जन्म – १५ ऑक्टोबर १९०२ ( दिंडोरी,नाशिक )
स्मृती – २९ डिसेंबर १९७१ ( नवी दिल्ली )
भाऊराव कृष्णराव गायकवाड उर्फ दादासाहेब गायकवाड हे भारतीय राजकारणी, समाजसेवक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी होते. गायकवाड हे आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष होते, तसेच पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते. मुंबई विधानसभेचे सदस्य (आमदार), लोकसभा सदस्य व राज्यसभा सदस्य ( खासदार ) म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे.
बाबासाहेबांच्या अनेक कामांत दादासाहेबांचा सहभाग होता. २ मार्च १९३०च्या वेळी डॉ.आंबेडकरांना दादासाहेबांची खूप मदत झाली. अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि बाबासाहेबांच्या पुढाकाराने दिलेल्या लढ्याचा एक भाग म्हणजे हा सत्याग्रह होता. नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहात त्यांचा सहभाग मोलाचा होता. १४ ऑक्टोबर १९५६ मध्ये दादासाहेब गायकवाड यांनी डॉ. आंबेडकरांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. १९३७-४६ या काळात गायकवाड मुंबई विधानसभेचे, तर १९५७-६२ या काळात लोकसभेचे सदस्य होते. १९५७-५८ मध्ये ते लोकसभेत रिपब्लिकन पक्षाचे नेते होते. १९६२-६८ दरम्यान ते राज्यसभेवर सदस्य म्हणून कार्यरत होते. दादासाहेब यांच्या मृत्यू नंतर त्यांचे गुणवर्णन करणारे आणि त्यांची कार्याची माहिती देणारे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यांतील काही :
* ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दादासाहेब गायकवाडांना पत्रे’ या नावाचा मराठी व इंग्रजी ग्रंथ प्रा. वामन निंबाळकर यांनी संपादित केला आहे.
* ’आंबेडकरी चळवळीतील दादासाहेब गायकवाड यांचे योगदान’ – लेखक डॉ. अविनाश दिगंबर फुलझेले
* दादासाहेब गायकवाड यांच्या कार्याची माहिती देणारा ’पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ नावाचा गौरवग्रंथ रंगनाथ डोळस यांनी लिहिला आहे.
* अरुण रसाळ यांचा ’जननायक कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ हा ग्रंथ.
* भावना भार्गवे यांचा ’लोकाग्रणी दादासाहेब गायकवाड’ हा ग्रंथ.
* कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे एक चरित्र त्यांचे जावई आणि आंबेडकरी चळवळीच्या महत्त्वपूर्ण कालखंडाचे साक्षीदार अॅड. हरिभाऊ पगारे यांनी लिहिले आहे.
* दि.रं. भालेराव यांनीही ’कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ या नावाचे एक छोटे चरित्रवजा पुस्तक लिहिले आहे.
पुरस्कार व सन्मान :
* कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाद्वारे २००२ पासून दिला जाणारा पुरस्कार आहे.
* दादासाहेबांच्या नावाने महाराष्ट्र राज्य सरकारची ’कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना’ या नावाची एक योजना २००४ पासून आहे. २०१२ साली तिचा लाभ ३८ भूमिहीनांना झाला होता. मात्र त्यापूर्वी केवळ २५० लोकांना जमिनी मिळाल्या होत्या.
* भारत सरकारने गायकवाडांना १९६८ मध्ये पद्मश्री हा पुरस्कार दिला.
* नाशिकमध्ये एका सभागृहाला ’दादासाहेब गायकवाड सभागृह’ नाव दिले आहे.
* मुंबईत अंधेरी भागात ‘दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र’ नावाची संस्था आहे.
* दादासाहब गायकवाड यांचा परिचय करून देणारी एक १३ मिनिटांची ‘डॉक्युमेंटरी फिल्म’ आहे.
More Stories
भारत देशामध्ये प्रथमच भिकूंच्या अस्थि जतन करण्याचा निर्णय घेतला – बुद्धिस्ट भारत टीम
भगवान बुद्धांच्या धम्माच्या प्रचारासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा. – भन्ते बूनली
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी पोलीस अधीक्षकांवर खुनाचा गुन्हा दाखल करा : राहुल डंबाळे