमित्त हा भाषाविद्, वैयाकरणी, वेद वेदांग आणि उपनिषदांचा ज्ञाता होता सुवर्णाच्या झारीतून हातावर दानाचे उदक सोडल्यानंतर शुद्धोदनाने बालकाला सब्बमित्ताच्या स्वाधीन केले. सब्बमित्त हा सिद्धार्थाचा दुसरा गुरू होय.
७. सब्बमित्ताजवळ सिद्धार्थाने त्याकाळी प्रचलित अशा सर्व दर्शनशास्त्रांचे अध्ययन केले.
८. याशिवाय सिद्धार्थाने भारद्वाजाकडून चित्ताची एकाग्रता आणि समाधी यासंबंधी प्रशिक्षण प्राप्त केले. भारद्वाज हा आलार कालामचा शिष्य होता. त्याचा आश्रम कपिलवस्तू नगरीतच होता.
The Buddha and His Dhamma | भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म | बुद्ध आणि त्यांचा धम्म
More Stories
Buddha and his Dhamma बुद्ध आणि त्याचा धम्म
🌼 मल्लांचा विलाप आणि एका भिक्खूची प्रसन्नता. 🌼 The lament of a warrior and the joy of a monk.
आत्मा आणि पुनर्जन्म या सिद्धांताचे आलोचक